ऑपेरेशन - कधी आणि कसे ?- कुंडलीप्रमाणे ऑपेरेशन
ऑपेरेशन ही गोष्ट सध्या सामान्य झाली आहे. कधी ना कधी प्रत्येकाला ऑपेरेशन थिएटर मध्ये हजेरी लावावीच लागतेय. अगदी छोट्यांपासून ते प्रौढ व्यक्तिंना ह्या गोष्टीला सामोरे जावे लागतेय. कधी हार्ट सर्जरी तर कधी किडनी ट्रान्सप्लांट. कधी मोती बिंदूचे ऑपेरेशन तर कधी सिझेरिअन डिलिव्हरी. कधी गॉल ब्लॅडरचे ऑपेरेशन तर कधी गुडघ्याचे. प्रत्येक ऑपेरेशनची ईमर्जन्सी वेगळी. जेव्हा ऑपेरेशन करण्यास काही दिवसांचा अथवा महिन्यांचा अवधी असतो तेंव्हा ऑपेरेशनसाठी योग्य वेळ निवडण्याची संधी मिळू शकते.
मुळात ऑपेरेशनसाठी योग्य वेळ म्हणजे काय ? हा प्रश्न वाचकांच्या मनात आला असेलच. योग्य वेळ ह्याचा अर्थ मुहूर्त नव्हे. योग्य वेळ ह्याचा अर्थ ती व्यक्ति जिचे ऑपेरेशन होणार आहे ती व्यक्ति आणि तिचे शरीर ऑपेरेशन करून घेण्यासाठी तयार आहे का ? कुंडली म्हणजेच तुमची कुंडलिनी. तुमच्या कुंडलीवरून शरीराची ठेवण, मानसिक जडण घडण लक्षात येते. नदी परीक्षेवरून जसे आधीच्या काळी आणि हल्ली सुद्धा तुमच्यातील शारीरिक बदल,त्रास,कमतरता लक्षात येते तसेच कुंडलीवरून कॅल्शियम,आयर्न ची कमतरता, शरीराला असणारा त्रास हा कुंडलीत प्रतिबिंबित होतो. कित्येक वेळेस माझ्याकडे येणाऱ्या जातकांना त्यांना भविष्यात होणाऱ्या शारीरिक त्रासाबद्दल आगाऊ सूचना दिलेल्या खऱ्या ठरल्या आहेत. त्याचा उपयोग असा झाला की वेळीच औषधोपचार केल्यामुळे शारीरिक व्याधींना आला बसू शकला आहे. त्यात गुडघ्यांचा होणार त्रास, मूळव्याध, फायब्रॉइड्स (गर्भाशयाशी निगडित),किडनीचे त्रास हे आणि ई. सांगू शकले. त्यामुळे कुंडलीचा अभ्यास ज्यांचा सखोल आहे ते तुम्हांला नक्कीच योग्य मार्गदर्शन करू शकतील. ज्योतिष सांगणे किंवा कुंडलीतून काही गोष्टी सांगू शकणे हे त्या ज्योतिषाच्या ज्ञानावर अवलंबून आहे. त्याचा अभ्यास,अवांतर वाचन,मनन -चिंतन स्वतःचा ह्या क्षेत्रातील अनुभव ह्यावर अचूक भविष्य वर्तवता येते. त्यामुळे भविष्य चुकल्यास ज्योतिष थोतांड ठरत नाही तर ज्योतिषी व्यक्तिचा अभ्यास कमी पडला असे म्हणूं शकतो.
ऑपेरेशनसाठी योग्य वेळ किंवा दिवस ठरवतांना जातकाच्या कुंडलीतील ग्रह स्थितीही तेवढीच महत्त्वाची. नाहीतर ऑपेरेशनसाठी चांगला दिवस ठरवतांना काही व्यक्ति कॅलेंडरच्या मागच्या पानावर दिलेले दिवस आणि वेळ ठरवून मोकळे होतात. तसे नको. ऑपेरेशनसाठी दिवस नक्की करताना खालील गोष्टींचा विचार व्हावा -
१) ऑपेरेशन शक्यतो शुक्ल पक्षात करावे.
२) पौर्णिमा आणि ग्रहण दिवस टाळावेत.
३) ऑपेरेशन करतेवेळी लग्न हे जातकाच्या कुंडलीला अनुरूप असावे. लग्नाधिपती अष्टमात असू नये.
४) जातकाच्या जन्म चंद्राला गोचरीचा चंद्र षडाष्टक योगात नसावा.
५) प्रश्नकुंडलातील ग्रहस्थिती काय सांगते आहे ते पहावे. ह्यासाठी एक केस आठवली ती इथे नमूद करते. दोन वर्षांपूर्वी एका जातकाने फोन केला होता तो त्याच्या मुलीच्या ऑपेरेशन संदर्भात. दोन वर्षाच्या त्या मुलीच्या हाताला कसलासा फोड आला होता. त्या फोडामुळे हाताला Infection झाले होते. हाताचे ऑपेरेशन करण्याचे डॉक्टरांनी ठरवले. त्यावेळी मुलीच्या कुंडलीबरोबरच मी प्रश्नकुंडलीवरही भर दिला. प्रश्नकुंडलीने कुठेही ऑपरेशनचे संकेत दिले नव्हते. त्यामुळे ऑपरेशन करावे लागणार नाही हे सांगितले. आणि घडलेही त्याप्रमाणेच. एका MRI च्या रिपोर्टसाठी ऑपरेशन थांबवले होते. तो रिपोर्ट आला आणि डॉक्टरांनी आता ऑपरेशनची गरज नसल्याचे सांगितले. त्यामुळे प्रश्नकुंडलीही तितकीच महत्त्वाची.
६) शनि,राहू आणि बुधाची नक्षत्रे टाळावीत कारण शनिची नक्षत्रे ऑपेरेशन delay करू शकतात. ऑपेरेशन वेळेत झाले तरी पेशंटला बरे होण्यास वेळ लागू शकतो. बुधाच्या नक्षत्रांमुळे एकच ऑपेरेशन दोनदा करावे लागते. ह्याचे एक उदाहरण देते - ओळखीच्या एका मित्राच्या वडिलांचे डोळ्याचे ऑपेरेशन करावे लागणार होते. ऑपेरेशनची emergency नव्हती. त्यांना आधीपासूनच एका डोळ्याने दिसत नव्हतं. म्हणजे कित्येक वर्ष त्यांना फक्त एका डोळ्याचीच दृष्टी होती. आणि एक दिवस अचानकपणे त्यांना दुसऱ्या डोळ्यानेही दिसणे कमी होऊ लागले. त्यामुळे त्यांनी ऑपेरेशन करून घेतले. ऑपेरेशन करण्याआधी मित्राने मला फोन केला. दोन दिवसांनीच म्हणजेच येत्या बुधवारी ऑपेरेशन करण्याचे ठरवले होते. जमल्यास बुधवारी ऑपेरेशन करू नये असा सल्ला त्याला दिला. त्याने कारण विचारल्यावर बुधवार आणि रेवती नक्षत्रावर ऑपेरेशन केल्यास पुन्हा ऑपेरेशन करावे लागेल असे सांगितले. त्यावर त्याचे म्हणणे,"नाही गं. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. डॉक्टरांची सगळी तयारी झाली आहे. म्हणजे डॉक्टर ओळखीचे आहेत. सांगितलं तर ते ही तयार होतील पण आता बाबा ऐकणार नाहीत. त्यांना लवकरात लवकर ऑपेरेशन करून घ्यायचे आहे." आता प्रार्थना करण्याशिवाय पर्याय नाही. ऑपेरेशन झाल्यानंतर मला त्या मित्राचा फोन आला. बाबांचे ऑपेरेशन सुरु असतांना काही कॉम्प्लिकेशन्स आले होते त्यामुळे एका महिन्याने पुन्हा ऑपेरेशन करावे लागेल असे डॉक्टरांचे म्हणणे. "मानले बुवा तुझ्या शास्त्राला" हे त्याचे शब्द. एका महिन्याने पुन्हा ऑपेरेशन केले परंतु फक्त ३०% दृष्टी प्राप्त झाली होती. ऑपेरेशनच्या वेळी बुधाचे रेवती नक्षत्र होते. बुध हा Duality चा कारक आहे. त्यामुळे बुधाच्या नक्षत्रावर ऑपेरेशन केल्यास पुन्हा करावे लागते असा अनुभव आहे. असो आपण आपल्या मूळ विषयाकडे जाऊ या.
७) प्रत्येक अवयव आणि राशी ह्यांचा नक्कीच संबंध आहे. मंगळाची मेष राशी मेंदूशी निगडीत तर मंगळीची दुसरी राशी वृश्चिक ही गुद्द्वाराशी निगडीत. वृषभ राशी घशाशी तर कन्या ही पोटाशी निगडीत. मकर राशी गुडघ्याशी निगडीत आहे. एखाद्या अवयवाचे ऑपेरेशन करत असतांना त्याच्याशी संबंधित ग्रह हा योग्य स्थितीत असावा.
वर सांगितलेल्या गोष्टी प्रत्येकाला अंमलात आणता येतीलच असे नाही. Emergency Operation करायचे असल्यास ह्या गोष्टी पाळता येणार नाहीत. त्यावेळेस जातकाच्या पंचम आणि लाभ स्थानातील ग्रहाचे अथवा राशीचे उपाय करणे योग्य ठरेल. ते ही शक्य नसल्यास नजीकच्या व्यक्तिने पेशंटसाठी "महामृत्युंजय" मंत्र ऑपेरेशन होईस्तोवर म्हणत रहावे. सिझरिन तात्काळ करायचे ठरल्यास अथवा एखाद्याचे हृदयाचे ऑपरेशन हे मुहूर्तासाठी थांबवणे योग्य नाहीच. परंतु एका महिन्याने अथवा आठवड्याने ऑपरेशन करून चालण्यासारखे असेल तर वरील गोष्टींचा विचार जरूर व्हावा.
धन्यवाद
अनुप्रिया देसाई - ९८१९०२१११९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा