वास्तूशास्त्र - खरोखरीच शास्त्र की निव्वळ फ़ॅड ?
नुकत्याच लग्न झालेल्या विनोदला राहता १BHK कमी पडू लागला. त्याने नवीन घर शोधण्यास सुरवात केली. स्वतः इंजिनिअर असूनही त्याचा ज्योतिष -शास्त्र, वास्तूशास्त्र ह्यावर त्याचा विश्वास. वास्तूशास्राच्या नियमांमध्ये बसेल असे घर त्याला पाहायचे होते. तो स्वतः पुण्यात. घर घ्यायचे होते पुण्यातच. मागच्या आठवडयात एक घर त्याच्या पसंतीस उतरले. आता हे घर वास्तू शास्त्राच्या नियमांप्रमाणे आहे का ह्यावर त्याला माझा सल्ला हवा होता. तो पुण्यात आणि मी मुंबईत. मग त्याला घराचा फ्लोर प्लॅन मला वॉट्स ऍपवर पाठवण्यास सांगितले. त्याने लागलीच फ्लॅटचा फ्लोअर प्लॅन मला पाठवला.
घरच्या फ्लोर प्लॅनमध्ये आढळले दोष म्हणजे (घर Resale चे आहे )-
१) पूर्व दिशा पूर्णपणे बंद. म्हणजेच पूर्वेला एकही खिडकी नाही.
२) ईशान्येत असलेला मुख्य दरवाजा. ज्यामुळे ईशान्य दिशेत कट निर्माण झाला.
३) पूर्व दिशेत दोन्ही टॉयलेट्स होते.
४) दक्षिणेत असलेल्या मोठाल्या खिडक्या.
५) सर्वात शेवटच्या मजल्यावर हे घर होते. घराच्या थेट वरती गच्ची.
पूर्व दिशेतून येणारी सकाळची सूर्यकिरणे ही आरोग्यदायी असतात. माझा अनुभव असा आहे की ज्या घरात पूर्व दिशा पूर्णपणे बंद असते त्या घरातील व्यक्तींमध्ये व्हिटॅमिन "D"" ची कमतरता दिसून. मग त्यांना कॅल्शिअमची इंजेकशन्स घ्यावी लागतात. त्यांच्या तब्येतीच्या कुरबुरी सुरूच असतात. सुर्याच्या किरणांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन D असते. जर वास्तूत सकाळची उन्हे म्हणजेच सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंतची सूर्याची किरणे भरपूर प्रमाणात प्रवेश करत असतील तर त्या घरातील व्यक्तींना नैसर्गिकरित्या हे व्हिटॅमिन मिळत असते. सूर्याच्या किरणांमध्ये अँटीबॅक्टेरियल तत्त्वही असतात त्यामुळे ही उन्हे जर स्वयंपाक घरात थेट प्रवेश करत असतील तर तिथे विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ शकत नाही. म्हणूनच आपल्या वास्तुशास्त्रात स्वयंपाकघर हे आग्नेय दिशेत असावे असे सांगितले गेले आहे. त्याकरिताच पूर्व दिशेत खिडक्या असाव्यात. परंतु ह्या घरात पूर्वेला खिडकी नाही म्हणजेच ह्या वास्तूतील व्यक्तींना तब्येतीच्या सततच्या तक्रारी असू शकतील ही एक शक्यता मी वर्तवली.
ईशान्य दिशा ही ईश्वराची दिशा असे आपण मानतो. ईशान्य दिशेत नेहेमी देवघर किंवा देव्हारा असावा असे नियम आहेत. ह्यालाही शास्त्रीय कारणे आहेत. ईशान्य दिशा सर्व दिशेत उच्च मानली गेली आहे. तिथे घराचे मुख्य प्रवेशद्वार असू नये. टॉयलेट्स तर मुळीच असू नयेत. ह्या वास्तूत घराचा मुख्य दरवाजा आहे ईशान्य दिशेत. अशा घरातील व्यक्तींच्या मनावर सतत मानसिक दडपण असणार ही दुसरी शक्यता मी वर्तवली.
पूर्व दिशेत घरातील दोन्ही टॉयलेट्स होते. पुन्हा तोच नियम लागू होतो. पूर्व दिशेची उन्हे घरात थेट प्रवेश करायला हवीत. तर ह्या दिशेत टॉयलेट्स असणे हे पूर्णपणे निषिद्ध मानले गेले आहे. अशा वास्तूमध्ये शैक्षणिक प्रगती अजिबात होत नाही असे माझे observation आहे. क्षमतेपेक्षा कमी टक्के मिळणे, आपण काय शिकावे ? हे समजत नाही. अशा वास्तूत राहणाऱ्या मुलांची Grasping power च कार्य करू शकत नाही. टंगळ मंगळ, टवाळक्या करणे असे उद्योग ही मुले करत राहतात. उद्दामपण वाढतो कारण सारासार विचार करण्याच्या बुद्धीवरच घाला घातला जातो. त्यामुळे इथे शैक्षणिक प्रगती होणे नाही ही तिसरी शक्यता मी वर्तवली.
दक्षिण दिशेत असलेल्या खिडक्या हा ह्या वास्तुत होणाऱ्या दोषांमध्ये आणखीनच भर घालत होता. दक्षिण ही दिशा निषिद्ध मानली गेली आहे. दक्षिणेकडून येणारी energy ही अजिबात आरोग्यदायी नसून वास्तूत राहणाऱ्या अचानकपणे व्यक्तींवर मानसिक दबाव येणे, आर्थिक आणि मानसिक कोंडी होणे ही चौथी शक्यता मी वर्तवली.
सर्वात शेवटच्या मजल्यावर असणाऱ्या घरात सर्वात जास्त गरमीचा त्रास होतो. कारण सूर्याची किरणे थेट गच्चीच्या सज्जावर पडत असतात. त्यामुळे त्याखालील असलेल्या घरात उष्णता वाढत जाते. सूर्यास्तानंतर ही उष्णता कमी होण्याची अपेक्षा आहे परंतु आजकालच्या सिमेंट -काँक्रीटच्या बांधकामामुळे ही उष्णता निवळली जात नाही. हे तिथेच ,म्हणजेच त्या वास्तूत फिरत रहाते. ही वास्तूत फिरत रहाणारी सततची उष्णताच आरोग्यसाठी घातक ठरते. गच्चीच्या खालचा फ्लॅट असण्यात अजून एक नकारात्मकता म्हणजे तुमच्या फ्लॅट्च्याचवरती पाण्याची ओव्हरहेड टाकी असणे. सततच हे वजन असणे म्हणजे डोक्याला ताप असतो. अशा वास्तूतील व्यक्तींना मानसिक दडपण हे नेहेमीच असते. ही पाचवी शक्यता मी वर्तवली.
विनोदला विचारले की ह्यांच्या घराच्या बरोबरवरती गच्चीत टाकी येते का रे ? त्यावर विनोदने सांगितले की टाकी तरी नाहीये परंतु हल्ली ते solar projections असतात सोलर energy साठी ती सगळी व्यवस्था ह्या फ्लॅटच्या बरोबरवरतीच आहे. मग मला वेगळीच शंका आली. मी त्याला ह्या वास्तूतील व्यक्तींमध्ये कोणाला मानसिक आजार आहे का ते विचारले आणि विनोद स्तब्धच झाला. त्याने माहिती दिली ती अशी की ह्या घरात दोनच व्यक्ती राहतात ते म्हणजे आई आणि तिचा १८ वर्षांचा मुलगा. मुलगा mentally challenged आहे. मुलाचे बाबा नोकरीनिमित्ताने मुंबईत असतात. मुलाच्या अशा परिस्थितीमुळे त्याच्या आईला नोकरी करता येणे शक्य नाही. सध्या आर्थिक कोंडी होतेय म्हणूनच हे घर विकून मुंबईत जाण्याचा विचार त्यांचा आहे. इथे वास्तूशास्त्राप्रमाणे वर्तवलेल्या सगळ्या शक्यता जुळून येतात. पहिली शक्यता तब्येतीच्या सततच्या तक्रारी असण्याची शक्यता सांगितली होती ती इथे खरी ठरतेय. दुसरी शक्यता अशी होती की घरातील व्यक्तींच्या मनावर असणारे मानसिक दडपण. आपल्या सर्वांनाच मानसिक दडपण असते परंतु त्या माऊलीचा विचार करा जिचा मुलगा मानसिक रोगी आहे त्या आईला किती दडपण असेल ? शैक्षणिक प्रगती होणे नाही ही वर्तवलेली शक्यताही तंतोतंत जुळते. आर्थिक कोंडी झाल्यामुळेच हे घर विकावे लागतेय हे त्या माऊलीने सांगितले. ( दक्षिण दिशेत असणाऱ्या खिडक्यांमुळे आर्थिक आणि मानसिक कोंडी होणे ). त्या घरात प्रवेश न करताही मी मुंबईतूनच पुण्यातील ह्या वास्तूत रहाणाऱ्या व्यक्तींची परिस्थिती तंतोतंत सांगितली ते वास्तूशास्त्राच्या अभ्यासामुळेच.
आपल्या ऋषीमुनींनी बनवलेले हे नियम आपल्याच भल्यासाठीं आहेत. आमचा विश्वास नाही वास्तू आणि ज्योतिषावर असं म्हणायची फॅशन झाली आहे सध्या. परदेशी वंशाचे लोक भारतात येउन ही आपली सर्व शास्त्रे शिकताहेत आणि आपल्या देशात ह्याचा अंमल करतांना दिसतात तेंव्हा आपल्याच शास्त्रावर विश्वास नसलेल्या भारतीय लोकांची कीव करावीशी वाटते. माझे काही जातक हे परदेशी वंशाचे आहेत. ह्या जातकांच्या मनात तर भारतीय ज्योतिष-शास्त्र,वास्तू शास्त्र ह्याबद्दल प्रचंड आदर आहे. अत्यंत आपुलकीने ते ह्या शास्त्रावर माझ्याबरोबर चर्चा करतात. आणि भारतीय वंशाचे लोक आपल्याच शास्त्राची थट्टा करतांना दिसतात आणि आमचा अशा गोष्टींवर विश्वास नाही असे म्हणण्यात धन्यता मानतात. ह्या लेखावरून काहीतरी प्रकाश डोक्यात पडेल अशी अपेक्षा. वर्तवलेले भविष्य चुकले तर शास्त्र चुकीचे ठरत नाही. चुकतो तो ज्योतिषी किंवा वास्तूतज्ञ. तेंव्हा कृपा करून शास्त्राला दूषणे देऊ नका.
वास्तू- शास्त्र सल्ल्यासाठी - www.kpastrovastu.com इथे भेट द्या.