कुंडलीतील रंग
रंग मनुष्याला अनादीकाळापासूनच भुलवत आले आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या रंगाच्या आवडी वेगळ्या आहेत. त्याला आवडण्याऱ्या रंगाचे कपडे, गोष्टी त्याला आवडतात. अगदी घरात भिंतींनासुद्धा त्याच्या आवडीचा रंग असतो. आपण ठराविक रंगाकडे आकृष्ट होतो ह्याचे कारण म्हणजे आपला स्वभाव. हो आपला स्वभावच आपल्याला एखाद्या ठराविक रंगाकडे आवड असण्याला कारणीभूत असतो. उदाहरणच घ्यायचे झाल्यास - ज्या व्यक्तींनाच स्वभाव हा तापट असतो किंवा प्रत्येक गोष्ट त्यांना वेगाने झालेली हवी असते अशा लोकांचा कल हा लाल आणि काळा ह्या रंगांकडे असतो. आहे ना गंमत ?
तुमच्या स्वभावामुळे तुम्हांला अमुक एका रंगाचे नेहमीच आकर्षणात वाटते. कपाटात आवडत्या रंगाचे ढीगभर कपडे असले तरीसुद्धा नवीन कपडे घेतांना तुमची नजर त्याच रंगाच्या कपड्यांकडे वळते. आणि मग घरच्यांकडून खरपूस समाचार मिळतो - त्याच त्याच रंगाचे किती कपडे झालेत कपाटात ?? तुला दुसरा कुठला रंग आवडतो की नाही तूला ? अर्थात आपले उत्तर "नाही" असेच असते बरोबर ना ?
तर आजचा आपला विषय आहे कुंडलीतील रंग. रंगांचा आपल्या जीवनावर होणार परिणाम किंवा आपल्या जीवनशैलीमुळे आपल्याला आवडणारा रंग.
पहिला रंग आहे - तांबडा (Red ) - तांबडा रंग म्हणजे म्हणजे भडक लाल. सूर्योदयाच्यावेळी आकाशात जी आभा निर्माण होते ती असते तांबड्या रंगाची. लाल रंग हा प्रेमाचा आहे. लाल हा रंग रक्ताचा सुद्धा आहे. ज्यांना हा रंग आवडतो त्यांचा स्वभाव अर्थात तापट असतोच परंतु ह्या लोकांची प्रत्येक गोष्टीत असलेली घाई त्यांना घातक ठरू शकते. हा रंग आवडणाऱ्यांचा पत्रिकेत "मंगळ" बलवान असतो. ह्यांना खाण्यातही पावभाजी, मिसळ असे तत्सम मसालेदार आणि चमचमीत पदार्थ आवडतात. अशा लोकांनी लाल रंगाचा वापर कमी करून काहीवेळेस निळा आणि पांढरा रंग वापरून स्वभावात बदल आणू शकतील. स्वभाव शांत होण्यास मदत होईल.
दुसरा रंग आहे - नारिंगी (Orange) - नारिंगी म्हणजेच भगवा रंग. नारिंगी रंग आहे जल्लोष आणि उत्साहाचा. ह्या रंगाकडे ज्यांचा कल असतो त्यांच्या कुंडलीत "रवि" बलवान असतो. सूर्य जसा वेळेवर उगवतो आणि मावळतो तशी ह्या लोकांच्या आयुष्यात शिस्त असते. अशा व्यक्तिंची इतर लोकांवर छाप लवकर पडते. ह्यांना सर्व उच्च प्रतीच्या गोष्टी आवडतात. जेवतील तर फक्त फाईव्ह स्टार हॉटेलमध्येच,प्रवास विमान किंवा स्वतःच्या गाडीने. रेल्वे किंवा बसने ह्यांनी क्वचितच प्रवास केलेला असतो. ह्यांच्यात जात्यातच नेतृत्व गुण असतात. काहीवेळेस स्वतःच्या स्वभावामुळे कुटुंबापासून दुरावा येतो. ह्या लोकांनी पांढऱ्या रंगाचा वापर केल्यास भावनिकदृष्ट्या कुटुंबियांशी जवळीक साधता येईल. ज्या लोकांना स्वभावात नेतृत्वगुण अवलंबवायचे असतील त्यांनी नारिंगी रंगाचा वापर करावा. आपल्या ऋषीमुनींही भगव्या रंगाचा अवलंब केला आहे.
तिसरा रंग आहे - पिवळा (Yellow ) - पिवळा रंग आहे ज्ञानाचा,नव्या कल्पनांचा. ज्ञानलालसा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. पिवळा रंग आहे विष्णूचा आणि लक्ष्मीचा. पवित्र हळदीचा रंगही पिवळाच. ह्यांचा स्वभावात तारतम्य असतं. ह्यांची बुद्धी उच्चं प्रतीची असते. वागण्यात प्रगल्भता असते. दुसऱ्या व्यक्तींना समजून घेण्याच्या वृत्तीमुळे ह्यांचा मित्रपरिवार मोठा असतो. ह्या व्यक्तिंना गोड पदार्थ जास्त आवडतात. प्रगल्भता आणि परिपक्वतेमुळे ह्या रंगाचा विशेष वापर वास्तुशास्त्रात शयनगृहात करण्यास सांगितला आहे. ह्या रंगाच्या वापरामुळे स्वभावातील तापटपणा आणि घाई ह्यावर नियंत्रण येण्यास मदत होते. पत्रिकेत "गुरु" बलवान असलेल्या व्यक्तिंना पिवळ्या रंगाचे विशेष अप्रूप असते. पत्रिकेत गुरु निर्बली असल्यास पिवळा रंग वापरावा. नात्यात स्थिरता आणायची असल्यास पिवळ्या रंगाचा वापर व्हावा.
चौथा रंग आहे - हिरवा (Green ) - हिरवा रंग आहे वसुंधरेचा,नव्या पालवीचा. गुढीपाडव्याच्या दिवशी निसर्गाकडे एक नजर पहाल तर लक्षात येईल की वसुंधरा हिरव्या शालूने नटली आहे. सोनेरी झेंडूची फुले त्या शालूची शोभा वाढवीत आहेत. हिरवा रंग आहे नव्या उमेदीचा आणि म्हणूनच आधीच्या इस्पितळात हिरव्या रंगाचे पडदे वापरण्याची पद्धत होती. आजारपणाने खचलेल्या व्यक्तिला ह्या रंगामुळे नवी उभारी मिळावी हा उद्देश. हिरवा रंग ज्यांना आवडतो त्यांची तर्कबुद्धी (Common Sense ) छान असते. बोलघेवडे असतात. हजरजबाबी असतात. नव्या उमीदीने,उत्साहाने प्रत्येक गोष्ट सुरु करतात. ह्यांना निरनिराळ्या प्रांतातील पदार्थ चाखून बघायची आवड असते. ज्यांच्या पत्रिकेत "बुध" बलवान असतो त्यांना हिरव्या रंगाचे आकर्षण असते. ज्यांना स्वतःची तर्कबुद्धी तेज करायची असेल त्यांनी हिरव्या रंगाचा वापर अंमलात आणावा. आजारी व्यक्तिच्या आसपास हिरव्या रंगाचा वापर केल्यास फायदा होतो. बाहेरच्या देशात झालेल्या एका संशोधनात हे सिद्ध झाले आहे की दृष्टी अधू किंवा चष्मा असलेल्या व्यक्तिंनी सतत हिरवळीकडे पहात राहिल्यास दृष्टीत सुधारणा होते.
पाचवा रंग आहे - निळा (Blue ) - निळा रंग आहे शांततेचा. गडद निळ्या रंगाचे टी -शर्ट घालून माझ्याकडे येणाऱ्या व्यक्तिच्या कुंडलीत हमखास "शनि" बलवान आढळतो. अशा व्यक्तिंना धर्म-जप -मंदिर ह्याचे वावडे असते. त्यांना आयुष्यातील प्रत्येक गोष्टीकडे व्यवहारिक दृष्टीने पहायची सवय असते. प्रत्येक गोष्टीचे त्यांना विश्लेषण (analysis ) हवे असते. वरवर पहाता ह्यांचा स्वभाव शांत वाटतो कारण ह्यांना उगीचच बडबड करण्याची सवय नसते. ते एकच वाक्य बोलतील आणि ते समोरच्या व्यक्तीला बरोबर समजेल. शोले फिल्ममधील अमिताभ आठवतोय ? फार न बोलता एकाच वाक्यात मतितार्थ सांगण्याची खुबी ह्यांच्याकडे असते. ह्या व्यक्तिंना सामाजिक समारंभात अजिबात स्वारस्य नसते. एकांतप्रिय व्यक्ति असतात. आळस असतोच. अशा व्यक्तिंनी Social होण्यासाठी आणि आळस घालवण्यासाठी नारिंगी रंगाचा वापर करणे उचित ठरेल.
सहावा रंग आहे गुलाबी - (Pink ) - गुलाबी रंग आहे प्रेमाचा. गुलाबी रंग हा स्त्रीतत्वाशी जोडला जातो. ज्यांना गुलाबी रंग आवडतो त्यांच्या पत्रिकेत "शुक्र" बलवान आढळून आलेला आहे. अशा व्यक्तिंना नटण्या -मुरडण्याची आवड जात्यातच असते. कल्पनाविलास असतो. ह्यांना थंड आणि गोड पदार्थ जास्त आवडतात. आयुष्याबद्दल नाहक आणि वेगळ्या कल्पना असतात. बुद्धी अजिबात स्थिर नसते. ह्यांचे "Imagination" चांगले असते. आपले सर्व नट,शिल्पकार, चित्रकार, इंटेरिअर डिझायनर,फॅशन डिझायनर,ब्युटी पार्लर इ. शुक्राच्या अंमलाखाली येतात. जन्मतः कलाकार व्यक्ती म्हणजे शुक्र. ज्यांचा व्यवसाय इंटेरिअर, फॅशन, फोटोग्राफीशी, ब्युटीपार्लर असा आहे त्यांनी गुलाबी रंगाचा वापर करावा. शुक्रप्रधान व्यक्ति गोष्टींचे प्रेझेन्टेशन फार छान पद्धतीने करू शकतात. व्यावसायिक व्यक्तिंनी प्रेसेंटेशनच्या वेळेस शुक्र प्रधान व्यक्तिंना ह्या कामासाठी अँपॉईंट करावे. नक्कीच फायद्याचे ठरेल.
सातवा रंग आहे पांढरा - (White) - पांढऱ्या रंगात सर्व रंग सामावलेले असतात. पांढरा रंग हा उच्च कोटीचा मानला गेला आहे. पवित्र मानला आहे. म्हणूनच आपल्या धार्मिक गोष्टींमध्ये पांढऱ्या रंगाला महत्त्व आहे. सरस्वतीदेवीचा रंग आहे पांढरा. उच्चकोटीची विद्वता हवी असेल तर अशा लोकांनी पांढऱ्या रंगाचा वापर करावा. पांढरा रंगसुद्धा शांततेचे प्रतिक आहे. पांढरा रंग शरणागतीचा आहे. शरणागती विद्वतेपुढे. फुकाचा अहंकार मागे टाकून आपल्यातल्या तेजाकडे (देवत्वाकडे ) जाऊ पाहणाऱ्यांनी जरूर ह्या रंगाचा वापर करावा. ज्यांचे मन अशांत आहे त्यांनीही ह्या रंगाचं वापर करावा.
वर जी मी फुलांची गोष्ट सांगितली होती ती इथे तंतोतंत पटते. पांढऱ्या सर्व फुलांना रंग नसला तरी उच्च प्रकारचा सुवास आहे. इंद्रधनुष्याकडून इतर फुलांवर विविध रंगाची उधळण होत असतांना ही फुले मात्र आपल्याच तेजात रममाण होती. अशा लोकांचा स्वभाव हीच त्यांची ओळख असते. शांतपणा हा ह्यांचा गुणधर्म.
तर असे हे रंग. रंगाच्या सततच्या वापराने आपण जरूर आपल्या स्वभावात फरक घडवून आणू शकता. अर्थात त्यासाठी कुंडलीतले कुठले ग्रह निर्बली आणि बलवान आहेत ते जाणकार ज्योतिषांकडून जाणून घ्या. रंगाचा वापर म्हणजे नुसतेच त्या रंगाचे कपडे असे नसून, तुम्ही त्या अमुक रंगाचे पेन जवळ बाळगू शकता. त्या रंगाची पाण्याची बाटली जवळ ठेवू शकता. बघा प्रयोग करून.
प्रतिक्रिया नक्की कळवा. - anupriyadesai@gmail.com