बुधवार, ४ एप्रिल, २०१८

ज्योतिष -योगायोगाच्या गोष्टी

ज्योतिष -योगायोगाच्या गोष्टी 


ज्योतिष शास्त्र ह्या शब्दाची फोड केली तर  ज्योती + ईश अशी होईल. ज्योती म्हणजे दृष्टी आणि ईश म्हणजे ईश्वर अर्थात परमेश्वर. आपल्या भाग्यात काय लिहून ठेवले आहे हे ज्याला समजण्याची दृष्टी आहे तो ज्योतिषी. ज्योतिषाकडे जेंव्हा व्यक्ति प्रश्न घेऊन जातात तेंव्हा सरार्सपणे हे विसरतात की ज्योतिषी हा जादूगार किंवा तांत्रिक नव्हे. तुमच्या भाग्यात काय लिहून ठेवले आहे ह्याची कल्पना मात्र तो देऊ शकतो. काही तंत्र आणि जादूने तुमचे भाग्य बदलू शकत नाही. हे सर्वसामान्य लोकांनी समजून घेतले पाहिजे.  तुम्हांला २८व्या वर्षी चांगल्या हुद्द्याची नोकरी मिळणार असे जर भाग्यात असले तर ह्याचा अर्थ २८व्या वर्षापर्यंत काहीच करायचे नाही असा नसून त्याचा अर्थ पुढील प्रमाणे आहे - २८व्या वर्षापर्यंत तुम्हांला काही उच्च शिक्षण घायचे असल्यास ते घ्यावे त्याच बरोबरीने नोकरी करावी. म्हणजे अनुभव आणि शिक्षण घेऊन वयाच्या २८व्या वर्षी तुम्ही नवीन नोकरीकरिता तयार होऊ शकता.

हीच गोष्ट लग्नाकरिता लागू होते. प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न होणे म्हणजे आनंददायी प्रसंग. परंतु सर्वांच्या  आयुष्यात लग्न एका ठराविक वर्षीच होत नाही. कोणाचे २२ व्या वर्षी,कोणाचे २८व्या वर्षी,कोणाचे ४०व्या वर्षी तर कोणाचे ६०व्या वर्षीही लग्न होऊ शकते. काहींना आजन्म ब्रम्हचारीही रहावे लागते. काहींनी लग्न न करण्याचा निश्चय करूनही अचानक आयुष्यात घडलेल्या घटनांमुळे लग्न करण्याचा निर्णय घेतला जातो. काहींच्या भाग्यात एकापेक्षा जास्त विवाह लिहिलेले असतात. म्हणजेच प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते.त्याच वेळी ती घटना घडते.

ज्योतिष शास्त्र हे संपूर्णतः खगोलशास्त्रावर अवलंबून आहे. खगोलीय घटना आणि त्याच्या गणितावरून काही गोष्टींची शक्यता वर्तवणे शक्य आहे परंतु त्या व्यक्तिचा तेवढा अभ्यास असावा. हे सांगतांना प्रसिद्ध खगोलशात्रज्ञ आणि ज्योतिषी वराहमिहीर ह्यांच्या जीवनात घडलेल्या एका गोष्टीची आठवण झाली. ती गोष्ट आज तुम्हांला सांगते.  

वराहमिहीर हे अत्यंत हुशार असे गणिती आणि खगोलशात्रज्ञ. मूळ नाव - मिहीर. अचूक गणित ह्यामुळे अचूक भविष्यवाणी ही त्यांची ख्याती होती. मिहीर हे उज्जैनच्या राजा विक्रमादित्यच्या दरबारात नऊ रत्नांपैकी एक.  राजज्योतिषी म्हणून त्यांना सन्मान मिळालेला. विक्रमादित्य राजाच्या नवजात बाळाची भविष्यवाणी करतांना मिहीरने,"राजकुमार हा अल्पायु असून त्याचा १८व्या वर्षी मृत्युयोग आहे. ज्यादिवशी राजकुमार १८वे वर्ष पूर्ण करेल त्यादिवशी त्यांस अटळ मृत्युयोग आहे. एवढेच नव्हे तर राजकुमारचा मृत्यू एका वराहमुळे(वराह म्हणजे डुक्कर)  होणार आहे." फक्त एवढीच भविष्यवाणी करून मिहीर थांबले नाहीत. त्यांनी  राजकुमाराच्या मृत्यूची तारीख आणि अचूक वेळ सुद्धा राजाला सांगितली. हे ऐकून राजा शोकमग्न झाला. होताहोता वर्षे सरत गेली. राजकुमार १८ वर्षांचा होणार तेंव्हा राजाने मिहीर ह्यांना भविष्यवाणीची आठवण करून दिली. मिहीर ह्यांनी जराही न डगमगता ते स्वतःच्या "त्या" भविष्यवाणीवर ठाम असल्याचे सांगितले. राजकुमाराच्या संरक्षणाची जय्यत तयारी राजा विक्रमादित्य राजाने करण्यास सुरवात केली. राजकुमाराला महालाच्या सर्वात वरच्या मजल्यावर ठेवण्यात आले. त्या मजल्यावर आणि बाकी संपूर्ण महालात,महालाबाहेर पहारेकऱ्यांच्या कडक बंदोबस्त करण्यात आला. कुठूनही जंगली जनावराने महालात येण्याची सोय नव्हती. राजकुमाराला संपूर्ण दिवस वरच्या मजल्यावर थांबण्याचे आदेश होते. एवढेच करून विक्रमादित्य थांबला नाही. राजा स्वतः दरबारात उपस्थित होता. त्याने मिहीर ह्यांनाही दरबारात उपस्थित राहण्यास सांगितले. हे एका प्रकारचे मिहीर ह्यांना दिलेले आव्हाहन होते. मिहीर ह्यांनी भविष्यवाणी तर केली होतीच परंतु राजाने राजकुमाराच्या संरक्षणाची सर्व जय्यत तयारी केली होती आणि मिहीर ह्यांचे भविष्य आता कसे खोटे ठरणार ह्याची ते वाट पहात होते.

मिहीर हे निश्चलपणे आणि आत्मविश्वासाने दरबारात उपस्थित होते. त्यांना त्यांच्या शास्त्रावर पूर्णपणे विश्वास होता. राजाला त्याच्या सेवेकऱ्यांवर आणि पहारेकऱ्यांवर पूर्णपणे विश्वास होता. दर अर्ध्यातासाने राजकुमाराच्या स्वास्थ्याबद्दलची माहिती राजाला येऊन सांगण्याचे आदेश पहारेकऱ्यांना होते. जसजसा वेळ जात होता तसतशी  दरबाराची उत्सुकता वाढू लागली होती. दरबारात उपस्थित असलेल्या सर्व लोकांना पुढे काय घडणार ह्या उत्सुकतेबरोबरच मिहीरची भविष्यवाणी कशी चुकणार ह्यांत आनंद होत होता. तेंव्हा दरबारात मिहिर ह्यांना  पाण्यात बघणारे बरेचजण होते. मिहिराचार्यांच्या चुकलेल्या भविष्यवाणीमुळे आता राजा काय शिक्षा देणार ह्याचा त्यांना आनंद होत होता. ज्यावेळेला राजकुमाराचा  मृत्यू होणार ती वेळ आली. राजाने मिहिराचार्यांना पुन्हा एकदा भविष्यवाणीबद्दल विचारले. त्यांनी  जराही न डगमगता ज्यावेळी मृत्यू होणार असे विधिलिखित आहे त्याच वेळी राजकुमारचा मृत्यू होणार हे निश्चित असे राजाला सांगितले. ती ठराविक वेळ निघून गेली तरी पहारेकऱ्यांकडून कुठलीही बातमी दरबारात आली नाही. मिहिराचार्यांची भविष्यवाणी खोटी ठरली म्हणून राजा आणि दरबारी खुश झाले. ह्यांवर मिहिराचार्यांचे उत्तर असे होते - : हे राजा, राजकुमाराचा मृत्यू सांगितलेल्या तासाला, त्याच मिनिटाला आणि त्याच सेकंदाला झालेल्या आहे. राजकुमार रक्ताच्या थारोळ्यात आहे. तुमच्या सैनिकांपैकी आणि पहारेकऱ्यांपैकी कोणाच्याच ही गोष्ट अजून लक्षात आलेली नाही. एका वराहमुळेच राजकुमारचा मृत्यू झालेला आहे. विधिलिखित चुकलेले नाही. तुम्ही ह्याची शहानिशा करून घ्यावी. "

तातडीने राजा आणि सैनिक राजकुमार ज्या मजल्यावर होता त्या मजल्यावर गेले. राजकुमार स्वतःच्या कक्षेत न दिसल्यामुळे सैनिकांनी सर्वत्र शोधण्यास प्रारंभ केला. काहीवेळापूर्वीच राजकुमार आणि त्याचे मित्र त्याच्या कक्षात बुद्धिबळासारखा खेळ खेळत होते. राजकुमाराला महालाबाहेर जाण्याची परवानगी नसल्याने ते सर्व त्याच्या कक्षेतच होते. मग राजकुमार गेले कुठे ? असे त्या मित्रांना विचारले असता त्यांनी सांगितले, राजकुमार दिवसभर स्वतःच्या कक्षेत राहून कंटाळले होते. खेळत्या हवेत जावे तर महालाबाहेर जाण्याची सक्ती त्यामुळे त्यांनी कक्षेच्या वर असलेल्या गच्चीत जाण्याचे ठरवले. त्यानंतर राजकुमार कक्षेत परतलेच नाहीत.

सर्व सैनिक आणि राजा महालाच्या गच्चीत पोहोचले. गच्चीत रक्ताच्या थारोळ्यात मृत्युमुखी पडलेल्या राजकुमाराला पाहून राजाला शोक अनावर झाला. एवढ्या उंचीवर,एवढ्या पहारेकऱ्यांच्या तैनातीत राजकुमारचा मृत्यू झाला होता. मृत्यूचे कारण होते - वराहचे चिन्ह. गच्चीवर सर्वत्र राजाचे राज्याचे झेंडे लावले गेले होते. त्या झेंड्याच्या बाजूला राजकुमाराला आराम करण्यासाठी म्हणून एक पलंग ठेवण्यात आला होता. थकलेल्या राजकुमाराने आराम करावा ह्या हेतूने त्या पलंगावर निजला. पलंगाच्या बाजूलाच असलेला झेंडा बरोबर राजकुमाराच्या अंगावर पडला. त्या झेंड्यावर असलेल्या लोखंडाच्या वराहच्या चिन्हाचे अणुकुचीदार सुळे राजकुमाराच्या छातीत रोवले गेले, ज्यामुळे राजकुमारचा मृत्यू झाला.

राजकुमाराच्या संरक्षणाच्या तयारीत राजा नि त्याचे सैनिक स्वतःच्या राज्याच्या चिन्हाबद्दल पार विसरून गेले. त्यांचे विजय चिन्ह होते वराहाचे म्हणजेच डुक्कर ह्या प्राण्याचे. झेंड्याच्या शेंड्यावर हे चिन्ह होते. ह्याच चिन्हाच्या वराहाच्या सुळ्यांनी राजकुमारचा बळी घेतला होता.

मिहिराचार्यानी वर्तवलेल्या भविष्यवाणीचा तंतोतंत घडले होते. राजाने मिहिराचार्यांना आपल्या राज्याचे विजयचिन्ह "वराह" हे पदवी म्हणून बहाल केलं. तेंव्हापासून मिहिराचार्य "वराहमिहीर" ह्या नावाने ओळखले जातात.

ह्यावरून बोध घेण्यासारखे म्हणजे घडणाऱ्या गोष्टी निश्चितपणे त्याचवेळी घडतात. तेंव्हा एखादी गोष्ट मिळवणायसाठी तुम्ही अथक प्रयत्न करता परंतु अपेक्षित वेळेत ती गोष्ट हाती लागली नाही तरी निराश न होता आपले प्रयत्न सुरु ठेवावेत. नोकरी करणाऱ्या व्यक्तिंचे जेंव्हा मला फोन येतात ते अशा आशयाचे -  मी इंटरव्यूव्ह देऊन महिना होत आला परंतु अजूनही त्यांच्याकडून काहीच उत्तर नाही. त्यावर माझे एकच उत्तर असते. एकच कंपनी आहे का ? तुमच्या कुंडलीत जर योग आहेत तर नोकरी मिळणारच परंतु जरा धीर धरा. दुसऱ्या कंपनीत प्रयत्न करा. योग्य ती वेळ यावी लागते हे खरेच परंतु आपण आपले प्रयत्न सोडू नयेत आणि धीर खचू देऊ नये. 

अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तू विशारद )


सोमवार, २ एप्रिल, २०१८

आज २ एप्रिल - शनि आणि मंगळ युती


आज २ एप्रिल - शनि आणि मंगळ युती 
दिनांक २५ मार्च रोजी माझ्या ह्याच ब्लॉगवर मी शनि आणि मंगळाच्या युतीचे काय परिणाम होऊ शकतील ह्यांवर लेख लिहिला होता. (आपण वाचला नसल्यास लिंक देत आहे -http://astroanupriya.blogspot.in/2018/03/blog-post_25.html ) १) त्यात शनी मंगळाच्या युतीमुळे मोर्चे निघणे, जातीय अथवा धार्मिक दंगली होऊ शकतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. आज सकाळपासूनच भारत बंदला हिंसक वळण लागले त्यात बऱ्याच राज्यात जीवितहानी सुद्धा झाली. उद्या(मंगळवार दिनांक - ३ एप्रिल रोजी ) ह्या बंदला  भडकावण्यासाठी  राजकीय वर्तुळातून काही हालचाली होऊ शकतील. 
२) ह्या लेखात लोकांनी मोर्चे काढणे-चर्चेतून गैरसमज होणे हे शक्यता वर्तवण्यात आली होती. आज मुंबईत होमिओपॅथी डॉक्टरांचा आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला.  
३) राजकीय क्षेत्रात घडामोडी होणे - अ) केजरीवाल ह्यांनी अरुण जेटली ह्यांची माफी मागितली. 
४) मोठाली जहाजं/रेल्वे ह्यांचा अपघात होणे - आज पहाटे चीनचे स्पेस स्टेशन प्रशांत महासागरात कोसळले. 
५) मंगळ आणि शनिच्या युतीमुळे अपघात होणे,आगी लागणे - आज महाराष्ट्रात पाच ठिकाणी अग्नितांडव झाले. अ) भिवंडीत "तेलाच्या"(तेल किंवा पेट्रोल हे शनिच्या अधिपत्याखाली येते.) १२ ते १३ गोदामांना आग लागली. आग(आग - मंगळाच्या अधिपत्याखाली ) शांत होण्यास १० तांस लागले. म्हणजे आगीची तीव्रता लक्षात येते. ब) मुंबईत अंधेरीमध्ये लक्ष्मी इंडस्ट्रिअल इस्टेटला आज दुपारी आग लागली. क) पुणे इथे महालक्ष्मी मार्केट यार्डला आग लागली. ड) औरंगाबादच्या माणिक इस्पितळाच्या पहिल्या मजल्याला आगीमुळे नुकसान झाले. इ) प्रसिद्ध कलाकार प्रमोद कांबळे ह्यांचा स्टुडिओ आगीत भस्मसात झाला. 
खाली आज घडलेल्या काही घडामोडींबद्दल सविस्तर लिहिले आहे. पुणे आणि भिवंडी इथे लागलेल्या आगीच्या वेळेची कुंडल्या दिलेल्या आहेत. 

भारत बंद - ऍट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याच्या वादातून आज एप्रिल २ रोजी भारत बंद पुकारण्यात आला. विविध संघटनांनी आंदोलन करत नारेबाजी केली. दुपारपर्यंत ह्या बंदला हिंसक वळण लागले. मध्यप्रदेशात एका व्यक्तिने गावठी पिस्तुलाने गोळ्या झाडल्या,त्यात एका व्यक्तिचा मृत्यु झाला. उत्तरप्रदेशातील हपूर स्टेशनजवळ २००० च्या संख्येने आलेल्या जमावाने रेल रोको आंदोलन केले ज्यामुळे ४-५ तास रेल्वे सेवा ठप्प होती. 
भिवंडी तेलाच्या गोदामांना आग 
रात्री १२ च्या सुमारास आग लागली. आगीत १२ ते १३ गोदामं जाळून खाक. अग्निशामकदलाच्या सहा गाड्या आग १० तासांनंतर आग आटोक्यात आली. 
ह्यावेळेची कुंडली मी जिज्ञासू ज्योतिषांसाठी देत आहे - L - मंगळ - १,५,१२             
S - चित्रा नक्षत्र - मंगळ -१,५,१२
R - शुक्र - ४,६,७,११
D - चंद्र - १०,८ 
अष्टम स्थानाचा सबलॉर्ड - मंगळ असून तो पुढील स्थानांचा कार्येश - १,५,१२
व्यय स्थानाचा सबलॉर्ड - शनि असून तो १,२ आणि ३ ह्या स्थानांचा कार्येश. 
अष्टम स्थान हे धोक्याचे/अपघाताचे स्थान आहे. ह्या स्थानाचा सबलॉर्ड मंगळ स्वतः आहे. व्यय स्थान म्हणजे नुकसानीचे स्थान. ह्या स्थानाचा सबलॉर्ड शनि आहे. 
पुणे मार्केटयार्ड आग लागली 
पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील एका धान्याचे दुकान भीषण आगीत जळून भस्मसात झाले. ही घटना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. 
तेंव्हाची कुंडली - 


L - बुध (वक्री) ९,१,४
S - स्वाती नक्षत्र - राहू - १,२
R - शुक्र - १०,५,१२ 
D - चंद्र - ४,२ 
अष्टम स्थानाचा सबलॉर्ड - मंगळ असून पुढील प्रमाणे कार्येश - ६,६,११. 
व्यय स्थानाचा सबलॉर्ड - शनि असून ६,८ आणि ९ ह्या स्थानांचा कार्येश. 
औरंगाबाद- इस्पितळाला आग लागली -  आज औरंगाबाद शहरातील जवाहर पोलिस स्टेशन समोरील माणिक हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्याला आग पसरली होती.अग्निशमन दलाच्या सहा गाड्या आणि 10 खासगी टॅंकरच्या मदतीने आग विझवण्यात आली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. माणिक हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीमध्ये स्क्रॅप जळाल्याने धूर निघाला होता. आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. 
स्टुडिओला आग- प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे ह्यांच्या स्टुडिओला आग लागली. ही घटना मनाला चटका लावणारी आहे. 

अमोनिया गॅस गळती - उत्तरप्रदेशात एका ठिकाणी अमोनिया गॅस गळती झाली. जीवितहानी नाही. 


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ- आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आली. 
मोर्चा - होमिओपॅथी डॉक्टरांनी आझाद मैदानात मोर्चा काढला आहे.  
 आजच्या ज्या घटना घडल्या त्यापैकी दोन घटनांच्या कुंडल्या मी वर दिल्या आहेतच. ह्या कुंडल्यांमधील आढळलेले साम्य म्हणजे - 

  • लग्न बिंदूच्या सर्वात जवळ प्लुटो आणि गुरु हे दोन ग्रह होते.  
  • प्लुटो ह्या ग्रहाला कुंडली विवेचनात गृहीत धरले जात नसले तरी अशा घटना घडतांना प्लुटो नेहमीच लग्नबिंदूजवळ आढळून येतो. 
  • प्लुटो हा समूहाचे नेतृत्त्व करतो. लग्न २८ अंशावर असतांना प्लूटो २७ अंश म्हणजेच लग्न बिंदूच्या बरेच जवळ होता. म्हणूनच जेंव्हा घटना घडल्या तेंव्हा कुठल्याही एका व्यक्तिचे नुकसान न होता एकूण समाजव्यवस्थेवर परिणाम झाला. घटना घडवून आणणारे सुद्धा एक-दोघे नव्हते. ह्या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे कोणीच नव्हते. घटना घडवून आणणारे समूहाने होते - प्लुटो हा समूहाचे नेतृत्त्व करतो. भारत बंद जाहीर झाल्यानंतर आंदोलनं जी झाली, त्या आंदोलनाचा परिणाम अर्थात वाईट होता. एकूण नऊ लोकांचे बळी ह्या आंदोलनामुळे गेले.  
  उद्या मंगळवार आहे. उद्याचाही दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. उद्या शनि आणि मंगळाची युती तर असणारच आहेच परंतु उद्याचे नक्षत्रही गुरुचे(विशाखा ) आहे. गुरु(वक्री ) आणि चंद्राची युती असणार आहे. तेंव्हा राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या उद्याचा दिवस महत्त्वाचा ठरेल. 

म. टी. - २५ मार्चचा लेख ज्यांनी ज्यांनी वाचला त्यांना तो आवडलाच परंतु आज ह्या सर्व घटना घडत असतांना मला त्यांचे अभिनंदनाचे फोन आणि मेसेजेस येत होते. तुम्ही लेखांत लिहिल्याप्रमाणे घडत आहे असा अभिप्राय सर्वांचाच होता. त्या सर्वांना धन्यवाद. 
आज घडलेल्या घटना अप्रिय होत्या. ह्यातून एकच गोष्ट सिद्ध होते ग्रहांच्या होणाऱ्या योगांवर दुर्लक्ष करून चालणार नाही. ह्याचा अजून अभ्यास व्हावा. मी माझ्या बुद्धीला जेवढे समजले तेवढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.  ज्योतिष प्रेमींनी,गुरूंनी ह्यांवर अजून प्रकाश टाकावा. काही मुद्दे माझ्याकडून  राहून गेले असावेत ते नक्की नमूद करा. 
आजप्रमाणेच १७ तारखेपर्यंत घडणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवून रहावे. 

अनुप्रिया देसाई 
९८१९०२१११९

READERS ALL OVER THE WORLD