शनि -मंगळ युती - सावधान
शनि आणि मंगळ हे दोन ग्रह सध्या एकाच राशीत म्हणजेच धनु राशीत आहेत. २ एप्रिल रोजी ह्या ग्रहांची अंशात्मक युती होत आहे. ही युती १७ एप्रिल पर्यंत असणार आहे. ही युती होणे म्हणजे राजकीय आणि सामाजिक अस्थैर्य निर्माण होणे,घातपात,अपघात होणे. ज्यांचा ज्योतिष -शास्त्राचा अभ्यास नाही त्यांच्यासाठी ग्रहांची युती म्हणजे काय हे थोडक्यात पाहूया - :
ग्रहांची युती म्हणजे ग्रह एकाच राशीत एकाच अंशावर येणे. ग्रहांची युती होणे म्हणजे दोन्ही ग्रहांच्या शक्तिचा मिलाप. गुरु हा ग्रह मुळातच शुभ ग्रह मानला गेला आहे. गुरु जेंव्हा चंद्राच्या युतीत येतो तेंव्हा "गजकेसरी" योग होतो. शुक्र जेंव्हा चंद्राच्या युतीत असतो तेंव्हा जातकाला शुभ फळे मिळतात. रवि आणि बुध जेंव्हा युतीत असतात त्या योगाला "बुधादित्य योग" होतो. असा योग असल्यास मुळातच व्यक्ति कुशाग्र बुद्धीची असते. चंद्र जेंव्हा मंगळाच्या युतीत असतो तेंव्हा त्या योगाला "लक्ष्मीयोग" म्हणतात.
परंतु जेंव्हा शनिसारखा ग्रह मंगळाच्या युतीत येतो तेंव्हा मात्र परिस्थिती वेगळी असते. युती म्हणजे दोन्ही ग्रहांच्या शक्ति एकत्र येणे. शनि हा वायुतत्त्वाचा ग्रह. शनि ह्या ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या गोष्टी म्हणजे - : लोखंड -अर्थात रेल्वे,लोखंडाच्या मोठमोठ्या क्रेन्स,मोठी जहाजं,विमानं, शस्त्र-अस्त्र, वाफेवर चालणाऱ्या गोष्टी, बर्फ, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू, खनिजे ( Minerals ),सर्व प्रकारच्या खाणी - सोन्याची खाण,कोळश्याची खाण, समुद्राखालील खनिजे,गॅस सिलेंडर इ.
मंगळ ह्या ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या गोष्टी - : उष्णता,आग,रसायने,अपघात,युद्ध,रक्तपात,स्फोटक रसायने- बॉम्ब, ज्वालामुखी, धारधार आणि स्फोटक शस्त्रात्रे - तलवार,बंदूक,तोफ इ.
जेंव्हा मंगळ आणि शनि हे दोन ग्रह एकत्र येतील तेंव्हा काय घटना घडू शकतील ह्याची कल्पनाच केलेली बरी.
सध्या शनि महाराज धनु राशीत १४ अंशावर असून पूर्वाषाढा नक्षत्रात आहे. मंगळाने धनु राशीत मार्च महिन्यात प्रवेश केला आणि सध्या ७ अंशावर असून शनिच्या युतीत आहे. परंतु २ एप्रिल रोजी दोन्हीही ग्रह १४ अंशावर असतील. दोन्ही ग्रहांच्या अंमलाखाली येणाऱ्या गोष्टींचा उल्लेख मी वर केलेलाच आहे.
आधी जेंव्हा जेंव्हा शनि आणि मंगळाच्या युती झाली होती तेंव्हा काय घडले ह्याची दोन उदाहरणे देत आहे- :
- २२ ऑगस्ट २०१६ - बिहारमध्ये पूर आला होता. तेंव्हा शनि आणि मंगळाची युती वृश्चिक ह्या जलतत्त्वात झाली होती.
- ३ ऑगस्ट २०१४ - लुद्दिन - चीन इथे भूकंप झाला होता. ह्या भूकंपाची तीव्रता Ms - 6.5, Mw - 6.1 इतकी होती. तेंव्हा शनि आणि मंगळ तूळ ह्या वायुतत्त्वाच्या राशीत युतीत होते. ह्या दोन ग्रहांबरोबर चंद्र त्याच राशीत होता.
१) हे दोन्ही ग्रह जेंव्हा एकाच राशीत आणि एकाच अंशावर येतील तेंव्हा काही घातपात, मोठे अपघात होण्याची शक्यता असते.
२) मोठाली जहाजं,विमानं ह्यांचा अपघात होणे. रेल्वेचे अपघात होणे.
३) नैसर्गिक आपत्ती - पूर येणे, ज्वालामुखीचा उद्रेक होणे,भूकंप होणे.
४) इमारती किंवा डोंगर ढासळणे,दरडी कोसळणे.
५) घातपाताचा कारवाया जसे की - बॉम्बस्फोट होणे, दहशतवाद, आतंकवाद घडणे.
६) अचानक दंगली सुरु होणे. धार्मिक -जातीय दंगली घडणे -घडवणे होऊ शकते. लोकांनी मोर्चा काढणे- चर्चेतून गैरसमज निर्माण होणे इ.
७) राजकीय क्षेत्रात घडामोडी होणे.
८) रसायनांचा टँकर उलटून अपघात होणे. वायुगळती होणे. वायूगळतीमुळे अपघात होणे.
९) साडेसाती सुरु असणाऱ्या राशींनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी. धनु,वृश्चिक,मकर, वृषभ आणि मिथुन ह्या राशीच्या लोकांना शारीरिक पीडा जाणवते.
शनि आणि मंगळाच्या युतीबरोबरच गुरु आणि बुध हे दोन ग्रह सध्या वक्री आहेत. गुरु आणि बुध म्हणजे देशाची Economy. हे दोन ग्रह वक्री म्हणजे देशाच्या आर्थिक व्यवस्थेत उलाढाल - शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर उलाढाल होणे ही शक्यता आहे. तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्हांला बोलण्यातून गैरसमज होत आहेत हे जाणवेल. आपला मुद्दा समोरच्याला समजेल असे बोलणे असावे. कागदोपत्री व्यवहारात विलंब होत राहील ज्यामुळे तुमचे पुढचे व्यवहार ठप्प होतील.
ह्या सर्व शक्यता वर्तवल्या आहेत त्यामुळे ह्या लेखाचा उद्देश लोकांनी घाबरून जाणे असा मुळीच नाही. परंतु स्वतःची सद्सद्विवेकबुद्धी जागृत असावी हे अपेक्षित आहे. मग ह्या शक्यतांचा फायदा काय ? घडणाऱ्या गोष्टी तर घडणारच आहेत. परंतु आपण काळजी नक्कीच घेऊ शकतो. कुठल्याही धार्मिक वादावर अथवा गोष्टींवर फार चर्चा करू नये. अशा गोष्टी शक्यतो टाळाव्यात ज्यामुळे वाद विकोपाला जाऊ शकतात.प्रवासात असतांना सावधानता बाळगावी. सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद वस्तू आढळल्यास हलगर्जीपणा बाळगू नये.
अनुप्रिया देसाई
९८१९०२१११९