नावांची गंमत
काल पेपरचे बिल घ्यायला विशीचा एक तरुण आला. "नवीनच दिसतो आहेस. काय नाव तुझे ?" सगळी माहिती नेहेमी विचारावी आणि कोणावरही विश्वास ठेवू नये ह्या "सावधान इंडिया" ह्या मालिकेचा सूर पकडून त्याला नाव विचारले. तो म्हणाला,"परदीप". हा चुकून नाव असे सांगतोय हे समजून त्याला म्हणाले,"अरे प्रदीप ना ?" तेवढ्याच आत्मविश्वासाने त्याने सांगितले,"अहो नाही. माझे नाव परदीप आहे.". आणि पावतीवर चक्क "परदीप" अशी सही सुद्धा केली पठ्ठ्याने. आता काय बोलणार ? परदीप चा अर्थ काय विचारले तर काहीही उत्तरं येणार नाही हे माहित होते म्हणून धाडसचं केले नाही विचारायचे. इतका कसा अपभ्रंश होऊ शकतो ? प्रदीप ह्या नावाचा किती सुंदर अर्थ आहे. प्रदीप म्हणजे दिवा/दिव्याचा प्रकाश. आणि हा पठ्ठ्या नावाची वाट लावतोय. परदीपचा अर्थ पर+दीप म्हणजेच परक्यांचा दीपक असा होतो. हास्यास्पद आहे. अर्थाविना नाव ठेवण्याची प्रथाच सुरु झाली आहे.परवा एका लग्नाच्या आमंत्रणाची पत्रिका आलेली. वाचतांना आमंत्रिक म्हणून घरातल्या मूळ पुरुषाचे नाव लिहिलेले. नाव लिहिले होते - परषोत्तम. बहुदा चुकून नाव छापले गेले असे मी पुटपुटले. त्यावर त्यांचे म्हणणे ,"नाही. अहो आजोबांचे नाव परषोत्तमच आहे". "बरं" म्हणून मी विषय तिथेच थांबवला. ह्यांना अर्थ विचारण्यात अर्थच नाही हे समजून गेले. एवढे सुंदर नाव "पुरूषोत्तम" सर्व पुरुषांमध्ये उत्तम असा त्याचा अर्थ आणि आपण खुद्द भगवान राम ह्यांना पुरूषोत्तम म्हणून संभोधतो. अशा सुंदर नावाचा असा अपभ्रंश आणि तो ही इतक्या आत्मविश्वासाने सांगण्याचे आणि छापण्याचेही धाडस. काय म्हणावे ?
लोकांनी सुंदर नावांचा अगदी चुराडा केला आहे. माझ्या ताईच्या शाळेत एक मुलगी आहे. ती लक्षात राहण्याचे कारण तिचे नाव "उपेक्षा". "तुझे असे का बरं नाव ठेवले ?" असे विचारल्यावर तिचे अचंबित करणारे उत्तर - "माझ्या मोठ्या बहिणीचे नाव अपेक्षा आहे म्हणून माझे नाव आई-बाबांनी उपेक्षा ठेवले.अपेक्षा आणि उपेक्षा". ह्या नावाचा अर्थ माहीत आहे का गं तुला ? असे विचारल्यावर -काय माहित ? त्याने काय फरक पडणार आहे अशा अर्थाचे भाव तिच्या चेहेऱ्यावर होते. तिला सांगावेसे वाटले अगं तुझ्या नावाचा अर्थ एकदा तरी शब्दकोषात पहा. म्हणजे कळेल किती चुकीचे नाव ठेवलेय आई-वडिलांनी. बरं बऱ्याच वाचकांना उपेक्षाचा अर्थ माहीत नसेल त्यांच्यासाठी अर्थ इथे नमूद करतेय - उपेक्षा म्हणजे अवहेलना (neglect ). थोडक्यात आमच्या मुलीची अवहेलना/उपेक्षा.
अजून एक गंमतीशीर नाव म्हणजे उल्का. उल्का नावाच्या दोन तरी मुली माझ्या पाहण्यात आहेत. आणि खरोखरीच त्यांचा स्वभावही खऱ्याखुऱ्या उल्के सारखाच आहे. दोघींना कधीही राग येऊ शकतो,दोघींचा पारा चढला की त्यांचे नवरे अगदी बिच्चारे होऊन जातात. उल्का हे नाव कसं काय एखाद्या मुलीचे असू शकेल ?
ताईने आताच एक नाव सांगितले - श्लेष्मा - अर्थ आहे शेंबूड - इंग्रजीत - Mucus. आणि हे एका मुलीचे नाव आहे. खरंच आश्चर्य आहे !!! लोकांनी नावे ठेवतांना एकदा त्याचा अर्थ तरी समजून घ्यावा नाहीतर किती अनर्थ होतो आहे पहा.
आणि काही नावे अशी आहेत ज्यांचा त्यांच्या नावाशी काहीही संबंध नाही -
शौर्य - शौर्य नावाचे तीन जातक आहेत. तिघेही अत्यंत शांत आणि केविलवाण्या चेहेऱ्याचे आहेत. शौर्याचा "श" नाही आयुष्यात.
धैर्य - नावाचा अर्थ धीर धरणे. (patience ) परंतु त्या मुलांमध्ये अस्थिरता जास्त दिसते. धीर धरणे म्हणजे काय हे त्यांच्या गावीही नाही.
काही जातकांची नावे मला खूप भावली -
- एका जातक मित्राचे नाव आहे - सुव्रत - सु + व्रत = चांगले असे व्रत (विष्णूचे एक नाव ) विष्णू सहस्त्रनामावली वाचली असेल तर हे नाव त्यात आहे.
- एका जातकाचे नाव - ययाती - अर्थ = प्रवासी
- एका माझ्या जातकाचे नाव त्याच्या आईने ठेवले - दीपसण - दिवाळीच्या दिवसात जन्माला म्हणून दीपसण. किती सुंदर नाव.
- एका छोट्या अशा मुलीची पत्रिका आली होती भविष्य विवेचनासाठी तिचे नाव - जीविका अर्थ आहे पाण्याचा स्त्रोत /जीवन
- मित्राच्या मुलाचे नाव - अमानी - विष्णूचे नाव. विष्णू सहस्त्रनामावलीतील अजून एक नाव
- सुव्रतच्याच जुळ्या मुलींची नावे - समिधा - an offering for a sacred fire. आणि अर्चिता - अर्थ - जिची पूजा करावी. (ही दोनही नावे विष्णूसहस्रनामावलीत आहेत )
- एक वेगळे नाव - सनिशा - अर्थ अजूनतरी माहीत नाही.
- एका जातक मैत्रिणीच्या ओळखीत हे नाव आहे एका मुलीचे - बिल्व - अर्थ - बिल्वाचे फळं. वेगळे नाव ठेवण्याच्या स्पर्धेत आगळेवेगळे नाव.
- अजून एक नाव आले आहे suggestion बॉक्स मध्ये - शडवली -अर्थ आहे हिरवळ. एका मुलीचे नाव आहे.
खंजन -अर्थ आहे - गालावरच्या खळ्या.
सुमुख -अर्थ आहे - सुंदर मुख असलेला.
आरा - अर्थ आहे - प्रकाश आणणारा (Light Bringer)
केया - अर्थ आहे - गोड (sweet)
तादात्म्य - अर्थ आहे - ओळख (Identity)अत्यंत वेगळे नाव आहे हे.
एक एका नावांची लाट येते प्रत्येक वर्षी. २०१० साली शौर्य नावाची लाट होती. २०११ साली अर्णव. २०१२ साली सर्व अर्जुनच अर्जुन. २०१३ साली जन्मलेल्या बहुतांश मुलींची नावे "ओवी"
अशी ही नावांची गंमत. तुमच्याही ओळखीत अशी नावे असतील. आहेत ? मग कळवा बरे मला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा