वक्री बुध - धनु राशीतील
सध्या बुध वक्री आहे. एखादा ग्रह वक्री असणे म्हणजे काहीतरी भयंकर घडणार हा जनमानसातील समज. ग्रह वक्री होतो म्हणजे नक्की काय हेच मुळात कोणाला माहीत नाही. ग्रह वक्री होणे म्हणजे काय ते आधी समजून घ्या. समजा आपण एका चालत्या कारमध्ये आहात. तुमच्या पुढे एक कार आहे. काही वेळाने जेंव्हा तुमची कार आणि दुसरी कार समांतर( Parallel ) असतील तेंव्हा तुम्हांला दोन्ही गाड्या एकाच ठिकाणी थांबल्याचा भास होईल. जेंव्हा दुसऱ्या कारचा वेग कमी होईल तेंव्हा ती कार मागे जात आहे असा आपल्याला भास होईल बरोबर ?? खरंतर कार मागे जातच नसते, आपल्याला वेगातील फरकामुळे हा भास होतो. तत्प्रमाणेच ग्रहांचे आहे. आपण पृथ्वीवर आहोत. पृथ्वीची एक ठरावीक गती आहे. बाकी सर्व ग्रहांना सुद्धा त्यांची गती आहे. जेंव्हा एखाद्या ग्रहाची गती कमी होते तेंव्हा पृथ्वीवरून पाहतांना आपल्याला तो ठराविक ग्रह मागे जात आहे की काय असे भासते त्यालाच ग्रह वक्री होणे म्हटले जाते. ग्रह वक्री स्थितीतून जेंव्हा मार्गी होतात तेंव्हा स्तंभी होतात असे म्हटले जाते. वरच्या उदाहरणात मी दोन्ही गाड्या जेंव्हा एकाच वेगाने (समांतर )जात असतील तेंव्हा एकाच ठिकाणी थांबल्यासारखे वाटते असे सांगितले आहे. तशीच अवस्था ग्रहाची होते त्याला ग्रह स्तंभी होणे म्हटले जाते.
प्रत्येक ग्रहाच्या कारकत्वाबद्दल मी मागील बऱ्याच लेखात सांगितले आहे. प्रत्येक ग्रह जेंव्हा वक्री होतो तेंव्हा त्याच्या संदर्भातील गोष्टींवर परिणाम होतो. जसे शनि जेंव्हा वक्री होतो तेंव्हा लोखंड,बांधकाम,तेल -खनिजे इ.वर होतो. वैयक्तिक कुंडलीवरही त्याचा परिणाम जाणवतो. मंगळ वक्री होतो तेंव्हा रसायने,घातपात,रक्तपात,युद्ध सदृश परिस्थिती निर्माण होणे इ. गोष्टी घडू शकतात. वैयक्तिक कुंडलीवर जाणवणारा परिणाम वेगळ्या प्रकारचा असू शकतो. अर्थात ह्या बाबतीत भविष्य वर्तवतांना ज्योतिषचे स्वतःचे निरीक्षण,मनन आणि चिंतन हे असतेच.
ग्रह वक्री असण्याने भौगोलिक,सामाजिक,राजकीय परिणाम होतच असतो. त्याचप्रमाणे तुमच्या कुंडलीत तो ठराविक ग्रह गोचरीने कुठे असणार आहे ? तो कुठच्या स्थानांचा अधिपती होतो हे भविष्य वर्तवितांना महत्त्वाचे ठरते.
आता ३ डिसेंबर रोजी बुध ग्रह वक्री झाला आहे. तो वक्री अवस्थेत २२ डिसेंबरपर्यंत असणार आहे. २० डिसेंबर ते २२ डिसेंबर तो स्तंभी असणार आहे. ह्या काळात तुम्ही कुठली काळजी घ्यायची ते पाहूया. त्याआधी बुधाचा ज्या गोष्टींशी संबंध येतो ते समजून घेऊ.
बुध म्हणजे बुद्धी. 'बुधग्रह आहे ज्यासी नीट, तत्यासी सर्व मार्ग सुचती सुभट' अशी बुधाबद्दल उक्ती आहे. बुद्धी सर्वांना ईश्वराने सारखीच दिलेली आहे. परंतु Common Sense सर्वांकडे असतोच असे नाही. हा Common Sense म्हणजेच सद्सदविवेकबुद्धी असणे म्हणजे पत्रिकेत बुध चांगल्या स्थितीत आहे असे समजावे. बुध म्हणजे समरणशक्ती. बुध म्हणजे सवांद,संभाषण(Communication ),प्रवास- Transportation, Travelling, कागदपत्रे इ. बुध म्हणजे duality -द्विस्वभावत्व. जेंव्हा बुध वक्री होतो तेंव्हा ह्या सर्व गोष्टींवर त्याचा परिणाम होतो. सवांद साधण्यासाठी आपण जी उपकरणे वापरतो अचानक त्यात काही दोष उत्पन्न होतात. तुमच्या बोलण्याचा समोरची व्यक्ति दुसरा अर्थ घेऊ शकते. किंवा तुम्हांला योग्य पद्धतीने तुमचा मुद्दा मांडता न आल्याने गैरसमज वाढीस लागतो. त्याप्रमाणे मोबाईल, फोन, कॉम्पुटर इ. मग ह्यांच्या दुरुस्तीसाठी धावाधाव सुरु होते. कारण मोबाईल, कॉम्पुटर हे सुद्धा ह्या शतकातील सवांदाची साधने आहेत. बुधाच्या वक्री असण्याचा परिणाम दळवळणावरही होतो. प्रवासात अत्यंत अडचणी येतात. प्रवासात रस्ता चुकण्याचीही शक्यता असते. पुन्हा पुन्हा त्याच रस्त्यावरून फिरणे होते. ह्यालाच आपण चकवा लागणे असे म्हणतो. बुध म्हणजे महत्त्वाची कागदपत्रेसुद्धा. त्यामुळे ह्याच काळात कागदपत्रे हरवणे,चेकबुक गहाळ होणे,प्रवासात महत्त्वाची फाईल विसरणे असे घडू शकते. वक्री बुधाचा काय परिणाम होऊ शकतो तो आपण पाहिला. आता ह्याचा प्रत्येक राशीवर काय परिणाम होतो ते समजून घ्या - :
मेष - महत्त्वाची कागदपत्रे जपणे. काही कारणास्तव ती कागदपत्रे कोणाला दिलेली असल्यास वेळेत ती न विसरता मागून घेणे. आपल्याला सध्याच्या काळात प्रवासाचे योग आहेत. तेंव्हा प्रवासात आपले ओळखपत्र, आपले सामान गहाळ होणार नाही ह्यांवर लक्ष देणे.
वृषभ - तुम्ही सध्या तुमच्या बोलण्यावर ताबा ठेवलेला बरा. तुमच्या बोलण्याने तुम्ही कोणाला दुखावू शकता आणि तुमच्याबद्दल गैरसमज वाढेल. त्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. तेंव्हा काळजी घ्या.
मिथुन - तुमच्यासाठी हा काळ विशेष काळजी करण्यासारखा जरी नसला तरी कोणाला असे कुठलेही आश्वासन देऊ नका जे आश्वासन पूर्ण करणे तुम्हांला शक्य होणार नाही.
कर्क - कुठल्याही कागदपत्रावर सही करतांना ते काळजीपूर्वक वाचा. त्यात काही गोष्टी आक्षेपजनक आढळल्यास शांतपणे त्याची चर्चा करा आणि मगच सही करा. कुठलाही मुद्दा पटला नसल्यास सही करू नये.
सिंह - तुमच्यासाठीही हा काळ विशेष काळजी करण्यासारखा नाही.
कन्या - सध्या प्रॉपर्टीसंदर्भात काही व्यवहार होत असल्यास तुम्हांला फायदा होण्याची शक्यता आहे. परंतु व्यवहार शक्यतो २२ डिसेंबरनंतर करावा.
तुळ - नोकरीच्यानिमित्ताने लांबचे प्रवास होणार आहेत. प्रवासाला निघतांना आणि प्रवास करतांना काळजी घेणे. कागदपत्रे,मोबाईल,लॅपटॉप इ. सामानाबाबत जागरूक रहाणे. अनोळखी व्यक्तिच्या हाती ह्या गोष्टी न दिलेल्या बऱ्या. तुमचा व्यवसाय Travelling शी निगडीत असल्यास एखाद्या प्रवाशाला झालेल्या त्रासामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. पत्र लिहितांना मुद्द्यांवर लक्ष द्या.
वृश्चिक - आपल्या कोर्टकेसेस काही सुरु असतील तर त्यात काही कारणामुळे विलंब होण्याची शक्यता आहे किंवा काही तांत्रिक अडचणी उद्भवतील. तेंव्हा आधीच मानसिक तयारी ठेवणे. वडिलोपार्जित इस्टेटीसंदर्भात काही व्यवहार सुरु असतील तर अडचणी येऊ शकतील.
धनु - तुमच्याच राशीत बुध ग्रहाचे आगमन झालेले आहे आणि वक्री अवस्थासुद्धा तुमच्या राशीतच असणार आहे. जोडीदाराबरोबर सतत खटके उडणार आहेत. तुमच्यातील गैरसमज वाढीस लागणार आहे. तेंव्हा काही गोष्टींची चर्चा जोडीदाराबरोबर शांतपणे करा. हीच गोष्ट व्यावसायिक भागीदाराबरोबरही लागू होते.
मकर - घरापासून काही काळ लांब राहण्याचा काळ असू शकेल. तुमच्या तुटक बोलण्याने किंवा वागण्याने वरिष्ठांची मर्जी गमावून बसाल. तेंव्हा बोलण्यात आणि वागण्यात काळजी घ्या.
कुंभ - मुलांच्या तब्येतीच्या बाबतीत विशेष काळजी घ्या. २२ डिसेंबरनंतर तुम्ही धार्मिक स्थळांना भेटी देणार आहात. परंतु त्याआधी होणाऱ्या प्रवासाची व्यवस्थित माहिती घ्या.
मीन - प्रॉपर्टीसंदर्भात,आईच्या तब्येतीसंदर्भात तुमची धावपळ होणार आहे.
बुध वक्री असतांना सर्वसाधारणपणे सर्वांनीच अशी काळजी घ्यावी - :
१) शक्यतो कुठलेही Agreementवर ह्याकाळात सही करू नये. सही करणे भागच असेल तर व्यवस्थित Agreementचे मुद्दे समजून घ्या. घाई करू नका.
२) कुठलेही महत्त्वाचे निर्णय ह्या काळात घेऊ नयेत किंवा नवीन व्यवसाय सुरु करू नये.
३) प्रत्येक गोष्टीसाठी विलंब आणि आव्हाने गृहीतच धरून चालणे. हे सर्व सांगण्याचा प्रपंच म्हणजे तुम्हांला घाबरवणे नसून तुम्ही अशा गोष्टींसाठी मानसिकरित्या खंबीर राहून तांत्रिक गोष्टीत सतर्कता बाळगा असा आहे.
४) शक्यतो आपला मोबाईल आणि कॉम्पुटरचा पासवर्ड,पिनकोड,पॅनकार्ड,आधारकार्ड,इनकमटॅक्स पेपर्स ह्या सर्व गोष्टी हाताळतांना आणि काम झाल्यावर जागेवर ठेवण्यावर विशेष काळजी घ्यावी.
५) ह्या काळात विजेच्या लपंडावामुळे किंवा वोल्टेज कमीजास्त झाल्यामुळे विजेची उपकरणे बिघडू शकतात.
६) तुम्हांला काहींबाबतीत चुकीची माहिती किंवा बातमी मिळू शकते. त्यामुळे पटकन निर्णय घेऊन नका. बातमीची पडताळणी करा आणि मगच निर्णय घ्या.
७) तुम्ही स्वतः बोलतांना काय मुद्दे मांडत आहात,विषय भरकटत तर नाही ना ?, लोकांपर्यंत तुम्हांला काय म्हणायचे आहे ते पोहोचते आहे का ? हे बघा.
८) Interview ला पोहोचायचे असेल तर वेळेत निघा. ट्रॅफिक असणे, Interviewची वेळ चुकीची समजली जाणे आणि म्हणून चुकीच्या वेळी पोहोचणे होऊ शकते तेंव्हा वेळ ठरवतांना काळजीपूर्वक ऐका.
९) बुध म्हणजे स्मरणशक्ती त्यामुळे ज्या काळात बुध वक्री होतो त्याकाळात विसरभोळेपणा जाणवतो.
हा काळ नकारत्मक अर्थाने घेऊ नका. बुध वक्री असण्याचा परिणाम सगळयांना सारखाच जाणवेल असे नाही. कारण तुमच्या कुंडलीत बुधाची असलेली स्थिती अशा वेळी महत्त्वाची ठरते. मूळ कुंडलीत बुध वक्री असेल तर अशा लोकांना ह्या वक्री बुधाचा विशेष त्रास जाणवत नाही असे निरीक्षण केले गेले आहे. बुध वक्री असण्याचा काळ म्हणजे पुनर्रचना करण्याचा काळ आहे, त्याच गोष्टींचे मूल्यांकन करण्याचा काळ आहे. अर्धवट राहिलेल्या योजना, कामे पूर्ण करण्याचा हाच तो काळ. वर सांगितलेली काळजी घेतल्यास नकारत्मक परिणाम मिळणार नाहीत.
प्रतिक्रिया नक्की कळवा.
अनुप्रिया देसाई- ९८१९०२१११९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा