गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१९

राजकारणातील यश आणि कुंडली

राजकारणात यश मिळेल का ? 

सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. माझ्याकडे येणाऱ्या जातकांपैकी बरेच जण मला राजकारणात यश आहे का ? मी राजकारणात जाऊ का ? माझे बरेचसे मित्र राजकारणात आहेत. मलाही जावेसे वाटतेय. मला निवडणुकीत तिकीट मिळेल का पासून ते मी निवडणूक जिंकेन का ? हे प्रश्न विचारले जात आहेत. काही जण ह्यात यशस्वी ठरतात तर काही जणांना हार मानावी लागते. मुळात कुंडलीत जर राजकारणात यश हा योग असेल तर तुम्हांला दिल्ली गाठायला वेळ लागणार नाही. काही वेळेस दिग्गज नेते निवडणुकीत हरतात तर राजकारणात नवखी असलेली व्यक्ति बाजी मारून जाते.
तुमच्या कुंडलीत जर राजकारणात यश मिळणारे योग असतील तर तुम्ही राजकारणात यश संपादन कराल. राजकारणात यशस्वी होण्यासाठी मुख्यत्वे रवि,शनि,मंगळ,राहू आणि बुध ह्या ग्रहांची साथ हवी. ह्या ग्रहांबरोबरच लग्न स्थान,दशम स्थान,षष्ठ स्थान,पराक्रम स्थान,अष्टम आणि लाभ स्थान ह्याची जोड असावी. स्थान आणि ग्रह ह्याच बरोबरीने सिंह,मेष,वृश्चिक राशी ह्यांचा प्रभाव मोठमोठ्या राजकारण्यांच्या कुंडलीतून दिसून येतो.

रवि - रवि म्हणजेच सूर्य. आपल्या ग्रहमालेतील महत्त्वाचा तारा म्हणजे सूर्य. सर्व ग्रह सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे सूर्य भोवती फिरतात ज्यामुळे ग्रहमाला स्वतःचे कार्य कुशलतेने करू शकते. थोडक्यात हा सूर्य "Leadership" चे कार्य करीत आहे. रवि म्हणजे नेतृत्व. नेता हा पक्षाचे नेतृत्व करीत असतो. हे नेतृत्व करणे तेवढे सोपे नाही. सर्वांचे ऐकून,सर्वांना सांभाळून घेऊन, सर्वांकडून कार्य करवून घेणे,महत्त्वाचे निर्णय घेणे,दूरदृष्टी ठेवणे आणि पक्ष चालवणे हे येड्यागबाळ्याचे काम नाही. नेतृत्व गुण नसतील तर असे कित्येक राजकारणी आले आणि तसेच गेले. सर्वांना धरून ठेवण्याचे कसब हे हवेच. हे फक्त रविच करू शकतो. तुमच्या कुंडलीत रविचे स्थान,राशी बलवत्तर असावे. हाच रवी जेंव्हा राजकारण्यांच्या कुंडलीत तपासला तेंव्हा तो कधी लग्नात (तनु स्थानात ),दशमेश किंवा दशमवर दृष्टी असणारा,कधी स्वतः लाभ स्थानात किंवा लाभावर दृष्टी असणारा आढळला. आज मी विविध पक्षातील माननीय राजकारण्यांच्या कुंडलीतून हे मुद्दे तुमच्या समोर मांडणार आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे,शरद पवारजी,पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी आणि अरविंद केजरीवाल ह्यांच्या कुंडल्या मी इथे नमूद करीत आहे.
माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या कुंडलीत रविची पंचम स्थानातून लाभ स्थानावर दृष्टी आहे. Leadership Qualities निश्चितच आहेत. रवि हा शनिच्या मकर राशीत आहे. दीर्घकाळ चालणारा पक्ष. शरद पवारांच्या कुंडलीत रवि दशमेश असून लग्न स्थानात मंगळाच्या वृश्चिक राशीत आहे. नरेंद्र मोदींच्या कुंडलीत रवि दशमेश असून लाभ स्थानात आहे तर सोनियांच्या कुंडलीत रवि मंगळाच्या वृश्चिक राशीत असून त्याची लाभ स्थानावर दृष्टी आहे. अरविंद केजरीवालांच्या कुंडलीत रवि स्वतःच्याच सिंह राशीत असून त्याची दशमावर दृष्टी आहे.

शनि - रवि खालोखाल दुसरा बलवान ग्रह असावा शनि. शनि म्हणजे सातत्य. शनि म्हणजे चिकाटी. शनि हा कष्टाळु आहे. दीर्घकाळ चालत आलेल्या गोष्टींचे प्रतिनिधित्त्व शनि करतो. पक्ष स्थापन करणे सोपे आहे तो पक्ष दीर्घकाळ राजकारणात टिकवून ठेवणं सोपे नाही. असा शनि तुमच्या कुंडलीत असेल तर सातत्याने एक पक्ष चालवणे, चिकाटीने-नेटाने एखादे कार्य करणे सोपे होते. तुमच्यातच जर धरसोड वृत्ती असेल तर तुमच्या कार्यकर्त्यांच्या मनातही संभ्रम निर्माण होईल. त्यामुळे शनि बलवान हवाच.
बाळासाहेबांच्या कुंडलीत शनि पराक्रम स्थानात असून दशमेश बुधावर शनिची दृष्टी आहे. नरेंद्र मोदींच्या कुंडलीत शनि दशमात आहे. शरद पवारांच्या कुंडलीत षष्ठातल्या शनिची लग्नेश मंगळावर दृष्टी आहे. सोनिया गांधींच्या कुंडलीत शनि लग्न स्थानातच तर केजरीवालांच्या कुंडलीत शनि षष्ठ स्थानावर दृष्टी आहे.

मंगळ - मंगळ म्हणजे Strength. मंगळ म्हणजे तडफदारपणा. लाजणे,भिडस्तपणा,लाडिकवाळ बोलणे हे मंगळाला आवडत नाही. मंगळाचे बोलणे म्हणजे एक घाव दोन तुकडे. मंगळ म्हणजे निडरपणा. तुम्ही चुकीचे वागलात हे तुम्हांला फक्त मंगळ व्यक्तिच सांगू शकते. त्यावेळी तुमचा हुद्दा -वय ह्या सर्वांचा मंगळप्रधान व्यक्ति विचार करीत नाहीत. पक्षाचा नेताही असाच असावा. निडर. पक्षाच्या नेत्यांना धमकीवजा बरेच फोन/संदेश येत असतात. ही धमकी कधी विरोधी पक्षाकडून असू शकते किंवा अंडरवर्ल्डकडून. परंतू आपले कार्य आपण निडरपणे करत राहणार तो म्हणजे मंगळ. अशा मंगळाची साथ कुंडलीला जरूर हवी.
बाळासाहेब ठाकरेंच्या कुंडलीत मंगळ मेषेचा (स्वराशीचा) आणि तो ही अष्टमात. अष्टमातून लाभ आणि पराक्रम स्थानावर दृष्टी. कुंडलीत मंगळाची अशी स्थिती नसती तर ते नवलच होते. मंगळ जेंव्हा अष्टमात असतो किंवा त्याची दृष्टी अष्टमावर तेंव्हा ती व्यक्ति निडर असतेच परंतु risk घेण्यासही मागेपुढे पाहत नाही. बाळासाहेब अत्यंत निडर असे व्यक्तिमत्त्व. आपल्या भाषणात मोठंमोठ्या नेत्यांबद्दल बोलतांना ते कधीही कचरले नाहीत. किंबहुना बाकी नेत्यांवर बाळासाहेबांचे दडपण असायचे. बाळासाहेबांचा दराराच तसा होता. बाळासाहेबांचा शब्द म्हणजे शब्द असायचा. पंतप्रधान मोदींच्या कुंडलीत हा मंगळ वुश्चिकेचा  (स्वराशीचा) चंद्राबरोबर असून लग्न स्थानात आहे. मंगळाची दृष्टी सप्तमावर आणि अष्टमावर आहेच. त्यांचा दराराही आहेच. पवारांच्या कुंडलीत मंगळ लग्नेश असून व्ययात आहे. व्ययातून षष्ठ स्थानावर,चंद्र,गुरु आणि शनिवर दृष्टी. षष्ठ स्थान हे सातत्याने कार्य करण्याचे स्थान. त्यांची कार्यपद्धती सर्वांना ज्ञात आहेच. सोनियाजींच्या कुंडलीत मंगळ हा षष्ठ स्थानात धनु राशीचा आहे. षष्ठ स्थान स्थानातून व्ययात असलेल्या चंद्रावर आणि लग्नातील शनिवर दृष्टी. राजीव गांधींच्या मृत्यूनंतर राजकारणात प्रवेश केला. त्या राजकारणात चुकीचं वागल्या की बरोबर हा ज्योतिषशास्त्राचा मुद्दा आता नाही. विदेशात आपले स्थान निर्माण करणे सोपे नव्हते. हिंदी भाषेचा गंध नव्हता. हिंदी भाषा चिकाटीने शिकून घेतली. पेहरावात बदल केला. त्यांचाही दरारा पक्षात आहेच. केजरीवालांच्या कुंडलीत कर्केचा मंगळ पराक्रम स्थानात आहे. मंगळाची दृष्टी दशम स्थानावर आहेच. दशम स्थान हे राजकारण्यांसाठी महत्त्वाचे. पक्षाचे नेतृत्व जरी करीत असले तरी त्यांचा दरारा आहे असं म्हणता येणार नाही.

राहू - जनसामान्यांसाठी राहू म्हणजे वाईट फळे देणारा. खरंतर तसं नाही. राजकारणी व्यक्ति,फिल्म -सीरिअल इंडस्ट्रीतील व्यक्ति इ. व्यक्तिंच्या कुंडलीत राहू सुस्थित असल्यास प्रगती लवकर होते. राहू म्हणजे प्रभाव. आपल्या बोलण्याने लोकांवर प्रभाव टाकणे हे काम राहूचे. ज्यांच्या कुंडलीत राहू बलवान अशा व्यक्तिंचा जनसागरावर लगेचच प्रभाव पडतो. त्यांचे Followers सुद्धा जास्त असतात.
बाळासाहेब ठाकरेंच्या कुंडलीत दशमात मिथुन राशीचा. दशम स्थान हे राजकारणी व्यक्तिंसाठी महत्त्वाचे आहेच परंतु इथे मिथुन राशीतील राहू आहे. मिथुन राशी ही बोलण्याशी संलग्न आहे. मिश्कीलपणे बोलणे,हजरजबाबी असणे हे मिथुनेचे गुण. हिंदुहृदयसम्राट असलेले बाळासाहेबांना संपूर्ण महाराष्ट्रने भरभरून प्रेम दिलं. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी होणारी गर्दी,दसरा मेळावा म्हणजे राहूच्या प्रभावाची उत्तम उदाहरणे. मोदींच्या कुंडलीत हाच राहूची पंचमातून लाभ स्थानावर दृष्टी. गंमत म्हणजे शरद पवारांच्या,सोनियाजींच्या आणि केजरीवालांच्या कुंडलीत राहू स्वतः लाभ स्थानातच. म्हणजेच जनसागर आहेच पण त्याला दशमातल्या मिथुनेतल्या राहूची तोड नाही.

बुध - वरील सर्व ग्रहांबरोबरच बुध हा ग्रह सुद्धा राजकारणात प्रवेश करणार असाल तर सुस्थितीत, बलवान असावा. बुध म्हणजे बुद्धी. बुध म्हणजे तुमची सद्सदविवेकबुद्धी(Common Sense). कुठल्याही परिस्थिती सद्सदविवेकबुद्धीने चोखपणे निर्णय घ्यावे लागतात. हे कुंडलीत सुस्थित असलेल्या बुधामुळे शक्य आहे. बुध हा वाणीचा सुद्धा कारक ग्रह. तुम्ही प्रभावीपणे बोलू शकाल का ? हे कुंडलीतील बुधाच्या स्थितीवर अवलंबून आहे. तुमचे बोलणे लोकांपर्यंत पोहोचवणे हे बुधाचे कार्य. बोलतांना जीभ घसरणे हे कुंडलीतील बुधाची स्थिती काही चांगली नाही हे दर्शवते. असा बुध जेंव्हा रविच्या सान्निध्यात येतो तेंव्हा त्या व्यक्तिचे बोलणे अत्यंत प्रभावी असते. बहुतांश राजकारण्यांच्या कुंडलीत असा योग नसल्याने त्यांची भाषणे तेवढी प्रभावी ठरत नाहीत. बुध आणि रवि ह्यांची जेंव्हा अंशात्मक युती होते तेंव्हा त्याला "बुधादित्य योग" म्हटले जाते. हा योग असणाऱ्या व्यक्तिचे बोलणे प्रभावी असतेच. त्यांना संभाषणकाला चातुर्य नैसर्गिकरित्या असते. त्यांच्या बोलण्याची छाप जनसामान्य लोकांच्या मनावर लगेच पडते.
बाळासाहेबांच्या कुंडलीत असा "बुधादित्य योग" आहे. पंचम स्थानात हा योग असून लाभ स्थानावर दृष्टी आहे. मिश्कीलपणे बोलणे. बोलण्यातून लोकांवर छाप पाडणे,लोकांपर्यंत विषय प्रभावीपणे जाणे हे बाळासाहेबांच्या भाषणाचे वैशिष्ट्य. मोदींच्या कुंडलीत "बुधादित्य योग" लाभ स्थानातच आहे. पवारांच्या कुंडलीत हा योग नसला तरी रवि आणि बुध हे लग्न स्थानातच आहेत. (अंशात्मक युती नाही.)सोनियाजींच्या कुंडलीतसुद्धा हा योग नाही परंतु रवि आणि बुधाची पंचम स्थानातून लाभ स्थानावर दृष्टी आहे. त्यामुळे बोलणे फार प्रभावी नाही. लोकांवर छाप पडणारे तर नक्कीच नाही. मिश्कीलपणा Totally Absent. केजरीवालांच्या कुंडलीत बुधादित्य योग आहे. त्यांच्या राजकारणात येण्याआधीची भाषणे पाहिली तर लोकांवर त्यांचा पडणारा प्रभाव लक्षात येईल. लोकांची मनं त्यांनी तेंव्हा जिंकली खरी परंतु काही कारणामुळे लोकांच्या मनातील स्वतःचे स्थान त्यांना टिकवता आले नाही. ह्यावर अजून विश्लेषण करता येईल परंतु आपला आजचा हा विषय नाही.

तर वाचकांनो हे सर्व योग तुमच्या कुंडलीत असतील आणि योग्य महादशांचा लाभ मिळाला तर राजकारणात नुसताच प्रवेश नव्हे तर ह्या क्षेत्रात नक्कीच यशस्वी व्हाल आणि नावलौकिक मिळेल.

कसा वाटला आजचा लेख. जरूर कळवा.

अनुप्रिया देसाई (ज्योतिष वास्तू विशारद )
९८१९०२१११९
वेबसाईट - www.kpastrovastu.com












मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१९

भारताचे पुलवामा भ्याड हल्ल्याला चोख उत्तर


भारताचे पुलवामा भ्याड हल्ल्याला चोख उत्तर 

आज भारताच्या वायुदलाने POK वर हल्ला केला. पुलवामा भ्याड हल्ल्याला भारताचे आज प्रत्युत्तर. आजचा दिवस आणि कुंडली अभ्यासनीय आहे. ज्योतिष शास्त्राची आवड असणाऱ्यासाठीच.  कुंडली आज पहाटे ३.३० काश्मीर इथली आहे. 

१) धनु लग्न आणि ते ही केतूच्या नक्षत्रात. केतू कस्पने धनु राशीत येतो. येणाऱ्या काही काळात केतू-शनि-प्लुटो युती बरेच काही घडवून आणणार आहे. त्या दृष्टीने आजची घटना फार महत्त्वाची. 

२) चंद्र व्ययात वृश्चिक राशीत शनिच्या अनुराधा नक्षत्रात. चंद्र स्वतः अष्टमेश. 

३) मंगळाची दृष्टी अष्टम आणि व्यय स्थान,चंद्रावर. मंगळ हा हल्ल्याचा कारक ग्रह आहे. 

४) लग्नात शनी प्लुटो युती लग्न स्थानात. 

५) आजचा वार मंगळवार. दिवसावर मंगळाचा प्रभाव. 

६) आजची तारीख २६ - एकूण ८ नंबर 

गुरु स्वतः व्ययात असणे आणि अष्टमावर दृष्टी असणे ह्यामुळे आपल्या जवानांना काहीही इजा झालेली नाही. संरक्षण मिळाले. 

आज मंगळ,शनि,प्लूटो ह्यांचा प्रभाव कुंडलीवर जाणवतो. 

अनुप्रिया देसाई 
९८१९०२१११९







शुक्रवार, २२ फेब्रुवारी, २०१९

ऑपेरेशन - कधी आणि कसे ?- कुंडलीप्रमाणे ऑपेरेशन



ऑपेरेशन - कधी आणि कसे ?- कुंडलीप्रमाणे ऑपेरेशन

ऑपेरेशन ही गोष्ट सध्या सामान्य झाली आहे. कधी ना कधी प्रत्येकाला ऑपेरेशन थिएटर मध्ये हजेरी लावावीच लागतेय. अगदी छोट्यांपासून ते प्रौढ व्यक्तिंना ह्या गोष्टीला सामोरे जावे लागतेय. कधी हार्ट सर्जरी तर कधी किडनी ट्रान्सप्लांट. कधी मोती बिंदूचे ऑपेरेशन तर कधी सिझेरिअन डिलिव्हरी. कधी गॉल ब्लॅडरचे ऑपेरेशन तर कधी गुडघ्याचे. प्रत्येक ऑपेरेशनची ईमर्जन्सी वेगळी. जेव्हा ऑपेरेशन करण्यास काही दिवसांचा अथवा महिन्यांचा अवधी असतो तेंव्हा ऑपेरेशनसाठी योग्य वेळ निवडण्याची संधी मिळू शकते.

मुळात ऑपेरेशनसाठी योग्य वेळ म्हणजे काय ? हा प्रश्न वाचकांच्या मनात आला असेलच. योग्य वेळ ह्याचा अर्थ मुहूर्त नव्हे. योग्य वेळ ह्याचा अर्थ ती व्यक्ति जिचे ऑपेरेशन होणार आहे ती व्यक्ति आणि तिचे शरीर ऑपेरेशन करून घेण्यासाठी तयार आहे का ? कुंडली म्हणजेच तुमची कुंडलिनी. तुमच्या कुंडलीवरून शरीराची ठेवण, मानसिक जडण घडण लक्षात येते. नदी परीक्षेवरून जसे आधीच्या काळी आणि हल्ली सुद्धा तुमच्यातील शारीरिक बदल,त्रास,कमतरता लक्षात येते तसेच कुंडलीवरून कॅल्शियम,आयर्न ची कमतरता, शरीराला असणारा त्रास हा कुंडलीत प्रतिबिंबित होतो. कित्येक वेळेस माझ्याकडे येणाऱ्या जातकांना त्यांना भविष्यात होणाऱ्या शारीरिक त्रासाबद्दल आगाऊ सूचना दिलेल्या खऱ्या ठरल्या आहेत. त्याचा उपयोग असा झाला की वेळीच औषधोपचार केल्यामुळे शारीरिक व्याधींना आला बसू शकला आहे. त्यात गुडघ्यांचा होणार त्रास, मूळव्याध, फायब्रॉइड्स (गर्भाशयाशी निगडित),किडनीचे त्रास हे आणि ई. सांगू शकले. त्यामुळे कुंडलीचा अभ्यास ज्यांचा सखोल आहे ते तुम्हांला नक्कीच योग्य मार्गदर्शन करू शकतील. ज्योतिष सांगणे किंवा कुंडलीतून काही गोष्टी सांगू शकणे हे त्या ज्योतिषाच्या ज्ञानावर अवलंबून आहे. त्याचा अभ्यास,अवांतर वाचन,मनन -चिंतन स्वतःचा ह्या क्षेत्रातील अनुभव ह्यावर अचूक भविष्य वर्तवता येते. त्यामुळे भविष्य चुकल्यास ज्योतिष थोतांड ठरत नाही तर ज्योतिषी व्यक्तिचा अभ्यास कमी पडला असे म्हणूं शकतो.

ऑपेरेशनसाठी योग्य वेळ किंवा दिवस ठरवतांना जातकाच्या कुंडलीतील ग्रह स्थितीही तेवढीच महत्त्वाची. नाहीतर ऑपेरेशनसाठी चांगला दिवस ठरवतांना काही व्यक्ति कॅलेंडरच्या मागच्या पानावर दिलेले दिवस आणि वेळ ठरवून मोकळे होतात. तसे नको. ऑपेरेशनसाठी दिवस नक्की करताना खालील गोष्टींचा विचार व्हावा -

१) ऑपेरेशन शक्यतो शुक्ल पक्षात करावे.

२) पौर्णिमा आणि ग्रहण दिवस टाळावेत.

३) ऑपेरेशन करतेवेळी लग्न हे जातकाच्या कुंडलीला अनुरूप असावे. लग्नाधिपती अष्टमात असू नये.

४) जातकाच्या जन्म चंद्राला गोचरीचा चंद्र षडाष्टक योगात नसावा.

५) प्रश्नकुंडलातील ग्रहस्थिती काय सांगते आहे ते पहावे. ह्यासाठी एक केस आठवली ती इथे नमूद करते. दोन वर्षांपूर्वी एका जातकाने फोन केला होता तो त्याच्या मुलीच्या ऑपेरेशन संदर्भात. दोन वर्षाच्या त्या मुलीच्या हाताला कसलासा फोड आला होता. त्या फोडामुळे हाताला Infection झाले होते. हाताचे ऑपेरेशन करण्याचे डॉक्टरांनी ठरवले. त्यावेळी मुलीच्या कुंडलीबरोबरच मी प्रश्नकुंडलीवरही भर दिला. प्रश्नकुंडलीने कुठेही ऑपरेशनचे संकेत दिले नव्हते. त्यामुळे ऑपरेशन करावे लागणार नाही हे सांगितले. आणि घडलेही त्याप्रमाणेच. एका MRI च्या रिपोर्टसाठी ऑपरेशन थांबवले होते. तो रिपोर्ट आला आणि डॉक्टरांनी आता ऑपरेशनची गरज नसल्याचे सांगितले. त्यामुळे प्रश्नकुंडलीही तितकीच महत्त्वाची.

६) शनि,राहू आणि बुधाची नक्षत्रे टाळावीत कारण शनिची नक्षत्रे ऑपेरेशन delay करू शकतात. ऑपेरेशन वेळेत झाले तरी पेशंटला बरे होण्यास वेळ लागू शकतो. बुधाच्या नक्षत्रांमुळे एकच ऑपेरेशन दोनदा करावे लागते. ह्याचे एक उदाहरण देते - ओळखीच्या एका मित्राच्या वडिलांचे डोळ्याचे ऑपेरेशन करावे लागणार होते. ऑपेरेशनची  emergency नव्हती. त्यांना आधीपासूनच एका डोळ्याने दिसत नव्हतं. म्हणजे कित्येक वर्ष त्यांना फक्त एका डोळ्याचीच दृष्टी होती. आणि एक दिवस अचानकपणे त्यांना दुसऱ्या डोळ्यानेही दिसणे कमी होऊ लागले. त्यामुळे त्यांनी ऑपेरेशन करून घेतले. ऑपेरेशन करण्याआधी मित्राने मला फोन केला. दोन दिवसांनीच म्हणजेच येत्या बुधवारी ऑपेरेशन करण्याचे ठरवले होते. जमल्यास बुधवारी ऑपेरेशन करू नये असा सल्ला त्याला दिला. त्याने कारण विचारल्यावर बुधवार आणि  रेवती नक्षत्रावर ऑपेरेशन केल्यास पुन्हा ऑपेरेशन करावे लागेल असे सांगितले. त्यावर त्याचे म्हणणे,"नाही गं. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. डॉक्टरांची सगळी तयारी झाली आहे. म्हणजे डॉक्टर ओळखीचे आहेत. सांगितलं तर ते ही तयार होतील पण आता बाबा ऐकणार नाहीत. त्यांना लवकरात लवकर ऑपेरेशन करून घ्यायचे आहे." आता प्रार्थना करण्याशिवाय पर्याय नाही. ऑपेरेशन झाल्यानंतर  मला त्या मित्राचा फोन आला. बाबांचे ऑपेरेशन सुरु असतांना काही कॉम्प्लिकेशन्स आले होते त्यामुळे एका महिन्याने पुन्हा ऑपेरेशन करावे लागेल असे डॉक्टरांचे म्हणणे. "मानले बुवा तुझ्या शास्त्राला" हे त्याचे शब्द. एका महिन्याने पुन्हा ऑपेरेशन केले परंतु फक्त ३०% दृष्टी प्राप्त झाली होती. ऑपेरेशनच्या वेळी बुधाचे रेवती नक्षत्र होते. बुध हा  Duality चा कारक आहे. त्यामुळे बुधाच्या नक्षत्रावर ऑपेरेशन केल्यास पुन्हा करावे लागते असा अनुभव आहे. असो आपण आपल्या मूळ विषयाकडे जाऊ या.

७) प्रत्येक अवयव आणि राशी ह्यांचा नक्कीच संबंध आहे. मंगळाची मेष राशी मेंदूशी निगडीत तर मंगळीची दुसरी राशी वृश्चिक ही गुद्द्वाराशी निगडीत. वृषभ राशी घशाशी तर कन्या ही पोटाशी निगडीत. मकर राशी गुडघ्याशी निगडीत आहे. एखाद्या अवयवाचे ऑपेरेशन करत असतांना त्याच्याशी संबंधित ग्रह हा योग्य स्थितीत असावा.

वर सांगितलेल्या गोष्टी प्रत्येकाला अंमलात आणता येतीलच असे नाही. Emergency Operation करायचे  असल्यास ह्या गोष्टी पाळता येणार नाहीत. त्यावेळेस जातकाच्या पंचम आणि लाभ स्थानातील ग्रहाचे अथवा राशीचे उपाय करणे योग्य ठरेल. ते ही शक्य नसल्यास नजीकच्या व्यक्तिने पेशंटसाठी "महामृत्युंजय" मंत्र ऑपेरेशन होईस्तोवर म्हणत रहावे. सिझरिन तात्काळ करायचे ठरल्यास अथवा एखाद्याचे हृदयाचे ऑपरेशन हे मुहूर्तासाठी थांबवणे योग्य नाहीच. परंतु एका महिन्याने अथवा आठवड्याने ऑपरेशन करून चालण्यासारखे असेल तर वरील गोष्टींचा विचार जरूर व्हावा.

धन्यवाद
अनुप्रिया देसाई - ९८१९०२१११९ 

सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१९

दागिने पुन्हा मिळतील का ?


दागिने पुन्हा मिळतील का ?

२५ जानेवारीला संध्याकाळी गीतांजलीचा फोन आला. १ मंगळसूत्र, सहा तोळ्यांच्या बांगड्या, कानातले डूल असा ऐवज तिला सापडत नव्हता. त्याचे झाले असे की गीतांजली कालच आपल्या नव्या घरी शिफ्ट झाली. घरातील बाकी सामान तर टेम्पोने घरी गेले होते परंतु दागिने आणि काही महत्वाच्या कागदपत्रांना सोबत घेऊन ती टॅक्सिने घरी आली. दुसऱ्या दिवशी दागिने आणि कागदपत्रे कपाटात ठेवून द्यावीत ह्या उद्देशाने गीतांजलीने ज्या बॅगेत हा ऐवज ठेवला होता ती बॅग उघडली. बॅगेत कागदपत्रे होती परंतु दागिने नव्हते. सर्व शोधाशोध केल्यानंतरसुद्धा दागिने मिळाले नाहीत तेंव्हा तिने मला फोन केला. घर शिफ्ट करण्याच्या गोंधळात दागिने चोरीला गेले की काय ही काळजी गीतांजलीला सतावत होती. आज मी लग्नसमारंभात व्यस्त असल्यामुळे लगेच तर उत्तर देऊ शकणार नाही परंतु उद्या सांगू शकेन. गीतांजलीने इतक्यात घरी कोणालाच ह्याबद्दल सांगितले नव्हते त्यामुळे जमल्यास आज उत्तर देऊ शकलात तर बरे ह्या विनंतीवर मी फक्त हो म्हणाले.

रात्री घरी आल्यावर प्रश्नकुंडली मांडली. ज्यावेळी गीतांजलीने प्रश्न विचारलं होता ती वेळ होती संध्याकाळी - ५. ११ . तेंव्हाचे शासक ग्रह खालीलप्रमाणे -

L - बुध
S - चंद्र
R - बुध
D - शुक्र

लग्न मिथुन आणि राशी कन्या. कर्क राशी द्वितीय स्थानी. प्रश्न कुंडलीतील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुंडलीत चंद्र आणि कर्क राशी प्रश्नकर्त्याच्या मनातील खऱ्या प्रश्नाचे प्रतिनिधित्व करतात. इथे कुंडलीत चंद्राची कर्क राशी द्वितीय स्थानात म्हणजेच धन स्थानात आहे. प्रश्न धनाबद्दल विचारला गेला आहे. म्हणजेच प्रश्न अगदी मनापासून विचारला गेला आहे.
चंद्र चतुर्थ स्थानात. चंद्र चंद्राच्याच हस्त नक्षत्रात. चंद्र त्या वस्तूबद्दलची किंवा हरवलेल्या व्यक्तिबद्दलची माहिती देतो. इथे चंद्र चतुर्थ स्थानात आहे. चतुर्थ स्थान म्हणजेच स्वतःचे घर. त्यामुळे दागिने घरातच आहेत ही प्राथमिक माहिती मिळाली. दागिने चोरीला गेलेले नाहीत.
आता पुढचा अपेक्षित प्रश्न म्हणजे दागिने कधी मिळतील ? वर शासक ग्रहांमध्ये सर्व जलदगतीचे ग्रह आहेत. जलदगतीचे ग्रह जेंव्हा शासक ग्रह म्हणून येतात तेंव्हा घटना लगेचच घडून येते. म्हणजेच दागिने लगेचच मिळणार आहेत.
शासक ग्रहांमध्ये बुध आहे. म्हणजेच दागिने जिथे ठेवले आहेत तिथे पुन्हा शोधणे. परंतु गीतांजलीला दागिने नेमके कुठे ठेवले आहेत हे आठवत नव्हते. कपाटात शोधून झाले होते. दागिने उत्तर दिशेत हिरव्या-पिवळ्या रंगाच्या बॅगेत असावेत.  गीतांजलीला पुन्हा एकदा शोध घेण्यास सांगितले. आमचे हे बोलणे रात्री १०.३० ते ११.०० च्या दरम्यान झाले. दागिने घरातच आहेत हे ऐकून गीतांजलीला हायसे वाटले कारण तिने आतापर्यंत टॅक्सी ड्राइव्हर,शिफ्टिंग करतांना मदतीला आलेल्या कामगारांना विचारून झाले होते. कोणाकडेही तिने सांगितलेल्या वर्णनाची पिशवी नव्हती.
दुसऱ्या दिवशी सकाळी १०.०७ मिनिटांनी गीतांजलीचा फोन आला. दागिने मिळाले. घराच्या उत्तर दिशेलाच मिळाले. ह्या दिशेत तिने सध्या कपाट ठेवले होते त्या कपाटात तिने दागिन्यांची पिशवी ठेवली परंतु त्यावर इतर कपडे आणि वस्तू आल्याने सापडत नव्हते. पुन्हा पुन्हा पाहिल्यावर ती पिशवी मिळाली. (पिशवी - हिरव्या पिवळ्या रंगाची होती). बुधाचा प्रताप. पुन्हा पुन्हा तपासल्यावर वस्तू मिळाली.

दागिने मिळाले असा जेंव्हा फोन आला तेंव्हा मीन लग्न होते आणि चंद्र सप्तमात अर्थात केंद्रातच होता. 

READERS ALL OVER THE WORLD