नवरात्र उत्सव कथा भाग १
नवरात्र ह्या वर्षी एक ऑक्टोबरला सुरु होत आहेत. ह्याबाबतीत मला बऱ्याच जणांनी नवरात्रावर काही लिहा ही विनंती केली आहे. त्यामुळे मी नवरात्राची उत्सव कथा ही ह्या लेखाच्या पहिल्या भागात आणि देवीची ओटी कशी भरावी ? ओटी भरण्याचे नेमके प्रयोजन काय ? प्रत्येक देवीची रूपे आणि त्यांना अर्पित केला जाणारा रंग ह्याबद्दलची माहिती लेखाच्या दुसऱ्या भागात मांडलेली आहे. ही माहिती मी स्वतः रचलेली नाही. ही माहिती मला एका जातक मित्राने पाठवलेली आहे.
!!!श्री नवरात्र उत्सव कथा!!!
🕉
महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र ! नवरात्र हे देवीचे व्रत असून महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी हे व्रत कुलाचार म्हणूनसुद्धा पाळले जाते. या व्रतात नऊ दिवस व्रतस्थ राहून देवीची मनोभावे आराधना केली जाते.
तिथी
आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी.
नवरात्री शनिवार १ ऑक्टोबर रोजी प्रारंभ होत आहे व विजयादशमी दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे तो दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आहे.
नवरात्र व्रताचा इतिहास
१. रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने नारदाने रामाला नवरात्रीचे व्रत करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर रामाने लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाला ठार मारले.
२. महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने नवमीला रात्री असुराला मारले. तेव्हापासून तिला महिषासुरमर्दिनी म्हणू लागले.
नवरात्र व्रताचे महत्त्व
१. जगात जेव्हा-जेव्हा तामसी, आसुरी व क्रूर लोक प्रबळ होऊन, सात्त्विक, उदारात्मक व धर्मनिष्ठ सज्जनांना छळतात, तेव्हा देवी धर्मसंस्थापनेकरता पुन:पुन्हा अवतार घेते.’ उपांग ललिता ’ ही जगज्जननी, जगद्धात्री, पालन पोषण करणारी; लक्ष्मी ही संपत्ती दायिनी; काली ही संहारकर्ती, अशा स्वरूपात नवरात्रात उपासना व पूजन होते.
२. नवरात्रीत देवीतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. देवीतत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी नवरात्रीच्या काळात ” श्री दुर्गादेव्यै नम: । ” हा नामजप जास्तीतजास्त करावा.
अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ, ह्यालाच नवरात्र उत्सव असं म्हणतात. नवरात्रात घरोघरी घट स्थापना केली जाते. ह्या नवरात्रींत देवीपुढे अखंड दिप लावला जातो. रात्री देवापुढे बसून उपासना, जप, ग्रंथवाचन, देवीची छान छान भजने, स्त्रोत्रं म्हटली जातात.
देवी कां प्रकट झाली? कशासाठी अनं कशी प्रकट झाली. ह्या बद्दल देवी महात्म्य नावाच्या ग्रंथात जी गोष्ट सांगितली जाते ती अशी :
पूर्वी पृथ्वीवर एक महिषासुर राक्षस फार माजला होता. त्यानं देवदेवता ऋषीमुनी, साधू संत सज्जन आणि भक्त भाविक ह्यांना अगदी सळो की पळो करून ठेवलं होत. तो सर्वांनाच फार त्रास देत होता.तेव्हा सर्व जण ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या देवतेंकडे गेले. त्यांनी आपली समस्या त्या देवांना सांगितली तेव्हा त्या देवांना महिषासूर राक्षसांचा फार राग आला. त्यांच्या क्रोधातून एक शक्तीदेवता प्रगट झाली.त्या शक्तीदेवतेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले आणि त्याला ठार मारले. म्हणूनच त्या देवीचं सर्वांनी नांव ठेवलं महिषासुर मर्दिनी. त्या देवीच्या उपासनेचा काळ म्हणजेच नवरात्र.
अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवघरांत, मठ मंदिरात जी घटस्थापना केली जाते ती कशी ह्याच उत्तर असं :
दोन पत्रावळी घेऊन त्यात एक परडी ठेवतात. परडीत काळी माती घालतात त्यात एक सुगड ठेवतात. त्याला कुंकवाची पाच किंवा सात बोटे काढतात. त्या सुगडाच्या तोंडावर नऊ विड्यांची पाने लावतात. त्यावर एक नारळ म्हणजेच श्रीफळ ठेवतात. त्या श्रीफळालाच देवीचा मुखवटा मानून हळद कुंकू लावतात. हार वेणी गजरा घालतात. घटा खालच्या काळ्या मातीत सात प्रकारची धान्य पेरतात.ह्या घटाजवळच अखंड नंदादीप लावतात. त्या दिव्याची काळजी घेतली जाते. दीप म्हणजे प्रकाश. अन प्रकाश म्हणजे ज्ञान, तसेच ह्या घटावर फुलांच्या माळा सोडल्या जातात. सकाळ-संध्याकाळ देवीची मनोभावे पूजा केली जाते. भक्ती केली जाते. उपासना केली जाते.नवरात्रातली ही देवी उपासना प्रामुख्याने रात्री करतात. कारण रात्रीची वेळ ही उपासनेला उत्तम असते. रात्री मन शांत स्थिर असते. त्याची एकाग्रता तादात्म्य भाव लवकर साधतो. एकेका दिवसानं घटा खालच्या मातीत पेरलेल धान हे पाणी आणि अखंड दिव्याची उष्णता ह्याने अंकुरते – हळू हळू वाढू लागते. तेच त्या देवीच घटावरच दर्शन असत.
आपल्या महाराष्ट्रात माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तश्रृंगी देवी अर्धे पीठ अशी देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत. येथे नवरात्रीमध्ये नऊ दिवस फार मोठी यात्रा भरते. देवीचे भक्त देवीच्या दर्शनासाठी खूप लांबून येतात. देवीला साडी-चोळी. पीठा-मीठाचा जोगवा, ओटी अर्पण करतात व सुखाचे वरदान मागतात.ह्या घटासमोर बसून उपासना करणाऱ्याचे मन शांत प्रसन्न व स्थिर होते. देवीची त्या भक्तावर कृपा होते. त्याला सुख शांती अन समाधान लाभते.
नवव्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवचंडीचे होम करतात.
ह्या नवरात्र उत्सव काळांत देवळांतून देवीची वेगवेगळी पूजा बांधतात. ती आदिमाया शक्ती दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण, मंगल आणि कल्याण करणारी आहे. ह्या शक्तीचे पूजन देशभरात केले जाते.ही शक्ती देवता देशभरांत अन वेगवेगळ्या भागांत विविध नावांनी ओळखली जाते. ह्या उत्सवाला सुद्धा सध्या सार्वजनिक स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे.
मुलींना आवडणारा हादगा हा सुद्ध ह्याच दिवसांत करतात. मुली पाटावर काढून त्याचे भोवती फेर धरतात. हादग्याची गाणी म्हणतात. नवनव्या खिरापती केल्या जातात.
नवरात्रीला सध्या जे सार्वजनिक स्वरुप आले आहे त्यामध्ये मुले मुली नऊ दिवस गरबा खेळतात. तसेच विविध मनोरंजनाचे स्पर्धा महिलांसाठी भरविल्या जातात. मुलां-मुलींसाठी अनेक स्पर्धात्मक कार्यक्रम राबविले जातात. शेवटच्या दिवशी देवीची फार मोठी मिरवणूक काढली जाते. शक्ती उपासनेचा हा नवरात्रीला उत्सव फार महत्त्वाचा आहे.
*नवरात्रीचे कलर*
०१/१०/२०१६ *ग्रे*
०२/१०/२०१६ *ऑरेंज*
०३/१०/२०१६ *सफेद*
०४/१०/२०१६ *लाल*
०५/१०/२०१६ *निळा*
०६/१०/२०१६ *पिवळा*
०७/१०/२०१६ *हिरवा*
०८/१०/२०१६ *मोरपीसी*
०९/१०/२०१६ *जांभळा*
१०/१०/२०१६ *आकाशी*
११/१०/२०१६ *गुलाबी*
तुम्हा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या भगव्या शुभेच्छा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा