दागिने पुन्हा मिळतील का ?
२५ जानेवारीला संध्याकाळी गीतांजलीचा फोन आला. १ मंगळसूत्र, सहा तोळ्यांच्या बांगड्या, कानातले डूल असा ऐवज तिला सापडत नव्हता. त्याचे झाले असे की गीतांजली कालच आपल्या नव्या घरी शिफ्ट झाली. घरातील बाकी सामान तर टेम्पोने घरी गेले होते परंतु दागिने आणि काही महत्वाच्या कागदपत्रांना सोबत घेऊन ती टॅक्सिने घरी आली. दुसऱ्या दिवशी दागिने आणि कागदपत्रे कपाटात ठेवून द्यावीत ह्या उद्देशाने गीतांजलीने ज्या बॅगेत हा ऐवज ठेवला होता ती बॅग उघडली. बॅगेत कागदपत्रे होती परंतु दागिने नव्हते. सर्व शोधाशोध केल्यानंतरसुद्धा दागिने मिळाले नाहीत तेंव्हा तिने मला फोन केला. घर शिफ्ट करण्याच्या गोंधळात दागिने चोरीला गेले की काय ही काळजी गीतांजलीला सतावत होती. आज मी लग्नसमारंभात व्यस्त असल्यामुळे लगेच तर उत्तर देऊ शकणार नाही परंतु उद्या सांगू शकेन. गीतांजलीने इतक्यात घरी कोणालाच ह्याबद्दल सांगितले नव्हते त्यामुळे जमल्यास आज उत्तर देऊ शकलात तर बरे ह्या विनंतीवर मी फक्त हो म्हणाले.
रात्री घरी आल्यावर प्रश्नकुंडली मांडली. ज्यावेळी गीतांजलीने प्रश्न विचारलं होता ती वेळ होती संध्याकाळी - ५. ११ . तेंव्हाचे शासक ग्रह खालीलप्रमाणे -
L - बुध
S - चंद्र
R - बुध
D - शुक्र
लग्न मिथुन आणि राशी कन्या. कर्क राशी द्वितीय स्थानी. प्रश्न कुंडलीतील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुंडलीत चंद्र आणि कर्क राशी प्रश्नकर्त्याच्या मनातील खऱ्या प्रश्नाचे प्रतिनिधित्व करतात. इथे कुंडलीत चंद्राची कर्क राशी द्वितीय स्थानात म्हणजेच धन स्थानात आहे. प्रश्न धनाबद्दल विचारला गेला आहे. म्हणजेच प्रश्न अगदी मनापासून विचारला गेला आहे.
चंद्र चतुर्थ स्थानात. चंद्र चंद्राच्याच हस्त नक्षत्रात. चंद्र त्या वस्तूबद्दलची किंवा हरवलेल्या व्यक्तिबद्दलची माहिती देतो. इथे चंद्र चतुर्थ स्थानात आहे. चतुर्थ स्थान म्हणजेच स्वतःचे घर. त्यामुळे दागिने घरातच आहेत ही प्राथमिक माहिती मिळाली. दागिने चोरीला गेलेले नाहीत.
आता पुढचा अपेक्षित प्रश्न म्हणजे दागिने कधी मिळतील ? वर शासक ग्रहांमध्ये सर्व जलदगतीचे ग्रह आहेत. जलदगतीचे ग्रह जेंव्हा शासक ग्रह म्हणून येतात तेंव्हा घटना लगेचच घडून येते. म्हणजेच दागिने लगेचच मिळणार आहेत.
शासक ग्रहांमध्ये बुध आहे. म्हणजेच दागिने जिथे ठेवले आहेत तिथे पुन्हा शोधणे. परंतु गीतांजलीला दागिने नेमके कुठे ठेवले आहेत हे आठवत नव्हते. कपाटात शोधून झाले होते. दागिने उत्तर दिशेत हिरव्या-पिवळ्या रंगाच्या बॅगेत असावेत. गीतांजलीला पुन्हा एकदा शोध घेण्यास सांगितले. आमचे हे बोलणे रात्री १०.३० ते ११.०० च्या दरम्यान झाले. दागिने घरातच आहेत हे ऐकून गीतांजलीला हायसे वाटले कारण तिने आतापर्यंत टॅक्सी ड्राइव्हर,शिफ्टिंग करतांना मदतीला आलेल्या कामगारांना विचारून झाले होते. कोणाकडेही तिने सांगितलेल्या वर्णनाची पिशवी नव्हती.
दुसऱ्या दिवशी सकाळी १०.०७ मिनिटांनी गीतांजलीचा फोन आला. दागिने मिळाले. घराच्या उत्तर दिशेलाच मिळाले. ह्या दिशेत तिने सध्या कपाट ठेवले होते त्या कपाटात तिने दागिन्यांची पिशवी ठेवली परंतु त्यावर इतर कपडे आणि वस्तू आल्याने सापडत नव्हते. पुन्हा पुन्हा पाहिल्यावर ती पिशवी मिळाली. (पिशवी - हिरव्या पिवळ्या रंगाची होती). बुधाचा प्रताप. पुन्हा पुन्हा तपासल्यावर वस्तू मिळाली.
दागिने मिळाले असा जेंव्हा फोन आला तेंव्हा मीन लग्न होते आणि चंद्र सप्तमात अर्थात केंद्रातच होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा