परीक्षेचा रिजल्ट आणि ढोंगी बाबांची चलती …….
काल माधुरीचा फोन आला. "Madam मुलाचा बारावीचा रिजल्ट लागला. तुम्ही म्हणला होतात ७० आणि ७५ टक्केच्या दरम्यान मार्क्स मिळतील. त्याला ७४% मिळाले."
मी म्हटले," अरे वाह छान. मग पुढचे काय ? पुढे काय म्हणतोय काय करायची इच्छा आहे ?"
"तुम्ही सांगिल्याप्रमाणे त्यालाही सिव्हिल इंजिनीरिंगच करायचे आहे. ते करू शकेल ना ? पुढे काही अडचणी तर येणार नाहीत ना ? कारण तुम्हाला तर माहीतच आहे तो जराही स्थिर नाही. दहावीपर्यंत कसा अभ्यास करून घेतलाय ते मलाच माहीत.बारावीचाही त्याने शेवटी शेवटी अभ्यास केलाय. त्यामुळे भीती वाटतेय. करेल ना पुढचे नीट?"
काही वेळेस काही जातक पुन्हा पुन्हा तेच तेच प्रश्न विचारात असतात.
काळजी वाटत असल्याने ठीक आहे पण म्हणून कुंडलीचे विवेचन एकदा झालेले असताना
पुन्हा पुन्हा तेच तेच विचारले कि मग त्रास होतो. कारण उत्तर तर बदलणार
नसते. असो तर मी म्हटले, "गेल्यावेळेस आपले बोलणे झाले आहे ना ? करेल तो व्यवस्थित. तरी सुद्धा तुम्हाला वाटत असेल तर पुन्हा एकदा मी कुंडली check करते."
"तसे नाही madam पण काय झालेय की मी मध्ये खूप Tension मध्ये होते अमोदच्या रिजल्टच्या संदर्भात,तेंव्हा माझ्या मैत्रिणीने मला एका ज्योतिषाबद्दल सांगितले. मी गेल्याच आठवड्यात त्यांच्याकडे गेले होते. त्यांनी तर स्पष्ट सांगितले कि हा मुलगा नापास होणार. मंगळ आणि राहूची युति आहे. ह्याला शिक्षणात खूप अडचणी आहेत. पुढे जास्त शिकू शकणार नाही.
मी खूप घाबरले हो. मी म्हटले मग काय करायचे? एकुलता एक मुलगा आहे तो पण नाही व्यवस्थित शिकला तर मग झालेच. त्यावर ते म्हणाले ह्यावर एक उपाय आहे. तो केल्याने तो पासच नाही तर मार्कही तुम्हाला हवे तसे मिळतील. आहे का तयारी ? मी विचारले काय उपाय आहे ? त्यावर त्यांनी मंगळ आणि राहुच्या शांतीचा उपाय सांगितला. ३०,०००/- रु. खर्च होईल पण तो उपाय केल्याने फरक पडेल असे सांगितले. मला काय करावे काय कळतच नव्हते. मग पुन्हा आमची वारी माझी मैत्रीण दुसऱ्या ज्योतिषाकडे घेऊन गेली. खूप प्रसिध्द आहेत ते. त्यांनी ही तेच सांगितले आणि शांतीचा खर्च ३५०००/- रु. सांगितला. इतकी घाबरली होते ना madam घरी आल्यावर मी ह्यांना सांगितले. ते तर इतके रागवले. मला म्हणाले काय गरज होती तिथे जायची? एकदा आपल्याला अनुप्रियाने सांगितलेय ना ?? आणि ही शांती बिंती काही करायची गरज नाही. मी हा खर्च करणार नाही.
रिजल्ट लागेपर्यंत मी इतकी tension मध्ये होते ना madam. काय सांगू ?? आणि जिने मला त्या ज्योतिषांकडे नेले होते तिचाही सारखा फोन येत होता. ते ज्योतिषी सारखे तिला फोन करून विचारात होते कि लवकर करा शांती मग मुहूर्त नाहीत आणि नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल मग आपल्या हातात काहीच नाही वगैरे. पण ह्यांनी नाहीच सांगितलेले त्यामुळे मी तिला तसे सांगितले.
आणि रिजल्टच्या दिवशीतर मी सगळे फोन बंद केले होते. सगळ्या नातेवाईकांना काय सांगायचे ह्याची भीती. मुलगा घरी आला तेंव्हा रिजल्ट कळला आणि इतका आनंद झाला ना. हे पण म्हणाले बघ उगीचंच tension घेतलं होतीस. अनुप्रियाने ७० आणि ७५ च्या दरम्यान सांगितलं होत ७४%मिळाले आणि ते ही कुठलीही शांती बिंती न करता."
एका दमात माधुरी बाईनी आपली कहाणी सांगितली. ऐकून रागही आला आणि समाधानही वाटले. माधुरीच्या ह्यांनी शास्त्रावर दाखवलेला विश्वास मला नवी स्फूर्ती देऊन गेला. माधुरीला सांगितले,"चला बरे झाले त्या निमित्ताने तुम्हालाही कळले ढोंगी लोक कसे असतात ते. आता लक्षात ठेवा आणि काळजी करू नका. अमोदची कुंडली व्यवस्थित आहे. काहीही अडचणी नाहीत. पुढचेही सगळे व्यवस्थित होईल."
ह्या शास्त्राचा वापर बरेच लोक आपल्या फायद्यासाठी करतात. लोकांना घाबरवून,खोटे सांगून पैसे कमवण्याचे नवीन नवीन मार्ग असतात ह्यांच्या कडे. पण लोकांनी सद्सदविवेकबुद्धीने विचार करावा म्हणून ही Case आज इथे Publish करतेय. चार दिवसांनी रिजल्ट लागणार आहे आणि त्याची आज शांती करून मार्क्स वाढतील असा विश्वास बरयाच ज्योतिषांकडून (ढोंगी) दिला जातो आणि भरगच्च रक्कम सांगितली जाते. चार दिवसात शांतीने रिजल्ट बदलू शकतो का ?? ह्याचा विचार पालकांनी करावा आणि अशा सगळ्या लोकांना थारा देऊ नये. कारण माधुरीने एकदा का शांती करून घेतली असती आणि रिजल्ट चांगला लागला आहेच तर ह्या ढोंगी लोकांनी त्याचे सर्व credit स्वतःला घेतले असते आणि भविष्यात अजून घाबरवून शांती वगैरेचा खर्च उकळला असता. पण अशा लोकांमुळे समाजाचे नुकसान तर होताच आहे त्याचबरोबरीने ह्या शास्त्राचा प्रांजळपणे अभ्यास करणारया लोकांवर(ज्योतिषांवर) मग समाज विश्वास ठेवत नाही आणि मार्गदर्शनापासून वंचित रहातो.
तुम्हीही नीट विचार करा आणि माधुरीसारखे कोणाच्या बोलण्याला बळी पडू नका.
प्रतिक्रिया नक्की कळवा : anupriyadesai@gmail.com