मंगळवार, २३ डिसेंबर, २०१४

आणि बाबा सापडले …….

आणि बाबा सापडले ……. 


१३ डिसेंबरच्या रात्री १०.४५ ला हेमंतचा फोन. शनिवार असल्याने दिवसभर जातकांची रीघ होती. दिवसभर वेगवेगळ्या कुंडल्या अभ्यासून आणि बोलून बोलून डोक जडं झालेलं. एवढ्या रात्री ह्याचा फोन कसा काय बुवा ? असा विचार करतच फोन घेतला. "बोल रे काय झालं ?" समोरून हेमंत," ताई  sorry. एवढ्या रात्री फोन करतोय. अगं पण आमचे बाबा गायब झालेत. म्हणजे झालाय असं कि आज आम्ही गोरेगावला एके ठिकाणी सत्यनारायण पूजेसाठी आलो आहोत. आठ-साडेआठच्या दरम्यान सर्वांची जेवणे आटोपली. त्यांनतर आम्ही सर्वजण गप्पा मारत होतो आणि अचानक लक्षात आले कि बाबा घरात नाहीत. सगळीकडे शोधाशोध सुरु आहे पण काहीच पत्ता लागत नाहीये. गेल्या काही वर्षांपासून त्यांना स्मृतीभ्रंशाचा त्रास आहे त्यामुळे कुठे गेले जरी असले तरी त्यांना परत येण्याचा रस्ता आठवणे कठीण आहे. त्यांच्याकडे mobileही नाही. कारण कित्येकवेळा ते mobile घेऊन जाणेही विसरतात. त्यांचा फोनही इथेच घरात आहे. त्यामुळे खूप काळजी वाटतेय. please जर सांगशील का कुठे असतील आणि सुखरूप असतील ना ??" मी म्हणाले," कळवते तुला ". 


लगेचच प्रश्नकुंडली मांडली. १३-१२. २०१४ रात्री १०.४५ मुंबई. सिंह लग्नाची कुंडली. शासक ग्रह खालीलप्रमाणे :


L  - रवि ४,१


S  - शुक्र ५,३,१०


R  - रवि ४,१


D  - शनि ४,६,७


गेल्या एका अशाच प्रकारच्या लेखात मी सांगितले होते कि लग्नाचा सबलॉर्ड जर शासक ग्रहांमध्ये असेल तर व्यक्ती सुखरूप (जिवंत) असते

१) इथे लग्नाचा सबलॉर्ड शुक्र शासक ग्रहांमध्ये आहे म्हणजेच बाबा सुखरूप आहेत. 

२) चंद्र केंद्रात आहे ह्याचाच अर्थ बाबा सुखरूप आहेतच आणि घरात/घराच्या आसपास आहेत. 


३) वर शासक ग्रहांच्या significations वर नजर टाकली तर लक्षात येईल कि कुठेही अष्टम आणि व्यय स्थानाचा संबंध आलेला नाही उलटपक्षी ४ स्थान सतत दर्शवले जात आहे. त्यामुळे १००% बाबांना कसलीही दुखापत झालेली नाही आणि बाबा लवकरच सापडतील. 


४) आता ते कधी सापडतील ? कारण ते स्वतःहून परत घरी येणं मुश्कील आहे. (स्मृतीभ्रंश ) त्यासाठी शासक ग्रह मदतीला घेतले. 


५) सिंह लग्न सुरु आहे २ अंशावर. लग्न केतूच्या नक्षत्रात आणि शुक्राच्या उपनक्षत्रात आहे. शासक ग्रहांमध्ये रवि दोनदा आणि शुक्र एकदा आलेला आहे. त्यामुळे सिंह लग्नावरच व्यक्ती सापडू शकते. आता सिंह लग्न संपणार  रात्री १२.४४ ला. त्यामुळे  नक्की कधी हे सांगण्यासाठी लग्नाचा नक्षत्र स्वामी आणि उपनक्षत्र स्वामी ह्यावरच लक्ष केंद्रित करावे लागेल. सध्या लग्न केतूच्या नक्षत्रात आहे परंतु केतू रुलिंगमध्ये नाही म्हणजेच केतू सोडून द्यावा. केतू नंतर येतो शुक्र. शुक्र रुलिंगमध्ये( दुसऱ्या क्रमांकावर ) आहे. लग्न शुक्राच्या नक्षत्रात १३ अंश २० कला ते २६ अंश ४० कला असे पर्यंत असणार आहे. तेंव्हा घडाळ्यात वेळ असेल रात्रीचे ११.३५ ते १२.३०.  अजून detail मध्ये जायचे म्हणजे लग्न शुक्राच्या उपनक्षत्रात आहे,रुलिंग मध्ये राशी स्वामी म्हणून तिसऱ्या क्रमांकावर रवि आलेला आहे. म्हणजेच लग्नाचे अंश शुक्राच्या नक्षत्रात आणि शुक्राच्याच उपनक्षत्रात असतील तेंव्हा (घडाळ्यात वेळ असेल - ११ वाजून ३३ मिनिटे ते ११ वाजून ४२ मिनिटे किंवा लग्नाचे अंश शुक्राच्या नक्षत्रात आणि रविच्या उपनक्षत्रात असतील तेंव्हा(घडाळ्यात वेळ असेल - ११ वाजून ४२ मिनिटे ते ११ वाजून ४५ मिनिटे ) बाबांचा शोध लागला पाहिजे. 


हेमंतला सांगितले,"अजिबात काळजी करू नकोस बाबा सुखरूप आहेत. घराच्या आसपासच आहेत. साडे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान शोध लागेल. शोध लागल्या लागल्या मला कळव". हेमंत निश्चिंत झाला कि नाही ते माहित नाही पण मी शासक ग्रहांच्या भरोशावर निश्चिंतपणे झोपून गेले. 


रात्री ११.४५ ला हेमंतचा फोन आला," ताई बाबा सापडले. सुखरूप आहेत आणि ते दादरच्या आमच्या दुसरया घरी आहेत. मी आता त्यांना घ्यायला जातोय. त्या घरी माझी काकी राहते. तिनेच फोन करून कळवले. तिचा फोन ठेवला आणि लागलीच तुला फोन करतोय." 

शासक ग्रहांनी पुन्हा एकदा दिलेला हा प्रत्यय. केंद्रातील चंद्र जातक घराच्या आसपासच असल्याचे निर्देशित करतो. इथेही जातक स्वतःच्याच दुसऱ्या घरी होता. जातक सुखरूप आहे. मला ११.४५ ला हेमंतचा फोन आलेला ह्याचाच अर्थ बाबांचा शोध ११ वाजून ४० मिनिटे ते ११ वाजून ४४ मिनिटे ह्या दरम्यान लागला. पैसे आणि mobile जवळ नसताना केवळ पूर्वीच्या स्मृतीवर ते दादरच्या घरी एवढ्या रात्री पोहोचले कसे हा एक प्रश्नच आहे. 

पुन्हा एकदा कोटी कोटी प्रणाम गुरुवर्य के.एस. कृष्णमुर्ती सरांना.     
 ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा -  www.kpastrovastu.com

READERS ALL OVER THE WORLD