हिंदू नववर्षाच्या खूप खुप शुभेच्छा.
काल निवांत वेळ मिळालेला. खिडकीत बसून मस्त वाफाळलेल्या चहाचा आनंद घेत होते आणि समोर असलेल्या झाडांकडे सहज लक्ष गेले. जुनी पाने गळून नवीन पालवी फुटत होती. दरवर्षी हाच क्रम. जुनी गळकी पाने पडून नवीन टवटवीत हिरवी पालवी झाडाला फुटते. ह्यात नवीन असे काहीच नाही. हा तर निसर्गाचा नियमच आहे. फाल्गुन संपून चैत्र सुरु होईल. चैत्र प्रतिपदा म्हणजे हिंदू नववर्षाची सुरवात. इथे झाडांना नवीन पालवी फुटतेय. तिथे झेंडूच्या फुलांनी संपूर्ण जमीन सुवर्णाचीच असल्याचा भास होतोय. चैत्र महिन्यात इतर फुले दुर्मिळ असतांना ह्या सोन्याच्या फुलांना बहर आलेला असतो. आंब्याची झाडे जर्र हिरव्या कैऱ्यांनी लगडलीयेत. संपूर्ण वसुंधराच जणू हिरवा शालू नेसून आणि सोन्याचे दागिने मिरवत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आतुर दिसते. खरया अर्थाने नवीन वर्षाचा प्रारंभ वाटतो.
आपल्या संस्कृतीत प्रत्येक सणांना वेगळेच महत्त्व आहे. ह्या ऋतूत थंडीचा सोस कमी होऊन उन्हाचा मारा सुरु होतो. म्हणूनच होळी आणि रंगपंचमी सारखे सण आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यानंतर येते चैत्र प्रतिपदा. २१ मार्चला सुर्य विषुववृत्तावर येतो. ह्याच दिवशी भर दुपारी सुर्य बरोबर डोक्यावर येतो. त्याला वसंतसंपात म्हणतात. सुर्य बरोबर डोक्यावर म्हणजे पृथ्वीवरच्या तापमानात वाढ. तापमानात वाढ म्हणजे शरीरातून साखर आणि पाणी कमी होणे (glucose), अंगावर पुरळ उठणे. आपल्या गुढी उभारण्याच्या पद्धतीत कलशाबरोबरच आपण साखरेच्या गाठी आणि कडूलिंबाची पाने जरीच्या वस्त्राला माळतो. साखरेच्या गाठी शरीरातील glucose कमी होण्यावरचा आणि कडुलिंब अंगावर उठणाऱ्या पूरळांवरचा उपायच नाही का ?
म्हणजे आपल्या पूर्वजांनी आपल्या सणांनमधील प्रत्येक पद्धती ह्या शास्त्रीय आधारानेच आखल्या आहेत. आपल्याला बरीचशी कारणे अजून कळली नसतील इतकेच.
त्यामुळे १ जानेवारीपेक्षा चैत्र प्रतिपदा हा दिवस नवीन वर्षासाठी योग्य ठरतो. सर्वांना हिंदू नववर्षाच्या खूप खुप शुभेच्छा.
विद्या वाचस्पती अनुप्रिया देसाई
M.Com. in Human Resource
( ज्योतिष विशारद, वास्तू विशारद,ज्योतिष अलंकार )