नवीन वर्ष साजरे करण्याचा राशींच्या तऱ्हा
३१st ला काय प्रोग्राम ? हा प्रश्न वातावरणात घुमू लागला आहे. गुलाबी थंडीबरोबरच नवीन वर्ष साजरा करण्याचा उत्साह जाणवतो आहे. गेल्या थर्टीफस्टला काय केले होते ? मग आता ह्या वेळी काय करायचे ? ह्यांवर सगळ्यांचे प्लॅन्स सुरु झालेले आहेत. थर्टीफस्टला नवीन संकल्पांचीही जाहीरात केली जाते. ह्यावर्षी कोणी नवीन घर घेणार ह्याचा संकल्प,तर कोणी नोकरी बदलणार हा संकल्प करतो. सर्वात जास्त संकल्प केला जातो तो वजन कमी करण्याचा. प्रत्येकाचा संकल्प वेगळा.
मला विचाराल तर माझं वैयक्तिक मत वेगळं आहे. मराठी शाळेत झालेल्या शिक्षणामुळे,कायम भारतीय संस्कार मनात खोलवर रुतलेले आहेत. नवीन वर्ष हे गुढीपाडव्यालाच. हिरव्या शालूने आणि झेंडूच्या फुलांनी बहरलेला निसर्ग. नवीन वर्ष सुरु झाल्याची ग्वाही निसर्गच प्रत्यक्षात देत असतो. ख्रिसमस ट्रीपेक्षा कडुनिंब आणि तुळस ही रोपटी नेहेमीच जवळची वाटत आली आहेत. ह्या दिवशी गुढी उभारून नवीन वर्षाची सुरवात होते. कडुनिंब,धणे आणि गूळ हे मिश्रण चघळणे ह्या दिवशी अनिवार्य. घरी पुरणपोळीचा छान बेत. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणं, मंदिरात जाऊन दर्शन घेणं हे आलंच. कुठेही आळस जाणवत नाही. सगळीकडे उत्साह आणि प्रफुल्लता. नवीन वर्षाची सुरवात असावी तर अशी.
परंतु सध्या इंग्राजळेल्या पिढीला गुढीपाडव्यापेक्षा १ जानेवारी हेच आपले नवीन वर्ष वाटू लागले आहे. म्हणून अगदी सप्टेंबर महिन्यातच थर्टीफस्टचे बुकिंग केले जाते.आमच्याकडे थर्टीफस्ट साजरा करा अशा आशयाचे होर्डिंग्स दिसू लागतात. ह्यामुळे गेल्या काही काळात हॉटेल्स किंवा तत्सम संस्थांना आर्थिक फायदा होऊ लागला आहे. ही झाली एक बाजू. ह्याची दुसरी बाजू म्हणजे - थर्टीफस्टनंतरच्या दुसऱ्या दिवशी ही पिढी रात्रभर झालेल्या जागरणाने लवकर उठू शकत नाही. काही वर्गात ड्रिंक्स किंवा तत्सम गोष्टींचाही समावेश असतो. नवीन वर्ष म्हणवून घेता परंतु त्याच दिवशी दुपारी ३.०० वाजता तुमची पहाट होते. आळसावलेल्या मनाला आणि शरीराला काहीही उत्साह नसतो. ह्या दुसऱ्या बाजूमुळे खरंतर वाईट वाटते.
असो. तर आजचा विषय आहे थोडासा गमतीदार. थर्टीफस्ट साजरा करणाऱ्या व्यक्तिच्या पद्धतीवरून आपण त्या व्यक्तिला ओळखू शकता. पण ही गोष्ट गंमत म्हणून घ्या !!
सतत थर्टीफस्टचे प्लॅनिंग बदलून शेवटी आहे त्याच प्लॅनप्रमाणे वागणाऱ्या तुमच्या मित्राची राशी आहे - कन्या. कन्या राशीला एखादा प्लॅन निश्चित होत आला की त्यात शंका जास्त वाटू लागतात मग प्लॅनमध्ये बदल करण्यास हे भाग पडतात. मग दुसरा प्लॅन झाला की त्यातही खोट दिसू लागते. शेवटी आहे त्याच प्लॅनप्रमाणे प्रोग्रॅम होतो.
आधी आढेवेढे घेऊन आणि भाव खाणाऱ्या परंतु नंतर तुमच्याबरोबर येणाऱ्या तुमच्या मैत्रिणीची राशी आहे - मकर. मुळात मकर राशीला आधी उत्साह नसतो परंतु पार्टी जसजशी रंगते तसतसे हे खऱ्या रूपात येतात.
एकाच वेळेस दोन ते तीन ठिकाणी थर्टीफस्ट साजरे करणारे महाभागही मी पहिले आहेत. जर तुमचा मित्र तुमच्या ग्रुप बरोबरच दुसऱ्याही ग्रुपबरोबर प्लॅन बनवत असेल किंवा जाणार असेल तर तो आहे - तूळ. तूळ राशीला पार्टीपेक्षाही कुठल्या हॉटेलमध्ये किंवा कुठल्या ठिकाणी थर्टीफस्ट साजरा होणार ह्याला महत्त्व जास्त असते. हॉटेल सुद्धा "ब्रँडेड" असावे लागते. अशा तशा ठिकाणी हे लोक शक्यतो जातच नाहीत.
तुमच्या मैत्रिणीला किंवा मित्राला थर्टीफस्ट साजरा करण्यापेक्षा त्या दिवशी आपण कसे दिसणार ह्याचे महत्त्व जास्त वाटत असेल आणि त्यासाठी बऱ्याच पार्लर आणि सॅलोनचे उंबरठे झिजवून झाले असतील तर त्याची किंवा तिची राशी आहे - वृषभ.
थर्टीफस्टला खाण्याचे प्लॅनिंग करत असतांना तिखट आणि चमचमीत नॉन व्हेज /चायनीज/थाई पदार्थ कुठे चांगले मिळतात ह्याची माहिती तुम्हांला देणारा मित्र आणि मैत्रिण म्हणजे साक्षात वृश्चिक राशीचा अवतार !!!
ज्या मैत्रिणीने माझा तर थर्टीफस्टचा प्लॅन फिक्स आहे,आम्ही गोव्याला जाणार आहोत असे ठामपणे सांगून तुम्हांला आठवडाभर भंडावून सोडले आहे आणि आयत्यावेळी ती जर तुमच्याबरोबर नवीन वर्ष साजरे करायला आली तर समजा तिची राशी आहे - मिथुन.
थर्टीफस्ट साजरे करण्यात धनु राशीचा हात कोणीच पकडू शकत नाही. प्लॅन्स अगदी तयार असतात ह्यांच्याकडे. थर्टीफस्टसाठी नुसते डेस्टिनेशन सांगून हे गप्प बसत नाहीत. तिथे कसं जायचं ? तिथे खाण्यापिण्याची काय सोय असेल ? इतर काही करमणुकीचे कार्यक्रम करता येतील का ? अशी इत्यंभूत माहिती धनु शिवाय कोणी देऊ शकत नाही. ग्रुपमध्ये कोणी आढेवेढे घेत असले तर त्याला वठणीवर फक्त धनुच आणू शकते.
थर्टीफस्ट म्हणजे ३१ तारीख संध्याकाळ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत साजरा करण्याचा काळ. सिंह राशी ह्याला अपवाद आहे. ३१ तारखेलाच सुट्टी घेऊन छान थंड हवेच्या ठिकाणी जायचे. संपूर्ण दिवस मस्त मजेत घालवायचा. संध्याकाळी नवीन उत्साहाने मौज करायला तयार असणारी राशी म्हणजे - सिंह.
आळसावलेले डोळे आणि थर्टीफस्टचा फारसा उत्साह नसणारी राशी म्हणजे कुंभ. ह्या राशीला थर्टीफस्ट साजरा झालाच पाहिजे,हा ही हल्ली एक भारतीय सण (?) आहे ह्याच्याशी सोयरसुतक नसतं. कोणीतरी प्लॅन बनवलेला असतो आपण फक्त जायचं एवढंच ह्यांना माहीत.
प्लॅन्स बनवतांना सर्वात जास्त चिडचिड होत असलेली मैत्रिण म्हणजे मेष. तिला कुठलेच ठिकाण आवडत नाही. आधी नकारघंटा आणि चिडचिड - मेषेचा साक्षात प्रत्यय.
सेलेब्रेशनपेक्षाही संकल्पाला जास्त महत्त्व देणार. थर्टीफस्टपेक्षा १ तारखेपासून मी अमुक अमुक करणार असे ठरवलेले आहे, मी अमुक ठिकाणी जाणार, मी कामे कमी करून लाईफ एन्जॉय करणार अशी सांगणारी राशी म्हणजे मीन. ह्या राशीला वर्तमानकाळात वावरताच येत नाही. एकतर भूतकाळात फार रमतात किंवा भविष्याची स्वप्ने रंगवण्यात मग्न असतात. म्हणजे गेल्या वर्षी थर्टीफस्ट कसा झक्कास साजरा केला होता ...त्या आधीच्या वर्षी कशी मजा आली होती ह्यावर चर्चा करण्यात अगदी रंगून जातील.
काय पटतंय का मंडळी ?? हा राशींचा गंमतीचा भाग झाला. ह्या वर्षी तुम्ही तुमच्या मैत्रिणीची किंवा मित्राची राशी नक्की ओळखू शकाल.
अनुप्रिया देसाई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा