सोमवार, ३० ऑक्टोबर, २०१७

एका दिवसात मुलुंड इथे वास्तुशास्त्र शिकण्याची संधी !!!

एका दिवसात मुलुंड इथे वास्तुशास्त्र शिकण्याची संधी !!!


एका दिवसात मुलुंड इथे वास्तुशास्त्र शिकण्याची संधी !!! वास्तू घेतांना काय काळजी घ्यावी ? राहत्या वास्तू सकारात्मक असावी म्हणून काय करू शकतो ?ह्या आणि इतर बऱ्याच गोष्टींवर चर्चा करणार आहोत. फी अगदी माफक असणार आहे. 
आपल्या घराचा "प्लॅन" आणल्यास वास्तू संदर्भांत आपल्याला मार्गदर्शन केले जाईल. ज्याची फी आकारली जाणार नाही.   



सोमवार, २३ ऑक्टोबर, २०१७

ग्रहांनी दिलेला संकेत खरा ठरला !!!

पाकीट हरवले.. 


आजच्या सदरात मी ग्रह किती बोलके असतात ह्या संदर्भात एक केस देणार आहे. १३ ऑक्टबोर रोजी संध्याकाळी ७ वाजून १९ मिनिटांनी आमच्या सोसायटीतील एक सदस्य माझ्या घरी आले. वय असेल ६५ च्या आसपास. ते स्वतः आणि त्यांच्या पत्नी दोघांचाही चेहरा घाबराघुबरा दिसत होता. त्यांनीच सांगायला सुरवात केली. ते दोघे बाजारातून दिवाळीची खरेदी करून स्कुटरवरून घरी परतत होते. सोसायटीच्या आवारात शिरताच त्यांच्या स्कुटरला समोरून सायकलने येणाऱ्या दुधवाल्याने ठोकर दिली. ह्यांत तो दूधवाला पडलाच परंतु हे जोडपेही स्कुटरवरून खाली पडले. धावत समोरच बसलेला वॉचमनही आला. सोसायटीच्या आवारात भाजी विकण्यासाठी आलेले भाजीविक्रेतेही धावत आले. सर्वांनी ह्या जोडप्याला सामान बॅगेत भरून दिले. काका आणि काकू दोघेही घरी गेले. घरात शिरताच काकांना जाणवले की आपले पैशांचे पाकीट खिशात नाही. सामानात शोधून झाल्यावर ते दोघेही तडक खाली आले. सोसायटीच्या आवारात जिथे त्यांची दुधवाल्याच्या सायकलीबरोबर ठोकर झाली तिथे त्या जागी शोधले परंतु पाकीट काही दृष्टीस पडले नाही. त्यांनी वॉचमनला विचारले. त्याने पाकीट पाहिलेही नाही असे सांगितले. भाजीवाला आणि दूधवाला केंव्हाच निघून गेलेले. काकांनी वॉचमनकडून दुधवाल्याचा नंबर घेतला आणि पाकीट सापडलं आहे का म्हणून विचारणा केली. त्यानेही नाकारघंटाच चालवली. त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या देवरे काकांनी मग माझ्याकडे येण्यास सुचवले. त्याप्रमाणे ते दिघे आणि देवरे काका माझ्या घरी आले. सर्व कथाकथन झाल्यानंतर मला कुंडलीवरून काही सांगता येईल असा त्यांचा प्रश्न होता कारण पाकिटात काकांचे "Ex-Service man" चे ID कार्ड होते. काका - काकूंचे पॅनकार्ड होते, आधारकार्ड होते आणि रु.१५०००/- नकद होते. पैशांपेक्षा पॅनकार्ड आणि आधारकार्डची चिंता त्यांना जास्त सतावत होती.  

प्रश्नकुंडली मांडली. मेष लग्नाची कुंडली. चंद्र कर्केचा चतुर्थात. चंद्र चतुर्थात असतो तेंव्हा वस्तू घरातच असते. किंवा घराच्या आसपास असते. ह्या कुंडलीत चंद्र चतुर्थात. चंद्र शनिच्या पुष्य नक्षत्रात. त्यादिवशीचे शासक ग्रह खालील प्रमाणे - : 

L - मेष - मंगळ - ५, १, ८

S - पुष्य - शनि - ८, १०, ११

R - कर्क - चंद्र - ४, ४

D - शुक्र - शुक्र -  ५, २, ७ 



चर लग्नाची कुंडली. चंद्र कर्क राशीत आणि कर्क राशी चतुर्थात आलेली. चंद्राच्या स्थितीवरून वस्तू कुठे आहे ह्याची कल्पना येते. चंद्र कर्क राशीत चतुर्थात ह्याचाच अर्थ वस्तू घरातच किंवा घराच्या आसपास आहे. चंद्राच्या ह्या स्थितीवरून त्यांना विचारले,"नक्की घरी पाकीट नाही ? व्यवस्थित शोधले तुम्ही ?". त्यावर त्यांचे म्हणणे," घरात शिरतानांच लक्षात आले की पाकीट नाही. ". 

चंद्र शनिच्या नक्षत्रात. शनि - ८,१०,११ चा कार्येश. म्हणजे पाकीट मिळेल परंतु केंव्हा आणि कुठे ? कुठे ह्या प्रश्नाचे उत्तर - घराच्या जवळ किंवा घरात असेच वाटते. केंव्हा ह्यासाठी L,S,R,D पाहिले तर शनि सोडल्यास बाकी ग्रह जलद गतीचे. चंद्र राहुबरोबर आहे. युती नसली तरी राहुंबरोबर असणे म्हणजे जिथे वस्तू असते तिथे काही वेळेस नजरेस पडत नाही. पुन्हा पुन्हा तपासून पाहावे लागते. 

आज शुक्रवार. शासक ग्रहांमध्ये शनि आहे. दुसऱ्या दिवशी शनिवार. शनि लाभ आणि अष्टम स्थानांचा कार्येश. उद्या पाकीट मिळेल हे नक्की. त्यांना तसे सांगितले आणि रीतसर पोलीस-स्टेशनांत कार्ड हरवल्याची तक्रार/नोंद करण्यास सांगितले. 

दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी संध्याकाळी काकांनी पाकीट मिळाल्याचे कळवले. पाकीट त्यांच्याच घराच्या बाहेर चपलांच्या रॅकच्या मागे पडलेले मिळाले. (चंद्र आणि राहू एकत्र - राहू - चपलांचा कारक ) किती वाजता पाकीट मिळाले ? ह्यावर त्यांचे उत्तर," वेळ लक्षात नाही परंतु सकाळी साडे दहाच्या आधीच पाकीट मिळाले". 

साडे दहाची कुंडली तपासली. वृश्चिक लग्न होते. लाभेश शनि लग्नात आला होता. लाभतील राशी म्हणजेच कुंभ राशी चतुर्थात. मुख्यतः चंद्र हा राहूच्या युतीत होता. पाकिटात सर्व गोष्टी सुरक्षित होत्या.  

ग्रहांनी दिलेला संकेत खरा ठरला !!!














शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०१७




 एका दिवसांत वास्तू शास्त्र शिकण्याची सुवर्णसंधी 


स्वतःच घर घेताना,आपलं घर हे वास्तूच्या नियमांप्रमाणे असावं असं प्रत्येकाला वाटतं. परंतु इंटरनेटवर वाचलेल्या लेखांतून आणि वाचलेल्या पुस्तकांतून शंकेचे समाधान होत नाही. मग आपण वास्तू तज्ज्ञाला बोलावतो. प्रत्येक फ्लॅट पाहतांना वास्तू तज्ज्ञाला बोलावणे practically शक्य नसतं. ४०,०००-४५,००० रु. फी भरून कोर्स करणं प्रत्येकाला शक्य नसतं. मग अशा वेळी करायचं काय ?

ह्या तुमच्या समस्येवर एक तोडगा आहे. दिवाळीनंतर मी तुम्हाला वास्तूबद्दलचे थोडेसे ज्ञान देणार आहे. वास्तू कशी निवडावी ह्याबद्दल आपण मार्गदर्शन घेणार आहोत. नुसत्या अमुक दिशेत मुख्य दार असले म्हणजे वास्तू -शास्त्र नव्हे. स्वयंपाकघर कुठे असावे ? ओटा कसा असावा ? कुठल्या मटेरिअलचा असावा ? बेडरूम कुठल्या दिशेत असली म्हणजे आर्थिक स्थैर्य लाभेल ? घरातील कर्त्या पुरुषाला मानसिक शांती कधी मिळेल ? मुलांची बेडरूम. देवघर कसे असावे ? तुमच्या घरातील नकारत्मक ऊर्जा घालवून वास्तू उत्साहवर्धक कशी करता येईल ? अशा आणि बऱ्याच गोष्टींची चर्चा आपण करणार आहोत.  तुमच्या इतरही शंकांचं समाधान होणार आहे. तुम्हांला वास्तू निवडतांना ह्या ज्ञानाचा उपयोग तर होईलच परंतु राहत्या वास्तूत काही बदल कसे करून घ्यायचे त्यासाठी हे ज्ञान नक्कीच उपयुक्त ठरेल.  

ह्या बरोबर एक सुवर्णसंधी अशी की तुम्ही तुमच्या राहत्या वास्तूचा "Map" बरोबर आणल्यास त्याबद्दल तुम्हांला मार्गदर्शन घेता येईल. 

नोंदणीसाठी शेवटची तारीख आहे ३१ ऑक्टोबर. तुम्ही मला इथे संपर्क करू शकता - ९८१९०२१११९. संध्याकाळी ७.०० नंतर फोन करून नोंदणी करू शकता. किंवा माझ्या ई -मेल आयडी वर मेल पाठवू शकता - anupriyadesai@gmail.com

धन्यवाद 
अनुप्रिया देसाई 

शनिवार, ७ ऑक्टोबर, २०१७

कुंडलीतून परिसंवाद मुलांशी

कुंडलीतून परिसंवाद मुलांशी 

करिअरमध्ये उंची गाठणाऱ्या आजच्या पालकांची कसरत होत असते. एकतर ऑफिसमध्ये दिलेले प्रोजेक्ट्स पूर्ण करा,ट्रेनचा /बसचा प्रवास करून घरी या,जेवा -टी. व्ही. पहा आणि झोपून जा. शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या कशा निघून जातात ते कळेपर्यंत सोमवार उजाडतो. ह्या चक्रातून पालकांची सुटका होणे कठीण आहे. ह्या सर्व दिनचर्येमध्ये पालकांचा मुलांशी किती सवांद साधला जात असेल ? त्या छोट्या जीवाला आजचा दिवस कसा गेला ? शाळेतील दिवस कसा होता ? आजच्या दिवसात असं काय घडलं जे तुमच्या मुलाला आवडलं ? किंवा असं काय घडलं ज्याने मुल गांगरून गेलं आहे ? हा सवांद तुमच्या मुलांबरोबर आठवड्यातील किती दिवस करता ?  आपल्या मुलांच्या स्वभावाबद्दल तुम्हांला किती माहिती आहे ? तुमच्या मुलांना राग किती येतो ? रागावर नियंत्रण त्यांना जमते का ? रागाचे रूपांतर अहंकारात होतेय का ? त्या अहंकाराच्या आहारी जाऊन मुले स्वतःला काही अपाय करून घेत आहेत का किंवा करून घेऊ शकतात ह्याची तुम्हांला कल्पना आहे का ?  लहान मुल हट्ट करणारच परंतु तो हट्ट आपण सतत पुरवत राहिलो तर त्याचे भविष्यातल्या परिणामांची कल्पना आहे का ?

पालकांच्या दुर्लक्षतेमुळे मुलं गुन्हेगारी,ड्रग्स आणि ह्या गोष्टींच्या आहारी जाऊ शकतात. ह्या तरुण पिढीच्या  वाढलेल्या फुकाच्या अहंकारामुळे एखादी गोष्ट त्यांना नाही मिळाली की दुसऱ्या व्यक्तीचा खून किंवा स्वतः आत्महत्या ही मुले करू लागली आहेत. ह्यात दोष पालकांचा,मुलांचा की बदललेल्या समाजव्यवस्थेचा ? आधीच्या काळी एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये प्रत्येक जोडप्याला किमान पाच मुले असायची. त्यावेळी मुलांकडे आणि पालकांकडे मोबाईल,टी.व्ही.,लॅपटॉप हे सर्व नव्हते आणि म्हणूनच त्यांच्यात सवांद जास्त होत होता. वडिलांचा किंवा घरातील मोठ्या व्यक्तींचा धाक असायचा. मुलांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय हे माहीतही नव्हते आणि त्याची त्यांना गरजही वाटली नाही. पण आजच्या मुलांना "Personal Space" हवी असते. मग त्यांना आपण त्यांची स्वतंत्र खोली देतोच परंतु त्याच बरोबरीने मोबाईलसारखे जग मुठीत येणारे खेळणेही देतो आणि तिथेच घात  होतोय. मुलं तुमच्याशी बोलण्यापेक्षा ह्या इंटरनेटच्या आभासी दुनियेत रममाण होतात. पालकांबरोबरीचा सवांद खुंटत जातो आणि मुलांना बाहेरची दुनिया खरी आणि आपली वाटू लागते. ह्या दुनियेत रमतांना मुले आपल्या पालकांपासून दुरावतात.

हल्लीच्या मुलांमध्ये सहनशक्ती कमी असणे, नकार ऐकण्याची क्षमता नसणे, सतत दुसऱ्या व्यक्तीबरोबर आपली बरोबरी करणे, आपल्याकडे जी वस्तू नाही किंवा पैसे नाहीत ह्या बाबतीत कमीपणा वाटणे इ. गोष्टी प्रकर्षाने जाणवत आहेत. माझ्या मित्राकडे अमुकअमुक कंपनीचा मोबाईल आहे म्हणून मला सुद्धा तोच मोबाईल हवा आणि आईवडिलांनी साधा मोबाईल दिल्यामुळे मित्रांसमोर हा मोबाईल दाखवण्याची लाज वाटते आणि म्हणून क्लासमध्ये असतांना पालकांचा फोन आला की मी फोन घेत नाही हे मला एका १६ वर्षाच्या मुलाने स्पष्ट सांगितले. मला सुद्धा अमुकअमुक कॉलेजला जायचे आहे,मला सुद्धा सुट्टीत मित्रांबरोबर फिरायला भारताबाहेर जायचे आहे ही वाक्य नेहेमीच ऐकू येतात. आणि जर मुलांच्या ह्या इच्छा पालक पूर्ण करू शकले नाहीत तर ही मुलं चोरी करून किंवा स्वतःच्याच पालकांची हत्या करून आपली गरज भागवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ह्यासाठी आपल्या समाजव्यवस्थेत झालेले बदल,दुसऱ्यांवर सतत कुरघोडी करून पुढे राहण्याचा हट्टहास, बुद्धी उच्च दर्जाची नसली तरी बेहत्तर परंतु पेहराव उच्च दर्जाचा हवा ह्या सर्व गोष्टी कारणीभूत आहेत असे मला वाटते. त्यासाठी मुलांना वाढवतांना आपण एकाच साच्यातून जाण्यास भाग तर पाडीत नाही ना हा प्रश्न पालकांनी स्वतःला विचारावा. एकाच साच्यातून म्हणजे प्रत्येक परीक्षेत प्रत्येक विषयात ९० पेक्षा जास्त मार्क्स मिळालेच पाहिजेत हा हट्ट. त्यासाठी शाळेनंतर क्लासेसला जाण्याचे प्रमाण वाढत गेले. परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले की आपले मुलं हुशार हा (गैर) समज रुजत चालला आहे. कारण चांगले मार्क्स म्हणजेच चांगल्या कॉलेजला ऍडमिशन आणि पुन्हा मग मार्कांची रस्सीखेच सुरूच. त्यानंतर हीच मुले चांगल्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर नोकरी करू लागतात तरीसुद्धा रस्सीखेच संपत नाही. ती सुरूच रहाते.  ह्या सर्व प्रवासात ८०% पालक आपल्या मुलांमधील सुप्त गुण ओळखण्याचा प्रयत्नही करीत नाहीत हे दुर्दैव.

प्रत्येक मुलं वेगळे आहे आणि त्याचा पिंड,त्याची आवड,त्याच्या बुद्धीचा दर्जा,त्याची अभ्यास करण्याची क्षमता ही वेगळी आहे. एवढंच नव्हे तर अभ्यास समजून घेण्याची पद्धतही वेगळी आहे. काही मुलांना एकदाच वाचून परीक्षेत ८०% मार्क्स मिळू शकतात. काही मुलांना सतत सराव केल्यानंतर परीक्षेत चांगले मार्क्स मिळतात. काही मुलांना व्हिजुअल इफेक्टसने समजावून सांगितले की त्यांच्या मार्कांमध्ये लक्षणीय फरक दिसून येतो. माझ्याकडे काही केसेस अशा आहेत ज्यामध्ये पालकांनी हे शैक्षणिक महत्त्वाचे वर्ष आहे म्हणून मुलीचा नृत्य प्रशिक्षण थांबवल्यानंतर तिला कमी मार्क्स मिळू लागले, अभ्यासातील तिचा रस कमी होऊ लागला. त्यानंतर कुंडली विवेचनासाठी जेव्हा ही केस माझ्याकडे आली तेंव्हा हिचे नृत्य बंद होऊ देऊ नका हे पालकांना शास्त्रीयदृष्ट्या समजावून सांगितल्यावर त्यानांही ही गोष्ट पटली.

आपल्या मुलांना व्यवस्थित ओळखण्याचे साधन म्हणजे कुंडली. कुंडलीतून तुम्ही तुमच्या मुलांबद्दल,त्यांच्या स्वभावाबद्दल, त्यांच्या आवडीनिवडीबद्दल जाणून घेऊ शकता. कुंडली म्हणजे आरसा. कुंडलीतील बारा स्थानांवरून त्या मुलाबद्दल प्रत्येक गोष्ट तुम्ही जाणून घेऊ शकता. इथे कुंडली विवेचनाचा उपयोग मुलाचा अभ्यास कशा पद्धतीने घेऊ शकतो ? त्याची स्मरणशक्ती कशी वाढेल ? त्याची लॉजिकली उत्तर देण्याची क्षमता आहे का ? तुमचे मुलं क्रिएटिव्ह आहे तर मग त्याला कुठल्या पद्धतीचे शिक्षण देऊन त्याला जीवनात ह्यात यश मिळेल हे सांगू शकतो. आपल्याकडे डॉ. गिरीश ओक ह्यांचे उदाहरण आहे. त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेऊनसुद्धा आपल्या आवडीच्या क्षेत्रात नाव कमावले आहे.

माझ्याकडे येणाऱ्या बहुतांश पालकांची ही इच्छा असते की मुलाने डॉक्टर,इंजिनीअर व्हावं आणि गलेलठ्ठ पगाराची नोकरी करावी आणि ऐश करावी. पण आज चित्र ह्याच्या अगदी उलटे आहे. ज्या व्यक्ती ह्या IT क्षेत्रात  आहेत ते जेंव्हा माझ्याकडे कुंडली विवेचनासाठी येतात  तेंव्हा त्यांच्या मनात हीच खंत असते की आई -वडील म्हणाले म्हणून मी ह्या क्षेत्रात आज काम करतोय पण माझी आवड वेगळी आहे आणि त्या आवडीच्या क्षेत्रात मला आता काम करायचंय. जास्त पैसे नकोत पण मनःशांती हवी. मग हीच गोष्ट आधीपासूनच आपण लक्षात घेतली तर त्या मुलाला आवडत्या क्षेत्रात काम करता येईल. जास्त पैसे कमवण्यापेक्षा मन समाधानी आणि आनंदी असेल तर मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यही जोपाजले जाईल.

कुंडलीच्या दशम आणि षष्ठ स्थानावरून आपले मुल कुठल्या प्रकारचे काम करणार हे लक्षात येऊ शकते आणि त्याचप्रमाणे आपण त्याची जडणघडण करू शकतो. द्वितीय स्थानावरून त्याची आर्थिक स्थिती कशी राहील हे समजल्यास तुम्हांला मुलाच्या भविष्याची चिंता रहाणार नाही. प्रत्येक व्यक्ती भिन्न आहे आणि त्याचा पिंड वेगळा आहे हे जाणून घेऊन जर त्याला त्या अभ्यासासाठी मदत केली तर मुलाला यश नक्की मिळू शकेल. त्याचबरोबरीने मुलांच्या पत्रिकेत त्यांचा गुन्हेगारी क्षेत्राकडे ओढा आहे का ? हे जाणून घेऊ शकतो आणि वेळीच मुलांचे तज्ज्ञांकडून काउन्सेलिंग करून घेऊ शकतो.
१) काही मुलांना सतत त्यांच्याकडेच "attention" हवे असते मग त्यासाठी त्यांच्या वागण्यात वेगळाच निगेटिव्ह बदल येऊ पाहत असतो. त्यावेळी ह्या मुलांना ओरडण्यापेक्षा समजून घेण्याची आवशक्यता असते.
२) काही मुले इतकी भावुक असतात की त्यांच्यावर कोणी रागावले आहे की ही कल्पनाच त्यांना सहन होत नाही आणि मग आत्महत्या करण्याकडे त्यांचा काळ होतो. अशा मुलांच्या पत्रिकेत  चंद्र हा निचीचा असू शकतो त्यामुळे मन दुर्बल असते.
३) काही मुले इतकी व्रात्य असतात की घरात मस्ती असतेच परंतु त्याच्या मित्रांचे पालकही तक्रार घेऊन घरी येत असतात. अशा वेळी कुंडलीतील मंगळ तपासून पहावा.
४) मुल हुशार असून अबोल रहात असेल तर बुध कसा आहे पत्रिकेत ते पहावे.
५) हुशार असूनसुद्धा मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नसेल तर अशा मुलांचा राहू आणि शुक्र ह्या ग्रहांची स्थिती तपासून बघा.

मुलांच्या पत्रिकेत जर असे काही योग आहेत का हे तपासून घेऊन त्यांच्याशी पालकांनी कसे वागावे हे पालक समजून घेऊ शकतात आणि पुढे होणारा अनर्थ टाळू शकतो. काही मुले सुरवातीला खूपच बुजरी असतात मग त्यांना बाहेरच्या जगाशी लढाई करतांना भविष्यात त्रास होऊ शकतो त्यासाठी कुंडलीचे विवेचन महत्त्वाचे ठरते. नुसतेच विवेचन न करीत मुलामध्ये सकारत्मक बदल कसा घडवून आणता येईल ह्यसाठी प्रयत्न करू शकतो.

सिद्धांत गणोरेचे उदाहरण अगदी हल्लीचे. ज्याने स्वतःच्या आईची हत्या केली आणि पश्चातापाचा लवलेशही चेहऱ्यावर दिसत नव्हता. सिद्धांतला वेळीच उपचाराची गरज होती आणि ती जर मिळाली असती तर पुढे होणारी  घटना टाळता आली असती.

ह्या संदर्भात अजूनही काही उदाहरणं देता येतील. आपल्याकडे डॉ. गिरीश ओक ह्यांचे बेस्ट उदाहरण आहे. ह्यांचा उल्लेख ह्यासाठी की डॉ. गिरीश ओक हे नाव प्रसिद्ध आहे. त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेऊनसुद्धा आपल्या आवडीच्या क्षेत्रात नाव कमावले आहे. म्हणूनच पालकांनो आपल्या मुलांच्या सुप्त गुणांना वेळीच ओळखा, त्यांच्यात असलेली कमतरता कशी भरून काढता येईल ? त्यांचा आत्मविश्वास कसा वाढेल ह्यावर चर्चा करून मार्ग काढता येऊ शकतो ह्यावर कुंडलीतून मार्गदर्शन आपण घेऊ शकता समाज सुदृढ बनवू शकता.

हा सर्व पालकांना नक्कीच उपयोगी ठरेल अशी अशा करते.

अनुप्रिया देसाई
anupriyadesai@gmail.com





READERS ALL OVER THE WORLD