बुधवार, ४ एप्रिल, २०१८

ज्योतिष -योगायोगाच्या गोष्टी

ज्योतिष -योगायोगाच्या गोष्टी 


ज्योतिष शास्त्र ह्या शब्दाची फोड केली तर  ज्योती + ईश अशी होईल. ज्योती म्हणजे दृष्टी आणि ईश म्हणजे ईश्वर अर्थात परमेश्वर. आपल्या भाग्यात काय लिहून ठेवले आहे हे ज्याला समजण्याची दृष्टी आहे तो ज्योतिषी. ज्योतिषाकडे जेंव्हा व्यक्ति प्रश्न घेऊन जातात तेंव्हा सरार्सपणे हे विसरतात की ज्योतिषी हा जादूगार किंवा तांत्रिक नव्हे. तुमच्या भाग्यात काय लिहून ठेवले आहे ह्याची कल्पना मात्र तो देऊ शकतो. काही तंत्र आणि जादूने तुमचे भाग्य बदलू शकत नाही. हे सर्वसामान्य लोकांनी समजून घेतले पाहिजे.  तुम्हांला २८व्या वर्षी चांगल्या हुद्द्याची नोकरी मिळणार असे जर भाग्यात असले तर ह्याचा अर्थ २८व्या वर्षापर्यंत काहीच करायचे नाही असा नसून त्याचा अर्थ पुढील प्रमाणे आहे - २८व्या वर्षापर्यंत तुम्हांला काही उच्च शिक्षण घायचे असल्यास ते घ्यावे त्याच बरोबरीने नोकरी करावी. म्हणजे अनुभव आणि शिक्षण घेऊन वयाच्या २८व्या वर्षी तुम्ही नवीन नोकरीकरिता तयार होऊ शकता.

हीच गोष्ट लग्नाकरिता लागू होते. प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न होणे म्हणजे आनंददायी प्रसंग. परंतु सर्वांच्या  आयुष्यात लग्न एका ठराविक वर्षीच होत नाही. कोणाचे २२ व्या वर्षी,कोणाचे २८व्या वर्षी,कोणाचे ४०व्या वर्षी तर कोणाचे ६०व्या वर्षीही लग्न होऊ शकते. काहींना आजन्म ब्रम्हचारीही रहावे लागते. काहींनी लग्न न करण्याचा निश्चय करूनही अचानक आयुष्यात घडलेल्या घटनांमुळे लग्न करण्याचा निर्णय घेतला जातो. काहींच्या भाग्यात एकापेक्षा जास्त विवाह लिहिलेले असतात. म्हणजेच प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते.त्याच वेळी ती घटना घडते.

ज्योतिष शास्त्र हे संपूर्णतः खगोलशास्त्रावर अवलंबून आहे. खगोलीय घटना आणि त्याच्या गणितावरून काही गोष्टींची शक्यता वर्तवणे शक्य आहे परंतु त्या व्यक्तिचा तेवढा अभ्यास असावा. हे सांगतांना प्रसिद्ध खगोलशात्रज्ञ आणि ज्योतिषी वराहमिहीर ह्यांच्या जीवनात घडलेल्या एका गोष्टीची आठवण झाली. ती गोष्ट आज तुम्हांला सांगते.  

वराहमिहीर हे अत्यंत हुशार असे गणिती आणि खगोलशात्रज्ञ. मूळ नाव - मिहीर. अचूक गणित ह्यामुळे अचूक भविष्यवाणी ही त्यांची ख्याती होती. मिहीर हे उज्जैनच्या राजा विक्रमादित्यच्या दरबारात नऊ रत्नांपैकी एक.  राजज्योतिषी म्हणून त्यांना सन्मान मिळालेला. विक्रमादित्य राजाच्या नवजात बाळाची भविष्यवाणी करतांना मिहीरने,"राजकुमार हा अल्पायु असून त्याचा १८व्या वर्षी मृत्युयोग आहे. ज्यादिवशी राजकुमार १८वे वर्ष पूर्ण करेल त्यादिवशी त्यांस अटळ मृत्युयोग आहे. एवढेच नव्हे तर राजकुमारचा मृत्यू एका वराहमुळे(वराह म्हणजे डुक्कर)  होणार आहे." फक्त एवढीच भविष्यवाणी करून मिहीर थांबले नाहीत. त्यांनी  राजकुमाराच्या मृत्यूची तारीख आणि अचूक वेळ सुद्धा राजाला सांगितली. हे ऐकून राजा शोकमग्न झाला. होताहोता वर्षे सरत गेली. राजकुमार १८ वर्षांचा होणार तेंव्हा राजाने मिहीर ह्यांना भविष्यवाणीची आठवण करून दिली. मिहीर ह्यांनी जराही न डगमगता ते स्वतःच्या "त्या" भविष्यवाणीवर ठाम असल्याचे सांगितले. राजकुमाराच्या संरक्षणाची जय्यत तयारी राजा विक्रमादित्य राजाने करण्यास सुरवात केली. राजकुमाराला महालाच्या सर्वात वरच्या मजल्यावर ठेवण्यात आले. त्या मजल्यावर आणि बाकी संपूर्ण महालात,महालाबाहेर पहारेकऱ्यांच्या कडक बंदोबस्त करण्यात आला. कुठूनही जंगली जनावराने महालात येण्याची सोय नव्हती. राजकुमाराला संपूर्ण दिवस वरच्या मजल्यावर थांबण्याचे आदेश होते. एवढेच करून विक्रमादित्य थांबला नाही. राजा स्वतः दरबारात उपस्थित होता. त्याने मिहीर ह्यांनाही दरबारात उपस्थित राहण्यास सांगितले. हे एका प्रकारचे मिहीर ह्यांना दिलेले आव्हाहन होते. मिहीर ह्यांनी भविष्यवाणी तर केली होतीच परंतु राजाने राजकुमाराच्या संरक्षणाची सर्व जय्यत तयारी केली होती आणि मिहीर ह्यांचे भविष्य आता कसे खोटे ठरणार ह्याची ते वाट पहात होते.

मिहीर हे निश्चलपणे आणि आत्मविश्वासाने दरबारात उपस्थित होते. त्यांना त्यांच्या शास्त्रावर पूर्णपणे विश्वास होता. राजाला त्याच्या सेवेकऱ्यांवर आणि पहारेकऱ्यांवर पूर्णपणे विश्वास होता. दर अर्ध्यातासाने राजकुमाराच्या स्वास्थ्याबद्दलची माहिती राजाला येऊन सांगण्याचे आदेश पहारेकऱ्यांना होते. जसजसा वेळ जात होता तसतशी  दरबाराची उत्सुकता वाढू लागली होती. दरबारात उपस्थित असलेल्या सर्व लोकांना पुढे काय घडणार ह्या उत्सुकतेबरोबरच मिहीरची भविष्यवाणी कशी चुकणार ह्यांत आनंद होत होता. तेंव्हा दरबारात मिहिर ह्यांना  पाण्यात बघणारे बरेचजण होते. मिहिराचार्यांच्या चुकलेल्या भविष्यवाणीमुळे आता राजा काय शिक्षा देणार ह्याचा त्यांना आनंद होत होता. ज्यावेळेला राजकुमाराचा  मृत्यू होणार ती वेळ आली. राजाने मिहिराचार्यांना पुन्हा एकदा भविष्यवाणीबद्दल विचारले. त्यांनी  जराही न डगमगता ज्यावेळी मृत्यू होणार असे विधिलिखित आहे त्याच वेळी राजकुमारचा मृत्यू होणार हे निश्चित असे राजाला सांगितले. ती ठराविक वेळ निघून गेली तरी पहारेकऱ्यांकडून कुठलीही बातमी दरबारात आली नाही. मिहिराचार्यांची भविष्यवाणी खोटी ठरली म्हणून राजा आणि दरबारी खुश झाले. ह्यांवर मिहिराचार्यांचे उत्तर असे होते - : हे राजा, राजकुमाराचा मृत्यू सांगितलेल्या तासाला, त्याच मिनिटाला आणि त्याच सेकंदाला झालेल्या आहे. राजकुमार रक्ताच्या थारोळ्यात आहे. तुमच्या सैनिकांपैकी आणि पहारेकऱ्यांपैकी कोणाच्याच ही गोष्ट अजून लक्षात आलेली नाही. एका वराहमुळेच राजकुमारचा मृत्यू झालेला आहे. विधिलिखित चुकलेले नाही. तुम्ही ह्याची शहानिशा करून घ्यावी. "

तातडीने राजा आणि सैनिक राजकुमार ज्या मजल्यावर होता त्या मजल्यावर गेले. राजकुमार स्वतःच्या कक्षेत न दिसल्यामुळे सैनिकांनी सर्वत्र शोधण्यास प्रारंभ केला. काहीवेळापूर्वीच राजकुमार आणि त्याचे मित्र त्याच्या कक्षात बुद्धिबळासारखा खेळ खेळत होते. राजकुमाराला महालाबाहेर जाण्याची परवानगी नसल्याने ते सर्व त्याच्या कक्षेतच होते. मग राजकुमार गेले कुठे ? असे त्या मित्रांना विचारले असता त्यांनी सांगितले, राजकुमार दिवसभर स्वतःच्या कक्षेत राहून कंटाळले होते. खेळत्या हवेत जावे तर महालाबाहेर जाण्याची सक्ती त्यामुळे त्यांनी कक्षेच्या वर असलेल्या गच्चीत जाण्याचे ठरवले. त्यानंतर राजकुमार कक्षेत परतलेच नाहीत.

सर्व सैनिक आणि राजा महालाच्या गच्चीत पोहोचले. गच्चीत रक्ताच्या थारोळ्यात मृत्युमुखी पडलेल्या राजकुमाराला पाहून राजाला शोक अनावर झाला. एवढ्या उंचीवर,एवढ्या पहारेकऱ्यांच्या तैनातीत राजकुमारचा मृत्यू झाला होता. मृत्यूचे कारण होते - वराहचे चिन्ह. गच्चीवर सर्वत्र राजाचे राज्याचे झेंडे लावले गेले होते. त्या झेंड्याच्या बाजूला राजकुमाराला आराम करण्यासाठी म्हणून एक पलंग ठेवण्यात आला होता. थकलेल्या राजकुमाराने आराम करावा ह्या हेतूने त्या पलंगावर निजला. पलंगाच्या बाजूलाच असलेला झेंडा बरोबर राजकुमाराच्या अंगावर पडला. त्या झेंड्यावर असलेल्या लोखंडाच्या वराहच्या चिन्हाचे अणुकुचीदार सुळे राजकुमाराच्या छातीत रोवले गेले, ज्यामुळे राजकुमारचा मृत्यू झाला.

राजकुमाराच्या संरक्षणाच्या तयारीत राजा नि त्याचे सैनिक स्वतःच्या राज्याच्या चिन्हाबद्दल पार विसरून गेले. त्यांचे विजय चिन्ह होते वराहाचे म्हणजेच डुक्कर ह्या प्राण्याचे. झेंड्याच्या शेंड्यावर हे चिन्ह होते. ह्याच चिन्हाच्या वराहाच्या सुळ्यांनी राजकुमारचा बळी घेतला होता.

मिहिराचार्यानी वर्तवलेल्या भविष्यवाणीचा तंतोतंत घडले होते. राजाने मिहिराचार्यांना आपल्या राज्याचे विजयचिन्ह "वराह" हे पदवी म्हणून बहाल केलं. तेंव्हापासून मिहिराचार्य "वराहमिहीर" ह्या नावाने ओळखले जातात.

ह्यावरून बोध घेण्यासारखे म्हणजे घडणाऱ्या गोष्टी निश्चितपणे त्याचवेळी घडतात. तेंव्हा एखादी गोष्ट मिळवणायसाठी तुम्ही अथक प्रयत्न करता परंतु अपेक्षित वेळेत ती गोष्ट हाती लागली नाही तरी निराश न होता आपले प्रयत्न सुरु ठेवावेत. नोकरी करणाऱ्या व्यक्तिंचे जेंव्हा मला फोन येतात ते अशा आशयाचे -  मी इंटरव्यूव्ह देऊन महिना होत आला परंतु अजूनही त्यांच्याकडून काहीच उत्तर नाही. त्यावर माझे एकच उत्तर असते. एकच कंपनी आहे का ? तुमच्या कुंडलीत जर योग आहेत तर नोकरी मिळणारच परंतु जरा धीर धरा. दुसऱ्या कंपनीत प्रयत्न करा. योग्य ती वेळ यावी लागते हे खरेच परंतु आपण आपले प्रयत्न सोडू नयेत आणि धीर खचू देऊ नये. 

अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तू विशारद )


सोमवार, २ एप्रिल, २०१८

आज २ एप्रिल - शनि आणि मंगळ युती


आज २ एप्रिल - शनि आणि मंगळ युती 
दिनांक २५ मार्च रोजी माझ्या ह्याच ब्लॉगवर मी शनि आणि मंगळाच्या युतीचे काय परिणाम होऊ शकतील ह्यांवर लेख लिहिला होता. (आपण वाचला नसल्यास लिंक देत आहे -http://astroanupriya.blogspot.in/2018/03/blog-post_25.html ) १) त्यात शनी मंगळाच्या युतीमुळे मोर्चे निघणे, जातीय अथवा धार्मिक दंगली होऊ शकतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. आज सकाळपासूनच भारत बंदला हिंसक वळण लागले त्यात बऱ्याच राज्यात जीवितहानी सुद्धा झाली. उद्या(मंगळवार दिनांक - ३ एप्रिल रोजी ) ह्या बंदला  भडकावण्यासाठी  राजकीय वर्तुळातून काही हालचाली होऊ शकतील. 
२) ह्या लेखात लोकांनी मोर्चे काढणे-चर्चेतून गैरसमज होणे हे शक्यता वर्तवण्यात आली होती. आज मुंबईत होमिओपॅथी डॉक्टरांचा आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला.  
३) राजकीय क्षेत्रात घडामोडी होणे - अ) केजरीवाल ह्यांनी अरुण जेटली ह्यांची माफी मागितली. 
४) मोठाली जहाजं/रेल्वे ह्यांचा अपघात होणे - आज पहाटे चीनचे स्पेस स्टेशन प्रशांत महासागरात कोसळले. 
५) मंगळ आणि शनिच्या युतीमुळे अपघात होणे,आगी लागणे - आज महाराष्ट्रात पाच ठिकाणी अग्नितांडव झाले. अ) भिवंडीत "तेलाच्या"(तेल किंवा पेट्रोल हे शनिच्या अधिपत्याखाली येते.) १२ ते १३ गोदामांना आग लागली. आग(आग - मंगळाच्या अधिपत्याखाली ) शांत होण्यास १० तांस लागले. म्हणजे आगीची तीव्रता लक्षात येते. ब) मुंबईत अंधेरीमध्ये लक्ष्मी इंडस्ट्रिअल इस्टेटला आज दुपारी आग लागली. क) पुणे इथे महालक्ष्मी मार्केट यार्डला आग लागली. ड) औरंगाबादच्या माणिक इस्पितळाच्या पहिल्या मजल्याला आगीमुळे नुकसान झाले. इ) प्रसिद्ध कलाकार प्रमोद कांबळे ह्यांचा स्टुडिओ आगीत भस्मसात झाला. 
खाली आज घडलेल्या काही घडामोडींबद्दल सविस्तर लिहिले आहे. पुणे आणि भिवंडी इथे लागलेल्या आगीच्या वेळेची कुंडल्या दिलेल्या आहेत. 

भारत बंद - ऍट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याच्या वादातून आज एप्रिल २ रोजी भारत बंद पुकारण्यात आला. विविध संघटनांनी आंदोलन करत नारेबाजी केली. दुपारपर्यंत ह्या बंदला हिंसक वळण लागले. मध्यप्रदेशात एका व्यक्तिने गावठी पिस्तुलाने गोळ्या झाडल्या,त्यात एका व्यक्तिचा मृत्यु झाला. उत्तरप्रदेशातील हपूर स्टेशनजवळ २००० च्या संख्येने आलेल्या जमावाने रेल रोको आंदोलन केले ज्यामुळे ४-५ तास रेल्वे सेवा ठप्प होती. 
भिवंडी तेलाच्या गोदामांना आग 
रात्री १२ च्या सुमारास आग लागली. आगीत १२ ते १३ गोदामं जाळून खाक. अग्निशामकदलाच्या सहा गाड्या आग १० तासांनंतर आग आटोक्यात आली. 
ह्यावेळेची कुंडली मी जिज्ञासू ज्योतिषांसाठी देत आहे - 



L - मंगळ - १,५,१२             
S - चित्रा नक्षत्र - मंगळ -१,५,१२
R - शुक्र - ४,६,७,११
D - चंद्र - १०,८ 
अष्टम स्थानाचा सबलॉर्ड - मंगळ असून तो पुढील स्थानांचा कार्येश - १,५,१२
व्यय स्थानाचा सबलॉर्ड - शनि असून तो १,२ आणि ३ ह्या स्थानांचा कार्येश. 
अष्टम स्थान हे धोक्याचे/अपघाताचे स्थान आहे. ह्या स्थानाचा सबलॉर्ड मंगळ स्वतः आहे. व्यय स्थान म्हणजे नुकसानीचे स्थान. ह्या स्थानाचा सबलॉर्ड शनि आहे. 
पुणे मार्केटयार्ड आग लागली 
पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील एका धान्याचे दुकान भीषण आगीत जळून भस्मसात झाले. ही घटना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. 
तेंव्हाची कुंडली - 


L - बुध (वक्री) ९,१,४
S - स्वाती नक्षत्र - राहू - १,२
R - शुक्र - १०,५,१२ 
D - चंद्र - ४,२ 
अष्टम स्थानाचा सबलॉर्ड - मंगळ असून पुढील प्रमाणे कार्येश - ६,६,११. 
व्यय स्थानाचा सबलॉर्ड - शनि असून ६,८ आणि ९ ह्या स्थानांचा कार्येश. 
औरंगाबाद- इस्पितळाला आग लागली -  आज औरंगाबाद शहरातील जवाहर पोलिस स्टेशन समोरील माणिक हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्याला आग पसरली होती.अग्निशमन दलाच्या सहा गाड्या आणि 10 खासगी टॅंकरच्या मदतीने आग विझवण्यात आली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. माणिक हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीमध्ये स्क्रॅप जळाल्याने धूर निघाला होता. आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. 
स्टुडिओला आग- प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे ह्यांच्या स्टुडिओला आग लागली. ही घटना मनाला चटका लावणारी आहे. 

अमोनिया गॅस गळती - उत्तरप्रदेशात एका ठिकाणी अमोनिया गॅस गळती झाली. जीवितहानी नाही. 


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ- आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आली. 
मोर्चा - होमिओपॅथी डॉक्टरांनी आझाद मैदानात मोर्चा काढला आहे.  
 आजच्या ज्या घटना घडल्या त्यापैकी दोन घटनांच्या कुंडल्या मी वर दिल्या आहेतच. ह्या कुंडल्यांमधील आढळलेले साम्य म्हणजे - 

  • लग्न बिंदूच्या सर्वात जवळ प्लुटो आणि गुरु हे दोन ग्रह होते.  
  • प्लुटो ह्या ग्रहाला कुंडली विवेचनात गृहीत धरले जात नसले तरी अशा घटना घडतांना प्लुटो नेहमीच लग्नबिंदूजवळ आढळून येतो. 
  • प्लुटो हा समूहाचे नेतृत्त्व करतो. लग्न २८ अंशावर असतांना प्लूटो २७ अंश म्हणजेच लग्न बिंदूच्या बरेच जवळ होता. म्हणूनच जेंव्हा घटना घडल्या तेंव्हा कुठल्याही एका व्यक्तिचे नुकसान न होता एकूण समाजव्यवस्थेवर परिणाम झाला. घटना घडवून आणणारे सुद्धा एक-दोघे नव्हते. ह्या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे कोणीच नव्हते. घटना घडवून आणणारे समूहाने होते - प्लुटो हा समूहाचे नेतृत्त्व करतो. भारत बंद जाहीर झाल्यानंतर आंदोलनं जी झाली, त्या आंदोलनाचा परिणाम अर्थात वाईट होता. एकूण नऊ लोकांचे बळी ह्या आंदोलनामुळे गेले.  
  उद्या मंगळवार आहे. उद्याचाही दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. उद्या शनि आणि मंगळाची युती तर असणारच आहेच परंतु उद्याचे नक्षत्रही गुरुचे(विशाखा ) आहे. गुरु(वक्री ) आणि चंद्राची युती असणार आहे. तेंव्हा राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या उद्याचा दिवस महत्त्वाचा ठरेल. 

म. टी. - २५ मार्चचा लेख ज्यांनी ज्यांनी वाचला त्यांना तो आवडलाच परंतु आज ह्या सर्व घटना घडत असतांना मला त्यांचे अभिनंदनाचे फोन आणि मेसेजेस येत होते. तुम्ही लेखांत लिहिल्याप्रमाणे घडत आहे असा अभिप्राय सर्वांचाच होता. त्या सर्वांना धन्यवाद. 
आज घडलेल्या घटना अप्रिय होत्या. ह्यातून एकच गोष्ट सिद्ध होते ग्रहांच्या होणाऱ्या योगांवर दुर्लक्ष करून चालणार नाही. ह्याचा अजून अभ्यास व्हावा. मी माझ्या बुद्धीला जेवढे समजले तेवढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.  ज्योतिष प्रेमींनी,गुरूंनी ह्यांवर अजून प्रकाश टाकावा. काही मुद्दे माझ्याकडून  राहून गेले असावेत ते नक्की नमूद करा. 
आजप्रमाणेच १७ तारखेपर्यंत घडणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवून रहावे. 

अनुप्रिया देसाई 
९८१९०२१११९

रविवार, २५ मार्च, २०१८

शनि -मंगळ युती - सावधान


शनि -मंगळ युती - सावधान

शनि आणि मंगळ हे दोन ग्रह सध्या एकाच राशीत म्हणजेच धनु राशीत आहेत. २ एप्रिल रोजी ह्या ग्रहांची अंशात्मक युती होत आहे. ही युती १७ एप्रिल पर्यंत असणार आहे. ही युती होणे म्हणजे राजकीय आणि सामाजिक अस्थैर्य निर्माण होणे,घातपात,अपघात होणे. ज्यांचा ज्योतिष -शास्त्राचा अभ्यास नाही त्यांच्यासाठी ग्रहांची युती म्हणजे काय हे थोडक्यात पाहूया - :

ग्रहांची युती म्हणजे ग्रह एकाच राशीत एकाच अंशावर येणे. ग्रहांची युती होणे म्हणजे दोन्ही ग्रहांच्या शक्तिचा  मिलाप. गुरु हा ग्रह मुळातच शुभ ग्रह मानला गेला आहे. गुरु जेंव्हा चंद्राच्या युतीत येतो तेंव्हा "गजकेसरी" योग होतो.  शुक्र जेंव्हा चंद्राच्या युतीत असतो तेंव्हा जातकाला शुभ फळे मिळतात. रवि आणि बुध जेंव्हा युतीत असतात त्या योगाला "बुधादित्य योग" होतो. असा योग असल्यास मुळातच व्यक्ति कुशाग्र बुद्धीची असते. चंद्र जेंव्हा मंगळाच्या युतीत असतो तेंव्हा त्या योगाला "लक्ष्मीयोग" म्हणतात.

परंतु जेंव्हा शनिसारखा ग्रह मंगळाच्या युतीत येतो तेंव्हा मात्र परिस्थिती वेगळी असते. युती म्हणजे दोन्ही ग्रहांच्या शक्ति एकत्र येणे. शनि हा वायुतत्त्वाचा ग्रह. शनि ह्या ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या गोष्टी म्हणजे - : लोखंड -अर्थात रेल्वे,लोखंडाच्या मोठमोठ्या क्रेन्स,मोठी जहाजं,विमानं, शस्त्र-अस्त्र, वाफेवर चालणाऱ्या गोष्टी, बर्फ, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू, खनिजे ( Minerals ),सर्व प्रकारच्या खाणी - सोन्याची खाण,कोळश्याची खाण, समुद्राखालील खनिजे,गॅस सिलेंडर इ.

मंगळ ह्या ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या गोष्टी - : उष्णता,आग,रसायने,अपघात,युद्ध,रक्तपात,स्फोटक रसायने- बॉम्ब, ज्वालामुखी, धारधार आणि स्फोटक  शस्त्रात्रे - तलवार,बंदूक,तोफ इ.

जेंव्हा मंगळ आणि शनि हे दोन ग्रह एकत्र येतील तेंव्हा काय घटना घडू शकतील ह्याची कल्पनाच केलेली बरी.
सध्या शनि महाराज धनु राशीत १४ अंशावर असून पूर्वाषाढा नक्षत्रात आहे. मंगळाने धनु राशीत मार्च महिन्यात प्रवेश केला आणि सध्या ७ अंशावर असून शनिच्या युतीत आहे. परंतु २ एप्रिल रोजी दोन्हीही ग्रह १४ अंशावर असतील. दोन्ही ग्रहांच्या अंमलाखाली येणाऱ्या गोष्टींचा उल्लेख मी वर केलेलाच आहे.

आधी जेंव्हा जेंव्हा शनि आणि मंगळाच्या युती झाली होती तेंव्हा काय घडले ह्याची दोन उदाहरणे देत आहे- :
  • २२ ऑगस्ट  २०१६ - बिहारमध्ये पूर आला होता. तेंव्हा शनि आणि मंगळाची युती वृश्चिक ह्या जलतत्त्वात झाली होती.
  • ३ ऑगस्ट २०१४ - लुद्दिन - चीन इथे भूकंप झाला होता. ह्या भूकंपाची तीव्रता Ms - 6.5, Mw - 6.1 इतकी होती. तेंव्हा शनि आणि मंगळ तूळ ह्या वायुतत्त्वाच्या राशीत युतीत होते. ह्या दोन ग्रहांबरोबर चंद्र त्याच राशीत होता. 
ह्या वर्षी शनि आणि मंगळाची जी युती होणार आहे ती धनु ह्या अग्नितत्त्वाच्या राशीत होत आहे. ह्या युतीचे काय परिणाम मिळणार ह्याची शक्यता वर्तवता येईल.  -

१) हे दोन्ही ग्रह जेंव्हा एकाच राशीत आणि एकाच अंशावर येतील तेंव्हा काही घातपात, मोठे अपघात होण्याची शक्यता असते.

२) मोठाली जहाजं,विमानं ह्यांचा अपघात होणे. रेल्वेचे अपघात होणे.

३) नैसर्गिक आपत्ती - पूर येणे, ज्वालामुखीचा उद्रेक होणे,भूकंप होणे.

४) इमारती किंवा डोंगर ढासळणे,दरडी कोसळणे.

५) घातपाताचा कारवाया जसे की - बॉम्बस्फोट होणे, दहशतवाद, आतंकवाद घडणे.

६) अचानक दंगली सुरु होणे. धार्मिक -जातीय दंगली घडणे -घडवणे होऊ शकते. लोकांनी मोर्चा काढणे- चर्चेतून गैरसमज निर्माण होणे इ. 

७) राजकीय क्षेत्रात घडामोडी होणे.

८) रसायनांचा टँकर उलटून अपघात होणे. वायुगळती होणे. वायूगळतीमुळे अपघात होणे.

९) साडेसाती सुरु असणाऱ्या राशींनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी. धनु,वृश्चिक,मकर, वृषभ आणि मिथुन ह्या राशीच्या लोकांना शारीरिक पीडा जाणवते.

शनि आणि मंगळाच्या युतीबरोबरच गुरु आणि बुध हे दोन ग्रह सध्या वक्री आहेत. गुरु आणि बुध म्हणजे देशाची Economy. हे दोन ग्रह वक्री म्हणजे देशाच्या आर्थिक व्यवस्थेत उलाढाल - शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर  उलाढाल होणे ही शक्यता आहे. तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्हांला बोलण्यातून गैरसमज होत आहेत हे जाणवेल. आपला मुद्दा समोरच्याला समजेल असे बोलणे असावे. कागदोपत्री व्यवहारात विलंब होत राहील ज्यामुळे तुमचे पुढचे व्यवहार ठप्प होतील. 
ह्या सर्व शक्यता वर्तवल्या आहेत त्यामुळे ह्या लेखाचा उद्देश लोकांनी घाबरून जाणे असा मुळीच नाही. परंतु स्वतःची सद्सद्विवेकबुद्धी जागृत असावी हे अपेक्षित आहे. मग ह्या शक्यतांचा फायदा काय ? घडणाऱ्या गोष्टी तर घडणारच आहेत. परंतु आपण काळजी नक्कीच घेऊ शकतो.  कुठल्याही धार्मिक वादावर अथवा गोष्टींवर फार चर्चा करू नये. अशा गोष्टी शक्यतो टाळाव्यात ज्यामुळे वाद विकोपाला जाऊ शकतात.प्रवासात असतांना सावधानता बाळगावी. सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद वस्तू आढळल्यास हलगर्जीपणा बाळगू नये. 

अनुप्रिया देसाई
९८१९०२१११९







बुधवार, २१ मार्च, २०१८

डॉक्टर होण्याचे कुंडलीतील योग


डॉक्टर होण्याचे कुंडलीतील योग

प्रत्येक पालकाला आपले मुल शिकून त्याने खूप प्रगती करावी असे वाटते. त्यापैकी काही पालकांची ही इच्छा असते की आपल्याला मुलाने/मुलीने डॉक्टर व्हावे अथवा इंजिनिअर व्हावे. परंतु काहीच पालकांची ही इच्छा पूर्ण होते. मुलांचा स्वतःचा असलेला कल,अभ्यास -चिंतन -मनन करण्याची तयारी/क्षमता,पालकांची आर्थिक परिस्थिती ह्या आणि अशा बऱ्याच गोष्टींवर मुलांचे डॉक्टर होणे अवलंबून असते. कुंडलीतील काही विशिष्ट योगांवरून मुल डॉक्टर होणार का ? ह्याची कल्पना येते. त्याच योगांबद्दलची माहिती ह्या लेखाद्वारे तुमच्या समोर मांडत आहे.

कुंडलीचे एकूण बारा भाग. प्रत्येक भागाचे काही वैशिष्ट्य असते. ह्या प्रत्येक स्थानांचा अभ्यास करूनच व्यक्ति आयुष्यात कोणत्या पद्धतीचे कार्य करणार आहे ह्याची कल्पना येऊ शकते. व्यक्ति डॉक्टर होणार का ह्यासाठी प्रथम स्थान,अष्टम स्थान,षष्ठ स्थान,पंचम,दशम,एकादश स्थान इ. स्थानांचा विचार होतो. स्थानांबरोबरच राशी आणि ग्रहांचे योगही अभ्यासावावे लागतात.

काही राशी ह्या नैसर्गिक "Healers" आहेत असे मला वाटते. वृश्चिक,कन्या,धनु, तूळ आणि मेष ह्या नैसर्गिक "Healers" आहेत. नैसर्गिक "Healers" ह्याचा अर्थ  निसर्गतःच त्यांच्यात दुसऱ्या व्यक्तिंना बरे करण्याची क्षमता आणि बुद्धिमत्ता असते. त्याला वैद्यकशास्त्राच्या शिक्षणाची जोड मिळाल्यानंतर तर अशा व्यक्ति काही काळातच प्रसिद्ध होतात. ह्यांच्या फक्त बोलण्याने अथवा समजावण्याने पेशंटला बरे वाटू लागते,आत्मविश्वास वाढतो. ह्या राशी असण्याबरोबरच पत्रिकेत रवि आणि मंगळ ह्या ग्रहांची स्थिती अभ्यासावी. रवि आणि मंगळ हे दोन्ही ग्रह  वैद्यकशास्त्र शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. हल्ली पालक आमचा मुलगा अथवा मुलगी फक्त डॉक्टर होणार की त्यातही सर्जन होणार की काही स्पेशिअलिटी असेल हे सुद्धा विचारतात. त्यासाठी खालील योग आणि ग्रहस्थिती अहम ठरते.

सामान्य लोकांना मुख्यतः तीन प्रकारची उपचारपद्धती  माहिती आहे. १) अलिओपॅथी २) होमिओपॅथी ३) आयुर्वेदिक पद्धती. सध्या काही डॉक्टर नवीन पद्धतीने उपचार करतांना दिसतात. त्यात ते पेशंटच्या शारीरिक क्षमतेप्रमाणे (Immune System), मानसिकता psychological pattern ह्याप्रमाणे तीन पद्धतींपैकी दोन पद्धतीचा एकत्रितपणे उपचार करतांना आढळून येतात.

ह्या तीन उपचारपद्धती बरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर आहेत. मानसोपचारतज्ञ, कान-नाक-घसा ह्याचे तज्ञ,डोळ्यांचे तज्ञ,हाडांचे तज्ञ (आर्थोपेडिक),प्लॅस्टिक सर्जन,हार्ट स्पेशीआलिस्ट,न्यूरोसर्जन इ. आणि सध्या तर गेल्या ७-८ वर्षात "ऑन्कोलॉजिस्ट"  (कॅन्सर तज्ञ आणि सर्जन ) डॉक्टरांची गरज जास्तच भासू लागली आहे. आपले मुलं कोणत्या प्रकारचे शिक्षण घेणार हे कुंडलीवरून नक्कीच समजू शकते. 

कुंडलीत रवि उच्चीचा असणे,महादशा पूरक लाभणे  म्हणजे व्यक्तिचे अलिओपॅथीचे शिक्षण होणार हे निश्चित. शनि आणि गुरुचे कुंडलीतील वर्चस्व म्हणजे आयुर्वेदिक शास्त्राचा अभ्यास. शुक्र,शनि कुंडलीत बलवान असणे म्हणजे होमिओपॅथीचा अभ्यास. ह्याचबरोबर, 

१) कुंडलीत रवि अष्टम स्थान,लाभ स्थान चांगल्या स्थितीत असेल तर व्यक्ति हार्ट सर्जन होऊ शकते.

२) कुंडलीतील चंद्र चांगल्या स्थितीत असणे,चंद्राबरोबर बुध आणि गुरु चांगल्या स्थितीत म्हणजेच व्यक्ति मानसोपचारतज्ञ होऊ शकते.

३) पंचम स्थानाबरोबर अष्टम स्थान आणि रवि,शुक्र,मंगळ ह्यांचा योग गायनॅकोलॉजिस्ट होण्याचे आहेत.

४) शुक्र,बुध,राहू  ह्या ग्रहांबरोबर अष्टम स्थान असेल तर व्यक्ति प्लॅस्टिक सर्जन होते.

५) अष्टम स्थानबरोबर केतू,गुरु,मंगळ ह्या ग्रहांचा योग म्हणजे "ऑन्कोलॉजिस्ट" डॉक्टर  होणार.

६) रवि ग्रहाबरोबरच शनि ग्रहाची पत्रिकेतील स्थिती आणि स्थान ह्यावरून व्यक्ति आर्थोपेडिक सर्जन होणार हे कळून येते.

७) शुक्र,चंद्र,रवि ग्रह आणि द्वितिय,व्यय स्थान ह्यावरून व्यक्ति डोळ्यांचा तज्ञ हे निश्चित.

८) बुध,शुक्र,शनि ह्यांचा संयोग आणि द्वितीय,तृतीय स्थानांमधील योग म्हणजे ENT Specialist.

९) बुध,मंगळ ह्या ग्रहांचा योग,मेष राशीचे कुंडलीतील स्थान म्हणजे व्यक्ति "न्यूरोसर्जन" होणार.

ह्या सर्व योगांबरोबरच कुंडलीत सुरु असलेल्या महादशा पूरक असाव्या लागतात. त्यावरूनच हे निश्चित करता येते की व्यक्ति कुठच्या पद्धतीने लोकांना बरे करण्यात यशस्वी ठरणार. तुमच्या मुलांच्या कुंडलीत कुठले योग आहेत हे तुम्ही पाहण्याआधी तुम्हांला काही गोष्टी स्पष्ट कराव्याशा वाटतात-

तुमच्या मुलाला आधी व्यवस्थित ओळखा. बरेच पालक ह्याच भ्रमात असतात की आम्हांला आमच्या मुलाबद्दल माहिती आहे. परंतु प्रत्यक्षात तसे नसते. पालकांना त्यांच्या मुलाची बुद्धीची कुवत,अभ्यास करण्याची क्षमता, एका जागी बसण्याची तयारी, मुलं सकाळी अभ्यास करू शकतो की संध्याकाळी ?, मनाची चंचलता, दुसऱ्या व्यक्तिबरोबर सतत आपली बरोबरी करण्याची सवय, Inferiority Complex असणे, अभ्यासापेक्षा खेळांत जास्त प्राविण्य मिळवण्याची क्षमता ह्या सर्वांची अजिबात कल्पनाच नसते. काही वेळेस तुम्हांला मुल हुशार असल्याने डॉक्टरच व्हावे असे जरी वाटत असले तरी मुलाला डॉक्टर होण्यात स्वारस्य नसते. किंवा डॉक्टर होऊनसुद्धा अशा व्यक्ति मग वेगळ्याच क्षेत्रात काम करतांना दिसतात. माननीय डॉक्टर आमटे ह्यांचे उदाहरण आपल्या सर्वांसमोर आहेच. डॉक्टर होऊन दुर्गम ठिकाणी जाऊन आदिवासी लोकांना आपल्या ज्ञानाचा उपयोग करून बरे करण्यात त्यांना आनंद मिळतो.

म्हणूनच आपल्या मुलांना आधी ओळखा. Three Idiots फिल्ममधील एक सवांद कधीच विसरू नका -

"Success के पिछे मत भागो. Excellence के पिछे भागो. Success पिछे आएगी"





बुधवार, २४ जानेवारी, २०१८

वास्तूतील नकारात्मक ऊर्जा कशी कमी कराल ?


वास्तू संदर्भात अनेक लेख आणि पुस्तके उपलब्ध आहेत तरी सुद्धा वास्तूबद्दलचे प्रश्न आणि शंका मनात सतत वाटत असतात. वास्तूतील ऊर्जा कशी वाढवावी आणि तिला रिचार्ज कसे करावे ह्यांवर लिहिलेल्या लेखाला वाचकांचा छान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर वाचकांकडून 'वास्तूतील नकारात्मक ऊर्जा कशी कमी करावी ह्यांवर काही लिहा' अशी विनंती होत होती. आजचा लेख ह्याच विषयावर आहे. काही वेळेस आपण कळत नकळत ज्या गोष्टी वास्तूत ठेवतो त्याचा कालांतराने वास्तूवर सकारात्मक परिणाम होण्याऐवजी नकारात्मक परिणाम होत जातो. अशा कुठल्या वस्तू किंवा गोष्टी घरात असू नयेत आणि वास्तूतील गोष्टी कशा प्रकारच्या असाव्यात ह्यांवर काही टिप्स देण्याचा हा प्रयत्न -

१) मुख्य दरवाजा - घरात ऊर्जेचा प्रवेश होतो तो मुख्य दरवाजाने. ह्यामुळे मुख्यदरवाज्यासमोर अडथळे असू नयेत. अडथळे ह्याचा अर्थ खूप सामान असू नये. चपलांचा रॅक दरवाज्यात समोरच असू नये. काही व्यक्तिंना फुलांची आवड असल्याने मोठमोठया फुलदाण्या मुख्य दरवाज्यातच ठेवल्या जातात. ज्यांमुळे मुख्यदरवाजतून घरात प्रवेश करणे काही वेळेस अडचणीचे ठरते.

मुख्य दरवाजा मोठा असल्यास तेवढी अडचण येत नाही परंतु शहरात छोट्या घरांमुळे प्रवेशद्वार हे फार मोठे नसते. काही वेळेस घरात प्रवेश केल्यानंतर narrow passage असतो. अशा पॅसेज मध्ये फुलदाण्या ठेवूच नयेत. पॅसेजच्या भिंतीवर छान paintings करू शकता ज्यामुळे प्रवेश करताच मन प्रसन्न होईल. दरवाजावर फार गोष्टी असू नयेत. काही वास्तूत मुख्य दरवाज्यावर भरपूर प्रमाणात खोटी प्लॅस्टिकची फुले,विचित्र चित्रे असलेली मी पाहिली आहेत. असे असू नये. वास्तू शास्त्राप्रमाणे प्रवेशद्वार हे दोन्ही बाजूने उघडणारे असावे. परंतु दोन्ही बाजूने उघडणारे दार हे स्वतःचा बंगला असेल तरच शक्य आहे,शहरात तर बिल्डर्स जसं घर बांधून देतो त्यावरच सगळं विसंबून आहे. आणि मुख्य म्हणजे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो परंतु मुख्य प्रवेशद्वाराची साफसफाई विसरून जातो. कित्येक महिन्यांची धूळ साचलेली असते. सणासुदीला लावलेल्या फुलांचे तोरण कित्येक महिने तिथेच असल्याने 'Decompose' होण्यास सुरवात झालेली असते. हे सर्व साफ झाले पाहिजे. सकारत्मक ऊर्जा हवी असल्यास मुख्यद्वाराजवळील अडथळे असू नयेत आणि प्रसन्न प्रवेश असावा.

२) खिडक्या आणि पडदे - मुख्यद्वारातून जसा ऊर्जेचा प्रवेश होतो त्याच प्रमाणे हवा खेळती ठेवणे हे काम आहे खिडक्यांचे. वास्तूत योग्य प्रमाणात आणि योग्य उंचीच्या असलेल्या खिडक्या नकारात्मक उर्जेला थारा देत नाहीत. खिडक्या ह्या योग्य दिशेत मोठ्या असाव्यात. खिडक्यांचे गज (Grill ) योग्य प्रमाणात असावे. ज्यामुळे सूर्यप्रकाश आणि हवा वास्तूत खेळती राहील. ज्या घरात सूर्यप्रकाश व्यवस्थित प्रमाणात येत नाही त्या वास्तूत 'Dull' वाटते. अशा वास्तूत काही वेळ जरी व्यतीत केला तरी डोके जड होणे,मळमळणे असे वाटू शकते. जर खिडक्या योग्य प्रमाणात नसतील किंवा सूर्य प्रकाश घरात फार वेळ राहत नसेल अशा वास्तूत 'Light Arrangement' व्यवस्थित असावी. गरज असल्यास 'Air Cooler' ठेवून हवा खेळती राहील ह्यांवर लक्ष्य द्यावे.

बऱ्याच वास्तूत मी पडद्यांचा विचित्र रंग पाहिला आहे. पडद्यांसाठी काळा रंग हा वास्तूत वापरूच नये. जर वास्तूत सूर्यप्रकाश योग्य प्रमाणात नसेल तर काळा किंवा गडद (Dark) रंग टाळलेलाच बरा ! हलक्या रंगाचे पडदे, भिंतीच्या रंगला साजेसा रंग निवडावा. ज्यामुळे नकारात्मक उर्जेला थारा उरणार नाही.

३) खेळती हवा - वास्तूत हवा खेळती असावी. व्हेंटिलेशन व्यवस्थित असले पाहिजे. जर खिडक्या कमी असल्या तरी जितक्या खिडक्या आहेत त्या बंद असू नयेत. काही वेळेस जातकांची तक्रार ही असते की खिडक्या उघड्या ठेवल्या की बाहेरची धूळ घरात येते वगैरे वगैरे. असा वेळेस पूर्णवेळ खिडक्या बंद न ठेवता काही वेळापुरत्या खिडक्या उघडाव्यात. मुख्य दरवाजा उघडावा. ज्यामुळे हवा खेळती राहण्यास मदत होईल. सततच्या बंद खिडक्या आणि दरवाजा ह्यामुळे वास्तूतील हवा दमकट होते. अशा वास्तूत एक प्रकारची दुर्गंधी येण्यास सुरवात होते. त्यामुळे हवा खेळती असण्याकडे लक्ष्य द्या. वास्तू नेहेमीच सुगंधाने दरवळली पाहिजे. कृत्रिम Freshener पेक्षा आपल्याकडे भारतीय आणि पारंपरिक बरेच उपाय आहेत. शेणाच्या गोवऱ्यांच्या वापराने वास्तूतील दुर्गंधी तर जाईलच परंतु नकारात्मक ऊर्जा आणि कीटक/डास ह्यांचा होणारा प्रादूर्भाव थांबेल. शेणाच्या गोवऱ्या वापरणे शक्य नसेल तर पाण्यात जाई-जुईच्या अत्तराचे चार -पाच थेंब घालून संपूर्ण घरात हे अत्तर शिंपडावे. दुर्गंधी नाहीशी होईल. आणि वास्तूत एक नैसर्गिक सुवास दरवळत राहील. वास्तूत धूप घालणे,अग्निहोत्र करणे ह्यामुळे बऱ्याच जातकांना फायदा झालेला आहे. तुम्ही सुद्धा अनुभव घेऊ शकता.

४) पुनर्रचना/ Rearrangement  - काहीवेळेस वास्तूत ठेवलेल्या वस्तू जसे सोफा,खुर्च्या,टी.व्ही.,टेबल ह्या वर्षानुवर्षे एकाच जागी असल्याने घरात वावरणाऱ्या व्यक्तिंना सुद्धा मग कंटाळा येऊ लागतो. अशा वेळेस वास्तूत फेररचना करू शकतो, ज्यामुळे वास्तू अजून प्रसन्न वाटेल.



५) वस्तूंची साठवण - भारतीय लोकांना असलेली एक सवय म्हणजे - जिथे फिरायला जातील तिथून भरपूर वास्तू आणणे आणि घरात साठवून ठेवणे. त्या वस्तूंची कालांतराने काळजी घेतली न गेल्यामुळे त्या वस्तू तशाच पडून राहतात. तुम्हीच तपासून पहा. तुमच्या शोकेस मध्ये अशा किती वस्तू आहेत ज्यांना तुम्ही वर्षानुवर्षे शोकेसमधून बाहेरच काढलेलं नसेल. ज्याचा तुम्हांलाच विसर पडलेला असतो. अशा वापरात नसलेल्या वस्तूंचा निचरा लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. बंद पडलेली घड्याळे,धूळ खात असलेली पुस्तके,शो-पिसेस, फुलदाण्या,वापरात नसलेली शेगडी,स्टोव्ह अशा वस्तुंनी वास्तूतील ऊर्जा 'Drain' होते. त्यामुळे अशा वस्तूंचा निकाल लवकरात लवकर लावणे. तुमच्या वास्तूतील ऊर्जेसाठी ह्या बंद आणि धूळ खात असलेल्या वस्तू हानिकारक ठरतात.

६) मिठाचा प्रयोग - वास्तू होणारा जाड मिठाचा प्रयोग आता नवीन नाही. भारताबाहेरील प्रगत देशात जाड मिठाचा प्रयोग नकारत्मक ऊर्जा घालवण्यासाठी मोठं मोठे Therapistही सुचवू लागले आहेत. जाड मिठाचा प्रयोग भारतात बऱ्याच काळापासून सुरु आहे. नाकारत्मक ऊर्जा ह्या शब्दापेक्षा आपल्याकडे "नजर लागणे" हा शब्द प्रयोग जास्त वापरला गेला. नजर लागली असं म्हणत तुमच्या आईने -आजीने तुमची नजर जाड मिठाने बऱ्याचदा काढली आहे. असं केल्याने लगेच गुण येतो असा शिक्कामोर्तबही झालेला असतो. आपल्या आजीला नकारत्मक ऊर्जा वगैरे शब्दप्रयोग माहीत नव्हते.
जाड मिठाच्या वापराने फरक पडतो ह्यांवर तिचा ठाम विश्वास होता आणि आहे. हेच आपल्याला आजच्या काळात त्यामागचे शास्त्र समजून पाळायचे आहे. जाड मीठ पाण्यात घालून त्या पाण्याने फारशी पुसून घेणे,जाड मीठ आणि निलगिरीच्या तेलाचे काही थेंब पाण्यात घालून ते पाणी शिंपडल्याने वास्तूतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होण्यास मदत होते. ह्या बरोबरीने जाड मीठ चिनी मातीच्या वाडग्यात किंवा चक्क मातीच्या मोठ्या पणतीत ठेवून घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवल्यानेही चांगले परिणाम मिळतात. हे मीठ कधी बदलावे ?  - जर वास्तू फारच  Dull वाटत असेल तर ४८ तासांत मीठ बदलावे. वाडग्यातील मीठ टॉयलेट मध्ये flush करावे आणि नवीन मीठ वाडग्यात ठेवावे. नाहीतर दर १० -१२ दिवसांनी मीठ बदल्यास चालू शकेल. हा प्रयोग नक्की करून पहा.

७) रोपटी आणि फुलझाडे - वास्तूत खऱ्या रोपट्यांचा आणि छोट्या फुलझाडांचा वापर केल्यास वास्तू प्रसन्न वाटते. फक्त ह्याचा वापर करतांना डास आणि माशा ह्यांचा उपद्रव होणार नाही ना ह्याची काळजी घ्यावी.



८) वास्तूतील चित्रे आणि फोटो  -
काही जातकांच्या घरी मी विचित्र अशी चित्रे आणि फोटो भिंतीवर पाहिली आहेत. रडणाऱ्या मुलाचे चित्र, दुःखी स्त्री,लढाईचा प्रसंग असलेले चित्र,डरकाळी फोडणारा सिंह किंवा वाघ - अशा चित्रांनी काय साध्य होते माहित नाही. आर्ट म्हणून ठीक आहे परंतु अशा चित्रांचा वास्तूतील वापर हानिकारकच ठरतो.


ह्या सर्व चित्रात दुःखाचा आणि रागाचा आवेग दिसून येतो. अशी चित्रे वास्तूत ठेवल्याने आपले लक्ष सतत अशा चित्रांकडे जाते. अशाच प्रकारचा स्वभाव आपला बदलत जातो. सिंहाचे चित्र असावे परंतु त्यातून 'Leadership Quality' झळकावी. स्त्रीचे चित्र जरूर असावे परंतु त्यातून तिच्या आनंदाच्या लहरींचे कंपन असावे, मुलाचे चित्र असावे असे ज्यातून त्याचा नटखटपणा,खेळकरपणा आणि निरागसता झळकावी. आणि म्हणूनच कृष्ण आणि यशोदेचे चित्र लावण्याची प्रथा असावी. नक्की विचार करा. तुम्हांला कुठल्या प्रकारची ऊर्जा हवी ते ठरवून चित्र निवडावे. 

९) भिंतीचा रंग - हल्ली भिंतींवर रंगसंगतीचा वापर चांगल्या प्रकारे केला जाऊ शकतो. गडद रंगाचा वापर करताना कुठल्या भिंतीवर हा प्रयोग करीत आहोत ह्याची काळजी घ्यावी. गडद रंग वापरतांना हलक्या रंगाचाही प्रयोग करावा. अशा खोलीत प्रकाश भरपूर असावा अथवा गडद रंगामुळे खोली लहान असल्याचा भास होतो.  

१०) घड्याळ - मुंबईत तर प्रत्येक खोलीत घड्याळ असणे अनिवार्य आहे. घड्याळावरच आपुले जीवन! वास्तूत घड्याळ शक्यतो पूर्व-पश्चिम किंवा उत्तरेच्या भिंतीवर असावे. वास्तू -व्हिजिटला गेल्यावर मला वेगवेगळ्या आणि विचित्र प्रकारची घड्याळे असू शकतात हे लक्षात आले. घड्याळ नेहमी 'काळ' दाखवतो. त्यामुळे घड्याळाची निवडही महत्त्वाची ठरते. ह्या बरोबर मी काही फोटो देत आहे. ह्या फोटोत दाखवलेली घड्याळे तुम्ही तुमच्या वास्तूत ठेवणे म्हणजे नकारत्मक उर्जेला आमंत्रण आहे. 


वर दिलेल्या सूचना आणि टिप्सचा वापर करून तुम्हांला तुमच्या वास्तूतील नकारत्मक ऊर्जा नाहीशी करण्यात नक्कीच मदत होईल अशी आशा आहे. 

प्रतिक्रिया नक्की कळवा. 
अनुप्रिया देसाई 
९८१९०२१११९

वास्तुपुरुष पालथा का प्रस्थापित करावा ?

वास्तूपुरुष कसा निक्षेपित करावा ?
वास्तुपुरुष पालथा का प्रस्थापित करावा ?  

हिंदू शास्त्रमान्यतेनुसार अंधकासूराशी लढताना महादेवाला अंगातून निघालेल्या घामाच्या थेंबातुन एका राक्षसाचा जन्म झाला. जन्माला आल्यापासूनच त्याने त्याच्या वाटेत येणाऱ्या सर्व गोष्टी गिळंकृत करण्यास आरंभ केला. आता आपण निर्माण केलेली ही सृष्टी धोक्यात आहे हे लक्षात आल्यावर ब्रह्मदेव आणि विष्णुंनी, शिवाकडे धाव घेतली. ह्या राक्षसावर वेळीच ताबा मिळवला नाही तर सृष्टीचे काही खरे नाही,तेंव्हा ह्यांवर काही उपाय सुचविण्यास शिवाला प्रार्थना केली. शिवाने युक्तीने त्या राक्षसाला आपला आशिर्वाद घेण्यास भाग पाडले. आशिर्वाद घेण्यासाठी जेंव्हा हा राक्षस शिवाच्या चरणी लीन झाला तेंव्हा सर्व अष्टदिग्पालांनी,देवतांनी त्याला सर्व दिशेकडून कोंडले. शिवने आपलं उजवा पाय राक्षसाच्या डोक्यावर ठेवून त्याला ताब्यात आणले. त्यामुळे ह्या राक्षसाला पुन्हा उच्छाद मांडता येणार नाही अशी शिवाची ही योजना होती. ह्या राक्षसाला वर देत शिवाने  त्याचे नाव "वास्तू पुरुष" ठेवले. वर देतांना शिवाने त्यास कोणालाही ह्यापुढे दुखावणार नाहीस असे वचन वास्तुपुरुषाकडून घेतले. वास्तूत राहणाऱ्या व्यक्तिंनी वास्तुपुरुषाची आठवण ठेवावी अशी सूचना शिवाने मानवजातीला दिली. 

 खालील चित्रात पहा वास्तू पुरुष हा नमस्कार करण्याच्या मुद्रेत आहे.   म्हणूनच वास्तू पुरुषाची प्रतिमा आपल्या वास्तूत प्रक्षेपित करतांना वास्तू पुरुषाचा चेहरा खालच्या बाजूस असावा. ह्याला "वास्तुपुरुष मंडळ" म्हणतात.  चित्रात जिथे वास्तुपुरुषाची शेंडी दाखवली आहे तिथे "ईश" असे लिहिलेले आहे. यश म्हणजे ईश्वर - शिव. वर आपण वाचले की शिवाने राक्षसाच्या डोक्यावर आपला पाय ठेवला. म्हणूनच ह्या स्थानाला शिवाचे स्थान मानले जाते. ज्याला आपण "ईशान्य" दिशा म्हणून संबोधतो. म्हणून ही दिशा शक्य तितकी स्वच्छ असावी. 

 वास्तुपुरुष मंडळ 

शिवाबरोबरच पूर्व दिशेला "आदित्य" देवता असते. चित्रात पूर्व दिशेला "सूर्य" असे लिहिले आहे. ह्या दिशेने सूर्यदेवतेने राक्षसाला ताब्यात ठेवले आहे. आग्नेय दिशेत (South -East ) अग्नि देवतेने,दक्षिणेला "यमाने" नैऋत्य दिशेने ( पश्चिम -दक्षिण ) "पितरांनी, पश्चिमेने "वरुण" देवतांनी ताब्यात ठेवले आहे. वरील चित्रात सर्व देवता आणि राक्षसांनी वास्तू पुरुषाला "control" मध्ये ठेवले आहे. 

ह्या सगळ्या देवतांबरोबरच चित्रात "ब्रह्म स्थानही दाखवण्यात आले आहे. ह्या ब्रह्म स्थानांत शक्यतो वजन येऊ देऊ नये. ब्रह्मस्थानांत फ्रीज,भिंत किंवा तत्सम जड वस्तूंमुळे झालेले दुष्परिणाम मी वेगवेगळ्या वास्तूत पाहिलेले आहेत. 


उत्तर दिशेत "कुबेर" देवता आहे. ह्या दिशेत शक्यतो पाण्याचा साठा असावा. पाण्याचा साठा ह्याचा अर्थ पाण्याचा कलश, फिश टॅंक इ. 


पश्चिम दिशेत जिथे "वरुण" देवता आहे तिथे विंड चाईम्स किंवा बासुरी असावी. 


पूर्व दिशेत जिथे "आदित्य/सूर्य" लिहिले आहे तिथे सूर्याची प्रतिमा असावी. 


आग्नेय दिशेत स्वयंपाक घर असावे. परंतु फ्लॅट सिस्टिममुळे ते शक्य नाही. त्यासाठी विना तोडफोड उपाय आहेत. 


वास्तूत राहणाऱ्या व्यक्तिंनी वर्षातून एकदा तरी ह्या सर्व देवतांची आराधना करावी. ह्या सर्व देवता किंवा शक्ती म्हणू,ह्या शांत राहतील ह्यासाठी वास्तूत वर्षातून एकदा होम/हवन करून घ्यावे. रामरक्षा,सप्तशती पाठ करून घ्यावा. वास्तूत कलह,क्लेश करू नये. सकाळी वास्तूत गोमूत्र शिंपडावे. संध्याकाळी अग्निहोत्र करू शकाल. अगदीच काही नाही जमले तरी वास्तू जमेल तितकी स्वच्छ ठेवावी. 



सोमवार, २२ जानेवारी, २०१८

ब्रह्मांडातील रत्ने

ब्रह्मांडातील रत्ने 

माझ्या ज्योतिष आणि वास्तू शास्त्रावरील पुस्तकाला उदंड प्रतिसाद मिळाला. गेल्या गणेश जयंतीला हे पुस्तक प्रसिद्ध केले होते. काल बरोबर एक वर्ष पूर्ण झाले. ह्या एका वर्षात लोकांच्या मनातून ज्योतिष शास्त्राबद्दलची भीती कमी करता आली ह्यांत आनंद आहे. मुळातच ह्या पुस्तकांत फार ज्योतिष शास्त्रीय भाषा वापरलेली नाही. सर्वसामान्य जातकांना वाचता येईल अशा पद्धतीने वाक्यरचना आणि केसेस दिलेल्या आहेत. पुस्तक वाचून  झाल्यावर आवर्जून फोन करून वाचकांनी त्यांना पुस्तक आवडल्याचे कळवले. पुस्तकातील वास्तू शास्त्राच्या टिप्स त्यांना उपयोगी ठरत आहेत. सर्व वाचकांचे आणि जातकांचे आभार !!!

अनुप्रिया देसाई 
९८१९०२१११९

मंगळवार, २ जानेवारी, २०१८

नवीन वर्ष साजरे करण्याचा राशींच्या तऱ्हा


नवीन वर्ष साजरे करण्याचा राशींच्या तऱ्हा 



३१st ला काय प्रोग्राम ? हा प्रश्न वातावरणात घुमू लागला आहे. गुलाबी थंडीबरोबरच नवीन वर्ष साजरा करण्याचा  उत्साह जाणवतो आहे. गेल्या थर्टीफस्टला काय केले होते ? मग आता ह्या वेळी काय करायचे ? ह्यांवर सगळ्यांचे  प्लॅन्स सुरु झालेले आहेत. थर्टीफस्टला नवीन संकल्पांचीही जाहीरात केली जाते. ह्यावर्षी कोणी नवीन घर घेणार ह्याचा संकल्प,तर कोणी नोकरी बदलणार हा संकल्प करतो. सर्वात जास्त संकल्प केला जातो तो वजन कमी करण्याचा. प्रत्येकाचा संकल्प वेगळा.

मला विचाराल तर माझं वैयक्तिक मत वेगळं आहे. मराठी शाळेत झालेल्या शिक्षणामुळे,कायम भारतीय संस्कार मनात खोलवर रुतलेले आहेत. नवीन वर्ष हे गुढीपाडव्यालाच. हिरव्या शालूने आणि झेंडूच्या फुलांनी बहरलेला निसर्ग. नवीन वर्ष सुरु झाल्याची ग्वाही निसर्गच प्रत्यक्षात देत असतो. ख्रिसमस ट्रीपेक्षा कडुनिंब आणि तुळस ही रोपटी नेहेमीच जवळची वाटत आली आहेत. ह्या दिवशी गुढी उभारून नवीन वर्षाची सुरवात होते. कडुनिंब,धणे  आणि गूळ हे मिश्रण चघळणे ह्या दिवशी अनिवार्य. घरी पुरणपोळीचा छान बेत. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणं, मंदिरात जाऊन दर्शन घेणं हे आलंच. कुठेही आळस जाणवत नाही. सगळीकडे उत्साह आणि प्रफुल्लता. नवीन वर्षाची सुरवात असावी तर अशी.

परंतु सध्या इंग्राजळेल्या पिढीला गुढीपाडव्यापेक्षा १ जानेवारी हेच आपले नवीन वर्ष वाटू लागले आहे. म्हणून अगदी सप्टेंबर महिन्यातच थर्टीफस्टचे बुकिंग केले जाते.आमच्याकडे थर्टीफस्ट साजरा करा अशा आशयाचे होर्डिंग्स दिसू लागतात. ह्यामुळे गेल्या काही काळात हॉटेल्स किंवा तत्सम संस्थांना आर्थिक फायदा होऊ लागला आहे. ही झाली एक बाजू. ह्याची दुसरी बाजू म्हणजे - थर्टीफस्टनंतरच्या दुसऱ्या दिवशी ही पिढी रात्रभर झालेल्या जागरणाने लवकर उठू शकत नाही. काही वर्गात ड्रिंक्स किंवा तत्सम गोष्टींचाही समावेश असतो. नवीन वर्ष म्हणवून घेता परंतु त्याच दिवशी दुपारी ३.०० वाजता तुमची पहाट होते. आळसावलेल्या मनाला आणि शरीराला काहीही उत्साह नसतो. ह्या दुसऱ्या बाजूमुळे खरंतर वाईट वाटते.

असो. तर आजचा विषय आहे थोडासा गमतीदार. थर्टीफस्ट साजरा करणाऱ्या व्यक्तिच्या पद्धतीवरून आपण त्या व्यक्तिला ओळखू शकता. पण ही गोष्ट गंमत म्हणून घ्या !!

सतत थर्टीफस्टचे प्लॅनिंग बदलून शेवटी आहे त्याच प्लॅनप्रमाणे वागणाऱ्या तुमच्या मित्राची राशी आहे - कन्या. कन्या राशीला एखादा प्लॅन निश्चित होत आला की त्यात शंका जास्त वाटू लागतात मग प्लॅनमध्ये बदल करण्यास हे भाग पडतात. मग दुसरा प्लॅन झाला की त्यातही खोट दिसू लागते. शेवटी आहे त्याच प्लॅनप्रमाणे प्रोग्रॅम होतो.

आधी आढेवेढे घेऊन आणि भाव खाणाऱ्या परंतु नंतर तुमच्याबरोबर येणाऱ्या तुमच्या मैत्रिणीची राशी आहे - मकर. मुळात मकर राशीला आधी उत्साह नसतो परंतु पार्टी जसजशी रंगते तसतसे हे खऱ्या रूपात येतात.

एकाच वेळेस दोन ते तीन ठिकाणी थर्टीफस्ट साजरे करणारे महाभागही मी पहिले आहेत. जर तुमचा मित्र तुमच्या ग्रुप बरोबरच दुसऱ्याही ग्रुपबरोबर प्लॅन बनवत असेल किंवा जाणार असेल तर तो आहे - तूळ. तूळ राशीला पार्टीपेक्षाही कुठल्या हॉटेलमध्ये किंवा कुठल्या ठिकाणी थर्टीफस्ट साजरा होणार ह्याला महत्त्व जास्त असते. हॉटेल सुद्धा "ब्रँडेड" असावे लागते. अशा तशा ठिकाणी हे लोक शक्यतो जातच नाहीत.

तुमच्या मैत्रिणीला किंवा मित्राला थर्टीफस्ट साजरा करण्यापेक्षा त्या दिवशी आपण कसे दिसणार ह्याचे महत्त्व जास्त वाटत असेल आणि त्यासाठी बऱ्याच पार्लर आणि सॅलोनचे उंबरठे झिजवून झाले असतील तर त्याची किंवा तिची राशी आहे - वृषभ.

थर्टीफस्टला खाण्याचे प्लॅनिंग करत असतांना तिखट आणि चमचमीत नॉन व्हेज /चायनीज/थाई पदार्थ कुठे चांगले मिळतात ह्याची माहिती तुम्हांला देणारा मित्र आणि मैत्रिण म्हणजे साक्षात वृश्चिक राशीचा अवतार !!!

ज्या मैत्रिणीने माझा तर थर्टीफस्टचा प्लॅन फिक्स आहे,आम्ही गोव्याला जाणार आहोत असे ठामपणे सांगून तुम्हांला आठवडाभर भंडावून सोडले आहे आणि आयत्यावेळी ती जर तुमच्याबरोबर नवीन वर्ष साजरे करायला  आली तर समजा तिची राशी आहे - मिथुन.

थर्टीफस्ट साजरे करण्यात धनु राशीचा हात कोणीच पकडू शकत नाही. प्लॅन्स अगदी तयार असतात ह्यांच्याकडे. थर्टीफस्टसाठी नुसते डेस्टिनेशन सांगून हे गप्प बसत नाहीत. तिथे कसं जायचं ? तिथे खाण्यापिण्याची काय सोय असेल ? इतर काही करमणुकीचे कार्यक्रम करता येतील का ? अशी इत्यंभूत माहिती धनु शिवाय कोणी देऊ शकत नाही. ग्रुपमध्ये कोणी आढेवेढे घेत असले तर त्याला वठणीवर फक्त धनुच आणू शकते.

थर्टीफस्ट म्हणजे ३१ तारीख संध्याकाळ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत साजरा करण्याचा काळ. सिंह राशी ह्याला अपवाद आहे. ३१ तारखेलाच सुट्टी घेऊन छान थंड हवेच्या ठिकाणी जायचे. संपूर्ण दिवस मस्त मजेत घालवायचा. संध्याकाळी नवीन उत्साहाने मौज करायला तयार असणारी राशी म्हणजे - सिंह.

आळसावलेले डोळे आणि थर्टीफस्टचा फारसा उत्साह नसणारी राशी म्हणजे कुंभ. ह्या राशीला थर्टीफस्ट साजरा झालाच पाहिजे,हा ही हल्ली एक भारतीय सण (?) आहे ह्याच्याशी सोयरसुतक नसतं. कोणीतरी प्लॅन बनवलेला असतो आपण फक्त जायचं एवढंच ह्यांना माहीत.

प्लॅन्स बनवतांना सर्वात जास्त चिडचिड होत असलेली मैत्रिण म्हणजे मेष. तिला कुठलेच ठिकाण आवडत नाही. आधी नकारघंटा आणि चिडचिड - मेषेचा साक्षात प्रत्यय.

सेलेब्रेशनपेक्षाही संकल्पाला जास्त महत्त्व देणार. थर्टीफस्टपेक्षा १ तारखेपासून मी अमुक अमुक करणार असे ठरवलेले आहे, मी अमुक ठिकाणी जाणार, मी कामे कमी करून लाईफ एन्जॉय करणार अशी सांगणारी राशी म्हणजे मीन. ह्या राशीला वर्तमानकाळात वावरताच येत नाही. एकतर भूतकाळात फार रमतात किंवा भविष्याची स्वप्ने रंगवण्यात मग्न असतात. म्हणजे गेल्या वर्षी थर्टीफस्ट कसा झक्कास साजरा केला होता ...त्या आधीच्या वर्षी कशी मजा आली होती ह्यावर चर्चा करण्यात अगदी रंगून जातील.

काय पटतंय का मंडळी ?? हा राशींचा गंमतीचा भाग झाला. ह्या वर्षी तुम्ही तुमच्या मैत्रिणीची किंवा मित्राची राशी नक्की ओळखू शकाल.

अनुप्रिया देसाई



READERS ALL OVER THE WORLD