पाकीट हरवले..
आजच्या सदरात मी ग्रह किती बोलके असतात ह्या संदर्भात एक केस देणार आहे. १३ ऑक्टबोर रोजी संध्याकाळी ७ वाजून १९ मिनिटांनी आमच्या सोसायटीतील एक सदस्य माझ्या घरी आले. वय असेल ६५ च्या आसपास. ते स्वतः आणि त्यांच्या पत्नी दोघांचाही चेहरा घाबराघुबरा दिसत होता. त्यांनीच सांगायला सुरवात केली. ते दोघे बाजारातून दिवाळीची खरेदी करून स्कुटरवरून घरी परतत होते. सोसायटीच्या आवारात शिरताच त्यांच्या स्कुटरला समोरून सायकलने येणाऱ्या दुधवाल्याने ठोकर दिली. ह्यांत तो दूधवाला पडलाच परंतु हे जोडपेही स्कुटरवरून खाली पडले. धावत समोरच बसलेला वॉचमनही आला. सोसायटीच्या आवारात भाजी विकण्यासाठी आलेले भाजीविक्रेतेही धावत आले. सर्वांनी ह्या जोडप्याला सामान बॅगेत भरून दिले. काका आणि काकू दोघेही घरी गेले. घरात शिरताच काकांना जाणवले की आपले पैशांचे पाकीट खिशात नाही. सामानात शोधून झाल्यावर ते दोघेही तडक खाली आले. सोसायटीच्या आवारात जिथे त्यांची दुधवाल्याच्या सायकलीबरोबर ठोकर झाली तिथे त्या जागी शोधले परंतु पाकीट काही दृष्टीस पडले नाही. त्यांनी वॉचमनला विचारले. त्याने पाकीट पाहिलेही नाही असे सांगितले. भाजीवाला आणि दूधवाला केंव्हाच निघून गेलेले. काकांनी वॉचमनकडून दुधवाल्याचा नंबर घेतला आणि पाकीट सापडलं आहे का म्हणून विचारणा केली. त्यानेही नाकारघंटाच चालवली. त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या देवरे काकांनी मग माझ्याकडे येण्यास सुचवले. त्याप्रमाणे ते दिघे आणि देवरे काका माझ्या घरी आले. सर्व कथाकथन झाल्यानंतर मला कुंडलीवरून काही सांगता येईल असा त्यांचा प्रश्न होता कारण पाकिटात काकांचे "Ex-Service man" चे ID कार्ड होते. काका - काकूंचे पॅनकार्ड होते, आधारकार्ड होते आणि रु.१५०००/- नकद होते. पैशांपेक्षा पॅनकार्ड आणि आधारकार्डची चिंता त्यांना जास्त सतावत होती. प्रश्नकुंडली मांडली. मेष लग्नाची कुंडली. चंद्र कर्केचा चतुर्थात. चंद्र चतुर्थात असतो तेंव्हा वस्तू घरातच असते. किंवा घराच्या आसपास असते. ह्या कुंडलीत चंद्र चतुर्थात. चंद्र शनिच्या पुष्य नक्षत्रात. त्यादिवशीचे शासक ग्रह खालील प्रमाणे - :
L - मेष - मंगळ - ५, १, ८
S - पुष्य - शनि - ८, १०, ११
R - कर्क - चंद्र - ४, ४
D - शुक्र - शुक्र - ५, २, ७
चर लग्नाची कुंडली. चंद्र कर्क राशीत आणि कर्क राशी चतुर्थात आलेली. चंद्राच्या स्थितीवरून वस्तू कुठे आहे ह्याची कल्पना येते. चंद्र कर्क राशीत चतुर्थात ह्याचाच अर्थ वस्तू घरातच किंवा घराच्या आसपास आहे. चंद्राच्या ह्या स्थितीवरून त्यांना विचारले,"नक्की घरी पाकीट नाही ? व्यवस्थित शोधले तुम्ही ?". त्यावर त्यांचे म्हणणे," घरात शिरतानांच लक्षात आले की पाकीट नाही. ".
चंद्र शनिच्या नक्षत्रात. शनि - ८,१०,११ चा कार्येश. म्हणजे पाकीट मिळेल परंतु केंव्हा आणि कुठे ? कुठे ह्या प्रश्नाचे उत्तर - घराच्या जवळ किंवा घरात असेच वाटते. केंव्हा ह्यासाठी L,S,R,D पाहिले तर शनि सोडल्यास बाकी ग्रह जलद गतीचे. चंद्र राहुबरोबर आहे. युती नसली तरी राहुंबरोबर असणे म्हणजे जिथे वस्तू असते तिथे काही वेळेस नजरेस पडत नाही. पुन्हा पुन्हा तपासून पाहावे लागते.
आज शुक्रवार. शासक ग्रहांमध्ये शनि आहे. दुसऱ्या दिवशी शनिवार. शनि लाभ आणि अष्टम स्थानांचा कार्येश. उद्या पाकीट मिळेल हे नक्की. त्यांना तसे सांगितले आणि रीतसर पोलीस-स्टेशनांत कार्ड हरवल्याची तक्रार/नोंद करण्यास सांगितले.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी संध्याकाळी काकांनी पाकीट मिळाल्याचे कळवले. पाकीट त्यांच्याच घराच्या बाहेर चपलांच्या रॅकच्या मागे पडलेले मिळाले. (चंद्र आणि राहू एकत्र - राहू - चपलांचा कारक ) किती वाजता पाकीट मिळाले ? ह्यावर त्यांचे उत्तर," वेळ लक्षात नाही परंतु सकाळी साडे दहाच्या आधीच पाकीट मिळाले".
साडे दहाची कुंडली तपासली. वृश्चिक लग्न होते. लाभेश शनि लग्नात आला होता. लाभतील राशी म्हणजेच कुंभ राशी चतुर्थात. मुख्यतः चंद्र हा राहूच्या युतीत होता. पाकिटात सर्व गोष्टी सुरक्षित होत्या.
ग्रहांनी दिलेला संकेत खरा ठरला !!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा