रंग माझा वेगळा
बरेच दिवस BLOG वर काही लिहा म्हणून सगळ्यांचे SMS येत होते. FACEBOOK वरून विचारणा होत होती …पण म्हणावा तसा विषय मिळत नव्हता. आज विषय मिळाला.
माझ्या संपर्कातल्या काही लोकांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु केला तर अशा कुंडलीत काय योग असावेत बरे? एवढे धाडस करणे सोप्पे नाही. आज अशा एका कुंडलीबद्दल बोलू.
त्याआधी कुंडलीतील काही स्थानांविषयी तोंडओळख करून देते.
षष्ठ स्थान : कुंडलीतल्या ह्या स्थानावरून मुख्यत्वे रोग-आजार, नोकरी,नोकरीचा कालावधी,स्पर्धात्मक यश इ पाहतात. सध्या आपण फक्त नोकरी संबंधी हे स्थान विचारात घेणार आहोत. कुंडलीतील ह्या स्थानावरून ही व्यक्ती कुठे नोकरी करेल ? नोकरीत ह्या व्यक्तीचा हुद्धा ? ही व्यकी किती मेहनती आहे ? ह्या गोष्टी पाहता येतात.
पंचम स्थान : ह्या स्थानावरून व्यक्तीची आवड-छंद, कला,आध्यात्मिक साधना,ध्यान-स्मरण इ. तर पाहता येतातच परंतु ह्या स्थानावरून व्यक्तीची नोकरी सुटणे,नोकरीतील बदल,नोकरी न मिळणे ह्याही गोष्टींचा पडताळा होतो.
दशम स्थान : ह्या स्थानावरून व्यक्ती नोकरी करेल कि व्यवसाय ? व्यवसायाचे साधारण स्वरूप, व्यवसायातील यश-अपयश,उच्च-अधिकार इ . चा विचार केला जातो.
ज्या व्यक्तींच्या कुंडलीत षष्ठ स्थान व षष्ठ स्थानातील ग्रह हे पूरक असतील तर व्यक्ती आयुष्यभर "नोकरी" करते. जर षष्ठ स्थान बरोबर व्यक्तीला नवम व दशम स्थानाचीही साथ मिळाली तर उच्चाधिकार प्राप्त होतात. मान-सन्मान मिळतो. परंतु जर ह्या षष्ठ स्थानाचा संबंध पंचमाशी असेल तर व्यक्ती नोकरी करू शकणार नाही. कोणाच्या हाताखाली काम करणे आवडत नाही. नोकरीत धरसोड होते. एखादी नोकरी ३-४ महिने केल्यानंतर कंटाळा यायला लागतो. तेच तेच काय काम करायचे असे वाटू लागते.
परंतु जेंव्हा ह्याच " षष्ठ" स्थानाला "पंचम" स्थानाबरोबर "दशम" आणि "सप्तम" स्थानाचाही संबंध येतो तेंव्हा जातक स्वतःचा व्यवसाय सुरु करतो. जेंव्हा तत्सम स्थानांच्या "दशा-अंतर्दशा" सुरु होतात तेंव्हा जातकाला नोकरीला राम-राम म्हणण्याची हिंमत येते. अशाच एका जातकाच्या कुंडलीचे विवेचन आज मी करणार आहे. हे विवेचन "वैदिक व कृष्णमुर्ती" ह्या दोन्ही पद्धतीने करण्याचा प्रयत्न,
योगेश पाटील ही व्यक्ती IT क्षेत्रातील नामवंत कंपनीत चांगल्या हुद्यावर होती. SAP का काय म्हणतात ते केले होते. पगार चांगला. परंतु नोकरी करताना नेहेमी असमाधानी. कायम दुसऱ्यासाठी काम करतोय ही भावना. पण स्वतःचा काय व्यवसाय सुरु करावा का हा संभ्रम. ह्या जातकाचे "कन्या" लग्न आहे व राशी आहे "वृश्चिक". लहानपणापासून अत्यंत कष्टाचे आयुष्य. स्वतःच्या IT शिक्षणाचा खर्च स्वतः छोटी - मोठी कामे करत college करत घेतले व नामवंत कंपनीत छान नोकरी मिळवली. अत्यंत हुशार व खूप मेहनती. काही काळातच नोकरीत परीक्षा देत देत वरच्या हुद्यावर जागा मिळवली. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा लाडका. ह्या जातकाच्या कुंडलीत पंचम व षष्ठ ह्या स्थानात अनुक्रमे मकर व कुंभ राशी आहेत. ह्या राशीचा स्वामी शनि हा "नवम" स्थानात आहे. म्हणजेच ह्या कुंडलीत षष्ठ स्थानाचा नवम स्थानाशी संबंध आहे. त्यामुळे ह्या व्यक्तीला चांगल्या कंपनीत चांगल्या हुद्यावर नोकरी मिळाली व बढतीही. नवम स्थानामुळे नोकरीच्या ठिकाणी नाव-लौकीकही चांगला प्राप्त झाला. पण आपण हे विसरता कामा नये की इथे षष्ठ स्थानाचा संबंध पंचमाशी सुद्धा आहे. पंचमात शनिचीच मकर राशी आहे आणि शनि आहे मंगळाच्या नक्षत्रात. मंगळ स्वतः सप्तमेश गुरु बरोबर पंचमात आहे. म्हणजेच इथे "पंचम,षष्ठ,सप्तम व नवम" स्थानांचा एकमेकांशी संबध आला आहे. पण नुसता कुंडलीत असा संबंध असून काही उपयोग नाही कारण जोपर्यंत पंचम व तत्सम स्थानाच्या दशा सुरु होत नाहीत तोपर्यंत कुंडलीतल्या योगांचे प्रत्यक्ष जीवनात परिवर्तन होत नाही.
हा जातक माझ्याकडे साधारणपणे जानेवारी २००९ साली आला होता. त्यावेळी त्याची शुक्राची अंतर्दशा सुरु होती. शुक्र कुंडलीत ८,२,९ ह्या स्थानचा कार्येश आहे. शुक्र केतूच्या नक्षत्रात व केतू १०,१ चा कार्येश. "माझी आहे ती नोकरी सोडून मला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे. असे काही योग आहेत का माझ्या कुंडलीत ?" हा त्याचा प्रश्न. त्याच्या कुंडलीतील इतर योग सांगत होते हा स्वतःचा व्यवसाय करणार. पण त्याची अंतर्दशा पाहता सध्या हा नोकरी सोडण्याच्या विचारावर तो ठाम नाही हे स्पष्ट दिसतेय… बरोबर ना ?? कारण पंचमाची अंतर्दशा सुरु झालेली नाहीये. जोपर्यंत पंचमाचा संबंध येत नाही तोपर्यंत जातक नोकरी सोडण्याच्या नुसत्या विचारात असतो पण नोकरी सोडू शकत नाही. त्यावेळी त्या जातकाला सांगितले," सध्या तरी तो योग तुझ्या कुंडलीत नाही. २०११ च्या जुलै महिन्यात हे धाडस तू करू शकशील. तुला मार्गही दिसेल. " हे मी कशावरून सांगितले हे तुमच्या लक्षात आलेच असेल. hmmmmmmm बरोबर पंचमातील "मंगळ" ग्रहाची विदशा ह्या कुंडलीला जुलै २०११ ला सुरु होणार होती. बाकीचे ही योग त्याच काळात व्यवसायासाठी पूरक दिसत होते. अत्यंत हिरमुसलेला चेहरा झाला होता त्याचा. परंतु इलाज नाही. ग्रह हेच सांगत होते.
नंतरच्या काही काळात त्या जातकाकडून काही कळले नाही. मी ही विसरून गेले. ऑक्टोबर२०११ च्या एका रविवारी स्वारी मला भेटण्यास आली. अत्यंत खुश दिसत होता. मी विचारले,"काय रे बाबा व्यवसाय सुरु केलास वाटते ?" हसत हसत तो म्हणाला," हो २००९ ला तुमच्याकडे आलो होतो तुम्ही सांगितल्याप्रमाणे जुलै २०११ लाच व्यवसाय सुरु झाला. मधल्या काळात खूप धडपड केली परंतु कधी भांडवल तर कधी जागेचा प्रश्न. पण आता सुरळीत सुरु आहे. त्या संदर्भात काही प्रश्न विचारायचे आहेत."
म्हणजे ग्रहांनी त्यांचा अंमल दाखवला होता. अशाच काही कुंडल्या घेऊन तुमच्या भेटीला येणार आहे लवकरच.
ज्योतिष आणि वास्तू सल्ल्यासाठी इथे संपर्क करावा - www.kpastrovastu.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा