वास्तूशास्त्राप्रमाणे अशी असावी तुमची बेडरूम
संपूर्ण दिवस कामात व्यस्त असलेल्या व्यक्तीला गरज असते ते शांत झोपेची. मनुष्य एक वेळ उपवाशी राहू शकेल परंतु झोप ही प्रत्येक व्यक्तीला हवीच. शरीर आणि मन ह्या दोघांनाही शांत झोपेची गरज असते. झोप जर पूर्ण झाली तर संपूर्ण दिवस उत्साहाने काम करता येते आणि त्याच बरोबर शरीर आणि मनाचे स्वास्थ्यही सुदृढ रहाते. आजकाल बऱ्याच लोकांना जे काही आजार होत आहेत त्यात ४०% व्यक्तींना पुरेसा आहार आणि झोप मिळाली नसते.
झोप व्यवस्थित मिळावी ह्यासाठी तुम्ही तुमच्या आहाराकडे आणि व्यायाम करण्याकडे लक्ष दिलेच पाहिजे परंतु त्याच बरोबरीने तुम्ही ज्या बेडरूममध्ये आराम करणार आहात त्या रूममधील रचना,बेड ठेवण्याची जागा, रंग, भिंतीवरील चित्रे, तिथे ठेवलेल्या वस्तू इथेही लक्ष दिले पाहिजे. कारण त्यामुळेच आज आपण त्याबद्दल माहिती घेणार आहोत.
बेडरूमची दिशा -: संपूर्ण वास्तूत जी खोली नेऋत्य (South - West) दिशेत असते ती खोली घरातल्या कर्त्या पुरुषाची असावी. कर्त्या ह्याचा अर्थ नुसतीच वयाने मोठी व्यक्ती नसून "कमावती मोठी व्यक्ती" असा अभिप्रेत आहे. जर दक्षिण -पश्चिमेत बेडरूम नसेल तर किमान पश्चिम किंवा दक्षिणेच्या दिशेत बेडरूम असावी. शक्यतो उत्तर दिशेत कमावत्या व्यक्तीची बेडरूम असू नये. दक्षिण ही दिशा स्थिरतेची आहे. बुद्धी स्थिर होणे, मन शांत होणे ह्यासाठी नेऋत्य ही दिशा महत्त्वाची ठरते. नेऋत्य हा शब्द निवृत्ती ह्या शब्दातून आलेला आहे. निवृत्त म्हणजेच Relax. धकाधकीच्या दिवसानंतर Relax होणायची दिशा म्हणजे नेऋत्य दिशा.
बेडची दिशा आणि आकार -: बेडचा आकार हा शक्यतो चौरस असावा. काही वास्तूंमध्ये बेड हा गोल किंवा षट्कोनी आकारात पाहिला गेला आहे. आपल्या शास्त्रात चौरस,चौकट ह्याला महत्त्व आहे. चार दिशा असाव्यात त्यामुळे बेड हा चौरस किंवा आयताकृती आकारात असावा. बेडची चादर शक्यतो भडक लाल आणि काळी असू नये.
वि. टी. - बेड अगदी दारासमोर असू नये. बेडरूमच्या दारातून बेड दिसू नये अशी रचना असावी. झोपतांना डोके दक्षिण दिशेकडे आणि पाय उत्तर दिशेकडे येतील अशी बेडची दिशा असावी.
बेडरूमचा रंग -: बेडरूममध्ये रंगसंगती शकतो फार भडक असू नये. लाल,काळा,गडद जांभळा हे रंग असू नयेत. बेडरूममध्ये तुम्हांला आवड असलेल्या रंगाची फिक्कट छटा चालू शकेल. फिक्कट छटेत निळा, गुलाबी, पिवळा ह्या आणि इतर रंगात किंवा रंगसंगतीत तुम्ही बेडरूम सजवू शकता.
वस्तू -: बेडरूम मध्ये सजावटीसाठी वस्तू ठेवल्या जातात. काहीवेळा त्या शोभेच्या वस्तूंमध्ये विचित्र वस्तू ठेवल्या जातात. जसे विचित्र चेहरा किंवा आकार असलेले शिल्प,सुकलेल्या फुलांची फुलदाणी, जुनी कागदपत्रे, वापरात नसलेल्या फाईल्स,बंद घड्याळ,तलवार,सुरींची रचना करून असूच नये. बेडरूममध्ये शक्यतो वस्तू कमीत कमी असाव्यात. एक बेड,एक कपाट,ए.सी. एवढेच असावे. आणि फारफार तर टेबल आणि खुर्ची ह्या व्यतिरिक्त इतर वस्तूंची गर्दी असू नये.
फर्निचर -: बेडरूममध्ये कमीतकमी फर्निचर असणे चांगले. शक्यतो बेडच्यावरती कुठलेही फर्निचर असू नये. फर्निचरचे कोपरे गोल असावेत.
चित्रे -: बेडरूममध्ये चित्रे ही शांतता प्रदान करणारी हवीत. राधा -कृष्णाचा फोटो हे प्रेमाचे प्रतीक आहे. लढाईच्या प्रसंगाची चित्रे, तलवार -ढाल ह्यांची चित्रे असू नयेत. तो फोटो बेडरूममध्ये लावल्यास तशीच "Energy" येते.
आरसा -: बेडरूममध्ये आरसा असतोच. म्हणजे तो कपटाचा आरसा किंवा ड्रेसिंग टेबलचा आरसा. हा आरसा झाकलेला तरी असावा किंवा आरश्याची रचना अशी असावी की बेडची प्रतिबिंब त्यात पडू नये. आपण झोपल्यानंतर आपली प्रतिमा आरशात दिसू नये. हल्ली आरशाची रचना अशी असते की कपाटाच्या आत आरसा असतो आणि वरून कपाटाचे दार असते म्हणजे आपसूकच आरसा झाकला जातो.
कपाट/तिजोरी -: कपाट किंवा तिजोरीची जागा ही दक्षिण दिशेत असावी. तिजोरीत एखादा छोटासा आरसा ठेवावा.
टी. व्ही. -: हल्ली बेडरूममध्ये टी. व्ही. असतोच. हा टी. व्ही. कुठे असावा ह्यासाठी दिशा निश्चित करणे म्हणजे त्या घराचा नकाशा आणि दिशा पाहूनच ठरवावे लागते.
बेडरूम ही आरामाची खोली असल्याने शक्यतो फार भडक वस्तू,रंग ह्याचा वापर न होता शांत रंग, चित्रे,वस्तू ठेवावीत. रूम फ्रेशनरपेक्षा बेडरूममध्ये धूप करावा. खडे मीठ एका चिनी मातीच्या वाडग्यात घेऊन कुठल्याही एका कोपऱ्यात ते ठेवावे. त्याने नकारत्मक ऊर्जा निघून जाण्यास मदत होईल.
ह्या टिप्सचा वाचकांना उपयोग होईल अशी आशा करते. आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा - anupriyadesai@gmail.com
अनुप्रिया देसाई
ज्योतिष आणि वास्तू विशारद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा