बुधवार, ९ ऑगस्ट, २०१७

कुंडली आणि तुमचे मित्र


कुंडली आणि तुमचे मित्र 


ह्या रविवारी मैत्री -दिवस अर्थात Friendship Day साजरा केला गेला. आपल्या आयुष्यात मित्र असणं फार महत्त्वाचे आहे. आई -वडील,बहिण,भाऊ आणि इतर नाती ही जन्माने मिळतातचं परंतु कोणाशी मैत्री करायची हे सर्वस्वी आपल्या मनावर आहे. त्यामुळेच ह्या नात्याला स्वतःच असं अनोखं विश्व आहे. ह्या नात्यात कुठलीही औपचारिकता नाही. जस जसं वय वाढत जातं आणि आपली मुलं त्यांच्या आयुष्यात गर्क होतात तेंव्हा तुम्ही एकटे पडता. अशा वेळी गरज असते मित्रांची. जीवाभावाचा मित्र मिळण्यासाठी भाग्य लागतं. खरंच असा मित्र आहे आपल्या भाग्यात ? कुंडलीवरून त्याची कल्पना नक्कीच येते. कुंडलीतील अकरावे स्थान म्हणजे तुमचा जीवाभावाचा मित्र. तुमच्या मनाची अवस्था ओळखणारा. तुमच्या आनंदात सामील होणारा. तुमच्या दुःखात नातेवाईकांपेक्षांही तुमच्या जवळ असणारा. तुम्हांला समजून घेणारा आणि चुकीच्या गोष्टींबाबत वेळीच तुम्हांला खडसावणाराही. परंतु सर्वांनाच हे भाग्य लाभते असे नाही. काही वेळेस मित्रांमुळे अनैतिक गोष्टींमध्ये फसण्याचीही शक्यता असते. काहीवेळेस तर एका मित्राने केलेल्या खुनाची शिक्षा त्याच्या इतर मित्रांनाही जेलमध्ये घेऊन जाते. आयुष्य बदलून जाते. संगतीचा परिणाम असतोच. मग आजच्या पालकांना तर आपल्या मुलांबाबत सतत हीच चिंता असते की आपले मूल कुठल्या संगतीत आहे ? त्यामुळे मुलांच्या कुंडली संदर्भात सर्व प्रश्न विचारून झाल्यानंतर हा एक प्रश हमखास पालकांकडून विचारला जातो - "ह्याला/हिला मित्र-मैत्रिणींपासुन काही अपाय तर नाही ना ? कुंडलीतुन काही का,उ शकेल का  ?"  अशा पालकांना कुंडलीचे मार्गदर्शन उपयोगी ठरते. तुम्ही तुमच्या मुलांच्या कुंडलीवरून त्यांच्या मित्र-मैत्रीणींबद्दल नक्कीच जाणून घेऊ शकता. 

आजचा आपला विषय आहे कुंडलीतील एकरावे स्थान -

कुंडलीत असलेली स्थाने तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिबद्दल सांगता असतात. जसे कुंडलीतले प्रथम स्थान तुमच्या स्वभावाबद्दल सांगते. चतुर्थ स्थान तुमच्या आईबद्दल कल्पना देते. मातृसौख्य किती आहे ह्याचा विचार ह्या स्थानावरून होतो. पंचम स्थानावरून तुम्हांला होणाऱ्या संततीबद्दल सांगता येऊ शकते. षष्ठ स्थान तुमच्या शत्रूंबद्दल कल्पना देते. सप्तम स्थान तुमच्या जीवनसाथीबद्दल सांगते. न स्थान मोठ्या भावंडांबद्दल माहिती देते. दशम स्थान पित्याबद्दल तर एकरावे स्थान तुमच्या मित्रांबद्दलची कल्पना देते.

एकराव्या स्थानात असलेल्या राशीवरून, ग्रहांवरून मित्रांची कल्पना येऊ शकते. मुलं कुठल्या संगतीत आहेत त्याची कल्पना येऊ शकते. कुंडलीत हे लाभ स्थान कुठले ह्याचे कल्पना खालील चित्रात आहे - :






एकरावे स्थान किंवा लाभ स्थान. ह्या स्थानाला लाभ स्थान म्हणूनही संबोधले जाते. लाभ स्थान म्हणजे प्रत्येक गोष्टीतून होणारे लाभ,फायदे. धन स्थान म्हणजेच द्वितीय स्थान. द्वितीय स्थानावरून तुमच्याकडे असणाऱ्या संपत्तीची कल्पना येते. परंतु द्वितीय आणि लाभ स्थानाचा एकत्र अभ्यास केल्यास समजून येते की व्यक्तिने नुसते पैसे कमवले आहेत ?  त्यातील किती पैसे तो Save करू शकेल ? नुसता खर्चचं होत राहणार आहे का ? हा झाला द्वितीय आणि लाभ स्थानाचा एकत्रित विचार. त्याचप्रमाणे सप्तम स्थानावरून जीवनसाथीची ओळख होते. ह्या स्थावरून तुमचे वैवाहिक सौख्य कसे असेल ह्याची कल्पना येते. सप्तम स्थान आणि लाभ स्थान ह्या दोघांचा विचार करता विवाहानंतर तुम्हांला वैवाहिक सौख्य लाभेल की तुमचे नुकसान होणार आहे ह्याचा आढावा घेता येतो.

लाभ स्थान हे एकमेव असे स्थान आहे ज्या स्थावरूनच तुमच्या मित्र -परिवाराची कल्पना येते. ह्या स्थानात असलेले ग्रह ठरवतात की तुमच्या मुलांचे मित्र हे कुठल्या पद्धतीचे असतील ?

लाभ स्थानात असलेल्या राशीवरून आणि ग्रहांवरून मित्र कुठल्या प्रकारचे असतील ? कुठल्या वर्गातली(उच्च वर्ग की खालच्या वर्गातील )असतील  ? त्यांचा स्वभाव,सांपत्तिक स्थिती ह्याची कल्पना येऊ शकते. मित्रांमुळे तुमचे मुल स्वतःचे नुकसान तर करून घेणार नाही ना ? हे तुम्ही जाणून घेऊ शकता.

शनि हा प्रौढ ग्रह आहे. एकराव्या स्थानात जर शनि असेल तर तुमच्या मुलाचे सर्व मित्र हे त्याच्या वयापेक्षा मोठे असू शकतात. त्याला त्याच्या वयाच्या व्यक्तिंबरोबर बोलणे,वावरणे थिल्लरपणा वाटू शकतो. त्याचे स्वतःचे बोलणे हे मॅच्युर्ड असू शकते. आपण बरे आणि आपले काम बरे हा स्वभ असल्याने मित्र फार नसतात. हल्लागुल्ला हा प्रकार नसतो. अध्यात्मिक देवाणघेवाण जास्त असते.

ह्या स्थानात असलेला मंगळ ग्रह हे दर्शवतो की तुमच्या मुलाच्या संगतीत असलेले मित्र/मैत्रिणी ह्या ऍडव्हेंचर्स कॅटेगरीचे आहेत. सर्वांना गिर्यारोहण करण्याची आवड असू शकते. ते कधीही शांत बसू शकणार नाहीत. त्यांच्यात होत असणाऱ्या चर्चाही टेकनॉलॉजी संदर्भातील असू शकतात. त्यांच्यातील वाद म्हणजे शारीरिक हमरातुमरी. काही दिवसानंतर शांत होऊन पुन्हा पहिल्या सारखा हसण्याचा -खिदळण्याचा आवाज सुरु होतो.

चंद्र जर ह्या स्थानात असेल तर तुमचे मुलं त्याच्या वयापेक्षा लहान असलेल्या मुलांबरोबर जास्त रमते. त्याला फार प्रौढ बोलणे आणि वागणे आवडत नाही. स्वछंदी रहाणे त्यांना जास्त आवडते. ह्यांचा मित्र परिवार फार मोठा असतो. कोणाची रोकटोक ह्यांना आवडत नाही. त्यामुळे मग त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या मुलांबरोबर त्यांचे जास्त जमते असे म्हणू शकतो. त्यांची बालपणाची मैत्री दीर्घकाळ टिकते. आपल्या मित्रांमध्ये ह्यांची भावनिक गुंतवणूक जास्त असते. मित्राला काही झाले म्हणजे ह्यांनाच जास्त त्रास होऊ लागतो. अगदी ममत्वाने काळजी घेतील.

ह्या स्थानात शुक्र असेल तर ह्यांचा मित्र परिवार काही काळापुरताच टिकतो. म्हणजे त्यांच्या वयानुसार त्यांच्या मित्र -परिवारात बदल होत रहातो. फार काळ एखाद्या व्यक्तिबरोबर मैत्री टिकणे खूप कठीण जाते. इथे वयापेक्षा अपेक्षेप्रमाणे मित्र परिवार बदलतो. शुक्राचे मूड्स सतत बदलत असतात त्यामुळे त्यांचे मित्रही बदलतात किंवा असे म्हणू शकतो की ते त्यांच्या मित्रांची वर्गवारी करून ठेवतात. स्वतःच्या शॉपिंगला जाताना ठराविक व्यक्तिला सोबत घेऊन जातील. ठराविक व्यक्ति म्हणजे ज्या व्यक्तीची चॉईस चांगली असेल त्याच व्यक्तिला शॉपिंगला घेऊन जातील.

जर ह्या स्थानात रवि असेल तर लहानपणी मित्र फार कमी असतात. कालांतराने ह्यांच्या मित्र -परिवारात मोठं-मोठ्या व्यक्तिंचा समावेश होतो. मोठ्या व्यक्ति म्हणजे वयाने नव्हेत तर मानाने,प्रसिद्धीने मोठया असलेल्या व्यक्ति. जसे राजकारणी, शाळेचे मुख्याध्यापक, अभिनेते इ. ह्यांना स्वतःला मोठेपणा मिरवण्याची फार आवड असल्याने अशा मोठ्या व्यक्तिंबरोबर ओळख वाढवून त्यांच्या बरोबर ऊठबस असते.

गुरुसारखा ग्रह जर ह्या स्थानी असेल तर तुमच्या मुलाचे मित्र असे असतात जे सतत आजूबाजूचे ज्ञान घेण्यात व्यस्त असतात. अशा मुलांचीही मित्रमंडळी ही मोठ्या वर्तुळातील असतात. त्यांची स्वतःची प्रगती होत असते आणि त्यांच्या मित्रांच्या ओळखातून ते स्वतःचा फायदाही करून घेतात.

बुध ह्या स्थानांत असलेल्या व्यक्तिला मैत्री करायला ठराविक वय किंवा कारण लागत नाही. अशा लोकांच्या मित्र -परिवारात लहान मुलांपासून प्रौढ व्यक्ति सामील असतात. ह्यांना स्वतःला प्रवासाची आवड असल्याने त्यांची मैत्री प्रवासातच जास्त होत असते. आणि ही मैत्री दीर्घकाळ टिकते.

आता पुढचा जो प्रकार आहे - ह्या सर्व ग्रहांबरोबर मी दोन ग्रहांचा उल्लेख केलेला नाही. ते ग्रह आहेत राहू आणि केतू. हे ग्रह नसून छाया ग्रह आहेत. राहू आणि केतू सारख्या ग्रहांना कायम वाईट म्हणून हिणवले गेले आहे. राहू आणि केतू मध्ये दोन्ही पद्धतीच्या शक्ती आहेत. जर चांगल्या स्वरूपाची फळे मिळण्याचे योग असतील तर राहू आणि केतू तुम्हांला प्रसिद्धीच्या शिखरावर घेऊन जातील नाहीतर मग उतरती कळा लागते. राहू लाभस्थानात असेल तर ह्या व्यक्तिच्या ओळखी भरपूर असतात. मित्र परिवार मोठा असतो. मग ह्या मित्र परिवारात गुंड व्यक्तिंची असलेली जवळीकही असू शकते. (संपूर्ण कुंडलीचा अभ्यास व्हावा )

तुमच्या मुलाच्या कुंडलीत जर ह्या स्थानात राहू आणि मंगळाची युती असेल तर तुम्हांला वाढत्या वयात मुलांवर लक्ष ठेवावे लागेल. इथे मंगळ असून जर तो मिथुन राशीतील असेल तर मात्र तुमच्या मुलांवर आणि त्याच्या मित्रांवर जरूर लक्ष ठेवा. उगीचंच नको त्या गोष्टींबाबत पैज लावून स्वतःचा आणि दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालणे ह्या गोष्टी होऊ शकतात. हल्ली जो ब्ल्यू व्हेल नावाच्या खेळामुळे जे काही अनुचित प्रकार घडीत आहेत त्या मुलांच्या कुंडलीत सर्वसाधारणपणे ह्याच प्रकारचे योग होत असावेत.

त्यामुळे तुमच्या मुलांच्या कुंडलीत ह्या स्थानात असलेले ग्रह तपासा आणि वेळीच सावधगिरी बाळगा. तुमची मुले कुठल्याही गोष्टीच्या आहारी तर जाणार नाहीत ना ? मित्र असणे म्हणजे आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. परंतु तुमचे मूल वाईट संगतीत तर नाही ना ह्यावर लक्ष ठेवणे तुमचे कर्तव्य आहे. सध्याचा जमाना इंटरनेटचा आहे. दहा वर्षांवरील प्रत्येक मुलाच्या/मुलीच्या हातात आज स्वतःचा मोबाईल आहे. करिअरमध्ये व्यग्र असणाऱ्या आजच्या आई -बाबांनी मुलांच्या हातात कुठले जीवघेणे खेळणे दिले आहे त्याचा पुनःविचार व्हावा. सतत मुलांच्या मागे त्याच्या परिणामांचा घोषा लावण्यापेक्षा त्यांच्याशी सवांद साधा. (आजच्या पालकांना हे आज आवर्जून सांगावे लागतेय. कारण पालक स्वतः घरी रात्री नऊच्या पुढे पाऊल ठेवतात. आधीच्या काळी आजी आणि आजोबा सवांद साधण्यासाठी घरी असायचे. आता कुटुंब विभक्त पद्धतीनंतर हा प्रश्न निकडीचा झालेला आहे.) कारण आजची पिढी ही "Techno Savvy" आहेत. त्यांच्या मनात भावनांचा गोंधळ आहे. आम्ही प्रॅक्टिकल आहोत असं म्हणून आयुष्यातील प्रश्न सुटत तर नाहीतच परंतु पुढे भावनिक गरज वाढत जाते, हे त्यांच्या ध्यानीमनीही नसते आणि मग नको ते टोकाचे निर्णय घेतले जातात.

हा लेख पालकांना नक्कीच उपयोगी ठरेल अशी आशा करते.

प्रतिक्रिया नक्की कळवा.





















शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०१७

परदेशात शिक्षण आणि कुंडलीतील योग ?

परदेशात शिक्षण आणि कुंडलीतील योग ?

२०१४च्या मे महिन्यात केतनचा मला एक ई -मेल आला. त्यात त्याने त्याची प्रश्नावली पाठवली होती. ह्या अगोदर आमची बऱ्याचदा भेटही झाली होती. त्याच्या कुंडलीसंदर्भात चर्चाही भरपूर झाली. परंतु त्यावेळेस तो कॉलेजमध्ये होता. आता शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे काय ? परदेशात जाऊन शिकण्याची इच्छा त्याने व्यक्त केली.  परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे योग कुंडलीत आहे का ?  ह्या संदार्भातील प्रश्न त्याने मला पाठवले होते. त्याची बहीण सध्या अमेरिके स्थायिक असल्याने त्याला बाकी बरीच मदत होणार होती. फक्त ऍडमिशन कुठल्या युनिव्हर्सिटीत घेऊ इतकाच काय तो त्याचा निर्णय बाकी होता. मग त्या अनुषंगाने व्हिसा वगैरे. त्याचे प्रश्न खालीलप्रमाणे होते -

१) मी MBA अमेरिकेतून करू शकतो का ?

२) MBA चा नाद सोडून मी IT वर लक्ष केंद्रित करू का ?

३) की Finance क्षेत्राकडे मी वळू ?

मी त्याला कुंडलीचा अभ्यास करून सांगते असे कळवले. केतनची कुंडली - 





मकर लग्न आणि  सिंह राशीची केतनची कुंडली. त्याच्या प्रश्नाप्रमाणे कुंडलीचे विवेचन करु -

1) मी अमेरिकेतून MBA करू शकतो का ? - 

एका प्रश्नात दोन प्रश्न आहेत. MBA करू शकतो का ? आणि अमेरिकेत जाऊ शकतो का ?  MBA करण्यासाठी कुंडलीत उच्च शिक्षणाचे योग कसे आहेत ते आधी पहावे लागतील. 
पारंपरिक पद्धतीनुसार - : उच्च शिक्षणासाठी नवम स्थानाबरोबरच चतुर्थ स्थान आणि लाभ स्थान विचारात घ्यावे. नवम स्थानाचा अधिपती बुध चतुर्थ स्थानात रवि आणि गुरूच्या युतीमध्ये. रवी आणि बुध ह्यांच्या युतीला "बुधादित्य योग" म्हटले जाते. व्यक्ती उच्च शिक्षण घेतेच. अर्थात ह्याला कुंडलीतील बाकी ग्रहांची साथ असावी. 
के. पी. प्रमाणे - : केतनच्या कुंडलीत नवम स्थानाचा सब लॉर्ड आहे गुरु - ३,३,१२. चतुर्थ स्थानाचा सबलॉर्ड आहे केतू - ८,८. अमेरिकेत जाऊ शकतो का ? ह्या प्रश्नासाठी व्यय स्थान आणि तृतीय स्थान पहिले जाते. इथे व्यय स्थानाचा सबलॉर्ड चंद्र असून तो ७ ह्या स्थानचा कार्येश आहे. तृतीय स्थानाचा सबलॉर्ड गुरु असून तृतीय आणि बाराव्या स्थानाचा कार्येश आहे.  

ह्याचाच अर्थ केतनच्या कुंडलीत उच्च शिक्षणाचे योग आहेत. MBAच करेल हे स्पष्ट नाही. बाहेरगावी जाण्याचे योग आहेत. बाहेरगावी जाण्याचे योग असले तरी फार काळ राहण्याचे योग दिसत नाहीत. चंद्र सप्तम स्थानाचा कार्येश आहे. म्हणजे व्यक्ती कायम प्रवास करेल परंतु एकाच ठिकाणी राहणे दिसत नाही. तृतीय स्थानाचा सबलॉर्ड गुरूसुद्धा तेच निर्देशित करीत आहे. 

२) IT वर लक्ष केंद्रित करू का ? - 

पारंपारिक पद्धतीनुसार  - : IT करण्यासाठी कुंडलीत मंगळ ह्या ग्रहाला महत्त्व द्यावे. केतनच्या कुंडलीत मंगळ  मकर राशीत उच्चीचा आहे.  चतुर्थ आणि लाभ स्थानांचा अधिपती म्हणून मंगळाला तेवढेच महत्त्व द्यावे.  चतुर्थात रवी उच्चीचा आहे. बुधादित्य योग आहेच. बुध आणि मंगळ ह्यांचा संबंध कॉम्पुटरशी आहे. मंगळ म्हणजे टेक्नॉलॉजी आणि बुध म्हणजे सवांद साधण्यासाठी जे माध्यम वापरलं ते. 

के. पी. प्रमाणे - : मंगळ - १,४,११ स्थानांचा कार्येश. बुध ३,६,९ ह्या स्थानांचा कार्येश. म्हणजेच IT क्षेत्रातील शिक्षण घेण्यासाठी ग्रहांचा चांगलाच पाठिंबा आहे. 

३) की Finance क्षेत्राकडे वळू ? - 

पारंपरिक पद्धतीनुसार - : Finance साठी गुरु,बुध ,शुक्र आणि शनि ह्या ग्रहांचा प्रामुख्याने विचार व्हावा. केतनच्या कुंडलीत गुरु अस्तंगत असून चतुर्थ स्थानात आहे. बुध अस्तंगत असून चतुर्थ स्थानात. बुधादित्य योग होत आहे. शुक्र वृषभ राशीत पंचम स्थानात. सर्वच योग चांगल्या प्रकारचे. 

के. पी. प्रमाणे - :  गुरु स्वतः ३,३,१२ स्थानांचा कार्येश असून शुक्राच्या नक्षत्रात. बुध ३,६,९, चा कार्येश असून शुक्राच्या नक्षत्रात. शुक्र ५,५,१० स्थानांचा कार्येश आणि मंगळाच्या नक्षत्रात. म्हणजेच ह्या क्षेत्रातही केतन आपले करिअर करू शकतो. शनि २,१,११ स्थानांचा कार्येश असून केतूच्या नक्षत्रात. 

आता संपूर्ण कुंडलीचा आढावा घेतल्यास - लग्नेश आणि धनेश शनि असून तो व्यय स्थानात आहे. शनि कस्पने लाभ स्थानात. चंद्र स्वतः अष्टम स्थानात. चंद्र कस्पने सप्तम स्थानात.  केतनने हे प्रश्न मला २०१४च्या एप्रिल महिन्यात पाठवले होते. त्यावेळी त्याला चंद्राची महादशा सुरु होती. चंद्र - ७,७ नक्षत्र स्वामी - शुक्र ५,५,१०. 
अंतर्दशा राहू - २,१,२ नक्षत्र स्वामी - गुरु ३,३,१२. पुढे येणाऱ्या अंतर्दशा - गुरु,शनि,बुध,केतू,शुक्र आणि रवि. म्हणजेच २०२२ पर्यंत चंद्र महादशा राहणार त्यानंतर मंगळ महादशा सुरु होईल. मंगळ महादशा पुन्हा IT क्षेत्र निर्देशित करीत आहे. 

त्यानंतर मी केतनला Finance आणि MBA पेक्षा तुझे करिअर IT क्षेत्रात दिसून येत आहे हे सांगितले. अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घेण्याच्या स्वप्नावर पाणी सोडावे लागणार आहे. हे सुद्धा बजावले.  हे सर्व ऐकल्यावर केतनचे म्हणणे त्याचे अमेरिकेत जायचे जवळजवळ ठरल्यात जमा आहे. फक्त औपचारिकता म्हणून कुंडली दाखवण्याचा खटाटोप. मी केतनला म्हणाले ठीक आहे. तू तुझ्या पद्धतीने प्रयत्न करून पहा. माझे भविष्यवाणी चुकली तर आनंदच आहे. 

त्यानंतर आमचा फ़ार संपर्क नव्हता. काल पठ्ठ्याने लग्नाचे योग कधी आहेत ह्या प्रश्नासाठी फोन केल्यावर खालील माहिती मिळाली - 
१) अमेरिकेत जाण्याची इतर सर्व तयारी झाली होती. एजंटने केतनला व्हिसा पुढच्या आठवड्यात देतो असे आश्वासनही दिले. त्याप्रमाणे पैशांची जुळवाजुळव आणि युनिव्हर्सिटीच्या सर्व बाबी पूर्ण करण्याच्या तयारीत केतन गढून गेला. शेवटच्या क्षणी काय झाले ते कोणालाच कळले नाही. केतनला व्हिसा नाकारण्यात आला होता. कुठलेही कारण न देता त्याला व्हिसा मिळाला नाही.  

२) त्याने अमेरिकेला जाण्याचा नाद सोडून दिला. सर्व लक्ष IT क्षेत्रावर केंद्रित केले. आज तोगेले ३ वर्ष  IT क्षेत्रात कार्यरत आहे. 

पैशांची जुळवाजुळव झालेली असतांना, बहीण स्वतः अमेरिकेत स्थायी असल्यामुळे राहण्याचा काही प्रश्नच नसतांना केतनला अमेरिकेला जाता आले नाही. कुंडलीत परदेशगमन योग आहेत परंतु परदेशात राहून शिक्षण आणि स्थायिक होणे नाही. कुंडलीने दिलेले उत्तर कालांतराने खरे ठरले असेच म्हणायचे !!! 















READERS ALL OVER THE WORLD