कोजागिरीची रात्र
वर्षाऋतू संपून आश्विन महिन्यात आकाश निरभ्र होण्यास सुरवात होते. आणि ह्याच महिन्यातील पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. ह्या रात्री श्रीलक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर येऊन "को जागर्ति ? को जागर्ति ?" (म्हणजेच कोण जागे आहे ) असे विचारात सर्वत्र संचार करत असते. जो जागरण करतो आहे त्याला धनसंपत्तीने समृध्द करते अशी आख्यायिका आहे.
आपले पूर्वज हे काळाच्या कितीतरी पटीने पुढे होते. आपल्या ऋषीमुनींनी हे जाणले होते की कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राची किरणे शरीर-स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. त्यामुळेच कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात सर्वांनी एकत्र येऊन त्याचा लाभ सर्वांना व्हावा ही धारणा ठेवून ह्या रात्री जो जागरण करेल तो समृद्ध होईल असे सांगण्यात आले. चंद्राच्या प्रकाशात एक प्रकारची शक्ती आहे. चंद्राच्या वाढत्या आकाराबरोबर ही शक्तीही वाढत जाते. त्यामुळेच काही वैद्य किंवा ह्या विषयातील तज्ञ् अमावस्येच्या दिवशी काही वनौषधींची लागवड करतात. (ह्या बद्दलचा पुरावा हवा असेल तर Gardening by the Moon, Moon Gardeners etc. गूगल करू शकता ) चंद्राच्या प्रकाशात असलेली शक्ती आपल्या ऋषीमुनींनी ओळखली होती. दुध हे आरोग्यदायी आहे. चंद्राच्या प्रकाशात जर हे दुध ठेवले आणि प्राशन केले तर ती शक्ती आपल्या शरीर स्वास्थ्यसाठी अत्यंत अमृतदायी ठरते. कोजागिरीप्रमाणेच कार्तिक महिन्यातील त्रिपुरारी पौर्णिमाही आरोग्यदायी आहे. मुंबईच्या जवळच अंबरनाथ इथे महादेवाचे मंदिर आहे. ह्या मंदिराच्या आसपासच्या परिसरात मोठे मैदान आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला ह्या मैदानातच सर्वजण उपस्थित असतात. स्वतःच्या समोर एका चिनीमातीच्या बशीत दुध ठेवले जाते. ते दुध रात्री काही काळांनंतर प्राशन केले जाते. हे सर्व सांगण्याचा उद्देश असा की पौर्णिमेच्या दिवशीच ही सर्व शक्ती वातावरणात असते आणि जसा चंद्राचा क्षय होतो तशी ही शक्तीही कमी कमी होत जाते.
परंतु काळाच्या ओघात बऱ्याचअंशी असा समज पसरला गेला की कोजागिरीची रात्र म्हणजे सर्वांनी गप्पा मारायच्या,छान नाश्ता करायचा आणि मग झोपून जायचे. हल्ली तर कोजागिरीला सुट्टी नसते म्हणून मग शनिवार किंवा रविवारच्या सोयीचा दिवस ठरवून कोजागिरी साजरी केली जाते. उद्देश चांगला आहे परंतु जो संदेश आपल्या ऋषीमुनींनी दिला आहे तो तर बाजूलाच रहातो. म्हणजे तुम्ही सोयीच्या दिवशी एकत्र तर येता परंतु त्या दिवशी कोजागिरी नसते. मग कुठे आला तो चंद्राचा प्रकाश आणि कुठे ती चंद्राच्या किरणांची शक्ती ?? ह्यामुळे मूळ उद्देश हरवतोय. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे ती अशी, की पौर्णिमेला सुट्टी नाही म्हणून सोसायटीत सोयीच्या दिवशी साजरी कराच परंतु कोजागिरीच्या रात्री चांदण्यात थोडा वेळ नक्की बसा. ज्यांना अस्थमा आहे त्यांच्यासाठी तर कोजागिरी पौर्णिमा म्हणजे पर्वणीच. चांदण्यात हळदीचे किंवा मसाल्याचे दुध काही काळ ठेवून प्राशन करा. नक्की फरक दिसेल. हे दुध ठेवण्यासाठी चांदीच्या वाटीचा उपयोग करा. चांदी हा धातू आणि मोती हे रत्न चंद्राच्या तत्वांना आकृष्ट करतात. चांदीची वाटी नसेल तर चिनीमातीची वाटी किंवा बशी चालू शकेल परंतु कृपा करून प्लॅस्टिकचे मग किंवा कप वापरू नका.
जो जागरण करतो तो समृद्ध होतो ह्याचा अर्थ आरोग्याने संपन्न आणि समृद्ध होतो असा आहे हे विसरू नका कारण ज्याची तब्येत चांगली तो काम करण्यास सक्षम आणि मग लक्ष्मी त्याच्याकडे आलीच म्हणून समजा.
तर मंडळी आजची कोजागिरी आरोग्यदायी पद्धतीने साजरी करा.