कुंडलीतील विवाह योग
एकदा मुलांना नोकरी लागली की पालक आणि मुले विवाहमंडळांच्या वेबसाईटवर जास्त रमतांना दिसून येतात. पालकांना मुलांनी लवकरात लवकर लग्न करून "Settle" व्हावे असे वाटत असते. आणि आपल्या भारतीय परंपरेनुसार प्रत्येक व्यक्तीला लग्न ह्या संस्कारातून जावेच लागते. भारताबाहेरील प्रगत देशातील व्यक्ती लग्नाशिवाय settle होते परंतु भारतीय व्यक्ती लग्न झाले म्हणजे settle झालो असे मानतात. तरी सध्या ह्या विचारांत फरक पडत आहे. बऱ्याच व्यक्ती लग्न न करण्याचा निर्णय घेत आहेत. काहींना स्वतःचं स्वतंत्र आयुष्य जगायचं आहे. कोणाचेही कुठलेही बंधन नको ही भावना सध्या तरुण पिढीत वाढत चालली आहे. काहींनी लग्न झालेल्या मित्रांच्या आयुष्यात आलेली वादळे जवळून पाहिलेली असतात. घटस्फोटापर्यंत गोष्टी जातांना पाहिल्या आहे. त्यामुळे स्वतः अविवाहित रहाण्याचा निर्णय घेतला जात आहे. कुंडलीत असे काही योग असतात का ज्यामुळे व्यक्ती विवाह करणार की अविवाहित रहाणार हे कळते ? हो नक्कीच. हे कळू शकते. विवाह होणार असेल तर तो प्रेम विवाह असेल का ? वैवाहिक सौख्य लाभेल ना ? की घटस्फोटाचे योग आहेत ? हे आणि असे असंख्य प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे आपली कुंडली देऊ शकते का ? आज हाच आपला विषय आहे - कुंडलीतील विवाह योग.
कुंडलीत विवाह स्थान कुठले ?
विवाह स्थान ओळखण्यासाठी आपल्याला आधी कुंडलीतील आपले स्थान कुठले हे लक्षात घेतले पाहिजे. कुंडली पाहिल्याबरोबर जे समोर दिसते ते पहिले स्थान म्हणजे तुम्ही. खालील चित्रात जिथे १ हा आकडा आहे त्याला "तनु स्थान" किंवा "लग्न स्थान म्हणतात. लग्न स्थान ह्याचा तुमच्या लग्नाशी काहीही संबंध नाही. त्याला "लग्न स्थान" हे एक नाव आहे. तनुस्थान किंवा लग्न स्थान म्हणजे तुमच्याबद्दलची सर्व माहिती. तुमचा स्वभाव, तुमची शारीरिक यष्टी वगैरे. तुमच्या कुंडलीत ह्या स्थानी १ हा आकडाच असेल हे जरुरी नाही. तिथे २,३,४,५... १२ पर्यंतचा कुठलाही आकडा असू शकतो. हे आकडे म्हणजे राशी होय. तुमच्या कुंडलीत २ हा आकडा ह्या स्थानी असेल तर तुमची लग्न राशी वृषभ आहे. जर तिथे ५ हा आकडा असेल तर तुमची लग्न राशी सिंह आहे. आपल्या समोर नेहेमीच आपला जोडीदार असणार त्यामुळे १ आकडा लिहिला आहे त्याच्या १८० अंशावर ७ हा आकडा आहे. हेच तुमच्या जोडीदाराचे स्थान.
ह्या स्थानावरून तुमचा विवाह होणार की नाही ? कधी होणार ? जोडीदार कसा असेल ? जोडीदाराच्या स्वभावाची कल्पना ह्या गोष्टींचा आढावा घेता येतो. ह्या स्थानाला "सप्तम स्थान" असे संबोधले जाते. ह्या स्थानात जी राशी असते ,जे ग्रह असतात त्याप्रमाणे तुमचा जोडीदार असतो. जोडीदाराला ओळखण्याची खूण म्हणजे त्या स्थानाशी निगडीत असलेले ग्रह तुमच्या जोडीदाराबद्दल माहिती देतात.
- सप्तम स्थान रविशी निगडीत - जोडीदार अतिशय महत्त्वाकांशी आणि अभिमानी. मोडेन पण वाकणार नाही अशी वृत्ती असते.
- सप्तम स्थान चंद्राशी निगडीत - जोडीदार सतत दुइतरांबद्दल काळजी करणारा असतो. अतिशय मायाळू आणि कनवाळू. स्वतः उपवाशी राहून इतरांना अन्न देण्यात ह्यांना आनंद मिळतो.
- सप्तम स्थान मंगळाशी निगडीत - जोडीदार अत्यंत तापट आणि हट्टी. ह्यांच्या प्रत्येक गोष्टीत स्पर्धा असते. शांत बसणे ही वृत्ती अजिबात नसते.
- सप्तम स्थान बुधाशी निगडीत - अशी व्यक्ती म्हणजे खुशाल चेंडू. फिरण्याची अत्यंत आवड. घरात ह्यांचा पाय टिकूच शकत नाही.
- सप्तम स्थान गुरूशी निगडीत - अशा व्यक्ती इतरांना लेक्चर देण्यात समाधान मानतात. धार्मिक स्थळांना भेटी देणे ह्यांना खूप आवडते.
- सप्तम स्थान शुक्राशी निगडीत - जोडीदार स्वतःच्याच प्रेमात असतो. जिथे आरसा दिसला तिथे आपला चेहरा न्याहाळणे आणि सतत केस विंचरणे म्हणजे समजून जा तुमच्या कुंडलीत सप्तम स्थान शुक्राशी निगडीत आहे.
- सप्तम स्थान शनिशी निगडीत - सगळ्या गोष्टींचा आळस असतो अशा व्यक्तींना. फिरायला जाणे म्हणजे ह्यांच्यासाठी कटकट असते. त्यापेक्षा घरी सोफ्यावर लोळत टी. व्ही. बघत बसणे त्यांना जास्त रुचते.
मंडळी तुम्ही तुमच्या कुंडलीत सप्तम स्थान कुठल्या ग्रहाशी निगडीत आहे ते तपासून पहा बरं !!! (अर्थात ह्यासाठी कुंडलीतील इतरही गोष्टींचा विचार व्हावा. )
विवाह होईल का ?
विवाह होण्यासाठी सप्तमस्थानचा संबंध हा द्वितीय (द्वितीय स्थान म्हणजे कुटुंब स्थान.)लग्नानंतर तुमच्या कुटुंबात एका व्यक्तीची वाढ होते म्हणून द्वितीय आणि सप्तमाचा संबंध असावा. द्वितीय स्थानाबरोबरच लाभ आणि पंचम स्थानांचाही विचार व्हावा. जर सप्तमाचा संबंध द्वितीय,लाभ आणि पंचम स्थानाबरोबर असेल तर विवाह होण्याचे योग आहेत.
परंतू जर सप्तम स्थानाचा संबंध लग्न स्थान,षष्ठ,व्यय आणि दशम स्थानाशी आल्यास व्यक्ती अविवाहित राहू शकते. परंत ह्यासाठी संपूर्ण कुंडलीचा अभ्यास व्हावा. आपल्या अविवाहित साधू संतांच्या कुंडलीत असे योग दिसून येतात.
विवाह कधी ?
पालकांची इच्छा असते की आपल्या मुलांचा विवाह योग्य वयात व्हावा. परंतु जर तुमच्या मुलाच्या कुंडलीत सप्तम स्थानावर शनिची दृष्टी किंवा शनि जर सप्तम स्थानाशी निगडीत असेल तर विवाह वयाच्या २९-३० व्या वर्षी होतो. इतरही काही योग असे असतात ज्यामुळे उशीरा विवाह संभवतो.
प्रेम विवाह होईल का ?
नवीन पिढीतल्या बहुतांश मुलांचा आणि मुलींचा हा प्रश्न असतो की लव्ह मॅरेज होईल ना ? कारण अरेंज मॅरेजमध्ये खूप कटकटी असतात. एकमेकांना ओळखत नसतांना विवाह कसा करायचा ? एवढी रिस्क आम्ही नाही घेऊ शकत. प्रेम विवाहात एकमेकांना भेटतो,बोलतो, घरच्या इतर व्यक्तींबरोबर भेट होत असते. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाबद्दल माहिती असते. अगदीच नवखे वाटत नाही.परंतु कुंडलीत योग असतील तर प्रेम विवाह संभव आहे.
प्रेम विवाहासाठी सप्तम स्थान आणि पंचम स्थान ह्यांचा आणि त्या स्थानांच्या अधिपती ग्रहांचा योग व्हावा लागतो. तरच प्रेम विवाह होऊ शकतो.
आंतरजातीय विवाह योग आहे का ?
प्रेम विवाह होणार आहे हे जातकांना जेव्हा सांगितले जाते तेंव्हा त्यांचा पुढचा प्रश्न असतो प्रेम विवाह आमच्याच जातीत की आंतरजातीय होणार आहे ? ह्या प्रश्नासाठी मात्र ज्योतिषाचा खोलवर अभ्यास असावा लागतो. कारण हल्ली नुसतचं जातीबाहेर लग्न होत नसून इतर धर्मांमध्येही सर्रास विवाह होत आहेत. तेंव्हा ह्याबाबत काळिजीपूर्वक भविष्य वर्तवणे योग्य ठरते.
घटस्फोट किंवा द्विभार्या योग आहे का ?
समाजात जस जशी शैक्षणिक प्रगती होत आहे तस तशी काडीमोड (घटस्फोट )ह्या प्रकारातही वाढ होत आहे. हल्ली मुलगा असो वा मुलगी उच्च विद्याविभूषित असल्याने स्वावलंबी असतात. स्वावलंबी असणे आणि अहंकारी असणे ह्यात फार फरक राहत नाही. मग अगदी छोट्या वाद-विवादातही कोणी माघार घेत नाही आणि फुकाच्या अहंकारात घटस्फोट होतो. त्यामुळे लग्न जमवितांना व्यवस्थित मॅच मेकिंग करणे जरुरी आहे. सप्तम स्थानाच्या अधिपतीचा संबंध षष्ठ स्थान,व्यय स्थान,अष्टम स्थान किंवा दशम स्थान यांच्याशी असेल तर घटस्फोट होण्याचे योग असतात. परंतु ह्यासाठी कुंडलीचा व्यवस्थित अभ्यास होणे जरुरी ठरते.
घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलेली जोडपी जेंव्हा ज्योतिषाकडे येतात तेंव्हा त्यांना, त्यांच्या पुढील आयुष्याबद्दल स्पष्टपणे सांगणे जरुरी आहे. कारण बाकीचे निर्णय घेण्यासाठी हे महत्त्वाचे ठरते. आणि घटस्फोट होणारच नसेल तर तसे त्यांना सांगून काय काळजी घेतली म्हणजे वाद विवाद फार विकोपाला जाणार नाहीत ह्याबद्दल समजावले पाहिजे असे माझे मत आहे.
वैवाहिक आयुष्य कसे असेल ?
सप्तम स्थानाचा अधिपती जर लाभ, तृतीय,पंचम,नवम ह्या स्थानाशी निगडीत असेल तर वैवाहिक आयुष्य समाधान कारक राहील. सप्तम स्थानावर शुभ ग्रहांची दृष्टी आणि योग्य अशा महादशा वैवाहिक सौख्य अबाधित ठेवण्यास मदत करतात. सप्तम स्थानांवर निगेटिव्ह ग्रहांची दृष्टी किंवा सप्तम स्थानाशी निगडीत निगेटिव्ह ग्रहांची युती वैवाहिक जीवनात वितुष्ट आणण्यात कारणीभूत ठरते. अर्थात दशेचाही विचार व्हावा.
तुमच्या कुंडलीतल्या ग्रहांबद्दल आणि वैवाहिक योगांबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जोडीदाराचे वर्णन थोडक्यात दिलेले आहे. विवाहाबद्दलचे भविष्य कथन करतांना कुंडलीचा सूक्ष्म अभ्यास करणे अभिप्रेत आहे. बरेच Permutation and Combination चा अभ्यास करून वैवाहिक जीवनाबद्दल भविष्य वर्तवता येते.
कसा वाटला हा लेख. प्रतिक्रिया जरूर कळवा- amipriyadesai@gmail.com
अनुप्रिया देसाई - ज्योतिष आणि वास्तू विशारद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा