शुक्रवार, २९ डिसेंबर, २०१७

मुहूर्तशास्त्र आणि कमला मिल घटना


मुहूर्तशास्त्र आणि कमला मिल घटना 
Kamala Mill Compund caught Fire


नमस्कार,

आज झालेल्या कमला मिल कंपाऊंड घटनेमुळे वाईट वाटले. मध्यरात्री लागलेल्या ह्या आगीत संपूर्ण हॉटेल जाळून खाक झाले. १४ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यात १२ महिला आणि २ पुरुष ह्यांचा समावेश होता. आग कशामुळे लागली ह्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी हॉटेलमध्ये होत असलेल्या हुक्का पार्टीमुळे आग लागली असल्याची शंका वर्तवली जात आहे. कारण काहीही असले तरी झालेले नुकसान आणि जीवितहानी भरून येण्यासारखी नाही.  एक ज्योतिषशास्त्री आणि वास्तूतज्ञ् म्हणून ह्या घटनेकडे पहाण्याचा माझा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यासाठी हा लेख -

बातमी कळल्यापासून त्या हॉटेलच्या वास्तूचा आकार आणि प्रश्नकुंडली ह्याचे विवेचन सुरु होते. ह्यात काही गोष्टी लक्षात आल्या त्या तुमच्यासमोर मांडत आहे. 

वास्तू निरीक्षण - १) प्रत्यक्ष वास्तूला भेट देणे शक्य नसल्याने गूगल मॅपवरून हे हॉटेल शोधले आणि त्याचा आढावा घेतला. मॅपवरून लक्षात येईल एक तर ही वास्तू विदिशा आहे. बिल्डिंग संपूर्णपणे तिरपी आहे. म्हणजेच सर्व दिशा काटकोनात गेल्या. 

२) ओपन रूफ हॉटेल आहे. बिल्डिंगच्या पूर्व आणि आग्नेय (अग्नि देवता )दिशेला हे हॉटेल आहे. सूर्य मावळेपर्यंत सूर्याच्या किरणांचा मारा होत असणार जे शारीरिकदृष्ट्या हानिकारक आहे. 

घटना कळल्यानंतर ही घटना का घडली ह्याचा विचार करतांना हॉटेल ज्या दिवशी सुरु झाले (मुहूर्त )त्या दिवसाची कुंडली मांडली. ती कुंडली इथे देत आहे - 



१)  मंगळ आणि शनि ह्या ग्रहांचे योग हे नेहेमीच स्फोटक ठरतात. ह्या कुंडलीत म्हणजेच मुहूर्ताच्या दिवशी शनि आणि मंगळाचा षडाष्टक योग होत आहे. 
२) कुंडलीचे वृश्चिक लग्न असून लग्न २६ अंशावर आहे. ह्या अंशाच्या सर्वात जवळ शनि २८ अंश आहे. 
३) शनिपासून आणि लग्न स्थानापासून अष्टमात मंगळ आहे. मंगळाचे अंशही २७ आहेत. हा योगायोग चांगला नाही. 
४) अष्टमेश बुध अष्टम स्थानातच आहे. 

ह्या सर्व योगावरून असे वाटते की आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या "मुहूर्त शास्त्राला " अर्थ आहे. ज्या दिवशी आणि वेळेला आपण काही गोष्टी सुरु करतो ती वेळ,दिवस महत्त्वाचे ठरतात. नाहीतर हल्ली मुहूर्त पाळलाच जात नाही. अगदी लग्न लागतांना सुद्धा मुहूर्त लक्षात घेत नाहीत. अगदी काटेकोरपणे मुहूर्त मानणारे तुम्ही नसाल पण हे लक्षात घ्या लग्न लागतांना हल्ली लोक अवास्तव गोष्टींनाच जास्त महत्त्व देतात. मुलीकडच्या लोकांची धावपळ तर विचारायलाच नको. - फोटोसेशन,हेयरस्टाईल आणि मेकअप ह्या गोष्टींचे इतके कौतुक असते की वेळेवर ह्या गोष्टी आटपून मुहूर्त साधणारे अगदी कमी. जर मुहूर्त साधायचाच नसेल तर गुरुजींकडून मुहूर्त काढून घेण्याचा प्रपंचच कशाला ? तुम्हांला जी वेळ योग्य वाटते ती वेळ ठरवा.  

मुहूर्त शास्त्रात मुहूर्त जेंव्हा ठरवून दिला जातो किंवा सांगितला जातो तेंव्हा सर्व गोष्टींचा विचार केला जातो. पंचांगाचा विचार आलाच परंतु आपल्या कुंडलीप्रमाणे ही वेळ योग्य आहे का हे सखोल तपासून सांगितले जाते. त्यामुळे मुहूर्त हा विचारात घेतला पाहिजे. जेंव्हा आपण मुहूर्त काढून पूजा करतो त्या दिवशी आपण सर्व नकारत्मक गोष्टींचे उच्चाटन करून  सकारात्मक ऊर्जांना आपल्याला मदत करण्यासाठी आवाहन करतो. पाश्चत्य संस्कृतीचे कौतुक असणाऱ्या लोकांसाठी - We Invite all Positive Energy to our Workplace on Specific Day. फक्त ह्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीत एक शुभ दिवस ठरवूंन दिला जातो. 

आता तुम्ही म्हणाला अशा प्रकारची हॉटेल्स भरपूर आहेत त्यांना नाही आगीने होरपळले. हो मान्य. अगदी शतप्रतिशत मान्य. ह्याला कारण वास्तूप्रमाणे मालकाची कुंडलीही अशा घटनेत महत्त्वाची ठरते. त्याच्या कुंडलीत जर ग्रहयोग आता चांगले नसतील तर त्याला अशा घटनांचा सामना करावा लागतो. आणि असे योग कुंडलीत आहेत असे समजल्यानंतर त्याने हॉटेल सुरु करू नये असे आपले शास्त्र सांगत नाही. शास्त्राचा खरा उपयोग तर इथेच होतो. असे काही घडणार असे कुंडलीत असेल तर ती घटना घडू नये म्हणून काळजी घेता येईल. मुहूर्तबद्दल मी वर सांगितलेच आहे त्याच बरोबर हॉटेल बांधतांना त्याने विशेष काळजी घायला हवी. हॉटेलमध्ये येण्यासाठी असणाऱ्या वाटेत फार अडथळा नसावा, रस्ता फार चिंचोळा नसेल ह्याची काळजी घ्यावी. ह्या जागेवर शक्यतो  fire resistant materials चा जास्तीत जास्त वापर करावा. आग लागल्यास ती आटोक्यात येण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी लवकर उपलब्ध होतील अशी व्यवस्था असावी. लोकांना लगेच बाहेर पडता येईल अशी दाराची रचना असावी. खरंतर अशा गोष्टींची काळजी सर्व हॉटेल्सने घेतलीच पाहिजे. परंतु आपल्याकडे घटना घडल्यावर जागृत होणे आहे. घटना घडण्याआधी जर काळजी घेतली तर त्याचा फायदा. 

ही काळजी जर हॉटेलच्या मालकांनी घेतली असती तर घटना टाळता आलीच असती आणि नाहक १४ बळी गेले नसते. 

बघा बरं विचार करून !!!

बुधवार, १३ डिसेंबर, २०१७

वक्री बुध - धनु राशीतील

वक्री बुध - धनु राशीतील 






सध्या बुध वक्री आहे. एखादा ग्रह वक्री असणे म्हणजे काहीतरी भयंकर घडणार हा जनमानसातील समज. ग्रह वक्री होतो म्हणजे नक्की काय हेच मुळात कोणाला माहीत नाही. ग्रह वक्री होणे म्हणजे काय ते आधी समजून घ्या. समजा आपण एका चालत्या कारमध्ये आहात. तुमच्या पुढे एक कार आहे. काही वेळाने जेंव्हा तुमची कार आणि दुसरी कार समांतर( Parallel ) असतील तेंव्हा तुम्हांला दोन्ही गाड्या एकाच ठिकाणी थांबल्याचा भास होईल. जेंव्हा दुसऱ्या कारचा वेग कमी होईल तेंव्हा ती कार मागे जात आहे असा आपल्याला भास होईल बरोबर ??  खरंतर कार मागे जातच नसते, आपल्याला वेगातील फरकामुळे हा भास होतो. तत्प्रमाणेच ग्रहांचे आहे. आपण पृथ्वीवर आहोत. पृथ्वीची एक ठरावीक गती आहे. बाकी सर्व ग्रहांना सुद्धा त्यांची गती आहे. जेंव्हा एखाद्या ग्रहाची गती कमी होते तेंव्हा पृथ्वीवरून पाहतांना आपल्याला तो ठराविक ग्रह मागे जात आहे की काय असे भासते त्यालाच ग्रह वक्री होणे म्हटले जाते. ग्रह वक्री स्थितीतून जेंव्हा मार्गी होतात तेंव्हा स्तंभी होतात असे म्हटले जाते. वरच्या उदाहरणात मी दोन्ही गाड्या जेंव्हा एकाच वेगाने (समांतर )जात असतील तेंव्हा एकाच ठिकाणी थांबल्यासारखे वाटते असे सांगितले आहे. तशीच अवस्था ग्रहाची होते त्याला ग्रह स्तंभी होणे म्हटले जाते.

प्रत्येक ग्रहाच्या कारकत्वाबद्दल मी मागील बऱ्याच लेखात सांगितले आहे. प्रत्येक ग्रह जेंव्हा वक्री होतो तेंव्हा  त्याच्या संदर्भातील गोष्टींवर परिणाम होतो. जसे शनि जेंव्हा वक्री होतो तेंव्हा लोखंड,बांधकाम,तेल -खनिजे इ.वर होतो. वैयक्तिक कुंडलीवरही त्याचा परिणाम जाणवतो. मंगळ वक्री होतो तेंव्हा रसायने,घातपात,रक्तपात,युद्ध सदृश परिस्थिती निर्माण होणे इ. गोष्टी घडू शकतात. वैयक्तिक कुंडलीवर जाणवणारा परिणाम वेगळ्या प्रकारचा असू शकतो. अर्थात ह्या बाबतीत भविष्य वर्तवतांना ज्योतिषचे स्वतःचे निरीक्षण,मनन आणि चिंतन हे असतेच.


ग्रह वक्री असण्याने भौगोलिक,सामाजिक,राजकीय परिणाम होतच असतो. त्याचप्रमाणे तुमच्या कुंडलीत तो ठराविक ग्रह गोचरीने कुठे असणार आहे ? तो कुठच्या स्थानांचा अधिपती होतो हे भविष्य वर्तवितांना महत्त्वाचे ठरते.


आता ३ डिसेंबर रोजी बुध ग्रह वक्री झाला आहे. तो वक्री अवस्थेत २२ डिसेंबरपर्यंत असणार आहे. २० डिसेंबर  ते २२ डिसेंबर तो स्तंभी असणार आहे. ह्या काळात तुम्ही कुठली काळजी घ्यायची ते पाहूया. त्याआधी बुधाचा ज्या गोष्टींशी संबंध येतो ते समजून घेऊ.


बुध म्हणजे बुद्धी. 'बुधग्रह आहे ज्यासी नीट, तत्यासी सर्व मार्ग सुचती सुभट' अशी बुधाबद्दल उक्ती आहे. बुद्धी सर्वांना ईश्वराने सारखीच दिलेली आहे. परंतु Common Sense सर्वांकडे असतोच असे नाही. हा Common Sense म्हणजेच सद्सदविवेकबुद्धी असणे म्हणजे पत्रिकेत बुध चांगल्या स्थितीत आहे असे समजावे. बुध म्हणजे समरणशक्ती. बुध म्हणजे सवांद,संभाषण(Communication ),प्रवास- Transportation, Travelling, कागदपत्रे इ. बुध म्हणजे duality -द्विस्वभावत्व. जेंव्हा बुध वक्री होतो तेंव्हा ह्या सर्व गोष्टींवर त्याचा परिणाम होतो. सवांद साधण्यासाठी आपण जी उपकरणे वापरतो अचानक त्यात काही दोष उत्पन्न होतात. तुमच्या बोलण्याचा समोरची व्यक्ति दुसरा अर्थ घेऊ शकते. किंवा तुम्हांला योग्य पद्धतीने तुमचा मुद्दा मांडता न आल्याने गैरसमज वाढीस लागतो. त्याप्रमाणे मोबाईल, फोन, कॉम्पुटर इ. मग ह्यांच्या दुरुस्तीसाठी धावाधाव सुरु होते. कारण मोबाईल, कॉम्पुटर हे सुद्धा ह्या शतकातील सवांदाची साधने आहेत. बुधाच्या वक्री असण्याचा परिणाम दळवळणावरही होतो. प्रवासात अत्यंत अडचणी येतात. प्रवासात रस्ता चुकण्याचीही शक्यता असते. पुन्हा पुन्हा त्याच रस्त्यावरून फिरणे होते. ह्यालाच आपण चकवा लागणे असे म्हणतो. बुध म्हणजे महत्त्वाची कागदपत्रेसुद्धा. त्यामुळे ह्याच काळात कागदपत्रे हरवणे,चेकबुक गहाळ होणे,प्रवासात महत्त्वाची फाईल विसरणे असे घडू शकते. वक्री बुधाचा काय परिणाम होऊ शकतो तो आपण पाहिला. आता ह्याचा प्रत्येक राशीवर काय परिणाम होतो ते समजून घ्या - :


मेष - महत्त्वाची कागदपत्रे जपणे. काही कारणास्तव ती कागदपत्रे कोणाला दिलेली असल्यास वेळेत ती न विसरता मागून घेणे. आपल्याला सध्याच्या काळात प्रवासाचे योग आहेत. तेंव्हा प्रवासात आपले ओळखपत्र, आपले सामान गहाळ होणार नाही ह्यांवर लक्ष देणे.


वृषभ - तुम्ही सध्या तुमच्या बोलण्यावर ताबा ठेवलेला बरा. तुमच्या बोलण्याने तुम्ही कोणाला दुखावू शकता आणि तुमच्याबद्दल गैरसमज वाढेल. त्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. तेंव्हा काळजी घ्या.


मिथुन - तुमच्यासाठी हा काळ विशेष काळजी करण्यासारखा जरी नसला तरी कोणाला असे कुठलेही आश्वासन देऊ नका जे आश्वासन पूर्ण करणे तुम्हांला शक्य होणार नाही.


कर्क - कुठल्याही कागदपत्रावर सही करतांना ते काळजीपूर्वक वाचा. त्यात काही गोष्टी आक्षेपजनक आढळल्यास शांतपणे त्याची चर्चा करा आणि मगच सही करा. कुठलाही मुद्दा पटला नसल्यास सही करू नये.


सिंह - तुमच्यासाठीही हा काळ विशेष काळजी करण्यासारखा नाही.


कन्या - सध्या प्रॉपर्टीसंदर्भात काही व्यवहार होत असल्यास तुम्हांला फायदा होण्याची शक्यता आहे. परंतु व्यवहार शक्यतो २२ डिसेंबरनंतर करावा.


तुळ - नोकरीच्यानिमित्ताने लांबचे प्रवास होणार आहेत. प्रवासाला निघतांना आणि प्रवास करतांना काळजी घेणे. कागदपत्रे,मोबाईल,लॅपटॉप इ. सामानाबाबत जागरूक रहाणे. अनोळखी व्यक्तिच्या हाती ह्या गोष्टी न दिलेल्या बऱ्या. तुमचा व्यवसाय Travelling शी निगडीत असल्यास एखाद्या प्रवाशाला झालेल्या त्रासामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. पत्र लिहितांना मुद्द्यांवर लक्ष द्या.


वृश्चिक - आपल्या कोर्टकेसेस काही सुरु असतील तर त्यात काही कारणामुळे विलंब होण्याची शक्यता आहे किंवा काही तांत्रिक अडचणी उद्भवतील. तेंव्हा आधीच मानसिक तयारी ठेवणे. वडिलोपार्जित इस्टेटीसंदर्भात काही व्यवहार सुरु असतील तर अडचणी येऊ शकतील.


धनु - तुमच्याच राशीत बुध ग्रहाचे आगमन झालेले आहे आणि वक्री अवस्थासुद्धा तुमच्या राशीतच असणार आहे. जोडीदाराबरोबर सतत खटके उडणार आहेत. तुमच्यातील गैरसमज वाढीस लागणार आहे. तेंव्हा काही गोष्टींची चर्चा जोडीदाराबरोबर शांतपणे करा. हीच गोष्ट व्यावसायिक भागीदाराबरोबरही लागू होते.


मकर - घरापासून काही काळ लांब राहण्याचा काळ असू शकेल. तुमच्या तुटक बोलण्याने किंवा वागण्याने वरिष्ठांची मर्जी गमावून बसाल. तेंव्हा बोलण्यात आणि वागण्यात काळजी घ्या.


कुंभ - मुलांच्या तब्येतीच्या बाबतीत विशेष काळजी घ्या. २२ डिसेंबरनंतर तुम्ही धार्मिक स्थळांना भेटी देणार आहात. परंतु त्याआधी होणाऱ्या प्रवासाची व्यवस्थित माहिती घ्या.


मीन - प्रॉपर्टीसंदर्भात,आईच्या तब्येतीसंदर्भात तुमची धावपळ होणार आहे.


बुध वक्री असतांना सर्वसाधारणपणे सर्वांनीच अशी काळजी घ्यावी - :


१) शक्यतो कुठलेही Agreementवर  ह्याकाळात सही करू नये. सही करणे भागच असेल तर व्यवस्थित Agreementचे मुद्दे समजून घ्या. घाई करू नका.


२) कुठलेही महत्त्वाचे निर्णय ह्या काळात घेऊ नयेत किंवा नवीन व्यवसाय सुरु करू नये.


३) प्रत्येक गोष्टीसाठी विलंब आणि आव्हाने गृहीतच धरून चालणे. हे सर्व सांगण्याचा प्रपंच म्हणजे तुम्हांला घाबरवणे नसून तुम्ही अशा गोष्टींसाठी मानसिकरित्या खंबीर राहून तांत्रिक गोष्टीत सतर्कता बाळगा असा आहे.


४) शक्यतो आपला मोबाईल आणि कॉम्पुटरचा पासवर्ड,पिनकोड,पॅनकार्ड,आधारकार्ड,इनकमटॅक्स पेपर्स ह्या सर्व गोष्टी हाताळतांना आणि काम झाल्यावर जागेवर ठेवण्यावर विशेष काळजी घ्यावी.


५) ह्या काळात विजेच्या लपंडावामुळे किंवा वोल्टेज कमीजास्त झाल्यामुळे विजेची उपकरणे बिघडू शकतात.


६) तुम्हांला काहींबाबतीत चुकीची माहिती किंवा बातमी मिळू शकते. त्यामुळे पटकन निर्णय घेऊन नका. बातमीची पडताळणी करा आणि मगच निर्णय घ्या.


७) तुम्ही स्वतः बोलतांना काय मुद्दे मांडत आहात,विषय भरकटत तर नाही ना ?, लोकांपर्यंत तुम्हांला काय म्हणायचे आहे ते पोहोचते आहे का ? हे बघा.


८) Interview ला पोहोचायचे असेल तर वेळेत निघा. ट्रॅफिक असणे, Interviewची वेळ चुकीची समजली जाणे आणि म्हणून चुकीच्या वेळी पोहोचणे होऊ शकते तेंव्हा वेळ ठरवतांना काळजीपूर्वक ऐका.


९) बुध म्हणजे स्मरणशक्ती त्यामुळे ज्या काळात बुध वक्री होतो त्याकाळात विसरभोळेपणा जाणवतो.


हा काळ नकारत्मक अर्थाने घेऊ नका. बुध वक्री असण्याचा परिणाम सगळयांना सारखाच जाणवेल असे नाही. कारण तुमच्या कुंडलीत बुधाची असलेली स्थिती अशा वेळी महत्त्वाची ठरते. मूळ कुंडलीत बुध वक्री असेल तर अशा लोकांना ह्या वक्री बुधाचा विशेष त्रास जाणवत नाही असे निरीक्षण केले गेले आहे. बुध वक्री असण्याचा काळ म्हणजे पुनर्रचना करण्याचा काळ आहे, त्याच गोष्टींचे मूल्यांकन करण्याचा काळ आहे. अर्धवट राहिलेल्या योजना, कामे पूर्ण करण्याचा हाच तो  काळ. वर सांगितलेली काळजी घेतल्यास नकारत्मक परिणाम मिळणार नाहीत.


प्रतिक्रिया नक्की कळवा.


अनुप्रिया देसाई- ९८१९०२१११९ 


शनिवार, ९ डिसेंबर, २०१७

प्रश्न कुंडली म्हणजे काय ?

प्रश्न कुंडली म्हणजे काय ?


प्रश्नकुंडली हा शब्द जरी नवीन वाटत असला तरी ही संकल्पना नवीन नाही. ही एक शास्त्रीय पद्धत आहे ज्यायोगे ठराविक प्रश्नाचे उत्तर मिळू शकते. जन्मकुंडली,प्रश्नकुंडली आणि नंबर कुंडली ह्या पद्धतीने तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. ज्योतिष शास्त्र हे अत्यंत गहन शास्त्र आहे. त्याचा संपूर्ण अभ्यास होणे हे मला अशक्य वाटते. प्रत्येकाने तो विषय आपल्या पद्धतीने समजून घेतला. त्या पद्धतीत "प्रश्न कुंडली"चा सखोल अभ्यास आहे.

प्रश्न कुंडली म्हणजे ज्यावेळी तुमच्या मनात प्रश्न उद्भवला जातो तो दिवस आणि वेळ ह्याची एक कुंडली मांडली जाते. माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की ह्या प्रश्न कुंडलीवरून दिलेली उत्तरे जन्मकुंडलीवरून दिलेल्या भाकितांपेक्षाही अचूक ठरतात. ह्यासाठी प्रश्नकुंडली आणि जन्मकुंडली ह्यातील फरक जाणून घ्या. जन्म कुंडली म्हणजे तुमच्या जन्माच्या दिवशी आणि ज्या वेळी जन्म झाला त्यावेळेची एक ग्रह स्थिती आकाशात असते. ही ग्रह स्थिती मांडणे म्हणजेच "जन्म कुंडली". जन्म कुंडली म्हणजे फक्त राशी जाणणे नव्हे तर जन्मकुंडलीवरून तुमचे संपूर्ण आयुष्य कसे असेल, तुमच्या कामाचे स्वरूप, तुमचे शिक्षण,वैवाहिक सौख्य,तुमची आयुष्यात होणारी प्रगती ह्या सर्वांचा आढावा घेता येतो. परंतु जेंव्हा एखादा "Specific" प्रश्न विचारला जातो तेंव्हा जन्मकुंडलीवरून उत्तरे देणं शक्य नसत. उदारहरणार्थ तुमची अमुक अमुक एखादी वस्तू हरवली आहे ? ह्या प्रश्नासाठी तुमच्या जन्मकुंडलीवरून देता येणं शक्य नाही. त्यासाठी ज्यावेळेस तुम्ही हा प्रश्न ज्योतिषाला विचारात तेंव्हा ज्योतिषी त्या दिवसाची आणि त्या वेळेची कुंडली मांडली जाते. त्या कुंडलीलाच प्रश्न कुंडली संबोधले जाते. ह्या प्रश्नकुंडलीवरून तुमची हरवलेली वस्तू कुठे आहे ? कुठच्या स्वरूपात आहे ? ही वस्तू कधी मिळेल ह्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे मिळू शकतात.


बऱ्याच व्यक्तिंना त्यांची जन्म तारीख माहित असते परंतु जन्मवेळ माहित नसते. काहींचा गावी जन्म झालेला असतो किंवा इतर काही कारणामुळे जन्मवेळ माहित नसते अशा लोकांसाठी प्रश्नकुंडली हा उत्तम उपाय आहे. ह्या प्रश्न कुंडलीवरून तुम्हांला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. ज्यांना आपली जन्म तारीख किंवा जन्मवेळ दोन्हीहीची कल्पना नसेल तर प्रश्नकुंडली हा उत्तम पर्याय आहे. परंतु एका वेळेस एकच प्रश्न विचारल्यास उत्तर मिळू शकेल. 


ह्या प्रश्न कुंडलीचा उपयोग हा - १) हरवलेली वस्तू शोधण्यासाठी, २) बेपत्ता व्यक्तिंसाठी ३) चोरी झालेल्या गोष्टींसाठी ४) नवीन एखादी गोष्ट घेतल्यास फायदा होणार आहे की नाही हे जाणण्यासाठी, ५) नवीन जागेत पैसे गुंतवावेत की नाही हे जाणून घेण्यासाठी ६) तुम्हांला अमुक अमुक नोकरी मिळेल का ह्या प्रश्नासाठी ७) बाळ होईल किंवा नाही ? ८) वारसाहक्काने प्रॉपर्टी मिळेल का ? ९) कोर्टकचेरीत यश मिळेल का ? १०) परदेशात जाता येईल का ? किती काळ वास्तव्य असेल हे जाणून घेण्यासाठीही होऊ शकतो.


प्रश्नकुंडली संदर्भात मला व्यक्तिशः असे वाटते की,


१) ज्या व्यक्तिला प्रश्न विचारायचा आहे त्याने प्रत्यक्षात ज्योतिषाकडे जाऊन प्रश्न विचारावा.

२) ज्या व्यक्तिबद्दल प्रश्न विचारायचा आहे ती व्यक्ति स्वतः प्रश्न विचारू शकत नसेल तर त्या व्यक्तिच्या नजीकच्या नातलगांनी प्रश्न विचारल्यास उत्तर अचूक मिळू शकेल. 
३) प्रश्न विचारण्याआधी प्रश्नकर्त्याने मन प्रश्नावर संपूर्णपणे केंद्रित करावे आणि मगच प्रश्न विचारावा. 
४) प्रश्न हा एका वेळी एकाच विषयबद्दल विचारावा आणि सकारात्मक असावा. ह्याचा अर्थ असा की समजा प्रश्न ईस्टेटीसंदर्भात असेल तर विचारतांना प्रॉपर्टीबद्दलचेच प्रश्न असावेत. मध्येच दुसऱ्या विषयावर प्रश्न विचारू नये. सकारात्मक प्रश्न ह्याचा अर्थ प्रश्न विचारतांना - मी ही प्रॉपर्टी घ्यावी का ?  असा प्रश्न असावा. मी ही प्रॉपर्टी घ्यावी की नाही ? असे दोन्ही पद्धतीचे प्रश्न असू नयेत. 
५) प्रश्न विचारतांना त्यात फार उपप्रश्न (Sub- Questions )असू नयेत. 

प्रश्नकुंडली ही दोन्ही पद्धतीने पहाता येते. वर म्हणाल्याप्रमाणे ज्योतिष शास्त्रात वेगवेगळ्या पद्धती आहेत. कुंडली विवेचन हे पारंपरिक पद्धतीने,कृष्णमूर्ती पद्धतीने, फोर स्टेप पद्धतीने,कस्पल इंटरलिंक पद्धतीने केले जाते.  भारतामध्ये ८५% ज्योतिषी अजूनही पारंपरिक पद्धतीने कुंडली विवेचन करतात. कृष्णमूर्ती पद्धतीचा वापर अजून व्यापक झालेला नाही. पारंपरिक पद्धतीच्या पुढचा अभ्यास म्हणजेच "ऍडव्हान्स पद्धती" म्हणून के. पी. पद्धतीकडे किंवा कृष्णमूर्ती पद्धतीकडे पाहिले जाते. कृष्णमूर्ती पद्धतीत काही किचकट गणिते आहेत. ज्यामुळे उत्तर अचूक येण्याचे प्रमाण जास्त आहे. ह्या कृष्णमूर्ती पद्धतीत अजून एक पद्धत प्रश्न विचारण्यासाठी वापरली जाते आणि ती म्हणजे - नंबर कुंडली. ह्या नंबर कुंडलीत जातकाला (प्रश्न कर्त्याला ) १ ते २४९ ह्या नंबरमधील एक नंबर निवडण्यास सांगितलं जातो. जातक जो नंबर देतो त्या नंबरची एक कुंडली मांडली जाते आणि उत्तर देता येते. अशा २४९ कुंडल्यांचा संच तयार असतो. प्रत्येक दिवसाप्रमाणे आणि वेळेप्रमाणे त्यात बदल करून उत्तर देता येते. ह्याला ज्योतिष शास्त्रीय आधार आहे. तो समजण्यास किचकट आहे म्हणून इथे सध्या त्याबद्दल सांगत नाही. 


ह्या सर्व गोष्टींबरोबरच जो उत्तर देणार त्या ज्योतिषाचेही लक्ष केंद्रित असावे. त्याच्या मानसिक स्थिरतेवरही उत्तर चूक किंवा बरोबर येणे अवलंबून असते. जर ज्योतिषी स्वतः आजारी आहे, फार घाईघाईत प्रश्नकुंडली अभ्यासल्यास उत्तर चुकू शकते. काही वेळेस जातकांकडून अत्यंत घाई दर्शवली जाते. आताच प्रश्नकुंडली बघून सांगा, ५ मिनिटांत फोन करतो लगेच सांगा अशा विनंत्या होत असतात. परंतु ज्योतिषी हा मशीन नसून मनुष्य आहे ही गोष्ट काही वेळेस जातक विसरून जातात. असे होऊ नये. कुंडलीवरून उत्तर देणे म्हणजे stock मधील सामान काढून तुम्हांला देणे एवढे सोपे नाही. ज्योतिषाला एका प्रश्नाचे उत्तर देण्यास वेळ लागू शकतो. तेंव्हा धीर धरा. तुम्हांला तुमचे उत्तर नक्की मिळेल. 


आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. 

अनुप्रिया देसाई 




READERS ALL OVER THE WORLD