कुंडलीतील मंगळाचा वचक
मंगळाला मंगळाचीच मुलगी असावी म्हणजे बरे असते. नाहीतर मृत्यू एकाचा मृत्यु होतो. ही वाक्य तुम्ही ऐकलेली असतीलच. परंतु असे का ? ह्याचे कारण कधी शोधण्याचा प्रयत्न केला आहे का ? मुलीच्या,मुलाच्या लग्नापर्यंत कुंडलीवर विश्वास नसणारे पालक,कुंडलीचा चक्क अभ्यास करू लागतात. मग मुलांचे नक्षत्र, राशी, नाडी,गण तोंडपाठ होतात. अमुक अमुक राशीची मुलगी चालेल किंवा नाही ह्याची सुद्धा इत्यंभूत माहिती पालकांना असते. त्यांना आपल्या कामापुरते ज्योतिष माहिती होते. चांगली गोष्ट आहे, परंतु अर्धवट ज्ञानाने नेहेमीच नुकसान होते हे लक्षात असु दे.
तर आजचा आपला विषय आहे - मंगळ दोष म्हणजे काय ?
मुळात कुंडलीत मंगळ असणे हा दोष का मानला जातो ? हा गैरसमज कोणी (जाणून-बुजून)पसरवला ? मला कल्पना नाही. मग त्यानंतर कुंडलीतल्या त्या मंगळाला जाती आल्या. सौम्य मंगळ,उग्र मंगळ वगैरे. मग ह्याचा परिहार म्हणून त्याची शांती किंवा मंगळीक व्यक्तीचा अमुक अमुक गोष्टींबरोबर विवाह लावणे इ. त्याने मंगळ शांत होतो म्हणे. किंवा मग वयाच्या २७ व्या वर्षी विवाह केल्यास मंगळाचा दोष नाही. असं खरंच असतं का ?
आमच्या मुलीच्या पत्रिकेत मंगळ आहे का ? असे विचारणाऱ्या पालकांना सांगावेसे वाटते,"अहो मंगळच काय तुमच्या मुलीच्या कुंडलीत सर्वच ग्रह आहेत." मंगळाचा एवढा वचक का बरं ? त्यासाठी मंगळाला आधी समजून घेऊ. मंगळ म्हणजे धडाडी. मंगळ म्हणजे सळसळतेपणा. शांत बसणे हे त्यांना माहीतच नसतं. बोलण्यांत स्पष्टपणा आणि चालण्यांत वेग हीच मंगळाची ओळख. बोलणे टोमणेवजाच असते. गुळमुळीत बोलणे त्यांना जमतच नाही. शरीर काटक आणि बळकट असते. आळसांत सुट्टीचा दिवस कसा व्यतीत करतात हे त्यांना माहित नसते. सुट्टीच्या दिवशी कोणती कामे आटोपून घ्यायची हे त्यांचे आधीच ठरलेले असते. स्वतःही कामे करतील आणि दुसऱ्यांनाही शांत बसू देणार नाहीत. ज्योतिष -शास्त्रात मंगळाला सेनापतीची उपमा दिली आहे. राजाने आदेश द्यावा आणि सेनापतीने युद्धभूमीवर सैनिकांकडून लढाई करवून शत्रूवर चढाई करावी म्हणजेच मंगळ. मंगळीक व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे येते. त्यांच्या ह्या कर्तुत्वाला जोडीदाराच्या सहकार्याची गरज भासते.
अधीरता,अतिघाई, वर्चस्व गाजवणे हा झाला मंगळाचा स्वभाव. वय जसं जसं वाढत जातं तसं तसा मंगळाची अधीरता कमी होते,राग कमी होतो. त्यामुळे मंगळ असलेल्या व्यक्तीचे लग्न वयाच्या २७व्या वर्षी किंवा नंतर झाले म्हणजे कुंडलीतला मंगळ दोष गेला किंवा राग कमी झाला असे गृहीत धरतात. पण ते तितकेसे खरे नाही असे मला वाटते. कारण मंगळाचा स्वाभाविक गुणधर्म हा कायमच रहातो. २७व्या वर्षांनंतर फरक एवढांच होतो की राग कधी व्यक्त करावा आणि कधी करू नये ह्याची समज मंगळीक व्यक्तीला आलेली असते. मंगळीक व्यक्ती "प्रॅक्टिकल" असते. चटकन होणारी कार्य त्यांना आवडतात. फार रेंगाळणारी कामे मंगळीक व्यक्ती सोडून देतात.
मंगळाची दुसरी बाजू म्हणजे, मंगळाचा संबंध मानवाच्या लैंगिक गरजांशी आहे. मंगळ असलेल्या व्यक्तींची लैंगिक इच्छा प्रबळ असतात. मंगळ असलेल्या व्यक्तींची ह्या विषयांत असलेली अधीरता आणि ह्या विषयांतील कल्पना ह्या सामान्य व्यक्तींपेक्षा वेगळ्या असतांत. आणि त्यांच्या ह्या गरजा मंगळ असलेलेही त्यांची पत्नीच समजून घेऊ शकते. मंगळ व्यक्तींमध्ये शारीरिक क्षमता जास्त असते. मंगळाला हळुवारपणा,रोमांस हे प्रकार जमत नाहीत.
जर मंगळ असलेल्या व्यक्तीचा विवाह सामान्य व्यक्तीबरोबर म्हणजेच मंगळ नसलेल्या व्यक्तीबरोबर झाला तर काय होईल ? मंगळ हा मुळातच धडाडीचा ग्रह. हळुवारपणा,गुळमुळीत बोलणे,नाजूकपणा हे मंगळाचे गुणधर्म नाहीत. आणि असे गुणधर्म असलेल्या व्यक्तींबरोबर त्यांचे फारकाळ जमतही नाही. त्यांचा मित्र परिवारही त्यांच्या सारखाच असतो. स्वभावात असलेला रांगणेपणा, तडफदारपणा,आव्हानात्मक भूमिका घेणे,प्रत्येक गोष्ट तीव्रपणे व्यक्त करण्याची वृत्ती ह्यामुळे त्यांनी लग्न करतांना आपला साथीदारही साधारपणे ह्याच स्वभावाचा असावा हे पहावे. अन्यथा त्यांचा कोंडमारा होण्याची शक्यता असते. कोंडमारा म्हणजे कसा ? तर समजा मंगळीक व्यक्तीचा विवाह शनि प्रबळ असणाऱ्या व्यक्तीबरोबर झाला तर घटस्फोट निश्चित समजा. शनि म्हणजे मंगळाच्या विरुद्ध. शनि म्हणजे प्रत्येक गोष्ट हळुवारपणे करणे, संयम असणे, शांतपणे आपले काम करणे, फार आव्हानात्मक कामे न करता फार काळ चालणारी कामे करण्यात ह्यांना रस असतो. शनि प्रधान व्यक्ती "संशोधनात्मक" कार्यात यशस्वी होतात. शनिला फार फिरण्याची आवड नसते. मंगळाला ट्रेकिंग आणि ऍडव्हेंचर अशा मैदानी खेळांची आवड आणि शनिला बैठ्या खेळांची आवड. सुट्टीच्या दिवशी मंगळ छान ट्रेकिंगचे प्रोग्राम बनवेल तर शनि ते सर्व कॅन्सल करून घरी बसायला लावेल. मग अशा शनिप्रधान व्यक्तीबरोबर जर मंगळीक व्यक्तीचा विवाह झाला तर तो किती काळ टिकेल ?
मंगळाचे असे गुणधर्म वाचल्यावर तुमच्या मनात नक्कीच हा प्रश्न आला असेल की, मग दोघेही जेंव्हा मंगळीक असतील तेंव्हा त्या लग्नाची गोष्ट कशी असेल ? दोघांनाही जेंव्हा मंगळ असतो तेंव्हा स्वभावही सारखेच असणारा. त्यामुळे दोघांमध्ये आकर्षणही तेवढेच टिकते. भांडणही होतात. भांडणाची परिणीती मारामारीतही होते. मग राग शांत झाल्यावर पुन्हा दोघे एक होतात. तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी अवस्था असते. म्हणूनच मंगळाला मंगळाचीच मुलगी असावी असे ज्योतिष -शास्त्राचे मत आहे.
मंगळाचे गुणधर्म असलेल्या किंवा मंगळप्रधान व्यक्तीला समजून घेणे आणि त्याप्रमाणे त्याला जोडीदार शोधणे हे जबाबदारीचे काम आहे. आधीच्याकाळी व्यक्तीला मंगळ असणे म्हणजे काय हे सामान्य जनतेला सांगणे तेंव्हाच्या ज्योतिषांना प्रशस्थ वाटले नसावे. म्हणून त्यांनी जोडीदाराच्या मृत्यूचे कारण सांगून मंगळाला मंगळाचीच पत्रिका असावी ह्यांवर भर दिला. त्यामुळे खरे कारण समाजाला कधीच समजू शकले नाही आणि समाज कायम एका गैरसमाजामध्येच घाबरून राहिला. आणि ह्याचमुळे ज्योतिष -शास्त्राला दूषणे देणाऱ्यांचेही फावले. तेंव्हा मंडळी आपल्या मुलीला मंगळ असल्यास घाबरण्याची गरज नाही तर तिच्या स्वभावाला समजून घेण्याची गरज आहे. साथीदाराचा मृत्यू होतो हे गैरसमज मनातून काढून टाका. तिच्या स्वभावाला साजेसा,तिला समजून घेणारा जीवनसाथी तिच्यासाठी शोधा.
आज समाज जागृत होत आहे. ही नवी पिढी विचारांनी प्रगल्भ आहे. मुख्यतः मुलगा आणि मुलगी शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. गरज आहे ती एकमेकांना समजून घेण्याची. कारण त्यामुळेच समाज ही संकल्पना टिकवण्यास मदत होईल. ह्या लेखाच्या निमित्ताने आजच्या पिढीला सांगावेसे वाटते की ज्योतिष शास्त्र हा विषय अत्यंत गहन आहे. तुमच्या कुंडलीवरून तुमचा स्वभाव अचूक सांगता येतो. त्यामुळे लग्नाआधी तुमच्या ज्योतिषाकडून तुमच्या होणाऱ्या जीवनसाथीबद्दल आधी जाणून घेणे फायदेशीर ठरेल. गुण किती जुळतांत ह्यापेक्षा पत्रिका किती जुळते ह्यांवर भर दिला पाहिजे तर घटस्फोट टाळता येतील.
प्रतिक्रिया नक्की कळवा - anupriyadesai@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा