माझं आधारकार्ड सापडेल का ?
आमच्या घरी मावशी गेले दोन वर्ष स्वयंपाकास येत आहेत. मूळच्या औरंगाबादच्या असल्याने स्वयंपाकात ठेचा आणि भाकरी ठरलेलीच. आम्ही काही सांगण्याआधी त्याच हक्काने सांगणार,"आज मी ही भाजी आमच्या औरंगाबादच्या इश्टाईलने बनवते, बगा खाऊन एकदा". गेल्या दोन वर्षात आपलंस केलं त्यांनी. शनिवार,रविवार आणि सुट्टीच्या दिवसांत जातकांची गर्दी असते. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे,कुंडली वेगळी. दुपारी दोन वाजून गेलेत आणि अजूनही मी जातकांच्या प्रश्न सोडवण्यात गुंतले आहे हे लक्षात आल्यावर मला हाक मारून स्वयंपाक घरात बोलावून घेणार. माझं पान वाढून,"आधी तुमी खाऊन घ्या. तुमालाबी बोलाची ताकद पाहिजेल ना ?" असं म्हणून मला जेवू घालणार. अशा आमच्या मावशी. आज रविवारचा दिवस. सकाळी ८.३० पासून जातकांची रीघ लागलेली. प्रत्येकाचे वेगळे प्रश्न आणि त्यावर आमची चर्चा चाललेली. १०.३० वाजले आणि मी मोकळी झाले. मावशीबाईंना चहा बनवण्यास सांगितला. चहा बनवता बनवता त्यांनी प्रश्न केला," ताई माझ्या महत्त्वाच्या गोष्टी हरविल्या आहेत. तुमी सांगू शकता ते ?" त्यांनी प्रश विचारल्याबरोबर घडाळ्याकडे नजर गेली. १० वाजून ३९ मिनिटे झालेली. काय गोष्टी हरवल्या आहेत ? ह्यांवर त्यांच उत्तर ," आधारकारड मिळना झालंय". हा महत्त्वाचा प्रश्न आहे खरा !!मग लगेच प्रश्नकुंडली मांडली.
पारंपरिक पद्धतीने - : तूळ लग्नाची कुंडली. चंद्र दशमात कर्क राशीत राहुबरोबर युतीत. प्रश्न आधारकार्डचा असल्याने चंद्र बुधाच्या नक्षत्रात आहे. बुध म्हणजे व्यवहारासाठी उपयुक्त ठरणारी कागदपत्रे. चंद्र कर्क राशीत असल्याने वस्तू घरातच आहेत.
कृष्णमूर्ती पद्धतीने - :
रुलिंग प्लॅनेट्स खालीलप्रमाणे-
L - शुक्र १०,१,८,१२
S - बुध १०,९,११
R - चंद्र ९
D - रवि १०,१०
सगळे ग्रह जलद गतीचे म्हणजेच आधारकार्ड आजच्या दिवसात सापडायला हवे. आजच्या दिवसांत पण कधी ? त्यासाठी रुलिंग प्लॅनेट्स मदतीला घेतले. रुलिंग प्लॅनेट्स मधील रवि सोडून द्यावा लागेल कारण आजच रविवार आणि आजच आधारकार्ड मिळणार आहे. त्यानंतर आहे शुक्र. शुक्राचेच तूळ लग्न आहे. पण मावशी घरी जाऊन स्वतः शोधणार. त्या संध्याकाळी ७.०० पर्यंत कामावरच असणार म्हणजे ७.०० वाजल्यानंतरचे लग्न पहावयास हवे. शुक्राचे वृषभ लग्न रात्री साधारपणे पावणे दहाला सुरु होते. रुलिंग प्लॅनेट्स मधील दुसरा ग्रह आहे बुध. परंतु आज चंद्र बुधाच्या नक्षत्रात असल्याने बुध गृहीत धरता येणार नाही. त्यानंतर आहे चंद्र. लग्न नक्षत्र स्वामी चंद्राच्या नक्षत्रात साधारणपणे रात्री १०.३० च्या सुमारास असेल.
मावशींना आधारकार्ड घरीच असल्याचे सांगितले. त्यावर त्यांचे म्हणणे असे की,सर्व घरात शोधून झाले परंतु सापडले नाही. चंद्र बुधाच्या आश्लेषा नक्षत्रात. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा घरात शोध घेण्यास सांगितले. आज रात्री ११.०० वाजेपर्यंत आधारकार्ड सापडले पाहिजे असे सांगितले.
दुसऱ्या दिवशी मावशी घरी आल्या तेच थँक्यू थँक्यू म्हणत. आधारकार्ड घरातच होते. कपाटात कपड्यांच्या मागे दडून बसलेले. त्याच जागी सकाळी पाहिले होते पण सापडले नाही आणि आता रात्री तिथेच सापडले. असं कसं ?आश्चर्ययुक्त समाधान त्यांचा चेहऱ्यावर होते. किती वाजता आधारकार्ड सापडलं ? ह्यावर त्यांचं उत्तर होतं - रात्री साडेदहाला सापडलं. म्हणजेच शुक्राच्या लग्नावर आणि लग्न चंद्राच्या रोहिणी नक्षत्रात असतांना कार्ड मिळाले.
रुलिंग प्लॅनेट्सनी पुन्हा एकदा दिलेला प्रत्यय.