बुधवार, २२ ऑक्टोबर, २०१४

GEM STONES /भाग्य रत्ने

रत्ने आणि भाग्योदय 


सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. येणारे वर्ष सुखाचे,समृद्धीचे,आनंदाचे तसेच Healthy,Wealthy ठरू देत हीच सदिछा. 

आज विषय आहे रत्नांविषयी. आपल्या मनानेच रत्न वापरणारे,टी. व्हि. वरील जाहिरात पाहून रत्ने ORDER करणारे महाभाग माझ्या पाहण्यात आहेत. पण आजच्या लेखात मी माझ्या एका जातक मैत्रीणीची कहाणी (हो वाचतना कहाणीच वाटेल ) सांगणार आहे. तिचे नाव दिप्ती. 

दीप्तीचा स्वतःचा व्यवसाय आहे. गेल्या चार - पांच वर्षापासून ती माझ्या संपर्कात आहे. व्यवसाय सुरु करण्यापासून ते व्यवसायाचा आलेख उंचच उंच वाढण्याकरिता तिने नेहेमीच प्रामाणिकपणे आणि विश्वासाने  मी शास्त्रानुसार दिलेले सर्व उपाय केले आणि तिला त्याची वेळोवेळी प्रचीती सुद्धा मिळाली. परंतु…………… २०१३ च्या डिसेंबर मध्ये तिची आई साताऱ्याला स्वतःच्या गावी गेली होती. तिथे दीप्तीचा सहज विषय निघाला …तिचा व्यवसाय कसा सुरु आहे ? कमाई किती आहे ? वगैरे…. घरातील वडील स्त्रियांनी मग गावातीलच एका गुरुजींना दीप्तीची कुंडली दाखवण्यास सुचविले. आईच ती … काळजीपोटी किंवा उत्सुकतेपोटी तिने गुरुजींची भेट घेतली. त्या गुरुजींनी दीप्तीची कुंडली तयार न करिता नुसतीच तिची राशी विचारली. (राशीवरून भविष्य सांगणारे भरपूर आहेत. राशीवरूनच कशाला नावावरून भविष्य सांगणारेही आहेत. शास्त्र त्याला मान्यता देत नाही. मनुष्य ज्या दिवशी,ज्या वेळेला जन्माला येतो तो दिवस आणि त्या वेळेची  कुंडली बनवून जर भविष्य कथित केले तरच ते १००%  अचूक येउ शकते आणि  त्या व्यक्तीला मार्गदर्शन उपयोगी ठरते. ह्या विषयावर एखादा लेख नक्कीच लिहीन. असो ) दीप्तीची मकर राशी आहे. मकर राशीचा स्वामी आहे शनि. त्यावरून त्या गुरुजींनी तिच्यासाठी शनिचे नीलम रत्न वापरावे हे सुचविले. त्यांच्याकडूनच ते रत्न विकत घेऊन त्या माउली आपल्या मुलीला धारण करण्यास दिले. त्यानंतर दिप्तीनेही विचार न करिता ते धारण केले. आणि त्याचा परिणाम …….

नीलम धारण केल्यानंतर दीप्तीच्या आयुष्यात काय बदल झाले हे मी पुढे सांगणारच आहे त्या आधी नीलम रत्नाबद्दल थोडी माहिती देते.Amitabh Bachhan wearing Two Neelam Stone Ring नीलम हे रत्न गडद निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटेत उपलब्द्ध असते. हे रत्न फार किमती असून,हे रत्न धारण केल्यानंतर त्याचे परिणाम त्वरीत दिसून येतात. जर जाणकार आणि अनुभवी ज्योतिषाकडून तुमच्या कुंडलीनुसार तुम्हाला हे रत्न भाग्यकारक असेल तर तुमचा नजिकच्या काळात भाग्योदय झालाच म्हणून समजा. परंतु जर अर्धवट ज्योतिष ज्ञानाने फुशारकी मारणारया ज्योतिषाने तुम्हांला हे रत्न धारण करण्यास दिले तर मात्र होत्याचे नव्हते होण्यास फार वेळ लागणार नाही. त्याचे दुष्परिणाम म्हणजे सर्व प्रथम व्यवसायात तुम्हाला  नुकसान होण्यास सुरवात होणे,अचानक व्यवसायात आणि व्यक्तिगत आयुष्यात संकटांची मालिका सुरु होणे आणि हळूहळू त्याचा गुंता वाढत जाणे इ. हे जरी विश्वास ठेवण्यासारखे वाटत नसले तरी अत्यंत खरे आहे आणि त्याचाच अनुभव दीप्तीला ह्या वर्षी मिळाला.

तर पुन्हा आपल्या मुळ विषयाकडे वळूया. दिप्तीनेही साधारण डिसेंबर २०१३ च्या शेवटच्या आठवड्यात नीलम रत्न फार विश्वासाने धारण केले. डिसेंबर महिना तर सुरळीत गेला परंतु जानेवारी महिन्यात तिच्या व्यवसायावर बराच परिणाम झाला. महिन्याला दोन Commercial जागेचे  प्रत्येकी १५०००/- भाडे,हाताखालील १० लोकांचा पगार आणि इतर बरेच खर्च, इतकी Capacity असणाऱ्या दीप्तीच्या बँक अकौंट मध्ये जानेवारी महिन्याच्या १५ तारखेला  फक्त ५०००/- इतकेच शिल्लक होते. परंतु आत्ताशा दीप्तीची परीक्षा सुरु झाली होती. त्यानंतर Office मधून बराचसा स्टाफ निघून गेला.  कामाचीही मागणी अचानक थंडावली. दीप्ती हतबल झाली होती कारण व्यवसाय सुरु केल्यापासून इतके नुकसान पहिल्यांदाच झाले होते. व्यवसायात होते असे कधी तरी असे मानून तिने स्वतःलाच समजावले.

होता होता जानेवारी महिना संपून फेब्रुवारी सुरु झाला. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात तिच्या ऑफिस मध्ये काम करणाऱ्या महिलेला तिचा १० वर्षांचा मुलगा सहज म्हणून भेटण्यास आला. येताना त्याच्या बरोबर त्याचे काही मित्रही आले. (दीप्तीचा महिला गृहउद्योग संदर्भातील व्यवसाय आहे . त्यामुळे ऑफिस road  side ला तळमजल्याला आहे )  तेवढ्यात पेट्रोलिंग करणारी पोलिसांची गाडी त्याच रस्त्याने चालली होती. दुकानात लहान मुलांना बघून पोलिसांनी विचारणा करण्याआधी सरळसरळ आरोप केले की ह्या दुकानात बालमजूर कामाला ठेवले आहेत. त्या मुलांनी, त्यांच्या मातोश्रींनी, दीप्तीने," असे काही नाही साहेब ऐकून तर घ्या" म्हणून पोलिसांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तो पूर्णपणे फोल ठरला. पोलिस ऐकून घेण्याच्या तयारीतच नव्हते. त्यांनी दीप्तीला पोलिस स्टेशनात येण्यास बजावले. madam च्या पायाखालची जमीनच हादरली आणि तिला माझी आठवण आली. 


पोलिसांना पैसे खायचे आहेत हे उघड आहे परंतु आधीच व्यवसायात नुकसान झालेले आणि बँकेत असलेले फक्त ५०००/- रुपये. मला फोन करून पुढे काय होणार आहे हे तिला जाणून घ्यायचे होते. प्रश्न कुंडली मांडून फार tension घेण्याची गरज नाही हे सांगितल्यावर दीप्तीच्या बोलण्यात आत्मविश्वास आला. तिला काही उपायही सुचविले जे पोलिस स्टेशनला जाता जाता तिला करता येतील. तिथून निघाल्यानिघाल्या दीप्तीचा मला फोन," madam झाले काम. सगळ्या मुलांवर आणि माझ्यावर प्रश्नांचा भडीमार झाला. दीड तास होतो पोलिस स्टेशनला. पैसेच खायचे होते त्यांना पण कमी रकमेवर निभावले. पण madam मला तुम्हाला एकदा भेटायला यायचे आहे. व्यवसायात आणि वैयक्तिक आयुष्यात गेल्या दोन -तीन महिन्यापासून बरीच उलथापालथ सुरु आहे."  तिला लगेच appointment चा दिवस आणि वेळ निश्चित करून दिली.


ठरलेल्या दिवशी दीप्ती आली. तिने सर्व कथाकथन केले आणि खरी गोम लक्षात आली. तिला मी नीलम रत्नाचा वापर ताबडतोब थांबवण्यास सांगितले. त्यासाठी दिवस आणि विधी निश्चित करून दिला. तिला काही मंत्र दिले आणि उपायही दिले. निश्चिंत होऊन दीप्तीने नीलम रत्नाचे विधिवत विसर्जन केले आणि दिलेले उपाय सुरु केले. आणि ह्या सर्वांचा सुंदर परिणाम एका महिन्यातच तिला मिळाला. तिच्या व्यवसायात वाढ झाली, गेलेले सर्व employee पुन्हा आले आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे तिला एका मोठ्या व्यवसायिकाकडून त्यांच्या व्यवसायात भागीदारीबद्दल विचारण्यात आले. दिलेले उपाय प्रामाणिकपणे केले आणि त्याचा सुंदर परिणाम मिळाला की जातकांच्या बोलण्यातून जो आनंद असतो तो ऐकून खरोखर खूप समाधान लाभते. 


बरेच जातक जेंव्हा माझ्याकडे येतात तेंव्हा नावावर किंवा राशीवर खूप भर देतात म्हणजे माझी वृषभ राशी आहे पण मला फार नटण्याची आवड नाही मग असे कसे तुमचे ज्योतिष ? किंवा माझे नाव सचिन आहे मग नावावरून माझी कुंभ राशी आहे ना मग कुंडलीत कन्या कशी लिहिली आहे ? किंवा काही जातकांची कुंडलीच बनवलेली नसेल तर माझे नाव अमित आहे मग मेष राशीवरून कुंडली बनवा आणि भविष्य सांगा अशीही( हास्यस्पद ) विनंती होते. टी.व्हि. वरही हल्ली अशा बरयाच जाहिराती असतात की ज्यात अमुक राशीच्या लोकांनी हेच रत्न वापरावे ह्यावर खोट्या दाढीमिशा लावून,अंगाला भस्म लावून,भगव्या कपड्यात असलेले (ढोंगी ) बाबा ठासून सांगताना दिसतात.  मग त्या रत्नाचे लॉकेट,अंगठी तयार असते फक्त तुम्ही पैसे भरायचे आणि त्यांना फोन करायचा. अगदी Discounted Rates मध्ये तुम्हाला रत्ने दिली जातात. मला ह्या माध्यमातून सर्व वाचकांना हे सांगायचे आहे की तुमचे नाव आणि राशीचे महत्त्व तर आहेच परंतु अचूक भविष्य आणि रत्न मार्गदर्शनासाठी कुंडलीचे महत्त्व जास्त आहे.

राशी -राशी म्हणजे काय तर तुमच्या जन्माच्या वेळेस चंद्र ज्या राशीत असतो ती असते तुमची राशी. परंतु चंद्र साधारणपणे अडीच दिवस (२.५ days)  एका राशीत असतो.  उदा. समजा तुमचा २९ तारखेचा जन्म आहे आणि तुमची राशी आहे सिंह तर तुमच्या एक दिवस आधी (२८ तारखेला )जन्म झालेल्या किंवा तुमच्या एक दिवस नंतर (३० तारखेला ) जन्म झालेल्या व्यक्तीचीही सिंह राशी असू शकेल. मग त्या व्यक्तीच्या आणि तुमच्या आयुष्यात एकाच प्रकारच्या आणि एकाच वेळेस घटना घडू शकतील का ???  ह्याचा सुज्ञ वाचकांनी जरूर विचार करावा. अगदी एकाच वेळेस जन्मलेल्या जुळ्या( Twins ) व्यक्तींच्या आयुष्यातही घडणारया घटनेत समानता नसते. मग राशी वरून भविष्य कसे सांगता येईल ???? हां ढोबळमानाने सध्या कितवा गुरु आणि शनि आहे ह्याची चर्चा करता येईल परंतु भविष्य मार्गदर्शन ?? मुळीच नाही.एका दिवसांचे  २४ तास. एका तासाची ६० मिनिटे ह्याप्रमाणे गणित मांडल्यास २४ * ६० = १४४० मिनिटांचा काळ येतो.  मिनिटांचा विचार केला तर प्रत्येक दिवसाच्या १४४० कुंडल्या तयार होतील आणि साधारणपणे प्रत्येक कुंडलीचे भविष्य वेगळे असेल. त्यामुळे फक्त राशीवर आणि नावावर भविष्य मार्गदर्शन होत नसते. 

ज्योतिष- शास्त्रात पारंपारिक,कृष्णमुर्ती,फोर स्टेप थेअरी,कस्पल इंटरलिंक अशा विविध पद्धतीने भविष्य मार्गदर्शन करता येते. पारंपारिक पद्धतीने कुंडली अभ्यासणार्यांची संख्या जास्त आहे. पारंपारिक पद्धतीनंतर कृष्णमुर्ती पद्धत ( K. P. System ) पूजनीय अशा K. S. KRISHNAMURTHY  सरांनी अवघ्या ज्योतिष - शास्त्राला अमूल्य भेट दिली आहे ज्यामुळे भविष्यात घडणारी घटना अगदी मिनिटापर्यंत सांगता येते( अर्थात त्या व्यक्तीचा तेवढा अभ्यासाचा व्यासंग असावा ). असो तात्पर्य असे कि  - १) स्वतःच स्वतःचा डॉक्टर होऊन औषध करणे जितके हानिकारक आहे त्याचप्रमाणे स्वतःच्याच ज्योतिषज्ञानाने (अर्धवट) रत्नांचा वापर घातकच ठरेल. 

२) राशीवरून आणि नावावरून वर्तवलेल्या भविष्यावर विश्वास ठेवू नये.
३) काही रत्ने अत्यंत प्रभावी असतात. जसे मा णिक,गोमेद,लसण्या,पुष्कराज आणि  नीलम इ. ह्यां रत्नांना धारण केल्यानंतर नजीकच्या काळात लगेचच प्रिय/अप्रिय घटना घडू शकतात त्यामुळे ही रत्ने स्वतःच्या मनाने अजिबात वापरू नयेत.
४) रत्ने सुचविणारी व्यक्ती ह्या विषयातील जाणकार आहे ह्याची खात्री असावी.
५) हल्ली टी. व्ही. वरही रत्नांबद्दलच्या काही जाहिराती तासंतास दाखविल्या जातात ज्यात राशीवरून रत्ने वापरण्यास उद्युक्त केले जाते आणि मग अशी रत्ने ऑर्डर केली जातात आणि नको ते परिणाम भोगावे लागतात.  त्यामुळे अशा जाहिरातीपासूनही सावधान.   

ज्योतिषांसाठी विशेष टीप : हा लेख १८ ऑक्टोबरपासून तयार आहे परंतु ब्लॉगवर प्रसिध्द करताना  Fonts चे काही settings बदलत होते. सतत चार दिवस पाठपुरावा केल्यानंतर आज त्याचे fontचे setting व्यवस्थित झाले आणि आज लेख पुर्णपणे तयार आहे. ह्याआधी इतके लेख लिहितांना असे कधीच झाले नाही. शनि हा विलंबाचा कारक आहे. नीलम संदर्भातील लेख लिहिला आहे. नीलम रत्नाचे काही फोटोही मी ब्लॉगवर घेतले आहेत. त्यामुळे असे झाले असावे की निव्वळ योगायोग ? तुमची मते नक्की कळवावीत. ( अंधश्रद्धा पसरवण्याचा अजिबात हेतू नाही )

वाचकांसाठी टीप : अमिताभ बच्चन ह्यांचा मधला काळ अत्यंत Difficult होता. मध्ये त्यांनी स्वतःची ABC कंपनी सुरु केले होती जी कर्जबाजारी निघाली. त्यानंतर अमिताभ बच्चन ह्यांना स्वतःलाही फिल्म मध्ये विशेष यश मिळाले नाही. ह्या सगळ्या घटनेनंतर त्यांच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटात नीलम रत्नाची अंगठी दिसू लागली. त्यानंतर Kaun Banega Crorepati (KBC ) हा प्रोग्रामचे hosting करण्यात ते बिझी झाले. हळूहळू काही दिवसांनी त्याच बोटात एकाचवेळेस दोन अंगठ्या दिसू लागल्या. हा प्रोग्राम तुफान सुरु आहे तो आजगायत. त्यांनतर पुन्हा गेल्या दोन वर्षापासून एकच अंगठी दिसू लागली आहे. जाहिराती,फिल्म, KBC प्रोग्राम एवढ्या सगळ्या व्यापात आज अमिताभ बच्चन कोणत्याही तरुण star पेक्षाही जास्त व्यस्त आहेत.       


सर्व वाचकांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. 

READERS ALL OVER THE WORLD