मला मुलगाच हवा - वंशाचा दिवा
"आहे गं पत्रिका माझ्याकडे. बोल काय प्रश्न आहेत ?"
" ताई आम्ही ना दुसऱ्या बाळाचा विचार करतोय. कधी योग आहेत ते सांगू शकाल का ?"
"हो अगं, सांगते मी. उद्या फोन कर मला."
"आणि ताई....... "
मी विचारले "काय गं ?"
आणि तिचा मला अपेक्षित असणारा प्रश्न आला. "ताई मला ना पहिली मुलगी आहे."
"मग ?" माझा तिरकस प्रश्न.
"ह्या वेळेस मला मुलगा होईल का ? जरा सांगा ना"
हा प्रश्न ऐकून इतका राग आला पण रागावर ताबा ठेवून मी तिला शांतपणे सांगितले,"हे बघ निशा. मी तुझ्या पत्रिकेवरून तुला आता बाळ होईल का आणि ते बाळ सुदृढ असेल ना एवढे सांगू शकेन. मुलगाच होईल हे मी सांगणार नाही."
त्यावर तिचा हतबल प्रश्न," ताई तेवढं जरा बघा नां होईल का मुलगा ते ? "
पुन्हा एकदा तेच सांगून फोन ठेवून दिला मी. मुलगाच होईल का ? हा प्रश्न मला नेहेमीच विचारला जातो. अगदी मुलगा होण्यासाठी काय उपाय करता येतील का तुमच्या शास्त्राप्रमाणे ? हे सुद्धा विचारले जाते. हे ऐकून खरंच कीव करावीशी वाटते.
माझे काही जातक हे अमेरिका, सिंगापूर,कोरिया,लंडन,जर्मनी इ. ठिकाणाहून आहेत. ते जेंव्हा बाळाचे गर्भाशयातील बाळाचे लिंग परीक्षण करून घेतात तेंव्हा आश्चर्य वाटते. काही जातकांनी मुलीचा गर्भ आहे हे कळल्यावर गर्भपात करून घेतला आहे.
काही केसेस मध्ये तर मी हे ही पहिले आहे की सुनेला मुलगी झाली म्हणून सुतकी चेहऱ्याने सासूबाई बातमी सांगताहेत. इतकं सुतकी वातावरण की पेढे -बर्फी काहीही वाटण्याची गरज त्यांना वाटत नाही. एका केस मध्ये तर माझ्या जातक मैत्रिणीला ८ वर्ष बाळं होत नव्हतं. आठ वर्षांनी IVF पद्धतीने तिला जुळ्या मुली झाल्या. सासूबाई आणि नवऱ्याने तिला हॉस्पिटलमध्येच सुनावले की आता घरी यायची गरज नाही. सहा-सात महिन्यांनी नवऱ्याने तिला घरी आणले. परंतु सहा सात महिने त्या मुली बाबांच्या आणि आजी-आजोबांच्या प्रेमापासून वंचित राहिल्या. मुलींचा आणि त्यांच्या आईचा असा काय गुन्हा झाला की सासरच्यांकडून ही वागणूक मिळावी ? हे सगळं ऐकलं की खरंच मन सुन्न होतं. कुठल्या शतकात आहोत आपण ? उच्च शिक्षण घेऊन परदेशात उच्च पदावर काम करणाऱ्या लोकांचेही हेच विचार आहेत अजून ? मग काय उपयोग आहे शिक्षणाचा ? ह्या सगळ्याचा विचार करता आपल्या भारतीय समाजव्यवस्थेकडे मन येऊन पोहोचते.
सुरवातीला आपल्या समाजव्यवस्थेने काही नियम घालून दिले होते. म्हणजे मुलगा हाच वंशाचा दिवा कारण मुलगा लग्न झाले तरी आडनाव बदलत नाही,घराणे बदलत नाही. आई - वडिलांकडेच राहतो. मुलगी तर लग्न होऊन जाते सासरी मग आम्हांला कोण बघणार ?? ह्या सर्व गोष्टी सांगून सुनेवर नाहीतर स्वतःच्या मुलीवर तुला मुलगाच झाला पाहिजे हे दडपण लादले जात असे.
परंतु आजही २०१६ ला जेंव्हा मला असे फोन येतात तेंव्हा खूप चीड येते. आज माझ्याकडे अशी बरीच उदाहरणं आहेत ज्या कुटुंबातील मुलगा परदेशात वास्तव्य करून आहे आणि मुलगी सासरी नांदत असली तरी आई -वडिलांची काळजी घेतेय.
काळ बदला आहे. काळाप्रमाणे आपणही बदलायला हवे. जो हा बदल जाणीवपूर्वक आपल्या जीवनात आणत नाही तो संपलाच. ह्याचे अगदी साधे उदाहरण द्यायचे झाले तर सध्या रिक्षा आणि टॅक्सीवाले संप पुकारणार आहेत ? का तर म्हणे उबर आणि ओला ह्यांनी आमच्या धंद्यात घसरण आणली. प्रत्यक्षात रिक्षावाल्यांची अरेरावी आणि काळाबरोबर न बदलण्याच्या वृत्तीमुळेच आज त्यांच्यावर ही वेळ आली आहे. आपल्या शास्त्रातही हे नमूद केलेय काळाप्रमाणे बदल करणं गरजेचे आहे. काळाप्रमाणे जो बदलतो त्याच्या जीवनाची प्रगती झालीच म्हणून समजा.
हेच सांगणे आहे माझे ह्या काळातल्या होणाऱ्या भावी पिढीला. मुलगाच हवा हा हट्ट सोडून द्या. का बरं मुलाचाच हट्ट धरून बसलात ? मुली कुठे कमी पडताहेत ? गेल्या कित्येक वर्षांचे बोर्डाचे निकाल बघा. प्रत्येक निकालांमध्ये मुलींनीच बाजी मारली आहे. आज सगळ्या क्षेत्रात मुली आहेत. आणि नुसत्याच त्या क्षेत्रात नाहीयेत तर आपल्या कर्तबगारीने अव्वल दर्जावर आहेत. मग मुलगी का नको ? का मुलगाच हवा आहे ? संगोपन करतांनाच मुलगा म्हणून फार लाड आणि मुलगी दुसऱ्याच्या घरचे धन म्हणून हिणवू नका. ही मुलींची कामे आहेत ही मुलांनी करायची नाहीत हे शिकवणही देऊ नका. अजून आपल्या भारतात मुख्यत्त्वे गुजरात,राजस्थान,हरियाणा, उत्तरप्रदेश ह्या ठिकाणी बायकांना अक्कल नसते,बायकांना नेहेमी आपल्या धाकात ठेवावे,बायकांना शिक्षणाची गरज काय ? अशा प्रकारांची विचारसरणी अजूनही आहे. ती येत्या काळात बदलेलच. तुमचं काय ? आत्तापासूनच संगोपनात बदल घडवून आणाल तर ह्या पिढीत तरी आपल्याला जुनाट विचारसरणीचा अंत झालेला दिसेल. मुलींचे संगोपन कुठल्याही बुरसटलेल्या विचारसरणीने करू नका. तिला फुलू दे,वाढू दे, बहरू दे कारण तीच तुमच्या पुढच्या पिढीला जन्म देणार आहे. तिचं अस्तित्व वाचवा हीच माझी विनंती आहे तुम्हा सर्वांना.
काळाला बदलण्याची ताकद स्त्रीमध्येच आहे.
बघा खालील चित्रांवरून काही समजतंय का ?
सितार वादक अनुष्का |