गुरुवार, २७ जुलै, २०१७

कुंडलीतील रंग

कुंडलीतील  रंग 

रंग म्हटलं की मला आमच्या शाळेतील मराठी विषयाचा एक धडा आठवतो - ही तेंव्हाची गोष्ट आहे जेंव्हा पृथ्वीवरील फुलांना स्वतःचे रंग नव्हते. सर्व फुले पांढऱ्या रंगाचीच. फुलांनी इंद्रधनुष्याकडे रंग देण्याची विनंती केली. मग इंद्रधनुष्याने पृथ्वीवरील सर्व फुलांना रंग द्यायचे ठरवले. सर्व फुले खूश झाली. इंद्रधनुष्याने भल्या पहाटे हा कार्यक्रम सुरु केला. सर्व फुले वेळेत हजर झाली परंतु काही आळशी फुले आपल्या झोपेमुळे ह्या कार्यक्रमाला हजर राहू शकली नाहीत. ती फुले म्हणजे अनंत, मोगरा,जाई, जुई, निशिगंध इ. झोपेतून जागे झाल्यांनतर सर्व रंगीबेरंगी फुलांना पाहून ही आळशी फुले लगबगीने इंद्रधनुष्याकडे रंग मागण्यास जाऊ लागली परंतु इंद्रधनुष्य केंव्हाच निघून गेले होते. मग त्या फुलांना इतर देवतांनी उच्च प्रकारचे सुगंध दिले. म्हणूनच ज्या फुलांना रंग आहेत त्यांना सुवास नाहीत आणि ज्या फुलांना सुवास आहेत त्यांना रंग नाहीत.

रंग मनुष्याला अनादीकाळापासूनच भुलवत आले आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या रंगाच्या आवडी वेगळ्या आहेत. त्याला आवडण्याऱ्या रंगाचे कपडे, गोष्टी त्याला आवडतात. अगदी घरात भिंतींनासुद्धा त्याच्या आवडीचा रंग असतो. आपण ठराविक रंगाकडे आकृष्ट होतो ह्याचे कारण म्हणजे आपला स्वभाव. हो आपला स्वभावच आपल्याला एखाद्या ठराविक रंगाकडे आवड असण्याला कारणीभूत असतो. उदाहरणच घ्यायचे झाल्यास - ज्या व्यक्तींनाच स्वभाव हा तापट असतो किंवा प्रत्येक गोष्ट त्यांना वेगाने झालेली हवी असते अशा लोकांचा कल हा लाल आणि काळा ह्या रंगांकडे असतो. आहे ना गंमत ? 

तुमच्या स्वभावामुळे तुम्हांला अमुक एका रंगाचे नेहमीच आकर्षणात वाटते. कपाटात आवडत्या रंगाचे ढीगभर कपडे असले तरीसुद्धा नवीन कपडे घेतांना तुमची नजर त्याच रंगाच्या कपड्यांकडे वळते. आणि मग घरच्यांकडून खरपूस समाचार मिळतो - त्याच त्याच रंगाचे किती कपडे झालेत कपाटात ?? तुला दुसरा कुठला रंग आवडतो की नाही तूला ? अर्थात आपले उत्तर "नाही"  असेच असते बरोबर ना ?

तर आजचा आपला विषय आहे कुंडलीतील रंग. रंगांचा आपल्या जीवनावर होणार परिणाम किंवा आपल्या जीवनशैलीमुळे आपल्याला आवडणारा रंग.

 पहिला रंग आहे - तांबडा (Red ) - तांबडा रंग म्हणजे म्हणजे भडक लाल. सूर्योदयाच्यावेळी आकाशात जी आभा निर्माण होते ती असते तांबड्या रंगाची. लाल रंग हा प्रेमाचा आहे. लाल हा रंग रक्ताचा सुद्धा आहे. ज्यांना हा रंग आवडतो त्यांचा स्वभाव अर्थात तापट असतोच परंतु ह्या लोकांची प्रत्येक गोष्टीत असलेली घाई त्यांना घातक ठरू शकते. हा रंग आवडणाऱ्यांचा पत्रिकेत "मंगळ" बलवान असतो. ह्यांना खाण्यातही पावभाजी, मिसळ असे तत्सम मसालेदार आणि चमचमीत पदार्थ आवडतात. अशा लोकांनी लाल रंगाचा वापर कमी करून काहीवेळेस निळा आणि पांढरा रंग वापरून स्वभावात बदल आणू शकतील. स्वभाव शांत होण्यास मदत होईल.

दुसरा रंग आहे - नारिंगी (Orange) - नारिंगी म्हणजेच भगवा रंग. नारिंगी रंग आहे जल्लोष आणि उत्साहाचा.  ह्या रंगाकडे ज्यांचा कल असतो त्यांच्या कुंडलीत "रवि" बलवान असतो. सूर्य जसा वेळेवर उगवतो आणि मावळतो तशी ह्या लोकांच्या आयुष्यात शिस्त असते. अशा व्यक्तिंची इतर लोकांवर छाप लवकर पडते. ह्यांना सर्व उच्च प्रतीच्या गोष्टी आवडतात. जेवतील तर फक्त फाईव्ह स्टार हॉटेलमध्येच,प्रवास विमान किंवा स्वतःच्या गाडीने. रेल्वे किंवा बसने ह्यांनी क्वचितच प्रवास केलेला असतो. ह्यांच्यात जात्यातच नेतृत्व गुण असतात. काहीवेळेस स्वतःच्या स्वभावामुळे कुटुंबापासून दुरावा येतो. ह्या लोकांनी पांढऱ्या रंगाचा वापर केल्यास भावनिकदृष्ट्या कुटुंबियांशी जवळीक साधता येईल. ज्या लोकांना स्वभावात नेतृत्वगुण अवलंबवायचे असतील त्यांनी नारिंगी रंगाचा वापर करावा. आपल्या ऋषीमुनींही भगव्या रंगाचा अवलंब केला आहे.

तिसरा रंग आहे - पिवळा (Yellow ) - पिवळा रंग आहे ज्ञानाचा,नव्या कल्पनांचा. ज्ञानलालसा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. पिवळा रंग आहे विष्णूचा आणि लक्ष्मीचा. पवित्र हळदीचा रंगही पिवळाच. ह्यांचा स्वभावात तारतम्य असतं. ह्यांची बुद्धी उच्चं प्रतीची असते. वागण्यात प्रगल्भता असते. दुसऱ्या व्यक्तींना समजून घेण्याच्या वृत्तीमुळे ह्यांचा मित्रपरिवार मोठा असतो. ह्या व्यक्तिंना गोड पदार्थ जास्त आवडतात. प्रगल्भता आणि परिपक्वतेमुळे ह्या रंगाचा विशेष वापर वास्तुशास्त्रात शयनगृहात करण्यास सांगितला आहे. ह्या रंगाच्या वापरामुळे स्वभावातील तापटपणा आणि घाई ह्यावर नियंत्रण येण्यास मदत होते. पत्रिकेत "गुरु" बलवान असलेल्या व्यक्तिंना पिवळ्या रंगाचे विशेष अप्रूप असते. पत्रिकेत गुरु निर्बली असल्यास पिवळा रंग वापरावा. नात्यात स्थिरता आणायची असल्यास पिवळ्या रंगाचा वापर व्हावा.

चौथा रंग आहे - हिरवा (Green ) - हिरवा रंग आहे वसुंधरेचा,नव्या पालवीचा. गुढीपाडव्याच्या दिवशी निसर्गाकडे एक नजर पहाल तर लक्षात येईल की वसुंधरा हिरव्या शालूने नटली आहे. सोनेरी झेंडूची फुले त्या शालूची शोभा वाढवीत आहेत. हिरवा रंग आहे नव्या उमेदीचा आणि म्हणूनच आधीच्या इस्पितळात हिरव्या रंगाचे पडदे वापरण्याची पद्धत होती. आजारपणाने खचलेल्या व्यक्तिला ह्या रंगामुळे नवी उभारी मिळावी हा उद्देश. हिरवा रंग ज्यांना आवडतो त्यांची तर्कबुद्धी (Common Sense ) छान असते. बोलघेवडे असतात. हजरजबाबी असतात. नव्या उमीदीने,उत्साहाने प्रत्येक गोष्ट सुरु करतात. ह्यांना निरनिराळ्या प्रांतातील पदार्थ चाखून बघायची आवड असते.  ज्यांच्या पत्रिकेत "बुध" बलवान असतो त्यांना हिरव्या रंगाचे आकर्षण असते. ज्यांना स्वतःची तर्कबुद्धी तेज करायची असेल त्यांनी हिरव्या रंगाचा वापर अंमलात आणावा. आजारी व्यक्तिच्या आसपास हिरव्या रंगाचा वापर केल्यास फायदा होतो. बाहेरच्या देशात झालेल्या एका संशोधनात हे सिद्ध झाले आहे की दृष्टी अधू किंवा चष्मा असलेल्या व्यक्तिंनी सतत हिरवळीकडे पहात राहिल्यास दृष्टीत सुधारणा होते.

पाचवा रंग आहे - निळा (Blue ) - निळा रंग आहे शांततेचा.  गडद निळ्या रंगाचे टी -शर्ट घालून माझ्याकडे येणाऱ्या व्यक्तिच्या कुंडलीत हमखास "शनि" बलवान आढळतो. अशा व्यक्तिंना धर्म-जप -मंदिर ह्याचे वावडे असते. त्यांना आयुष्यातील प्रत्येक गोष्टीकडे व्यवहारिक दृष्टीने पहायची सवय असते. प्रत्येक गोष्टीचे त्यांना  विश्लेषण (analysis ) हवे असते. वरवर पहाता ह्यांचा स्वभाव शांत वाटतो कारण ह्यांना उगीचच बडबड करण्याची सवय नसते. ते एकच वाक्य बोलतील आणि ते समोरच्या व्यक्तीला बरोबर समजेल. शोले फिल्ममधील अमिताभ आठवतोय ? फार न बोलता एकाच वाक्यात मतितार्थ सांगण्याची खुबी ह्यांच्याकडे असते. ह्या व्यक्तिंना सामाजिक समारंभात अजिबात स्वारस्य नसते. एकांतप्रिय व्यक्ति असतात. आळस असतोच. अशा व्यक्तिंनी  Social होण्यासाठी आणि आळस घालवण्यासाठी नारिंगी रंगाचा वापर करणे उचित ठरेल.

सहावा रंग आहे गुलाबी - (Pink ) - गुलाबी रंग आहे प्रेमाचा. गुलाबी रंग हा स्त्रीतत्वाशी जोडला जातो. ज्यांना गुलाबी रंग आवडतो त्यांच्या पत्रिकेत "शुक्र" बलवान आढळून आलेला आहे. अशा व्यक्तिंना नटण्या -मुरडण्याची आवड जात्यातच असते. कल्पनाविलास असतो. ह्यांना थंड आणि गोड पदार्थ जास्त आवडतात. आयुष्याबद्दल नाहक आणि वेगळ्या कल्पना असतात. बुद्धी अजिबात स्थिर नसते. ह्यांचे "Imagination" चांगले असते. आपले सर्व नट,शिल्पकार, चित्रकार, इंटेरिअर डिझायनर,फॅशन डिझायनर,ब्युटी पार्लर इ. शुक्राच्या अंमलाखाली येतात. जन्मतः कलाकार व्यक्ती म्हणजे शुक्र. ज्यांचा व्यवसाय इंटेरिअर, फॅशन, फोटोग्राफीशी, ब्युटीपार्लर असा आहे त्यांनी गुलाबी रंगाचा वापर करावा. शुक्रप्रधान व्यक्ति गोष्टींचे प्रेझेन्टेशन फार छान पद्धतीने करू शकतात.  व्यावसायिक व्यक्तिंनी प्रेसेंटेशनच्या वेळेस शुक्र प्रधान व्यक्तिंना ह्या कामासाठी अँपॉईंट करावे. नक्कीच फायद्याचे ठरेल.

सातवा रंग आहे पांढरा - (White) - पांढऱ्या रंगात सर्व रंग सामावलेले असतात. पांढरा रंग हा उच्च कोटीचा मानला गेला आहे. पवित्र मानला आहे. म्हणूनच आपल्या धार्मिक गोष्टींमध्ये पांढऱ्या रंगाला महत्त्व आहे. सरस्वतीदेवीचा रंग आहे पांढरा. उच्चकोटीची विद्वता हवी असेल तर अशा लोकांनी पांढऱ्या रंगाचा वापर करावा. पांढरा रंगसुद्धा शांततेचे प्रतिक आहे. पांढरा रंग शरणागतीचा आहे. शरणागती विद्वतेपुढे. फुकाचा अहंकार मागे टाकून आपल्यातल्या तेजाकडे (देवत्वाकडे ) जाऊ पाहणाऱ्यांनी जरूर ह्या रंगाचा वापर करावा. ज्यांचे मन अशांत आहे त्यांनीही ह्या रंगाचं वापर करावा.

वर जी मी फुलांची गोष्ट सांगितली होती ती इथे तंतोतंत पटते. पांढऱ्या सर्व फुलांना रंग नसला तरी उच्च प्रकारचा  सुवास आहे. इंद्रधनुष्याकडून इतर फुलांवर विविध रंगाची उधळण होत असतांना ही फुले मात्र आपल्याच तेजात रममाण होती. अशा लोकांचा स्वभाव हीच त्यांची ओळख असते. शांतपणा हा ह्यांचा गुणधर्म.

तर असे हे रंग. रंगाच्या सततच्या वापराने आपण जरूर आपल्या स्वभावात फरक घडवून आणू शकता. अर्थात त्यासाठी कुंडलीतले कुठले ग्रह निर्बली आणि बलवान आहेत ते जाणकार ज्योतिषांकडून जाणून घ्या.  रंगाचा वापर म्हणजे नुसतेच त्या रंगाचे कपडे असे नसून, तुम्ही त्या अमुक रंगाचे पेन जवळ बाळगू शकता. त्या रंगाची पाण्याची बाटली जवळ ठेवू शकता. बघा प्रयोग करून.

प्रतिक्रिया नक्की कळवा. - anupriyadesai@gmail.com
















बुधवार, १२ जुलै, २०१७

कुंडलीतील मंगळाचा वचक

कुंडलीतील मंगळाचा वचक 


मंगळाला मंगळाचीच मुलगी असावी म्हणजे बरे असते. नाहीतर मृत्यू  एकाचा मृत्यु होतो. ही वाक्य तुम्ही  ऐकलेली असतीलच. परंतु असे का ? ह्याचे कारण कधी शोधण्याचा प्रयत्न केला आहे का ? मुलीच्या,मुलाच्या लग्नापर्यंत कुंडलीवर विश्वास नसणारे पालक,कुंडलीचा चक्क अभ्यास करू लागतात. मग मुलांचे नक्षत्र, राशी, नाडी,गण तोंडपाठ होतात. अमुक अमुक राशीची मुलगी चालेल किंवा नाही ह्याची सुद्धा इत्यंभूत माहिती पालकांना असते. त्यांना आपल्या कामापुरते ज्योतिष माहिती होते. चांगली गोष्ट आहे, परंतु अर्धवट ज्ञानाने नेहेमीच नुकसान होते हे लक्षात असु दे.

तर आजचा आपला विषय आहे -  मंगळ दोष म्हणजे काय ?

मुळात कुंडलीत मंगळ असणे हा दोष का मानला जातो ? हा गैरसमज कोणी (जाणून-बुजून)पसरवला ? मला कल्पना नाही. मग त्यानंतर कुंडलीतल्या त्या मंगळाला जाती आल्या. सौम्य मंगळ,उग्र मंगळ वगैरे. मग ह्याचा परिहार म्हणून त्याची शांती किंवा मंगळीक व्यक्तीचा अमुक अमुक गोष्टींबरोबर विवाह लावणे इ. त्याने मंगळ शांत होतो म्हणे. किंवा मग वयाच्या  २७ व्या वर्षी विवाह केल्यास मंगळाचा दोष नाही. असं खरंच असतं का ?

आमच्या मुलीच्या पत्रिकेत मंगळ आहे का ? असे विचारणाऱ्या पालकांना सांगावेसे वाटते,"अहो मंगळच काय तुमच्या मुलीच्या कुंडलीत सर्वच ग्रह आहेत."  मंगळाचा एवढा वचक का बरं ? त्यासाठी मंगळाला आधी समजून घेऊ. मंगळ म्हणजे धडाडी. मंगळ म्हणजे सळसळतेपणा. शांत बसणे हे त्यांना माहीतच नसतं. बोलण्यांत स्पष्टपणा आणि चालण्यांत वेग हीच मंगळाची ओळख. बोलणे टोमणेवजाच असते. गुळमुळीत बोलणे त्यांना जमतच नाही. शरीर काटक आणि बळकट असते. आळसांत सुट्टीचा दिवस कसा व्यतीत करतात हे त्यांना माहित नसते. सुट्टीच्या दिवशी कोणती कामे आटोपून घ्यायची हे त्यांचे आधीच ठरलेले असते. स्वतःही कामे करतील आणि दुसऱ्यांनाही शांत बसू देणार नाहीत. ज्योतिष -शास्त्रात मंगळाला सेनापतीची उपमा दिली आहे. राजाने आदेश द्यावा आणि सेनापतीने युद्धभूमीवर सैनिकांकडून लढाई करवून शत्रूवर चढाई करावी म्हणजेच मंगळ. मंगळीक व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे येते. त्यांच्या ह्या कर्तुत्वाला जोडीदाराच्या सहकार्याची गरज भासते.

अधीरता,अतिघाई, वर्चस्व गाजवणे हा झाला मंगळाचा स्वभाव. वय जसं जसं वाढत जातं तसं तसा मंगळाची अधीरता कमी होते,राग कमी होतो. त्यामुळे मंगळ असलेल्या व्यक्तीचे लग्न वयाच्या २७व्या वर्षी किंवा नंतर झाले म्हणजे कुंडलीतला मंगळ दोष गेला किंवा राग कमी झाला असे गृहीत धरतात. पण ते तितकेसे खरे नाही असे मला वाटते. कारण मंगळाचा स्वाभाविक गुणधर्म हा कायमच रहातो. २७व्या वर्षांनंतर फरक एवढांच होतो की राग कधी व्यक्त करावा आणि कधी करू नये ह्याची समज मंगळीक व्यक्तीला आलेली असते. मंगळीक व्यक्ती "प्रॅक्टिकल" असते. चटकन होणारी कार्य त्यांना आवडतात. फार रेंगाळणारी कामे मंगळीक व्यक्ती सोडून देतात.

मंगळाची दुसरी बाजू म्हणजे, मंगळाचा संबंध मानवाच्या लैंगिक गरजांशी आहे. मंगळ असलेल्या व्यक्तींची लैंगिक इच्छा प्रबळ असतात. मंगळ असलेल्या व्यक्तींची ह्या विषयांत असलेली अधीरता आणि ह्या विषयांतील कल्पना ह्या सामान्य व्यक्तींपेक्षा वेगळ्या असतांत. आणि त्यांच्या ह्या गरजा मंगळ असलेलेही त्यांची पत्नीच समजून घेऊ शकते. मंगळ व्यक्तींमध्ये शारीरिक क्षमता जास्त असते. मंगळाला हळुवारपणा,रोमांस हे प्रकार जमत नाहीत.

जर मंगळ असलेल्या व्यक्तीचा विवाह सामान्य व्यक्तीबरोबर म्हणजेच मंगळ नसलेल्या व्यक्तीबरोबर झाला तर काय होईल ?  मंगळ हा मुळातच धडाडीचा ग्रह. हळुवारपणा,गुळमुळीत बोलणे,नाजूकपणा हे मंगळाचे गुणधर्म नाहीत. आणि असे गुणधर्म असलेल्या व्यक्तींबरोबर त्यांचे फारकाळ जमतही नाही. त्यांचा मित्र परिवारही त्यांच्या सारखाच असतो. स्वभावात असलेला रांगणेपणा, तडफदारपणा,आव्हानात्मक भूमिका घेणे,प्रत्येक गोष्ट तीव्रपणे व्यक्त करण्याची वृत्ती ह्यामुळे त्यांनी लग्न करतांना आपला साथीदारही साधारपणे ह्याच स्वभावाचा असावा हे पहावे. अन्यथा त्यांचा कोंडमारा होण्याची शक्यता असते. कोंडमारा म्हणजे कसा ?  तर समजा मंगळीक व्यक्तीचा विवाह शनि प्रबळ असणाऱ्या व्यक्तीबरोबर झाला तर घटस्फोट निश्चित समजा. शनि म्हणजे मंगळाच्या विरुद्ध. शनि म्हणजे प्रत्येक गोष्ट हळुवारपणे करणे, संयम असणे, शांतपणे आपले काम करणे, फार आव्हानात्मक कामे न करता फार काळ चालणारी कामे करण्यात ह्यांना रस असतो. शनि प्रधान व्यक्ती "संशोधनात्मक" कार्यात यशस्वी होतात. शनिला फार फिरण्याची आवड नसते. मंगळाला ट्रेकिंग आणि ऍडव्हेंचर अशा मैदानी खेळांची आवड आणि शनिला बैठ्या खेळांची आवड. सुट्टीच्या दिवशी मंगळ छान ट्रेकिंगचे प्रोग्राम बनवेल तर शनि ते सर्व कॅन्सल करून घरी बसायला लावेल. मग अशा शनिप्रधान व्यक्तीबरोबर जर मंगळीक व्यक्तीचा विवाह झाला तर तो किती काळ टिकेल ?

मंगळाचे असे गुणधर्म वाचल्यावर तुमच्या मनात नक्कीच हा प्रश्न आला असेल की, मग दोघेही जेंव्हा मंगळीक असतील तेंव्हा त्या लग्नाची गोष्ट कशी असेल ? दोघांनाही जेंव्हा मंगळ असतो तेंव्हा स्वभावही सारखेच असणारा. त्यामुळे दोघांमध्ये आकर्षणही तेवढेच टिकते. भांडणही होतात. भांडणाची परिणीती मारामारीतही होते. मग राग शांत झाल्यावर पुन्हा दोघे एक होतात. तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी अवस्था असते. म्हणूनच मंगळाला मंगळाचीच मुलगी असावी असे ज्योतिष -शास्त्राचे मत आहे. 

मंगळाचे गुणधर्म असलेल्या किंवा मंगळप्रधान व्यक्तीला समजून घेणे आणि त्याप्रमाणे त्याला जोडीदार शोधणे हे जबाबदारीचे काम आहे. आधीच्याकाळी व्यक्तीला मंगळ असणे म्हणजे काय हे सामान्य जनतेला सांगणे तेंव्हाच्या ज्योतिषांना प्रशस्थ वाटले नसावे. म्हणून त्यांनी जोडीदाराच्या मृत्यूचे कारण सांगून मंगळाला मंगळाचीच पत्रिका असावी ह्यांवर भर दिला. त्यामुळे खरे कारण समाजाला कधीच समजू शकले नाही आणि समाज कायम एका गैरसमाजामध्येच घाबरून राहिला. आणि ह्याचमुळे ज्योतिष -शास्त्राला दूषणे देणाऱ्यांचेही फावले. तेंव्हा मंडळी आपल्या मुलीला मंगळ असल्यास घाबरण्याची गरज नाही तर तिच्या स्वभावाला समजून घेण्याची गरज आहे. साथीदाराचा मृत्यू होतो हे गैरसमज मनातून काढून टाका. तिच्या स्वभावाला साजेसा,तिला समजून घेणारा जीवनसाथी तिच्यासाठी शोधा.
आज समाज जागृत होत आहे. ही नवी पिढी विचारांनी प्रगल्भ आहे. मुख्यतः मुलगा आणि मुलगी शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. गरज आहे ती एकमेकांना समजून घेण्याची. कारण त्यामुळेच समाज ही संकल्पना  टिकवण्यास मदत होईल. ह्या लेखाच्या निमित्ताने आजच्या पिढीला सांगावेसे वाटते की ज्योतिष शास्त्र हा विषय अत्यंत गहन आहे. तुमच्या कुंडलीवरून तुमचा स्वभाव अचूक सांगता येतो. त्यामुळे लग्नाआधी तुमच्या ज्योतिषाकडून तुमच्या होणाऱ्या जीवनसाथीबद्दल आधी जाणून घेणे फायदेशीर ठरेल. गुण किती जुळतांत ह्यापेक्षा पत्रिका किती जुळते ह्यांवर भर दिला पाहिजे तर घटस्फोट टाळता येतील.

प्रतिक्रिया नक्की कळवा - anupriyadesai@gmail.com








गुरुवार, ६ जुलै, २०१७

Horoscope and Marriage Yog



Horoscope and Marriage Yog

Once the children get settled in their career,parents are more worried about getting them married. Now a days getting married is not easy as it use to be. Previously though there was no Internet  and no proper means of Media/Communication, Marriages were  easy. But now a days it is becoming task of your life. Though thousands of profiles are available on different websites,getting a perfect match is not easy. 

Is it possible to know about your life partner from your horoscope ? Can you know about his nature ? Will he be from other caste or different religion ? Does horoscope tell about your married life ? Will it be good or there is divorced written in my destiny ? - All these questions could be answered by your Horoscope. 

In horoscope there are 12 houses and each house represents different things and persons in your life. Very First house represents yourself. How you will be ? What will be your nature ? How will be your physique ? What is your thinking pattern ? From following picture,this concept will be more clear to you. 



The house in which number 1 is written represents yourself. That is first house. Second house tells about your financial status, about your family members. Third house describes about your travelling,about your strength. Fourth house tells about your your mother,your home. From Sixth house Astrologer can tell about your Job Profile etc. Our life Partner,our Business Partner stands exactly in front of us. Yes the house in which number 7 is written unfolds the story of our Married Life. It describes about your Partner. The Rashi,the Planets which is placed in seventh house gives idea about the Life Partner and Married Life. 

  • Seventh House connected with Sun - Partner will be Enthusiastic. He will be Ambitious. Nature wise person will be Adamant. He will be Dominating. He always likes to lead. 
  • Seventh House connected with Moon -  Partner will be Emotional and Caring. In Astrology we say he will be like Motherly figure for family members and for society. He will keep doing things which will contribute in providing food to the people around. This person is fond of pets. He gets satisfaction in doing social work rather than wasting money on entertainment.  
  • Seventh House connected with Mars - Person will be Short Tempered. He will always keep himself in Competition with others. Likes speed and aggression in every aspect of life. To tune up with this person one needs to understand planet Mars first.
  • Seventh House connected with Mercury - If your life partner keeps the group alive and entertains in marriage ceremony,birthday parties, assume that you have Mercury connected to your seventh house. These kind of persons cannot  stay in isolation. They like to travel and make new friends. 
  • Seventh House connected with Jupiter - Jupiter is huge planet. This partner is fond of accumulating knowledge from different aspects. He enjoys the company of wise people. He likes to visit religious places. 
  • Seventh House connected with Saturn - Partner will be least bothered with materialistic things. He will be more of an introvert.Roaming around and watching movies on holidays is not his cup of tea. He is calm and practical. Sometimes you will feel he is lazy. 

so guys check which planet occupies your seventh house ? This description is very useful before getting married. 

Will I get married ?


To get married seventh house should be connected with Second house. Second house represents your Family. After marriage there will be addition of person in your family. So if Second house is connected then there will be Marriage Yog in your destiny. With Second house we should also consider Fifth House. In astrology,Fifth house is house of Pleasure,Romance and Progeny. After fifth, most important house is Eleventh house. Eleventh house is house of aspirations, gains,happiness through fulfillment of desires. So if this house is connected with Seventh house it gives confirmation about the event of marriage happening in one's life. 

I have come across some people who have decided not to get married. In their horoscope Seventh house is connected with Sixth House,Tenth house. These people are stuck with circumstances like ill health of parents or Job profile is more of travelling etc. 


Marriage When ? 

Though in different community marriage age differs, its the destiny which decides date of marriage. If Saturn is aspecting to Seventh house or Seventh house Lord or Moon,marriage happens after the age of 30. To get married in proper age one should have supportive Dasha as well. 

Love or Arrange ?

This is frequently asked question. Now a days people are more inclined to select their partner of their own. As they are not much ready to tackle with the problems which are faced in arrange marriage like - marrying to unknown person, family is unknown. There are chances that past events or any illness to the person has not been disclosed. 

Now a days though love marriages are common in different castes, people still are reserved about getting married into different religion. So to calculate this from your Horoscope,is not an easy task for an Astrologer. 

Seventh house connected with Fifth and Eighth house indicates Love Marriage. If Planets like Rahu is connected with Seventh house,marriage in different community is quite possible. But here too dasha should support for this Inter Caste or Inter Religion marriage. 

How will be married life ? Is there divorce written in my destiny ?

This question is usually asked to astrologers. Previously in our culture being a divorcee was not taken positively. Being divorcee and getting married for second time is now frequent and is getting slowly accepted. 

If Seventh house is connected with Sixth house or Tenth house then there will constant conflicts between couple which will lead to divorce. 

Seventh House connected with Jupiter or Mercury results in second Marriage. Even if Seven house is presented by dual sign like Pieces,Gemini,Sagittarius or Virgo divorce is possible. So if you have dual sign in your seventh house be careful while selecting Life Partner. 

Through horoscope we can get details about life partner,Marriage, Married Life,Nature And Description of Partner. We can surely use Astrology as a tool to guide us. 

Mail me your Replies here - anupriyadesai@gmail.com




बुधवार, ५ जुलै, २०१७

वास्तूशास्त्राप्रमाणे कशी असावी तुमची बेडरूम ?

वास्तूशास्त्राप्रमाणे अशी असावी तुमची बेडरूम 


संपूर्ण दिवस कामात व्यस्त असलेल्या व्यक्तीला गरज असते ते शांत झोपेची. मनुष्य एक वेळ उपवाशी राहू शकेल परंतु झोप ही प्रत्येक व्यक्तीला हवीच. शरीर आणि मन ह्या दोघांनाही शांत झोपेची गरज असते. झोप जर पूर्ण झाली तर संपूर्ण दिवस उत्साहाने काम करता येते आणि त्याच बरोबर शरीर आणि मनाचे स्वास्थ्यही सुदृढ रहाते. आजकाल बऱ्याच लोकांना जे काही आजार होत आहेत त्यात ४०% व्यक्तींना पुरेसा आहार आणि झोप मिळाली नसते.

झोप व्यवस्थित मिळावी ह्यासाठी तुम्ही तुमच्या आहाराकडे आणि  व्यायाम करण्याकडे लक्ष दिलेच पाहिजे परंतु त्याच बरोबरीने तुम्ही ज्या बेडरूममध्ये आराम करणार आहात त्या रूममधील रचना,बेड ठेवण्याची जागा, रंग, भिंतीवरील चित्रे, तिथे ठेवलेल्या वस्तू इथेही लक्ष दिले पाहिजे. कारण त्यामुळेच  आज आपण त्याबद्दल माहिती घेणार आहोत.

बेडरूमची दिशा -: संपूर्ण वास्तूत जी खोली नेऋत्य  (South - West) दिशेत असते ती खोली घरातल्या कर्त्या पुरुषाची असावी. कर्त्या ह्याचा अर्थ नुसतीच वयाने मोठी व्यक्ती नसून "कमावती मोठी व्यक्ती" असा अभिप्रेत आहे. जर दक्षिण -पश्चिमेत बेडरूम नसेल तर किमान पश्चिम किंवा दक्षिणेच्या दिशेत बेडरूम असावी. शक्यतो उत्तर दिशेत कमावत्या व्यक्तीची बेडरूम असू नये. दक्षिण ही दिशा स्थिरतेची आहे. बुद्धी स्थिर होणे, मन शांत होणे ह्यासाठी नेऋत्य ही दिशा महत्त्वाची ठरते. नेऋत्य हा शब्द निवृत्ती ह्या शब्दातून आलेला आहे. निवृत्त म्हणजेच Relax. धकाधकीच्या दिवसानंतर Relax होणायची दिशा म्हणजे नेऋत्य दिशा.

बेडची दिशा आणि आकार -:  बेडचा आकार हा शक्यतो चौरस असावा. काही वास्तूंमध्ये बेड हा गोल किंवा षट्कोनी आकारात पाहिला गेला आहे. आपल्या शास्त्रात चौरस,चौकट ह्याला महत्त्व आहे. चार दिशा असाव्यात त्यामुळे बेड हा चौरस किंवा आयताकृती आकारात असावा. बेडची चादर शक्यतो भडक लाल आणि काळी असू नये.

वि. टी. - बेड अगदी दारासमोर असू नये. बेडरूमच्या दारातून बेड दिसू नये अशी रचना असावी. झोपतांना डोके दक्षिण दिशेकडे आणि पाय उत्तर दिशेकडे येतील अशी बेडची दिशा असावी.  

बेडरूमचा रंग -:  बेडरूममध्ये रंगसंगती शकतो फार भडक असू नये. लाल,काळा,गडद जांभळा हे रंग असू नयेत. बेडरूममध्ये तुम्हांला आवड असलेल्या रंगाची फिक्कट छटा चालू शकेल. फिक्कट छटेत निळा, गुलाबी, पिवळा ह्या आणि इतर रंगात किंवा रंगसंगतीत तुम्ही बेडरूम सजवू शकता.

वस्तू -:  बेडरूम मध्ये सजावटीसाठी वस्तू ठेवल्या जातात. काहीवेळा त्या शोभेच्या वस्तूंमध्ये विचित्र वस्तू ठेवल्या जातात. जसे विचित्र चेहरा किंवा आकार असलेले शिल्प,सुकलेल्या फुलांची फुलदाणी, जुनी कागदपत्रे, वापरात नसलेल्या फाईल्स,बंद घड्याळ,तलवार,सुरींची रचना करून असूच नये. बेडरूममध्ये शक्यतो वस्तू कमीत कमी असाव्यात. एक बेड,एक कपाट,ए.सी. एवढेच असावे. आणि फारफार तर टेबल आणि खुर्ची ह्या व्यतिरिक्त इतर वस्तूंची गर्दी असू नये.

फर्निचर -: बेडरूममध्ये कमीतकमी फर्निचर असणे चांगले. शक्यतो बेडच्यावरती कुठलेही फर्निचर असू नये. फर्निचरचे कोपरे गोल असावेत.  

चित्रे -: बेडरूममध्ये चित्रे ही शांतता प्रदान करणारी हवीत. राधा -कृष्णाचा फोटो हे प्रेमाचे प्रतीक आहे. लढाईच्या प्रसंगाची चित्रे, तलवार -ढाल ह्यांची चित्रे असू नयेत.  तो फोटो बेडरूममध्ये लावल्यास तशीच "Energy" येते.

आरसा -: बेडरूममध्ये आरसा असतोच. म्हणजे तो कपटाचा आरसा किंवा ड्रेसिंग टेबलचा आरसा. हा आरसा झाकलेला तरी असावा किंवा आरश्याची रचना अशी असावी की बेडची प्रतिबिंब त्यात पडू नये. आपण झोपल्यानंतर आपली प्रतिमा आरशात दिसू नये. हल्ली आरशाची रचना अशी असते की कपाटाच्या आत आरसा असतो आणि वरून कपाटाचे दार असते म्हणजे आपसूकच आरसा झाकला जातो.

कपाट/तिजोरी -: कपाट किंवा तिजोरीची जागा ही दक्षिण दिशेत असावी. तिजोरीत एखादा छोटासा आरसा ठेवावा. 

टी. व्ही. -: हल्ली बेडरूममध्ये टी. व्ही. असतोच. हा टी. व्ही. कुठे असावा ह्यासाठी दिशा निश्चित करणे म्हणजे त्या घराचा नकाशा आणि दिशा पाहूनच ठरवावे लागते. 

बेडरूम ही आरामाची खोली असल्याने शक्यतो फार भडक वस्तू,रंग ह्याचा वापर न होता शांत रंग, चित्रे,वस्तू ठेवावीत. रूम फ्रेशनरपेक्षा बेडरूममध्ये धूप करावा. खडे मीठ एका चिनी मातीच्या वाडग्यात घेऊन कुठल्याही एका कोपऱ्यात ते ठेवावे. त्याने नकारत्मक ऊर्जा निघून जाण्यास मदत होईल. 

ह्या टिप्सचा वाचकांना उपयोग होईल अशी आशा करते. आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा - anupriyadesai@gmail.com

अनुप्रिया देसाई 

ज्योतिष आणि वास्तू विशारद 














शनिवार, १ जुलै, २०१७

कुंडलीतील विवाह योग

कुंडलीतील विवाह योग 




एकदा मुलांना नोकरी लागली की पालक आणि मुले विवाहमंडळांच्या वेबसाईटवर जास्त रमतांना दिसून येतात. पालकांना मुलांनी लवकरात लवकर लग्न करून "Settle" व्हावे असे वाटत असते. आणि आपल्या भारतीय परंपरेनुसार प्रत्येक व्यक्तीला लग्न ह्या संस्कारातून जावेच लागते. भारताबाहेरील प्रगत देशातील व्यक्ती लग्नाशिवाय settle होते परंतु भारतीय व्यक्ती लग्न झाले म्हणजे settle झालो असे मानतात. तरी सध्या ह्या विचारांत फरक पडत आहे. बऱ्याच व्यक्ती लग्न न करण्याचा निर्णय घेत आहेत. काहींना स्वतःचं स्वतंत्र  आयुष्य जगायचं आहे. कोणाचेही कुठलेही बंधन नको ही भावना सध्या तरुण पिढीत वाढत चालली आहे. काहींनी लग्न झालेल्या मित्रांच्या आयुष्यात आलेली वादळे जवळून पाहिलेली असतात. घटस्फोटापर्यंत गोष्टी जातांना पाहिल्या आहे. त्यामुळे स्वतः अविवाहित रहाण्याचा निर्णय घेतला जात आहे. कुंडलीत असे काही योग असतात का ज्यामुळे व्यक्ती विवाह करणार की अविवाहित रहाणार हे कळते ? हो नक्कीच. हे कळू शकते. विवाह होणार असेल तर तो प्रेम विवाह असेल का ? वैवाहिक सौख्य लाभेल ना ? की घटस्फोटाचे योग आहेत ? हे आणि असे असंख्य प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे आपली कुंडली देऊ शकते का ? आज हाच आपला विषय आहे - कुंडलीतील विवाह योग.


कुंडलीत विवाह स्थान कुठले ?


विवाह स्थान ओळखण्यासाठी आपल्याला आधी कुंडलीतील आपले स्थान कुठले हे लक्षात  घेतले पाहिजे. कुंडली पाहिल्याबरोबर जे समोर दिसते ते पहिले स्थान म्हणजे तुम्ही. खालील चित्रात जिथे १ हा आकडा आहे त्याला "तनु स्थान" किंवा  "लग्न स्थान म्हणतात. लग्न स्थान ह्याचा तुमच्या लग्नाशी काहीही संबंध नाही. त्याला "लग्न स्थान" हे एक नाव आहे. तनुस्थान किंवा लग्न स्थान म्हणजे तुमच्याबद्दलची सर्व माहिती. तुमचा स्वभाव, तुमची शारीरिक यष्टी वगैरे. तुमच्या कुंडलीत ह्या स्थानी १ हा आकडाच असेल हे जरुरी नाही. तिथे  २,३,४,५... १२ पर्यंतचा कुठलाही आकडा असू शकतो. हे आकडे म्हणजे राशी होय. तुमच्या कुंडलीत २ हा आकडा ह्या स्थानी असेल तर तुमची लग्न राशी वृषभ आहे. जर तिथे ५ हा आकडा असेल तर तुमची लग्न राशी सिंह आहे. आपल्या समोर नेहेमीच आपला जोडीदार असणार त्यामुळे १ आकडा लिहिला आहे त्याच्या १८० अंशावर ७ हा आकडा आहे. हेच तुमच्या जोडीदाराचे स्थान.


ह्या स्थानावरून तुमचा विवाह होणार की नाही ? कधी होणार ? जोडीदार कसा असेल ? जोडीदाराच्या स्वभावाची कल्पना ह्या गोष्टींचा आढावा घेता येतो. ह्या स्थानाला "सप्तम स्थान" असे संबोधले जाते. ह्या स्थानात जी राशी असते ,जे ग्रह असतात त्याप्रमाणे तुमचा जोडीदार असतो. जोडीदाराला ओळखण्याची खूण म्हणजे त्या स्थानाशी निगडीत असलेले ग्रह तुमच्या जोडीदाराबद्दल माहिती देतात.  

  • सप्तम स्थान रविशी निगडीत -  जोडीदार अतिशय महत्त्वाकांशी आणि अभिमानी. मोडेन पण वाकणार नाही अशी वृत्ती असते. 
  • सप्तम स्थान चंद्राशी  निगडीत - जोडीदार सतत दुइतरांबद्दल  काळजी करणारा असतो. अतिशय मायाळू आणि कनवाळू. स्वतः उपवाशी राहून इतरांना अन्न देण्यात ह्यांना आनंद मिळतो. 
  • सप्तम स्थान मंगळाशी निगडीत - जोडीदार अत्यंत तापट आणि हट्टी. ह्यांच्या प्रत्येक गोष्टीत स्पर्धा असते. शांत बसणे ही वृत्ती अजिबात नसते.  
  • सप्तम स्थान बुधाशी निगडीत - अशी व्यक्ती म्हणजे खुशाल चेंडू. फिरण्याची अत्यंत आवड. घरात ह्यांचा पाय टिकूच शकत नाही. 
  • सप्तम स्थान गुरूशी निगडीत - अशा व्यक्ती इतरांना लेक्चर देण्यात समाधान मानतात. धार्मिक स्थळांना भेटी देणे ह्यांना खूप आवडते. 
  • सप्तम स्थान शुक्राशी निगडीत - जोडीदार स्वतःच्याच प्रेमात असतो. जिथे आरसा दिसला तिथे आपला चेहरा न्याहाळणे आणि सतत केस विंचरणे म्हणजे समजून जा तुमच्या कुंडलीत सप्तम स्थान शुक्राशी निगडीत आहे. 
  • सप्तम स्थान शनिशी निगडीत - सगळ्या गोष्टींचा आळस असतो अशा व्यक्तींना. फिरायला जाणे म्हणजे ह्यांच्यासाठी कटकट असते. त्यापेक्षा घरी सोफ्यावर लोळत टी. व्ही. बघत बसणे त्यांना जास्त रुचते.  

मंडळी तुम्ही तुमच्या कुंडलीत सप्तम स्थान कुठल्या ग्रहाशी निगडीत आहे ते तपासून पहा बरं !!! (अर्थात ह्यासाठी कुंडलीतील इतरही गोष्टींचा विचार व्हावा. ) 

विवाह होईल का ?


विवाह होण्यासाठी सप्तमस्थानचा संबंध हा द्वितीय (द्वितीय स्थान म्हणजे कुटुंब स्थान.)लग्नानंतर तुमच्या कुटुंबात एका व्यक्तीची वाढ होते म्हणून द्वितीय आणि सप्तमाचा संबंध असावा. द्वितीय स्थानाबरोबरच लाभ आणि पंचम स्थानांचाही विचार व्हावा. जर सप्तमाचा संबंध द्वितीय,लाभ आणि पंचम स्थानाबरोबर असेल तर विवाह होण्याचे योग आहेत.


परंतू जर सप्तम स्थानाचा संबंध लग्न स्थान,षष्ठ,व्यय आणि दशम स्थानाशी आल्यास व्यक्ती अविवाहित राहू शकते. परंत ह्यासाठी संपूर्ण कुंडलीचा अभ्यास व्हावा. आपल्या अविवाहित साधू संतांच्या कुंडलीत असे योग दिसून येतात.  



विवाह कधी ? 


पालकांची इच्छा असते की आपल्या मुलांचा विवाह योग्य वयात व्हावा. परंतु जर तुमच्या मुलाच्या कुंडलीत सप्तम स्थानावर शनिची दृष्टी किंवा शनि जर सप्तम स्थानाशी निगडीत असेल तर विवाह वयाच्या २९-३० व्या वर्षी होतो. इतरही काही योग असे असतात ज्यामुळे उशीरा विवाह संभवतो.  



प्रेम विवाह होईल का ?

नवीन पिढीतल्या बहुतांश मुलांचा आणि मुलींचा हा प्रश्न असतो की लव्ह मॅरेज होईल ना ? कारण अरेंज मॅरेजमध्ये खूप कटकटी असतात. एकमेकांना ओळखत नसतांना विवाह कसा करायचा ? एवढी रिस्क आम्ही नाही घेऊ शकत. प्रेम विवाहात एकमेकांना भेटतो,बोलतो, घरच्या इतर व्यक्तींबरोबर भेट होत असते. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाबद्दल माहिती असते. अगदीच नवखे वाटत नाही.परंतु कुंडलीत योग असतील तर प्रेम विवाह संभव आहे.

 प्रेम विवाहासाठी सप्तम स्थान आणि पंचम स्थान ह्यांचा आणि त्या स्थानांच्या अधिपती ग्रहांचा योग व्हावा लागतो. तरच प्रेम विवाह होऊ शकतो.

आंतरजातीय विवाह योग आहे का ? 


प्रेम विवाह होणार आहे हे जातकांना जेव्हा सांगितले जाते तेंव्हा त्यांचा पुढचा प्रश्न असतो प्रेम विवाह आमच्याच जातीत की आंतरजातीय होणार आहे ? ह्या प्रश्नासाठी मात्र ज्योतिषाचा खोलवर अभ्यास असावा लागतो. कारण हल्ली नुसतचं जातीबाहेर लग्न होत नसून इतर धर्मांमध्येही सर्रास विवाह होत आहेत. तेंव्हा ह्याबाबत काळिजीपूर्वक भविष्य वर्तवणे योग्य ठरते. 


घटस्फोट किंवा द्विभार्या योग आहे का  ?


समाजात जस जशी शैक्षणिक प्रगती होत आहे तस तशी काडीमोड (घटस्फोट )ह्या प्रकारातही वाढ होत आहे. हल्ली मुलगा असो वा मुलगी उच्च विद्याविभूषित असल्याने स्वावलंबी असतात. स्वावलंबी असणे आणि अहंकारी असणे ह्यात फार फरक राहत नाही. मग अगदी छोट्या वाद-विवादातही कोणी माघार घेत नाही आणि फुकाच्या अहंकारात घटस्फोट होतो. त्यामुळे लग्न जमवितांना व्यवस्थित मॅच मेकिंग करणे जरुरी आहे. सप्तम स्थानाच्या अधिपतीचा संबंध षष्ठ स्थान,व्यय स्थान,अष्टम स्थान  किंवा दशम स्थान यांच्याशी असेल तर घटस्फोट होण्याचे योग असतात. परंतु ह्यासाठी कुंडलीचा व्यवस्थित अभ्यास होणे जरुरी ठरते.


घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलेली जोडपी जेंव्हा ज्योतिषाकडे येतात तेंव्हा त्यांना, त्यांच्या पुढील आयुष्याबद्दल स्पष्टपणे सांगणे जरुरी आहे. कारण बाकीचे निर्णय घेण्यासाठी हे महत्त्वाचे ठरते. आणि घटस्फोट होणारच नसेल तर तसे त्यांना सांगून काय काळजी घेतली म्हणजे वाद विवाद फार विकोपाला जाणार नाहीत ह्याबद्दल समजावले पाहिजे असे माझे मत आहे.   


वैवाहिक आयुष्य कसे असेल ?


सप्तम स्थानाचा अधिपती जर लाभ, तृतीय,पंचम,नवम ह्या स्थानाशी निगडीत असेल तर वैवाहिक आयुष्य समाधान कारक राहील. सप्तम स्थानावर शुभ ग्रहांची दृष्टी आणि योग्य अशा महादशा वैवाहिक सौख्य अबाधित ठेवण्यास मदत करतात. सप्तम स्थानांवर निगेटिव्ह ग्रहांची दृष्टी किंवा सप्तम स्थानाशी निगडीत निगेटिव्ह ग्रहांची युती वैवाहिक जीवनात वितुष्ट आणण्यात कारणीभूत ठरते. अर्थात दशेचाही विचार व्हावा. 


तुमच्या कुंडलीतल्या ग्रहांबद्दल आणि वैवाहिक  योगांबद्दल  थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.  जोडीदाराचे वर्णन  थोडक्यात दिलेले आहे. विवाहाबद्दलचे भविष्य कथन करतांना कुंडलीचा सूक्ष्म अभ्यास करणे अभिप्रेत आहे. बरेच Permutation and Combination चा अभ्यास करून वैवाहिक जीवनाबद्दल भविष्य वर्तवता येते. 


कसा वाटला हा लेख. प्रतिक्रिया जरूर कळवा- amipriyadesai@gmail.com 


अनुप्रिया देसाई - ज्योतिष आणि वास्तू विशारद      






READERS ALL OVER THE WORLD