बुधवार, २४ जानेवारी, २०१८

वास्तूतील नकारात्मक ऊर्जा कशी कमी कराल ?


वास्तू संदर्भात अनेक लेख आणि पुस्तके उपलब्ध आहेत तरी सुद्धा वास्तूबद्दलचे प्रश्न आणि शंका मनात सतत वाटत असतात. वास्तूतील ऊर्जा कशी वाढवावी आणि तिला रिचार्ज कसे करावे ह्यांवर लिहिलेल्या लेखाला वाचकांचा छान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर वाचकांकडून 'वास्तूतील नकारात्मक ऊर्जा कशी कमी करावी ह्यांवर काही लिहा' अशी विनंती होत होती. आजचा लेख ह्याच विषयावर आहे. काही वेळेस आपण कळत नकळत ज्या गोष्टी वास्तूत ठेवतो त्याचा कालांतराने वास्तूवर सकारात्मक परिणाम होण्याऐवजी नकारात्मक परिणाम होत जातो. अशा कुठल्या वस्तू किंवा गोष्टी घरात असू नयेत आणि वास्तूतील गोष्टी कशा प्रकारच्या असाव्यात ह्यांवर काही टिप्स देण्याचा हा प्रयत्न -

१) मुख्य दरवाजा - घरात ऊर्जेचा प्रवेश होतो तो मुख्य दरवाजाने. ह्यामुळे मुख्यदरवाज्यासमोर अडथळे असू नयेत. अडथळे ह्याचा अर्थ खूप सामान असू नये. चपलांचा रॅक दरवाज्यात समोरच असू नये. काही व्यक्तिंना फुलांची आवड असल्याने मोठमोठया फुलदाण्या मुख्य दरवाज्यातच ठेवल्या जातात. ज्यांमुळे मुख्यदरवाजतून घरात प्रवेश करणे काही वेळेस अडचणीचे ठरते.

मुख्य दरवाजा मोठा असल्यास तेवढी अडचण येत नाही परंतु शहरात छोट्या घरांमुळे प्रवेशद्वार हे फार मोठे नसते. काही वेळेस घरात प्रवेश केल्यानंतर narrow passage असतो. अशा पॅसेज मध्ये फुलदाण्या ठेवूच नयेत. पॅसेजच्या भिंतीवर छान paintings करू शकता ज्यामुळे प्रवेश करताच मन प्रसन्न होईल. दरवाजावर फार गोष्टी असू नयेत. काही वास्तूत मुख्य दरवाज्यावर भरपूर प्रमाणात खोटी प्लॅस्टिकची फुले,विचित्र चित्रे असलेली मी पाहिली आहेत. असे असू नये. वास्तू शास्त्राप्रमाणे प्रवेशद्वार हे दोन्ही बाजूने उघडणारे असावे. परंतु दोन्ही बाजूने उघडणारे दार हे स्वतःचा बंगला असेल तरच शक्य आहे,शहरात तर बिल्डर्स जसं घर बांधून देतो त्यावरच सगळं विसंबून आहे. आणि मुख्य म्हणजे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो परंतु मुख्य प्रवेशद्वाराची साफसफाई विसरून जातो. कित्येक महिन्यांची धूळ साचलेली असते. सणासुदीला लावलेल्या फुलांचे तोरण कित्येक महिने तिथेच असल्याने 'Decompose' होण्यास सुरवात झालेली असते. हे सर्व साफ झाले पाहिजे. सकारत्मक ऊर्जा हवी असल्यास मुख्यद्वाराजवळील अडथळे असू नयेत आणि प्रसन्न प्रवेश असावा.

२) खिडक्या आणि पडदे - मुख्यद्वारातून जसा ऊर्जेचा प्रवेश होतो त्याच प्रमाणे हवा खेळती ठेवणे हे काम आहे खिडक्यांचे. वास्तूत योग्य प्रमाणात आणि योग्य उंचीच्या असलेल्या खिडक्या नकारात्मक उर्जेला थारा देत नाहीत. खिडक्या ह्या योग्य दिशेत मोठ्या असाव्यात. खिडक्यांचे गज (Grill ) योग्य प्रमाणात असावे. ज्यामुळे सूर्यप्रकाश आणि हवा वास्तूत खेळती राहील. ज्या घरात सूर्यप्रकाश व्यवस्थित प्रमाणात येत नाही त्या वास्तूत 'Dull' वाटते. अशा वास्तूत काही वेळ जरी व्यतीत केला तरी डोके जड होणे,मळमळणे असे वाटू शकते. जर खिडक्या योग्य प्रमाणात नसतील किंवा सूर्य प्रकाश घरात फार वेळ राहत नसेल अशा वास्तूत 'Light Arrangement' व्यवस्थित असावी. गरज असल्यास 'Air Cooler' ठेवून हवा खेळती राहील ह्यांवर लक्ष्य द्यावे.

बऱ्याच वास्तूत मी पडद्यांचा विचित्र रंग पाहिला आहे. पडद्यांसाठी काळा रंग हा वास्तूत वापरूच नये. जर वास्तूत सूर्यप्रकाश योग्य प्रमाणात नसेल तर काळा किंवा गडद (Dark) रंग टाळलेलाच बरा ! हलक्या रंगाचे पडदे, भिंतीच्या रंगला साजेसा रंग निवडावा. ज्यामुळे नकारात्मक उर्जेला थारा उरणार नाही.

३) खेळती हवा - वास्तूत हवा खेळती असावी. व्हेंटिलेशन व्यवस्थित असले पाहिजे. जर खिडक्या कमी असल्या तरी जितक्या खिडक्या आहेत त्या बंद असू नयेत. काही वेळेस जातकांची तक्रार ही असते की खिडक्या उघड्या ठेवल्या की बाहेरची धूळ घरात येते वगैरे वगैरे. असा वेळेस पूर्णवेळ खिडक्या बंद न ठेवता काही वेळापुरत्या खिडक्या उघडाव्यात. मुख्य दरवाजा उघडावा. ज्यामुळे हवा खेळती राहण्यास मदत होईल. सततच्या बंद खिडक्या आणि दरवाजा ह्यामुळे वास्तूतील हवा दमकट होते. अशा वास्तूत एक प्रकारची दुर्गंधी येण्यास सुरवात होते. त्यामुळे हवा खेळती असण्याकडे लक्ष्य द्या. वास्तू नेहेमीच सुगंधाने दरवळली पाहिजे. कृत्रिम Freshener पेक्षा आपल्याकडे भारतीय आणि पारंपरिक बरेच उपाय आहेत. शेणाच्या गोवऱ्यांच्या वापराने वास्तूतील दुर्गंधी तर जाईलच परंतु नकारात्मक ऊर्जा आणि कीटक/डास ह्यांचा होणारा प्रादूर्भाव थांबेल. शेणाच्या गोवऱ्या वापरणे शक्य नसेल तर पाण्यात जाई-जुईच्या अत्तराचे चार -पाच थेंब घालून संपूर्ण घरात हे अत्तर शिंपडावे. दुर्गंधी नाहीशी होईल. आणि वास्तूत एक नैसर्गिक सुवास दरवळत राहील. वास्तूत धूप घालणे,अग्निहोत्र करणे ह्यामुळे बऱ्याच जातकांना फायदा झालेला आहे. तुम्ही सुद्धा अनुभव घेऊ शकता.

४) पुनर्रचना/ Rearrangement  - काहीवेळेस वास्तूत ठेवलेल्या वस्तू जसे सोफा,खुर्च्या,टी.व्ही.,टेबल ह्या वर्षानुवर्षे एकाच जागी असल्याने घरात वावरणाऱ्या व्यक्तिंना सुद्धा मग कंटाळा येऊ लागतो. अशा वेळेस वास्तूत फेररचना करू शकतो, ज्यामुळे वास्तू अजून प्रसन्न वाटेल.५) वस्तूंची साठवण - भारतीय लोकांना असलेली एक सवय म्हणजे - जिथे फिरायला जातील तिथून भरपूर वास्तू आणणे आणि घरात साठवून ठेवणे. त्या वस्तूंची कालांतराने काळजी घेतली न गेल्यामुळे त्या वस्तू तशाच पडून राहतात. तुम्हीच तपासून पहा. तुमच्या शोकेस मध्ये अशा किती वस्तू आहेत ज्यांना तुम्ही वर्षानुवर्षे शोकेसमधून बाहेरच काढलेलं नसेल. ज्याचा तुम्हांलाच विसर पडलेला असतो. अशा वापरात नसलेल्या वस्तूंचा निचरा लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. बंद पडलेली घड्याळे,धूळ खात असलेली पुस्तके,शो-पिसेस, फुलदाण्या,वापरात नसलेली शेगडी,स्टोव्ह अशा वस्तुंनी वास्तूतील ऊर्जा 'Drain' होते. त्यामुळे अशा वस्तूंचा निकाल लवकरात लवकर लावणे. तुमच्या वास्तूतील ऊर्जेसाठी ह्या बंद आणि धूळ खात असलेल्या वस्तू हानिकारक ठरतात.

६) मिठाचा प्रयोग - वास्तू होणारा जाड मिठाचा प्रयोग आता नवीन नाही. भारताबाहेरील प्रगत देशात जाड मिठाचा प्रयोग नकारत्मक ऊर्जा घालवण्यासाठी मोठं मोठे Therapistही सुचवू लागले आहेत. जाड मिठाचा प्रयोग भारतात बऱ्याच काळापासून सुरु आहे. नाकारत्मक ऊर्जा ह्या शब्दापेक्षा आपल्याकडे "नजर लागणे" हा शब्द प्रयोग जास्त वापरला गेला. नजर लागली असं म्हणत तुमच्या आईने -आजीने तुमची नजर जाड मिठाने बऱ्याचदा काढली आहे. असं केल्याने लगेच गुण येतो असा शिक्कामोर्तबही झालेला असतो. आपल्या आजीला नकारत्मक ऊर्जा वगैरे शब्दप्रयोग माहीत नव्हते.
जाड मिठाच्या वापराने फरक पडतो ह्यांवर तिचा ठाम विश्वास होता आणि आहे. हेच आपल्याला आजच्या काळात त्यामागचे शास्त्र समजून पाळायचे आहे. जाड मीठ पाण्यात घालून त्या पाण्याने फारशी पुसून घेणे,जाड मीठ आणि निलगिरीच्या तेलाचे काही थेंब पाण्यात घालून ते पाणी शिंपडल्याने वास्तूतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होण्यास मदत होते. ह्या बरोबरीने जाड मीठ चिनी मातीच्या वाडग्यात किंवा चक्क मातीच्या मोठ्या पणतीत ठेवून घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवल्यानेही चांगले परिणाम मिळतात. हे मीठ कधी बदलावे ?  - जर वास्तू फारच  Dull वाटत असेल तर ४८ तासांत मीठ बदलावे. वाडग्यातील मीठ टॉयलेट मध्ये flush करावे आणि नवीन मीठ वाडग्यात ठेवावे. नाहीतर दर १० -१२ दिवसांनी मीठ बदल्यास चालू शकेल. हा प्रयोग नक्की करून पहा.

७) रोपटी आणि फुलझाडे - वास्तूत खऱ्या रोपट्यांचा आणि छोट्या फुलझाडांचा वापर केल्यास वास्तू प्रसन्न वाटते. फक्त ह्याचा वापर करतांना डास आणि माशा ह्यांचा उपद्रव होणार नाही ना ह्याची काळजी घ्यावी.८) वास्तूतील चित्रे आणि फोटो  -
काही जातकांच्या घरी मी विचित्र अशी चित्रे आणि फोटो भिंतीवर पाहिली आहेत. रडणाऱ्या मुलाचे चित्र, दुःखी स्त्री,लढाईचा प्रसंग असलेले चित्र,डरकाळी फोडणारा सिंह किंवा वाघ - अशा चित्रांनी काय साध्य होते माहित नाही. आर्ट म्हणून ठीक आहे परंतु अशा चित्रांचा वास्तूतील वापर हानिकारकच ठरतो.


ह्या सर्व चित्रात दुःखाचा आणि रागाचा आवेग दिसून येतो. अशी चित्रे वास्तूत ठेवल्याने आपले लक्ष सतत अशा चित्रांकडे जाते. अशाच प्रकारचा स्वभाव आपला बदलत जातो. सिंहाचे चित्र असावे परंतु त्यातून 'Leadership Quality' झळकावी. स्त्रीचे चित्र जरूर असावे परंतु त्यातून तिच्या आनंदाच्या लहरींचे कंपन असावे, मुलाचे चित्र असावे असे ज्यातून त्याचा नटखटपणा,खेळकरपणा आणि निरागसता झळकावी. आणि म्हणूनच कृष्ण आणि यशोदेचे चित्र लावण्याची प्रथा असावी. नक्की विचार करा. तुम्हांला कुठल्या प्रकारची ऊर्जा हवी ते ठरवून चित्र निवडावे. 

९) भिंतीचा रंग - हल्ली भिंतींवर रंगसंगतीचा वापर चांगल्या प्रकारे केला जाऊ शकतो. गडद रंगाचा वापर करताना कुठल्या भिंतीवर हा प्रयोग करीत आहोत ह्याची काळजी घ्यावी. गडद रंग वापरतांना हलक्या रंगाचाही प्रयोग करावा. अशा खोलीत प्रकाश भरपूर असावा अथवा गडद रंगामुळे खोली लहान असल्याचा भास होतो.  

१०) घड्याळ - मुंबईत तर प्रत्येक खोलीत घड्याळ असणे अनिवार्य आहे. घड्याळावरच आपुले जीवन! वास्तूत घड्याळ शक्यतो पूर्व-पश्चिम किंवा उत्तरेच्या भिंतीवर असावे. वास्तू -व्हिजिटला गेल्यावर मला वेगवेगळ्या आणि विचित्र प्रकारची घड्याळे असू शकतात हे लक्षात आले. घड्याळ नेहमी 'काळ' दाखवतो. त्यामुळे घड्याळाची निवडही महत्त्वाची ठरते. ह्या बरोबर मी काही फोटो देत आहे. ह्या फोटोत दाखवलेली घड्याळे तुम्ही तुमच्या वास्तूत ठेवणे म्हणजे नकारत्मक उर्जेला आमंत्रण आहे. 


वर दिलेल्या सूचना आणि टिप्सचा वापर करून तुम्हांला तुमच्या वास्तूतील नकारत्मक ऊर्जा नाहीशी करण्यात नक्कीच मदत होईल अशी आशा आहे. 

प्रतिक्रिया नक्की कळवा. 
अनुप्रिया देसाई 
९८१९०२१११९

वास्तुपुरुष पालथा का प्रस्थापित करावा ?

वास्तूपुरुष कसा निक्षेपित करावा ?
वास्तुपुरुष पालथा का प्रस्थापित करावा ?  

हिंदू शास्त्रमान्यतेनुसार अंधकासूराशी लढताना महादेवाला अंगातून निघालेल्या घामाच्या थेंबातुन एका राक्षसाचा जन्म झाला. जन्माला आल्यापासूनच त्याने त्याच्या वाटेत येणाऱ्या सर्व गोष्टी गिळंकृत करण्यास आरंभ केला. आता आपण निर्माण केलेली ही सृष्टी धोक्यात आहे हे लक्षात आल्यावर ब्रह्मदेव आणि विष्णुंनी, शिवाकडे धाव घेतली. ह्या राक्षसावर वेळीच ताबा मिळवला नाही तर सृष्टीचे काही खरे नाही,तेंव्हा ह्यांवर काही उपाय सुचविण्यास शिवाला प्रार्थना केली. शिवाने युक्तीने त्या राक्षसाला आपला आशिर्वाद घेण्यास भाग पाडले. आशिर्वाद घेण्यासाठी जेंव्हा हा राक्षस शिवाच्या चरणी लीन झाला तेंव्हा सर्व अष्टदिग्पालांनी,देवतांनी त्याला सर्व दिशेकडून कोंडले. शिवने आपलं उजवा पाय राक्षसाच्या डोक्यावर ठेवून त्याला ताब्यात आणले. त्यामुळे ह्या राक्षसाला पुन्हा उच्छाद मांडता येणार नाही अशी शिवाची ही योजना होती. ह्या राक्षसाला वर देत शिवाने  त्याचे नाव "वास्तू पुरुष" ठेवले. वर देतांना शिवाने त्यास कोणालाही ह्यापुढे दुखावणार नाहीस असे वचन वास्तुपुरुषाकडून घेतले. वास्तूत राहणाऱ्या व्यक्तिंनी वास्तुपुरुषाची आठवण ठेवावी अशी सूचना शिवाने मानवजातीला दिली. 

 खालील चित्रात पहा वास्तू पुरुष हा नमस्कार करण्याच्या मुद्रेत आहे.   म्हणूनच वास्तू पुरुषाची प्रतिमा आपल्या वास्तूत प्रक्षेपित करतांना वास्तू पुरुषाचा चेहरा खालच्या बाजूस असावा. ह्याला "वास्तुपुरुष मंडळ" म्हणतात.  चित्रात जिथे वास्तुपुरुषाची शेंडी दाखवली आहे तिथे "ईश" असे लिहिलेले आहे. यश म्हणजे ईश्वर - शिव. वर आपण वाचले की शिवाने राक्षसाच्या डोक्यावर आपला पाय ठेवला. म्हणूनच ह्या स्थानाला शिवाचे स्थान मानले जाते. ज्याला आपण "ईशान्य" दिशा म्हणून संबोधतो. म्हणून ही दिशा शक्य तितकी स्वच्छ असावी. 

 वास्तुपुरुष मंडळ 

शिवाबरोबरच पूर्व दिशेला "आदित्य" देवता असते. चित्रात पूर्व दिशेला "सूर्य" असे लिहिले आहे. ह्या दिशेने सूर्यदेवतेने राक्षसाला ताब्यात ठेवले आहे. आग्नेय दिशेत (South -East ) अग्नि देवतेने,दक्षिणेला "यमाने" नैऋत्य दिशेने ( पश्चिम -दक्षिण ) "पितरांनी, पश्चिमेने "वरुण" देवतांनी ताब्यात ठेवले आहे. वरील चित्रात सर्व देवता आणि राक्षसांनी वास्तू पुरुषाला "control" मध्ये ठेवले आहे. 

ह्या सगळ्या देवतांबरोबरच चित्रात "ब्रह्म स्थानही दाखवण्यात आले आहे. ह्या ब्रह्म स्थानांत शक्यतो वजन येऊ देऊ नये. ब्रह्मस्थानांत फ्रीज,भिंत किंवा तत्सम जड वस्तूंमुळे झालेले दुष्परिणाम मी वेगवेगळ्या वास्तूत पाहिलेले आहेत. 


उत्तर दिशेत "कुबेर" देवता आहे. ह्या दिशेत शक्यतो पाण्याचा साठा असावा. पाण्याचा साठा ह्याचा अर्थ पाण्याचा कलश, फिश टॅंक इ. 


पश्चिम दिशेत जिथे "वरुण" देवता आहे तिथे विंड चाईम्स किंवा बासुरी असावी. 


पूर्व दिशेत जिथे "आदित्य/सूर्य" लिहिले आहे तिथे सूर्याची प्रतिमा असावी. 


आग्नेय दिशेत स्वयंपाक घर असावे. परंतु फ्लॅट सिस्टिममुळे ते शक्य नाही. त्यासाठी विना तोडफोड उपाय आहेत. 


वास्तूत राहणाऱ्या व्यक्तिंनी वर्षातून एकदा तरी ह्या सर्व देवतांची आराधना करावी. ह्या सर्व देवता किंवा शक्ती म्हणू,ह्या शांत राहतील ह्यासाठी वास्तूत वर्षातून एकदा होम/हवन करून घ्यावे. रामरक्षा,सप्तशती पाठ करून घ्यावा. वास्तूत कलह,क्लेश करू नये. सकाळी वास्तूत गोमूत्र शिंपडावे. संध्याकाळी अग्निहोत्र करू शकाल. अगदीच काही नाही जमले तरी वास्तू जमेल तितकी स्वच्छ ठेवावी. सोमवार, २२ जानेवारी, २०१८

ब्रह्मांडातील रत्ने

ब्रह्मांडातील रत्ने 

माझ्या ज्योतिष आणि वास्तू शास्त्रावरील पुस्तकाला उदंड प्रतिसाद मिळाला. गेल्या गणेश जयंतीला हे पुस्तक प्रसिद्ध केले होते. काल बरोबर एक वर्ष पूर्ण झाले. ह्या एका वर्षात लोकांच्या मनातून ज्योतिष शास्त्राबद्दलची भीती कमी करता आली ह्यांत आनंद आहे. मुळातच ह्या पुस्तकांत फार ज्योतिष शास्त्रीय भाषा वापरलेली नाही. सर्वसामान्य जातकांना वाचता येईल अशा पद्धतीने वाक्यरचना आणि केसेस दिलेल्या आहेत. पुस्तक वाचून  झाल्यावर आवर्जून फोन करून वाचकांनी त्यांना पुस्तक आवडल्याचे कळवले. पुस्तकातील वास्तू शास्त्राच्या टिप्स त्यांना उपयोगी ठरत आहेत. सर्व वाचकांचे आणि जातकांचे आभार !!!

अनुप्रिया देसाई 
९८१९०२१११९

मंगळवार, २ जानेवारी, २०१८

नवीन वर्ष साजरे करण्याचा राशींच्या तऱ्हा


नवीन वर्ष साजरे करण्याचा राशींच्या तऱ्हा ३१st ला काय प्रोग्राम ? हा प्रश्न वातावरणात घुमू लागला आहे. गुलाबी थंडीबरोबरच नवीन वर्ष साजरा करण्याचा  उत्साह जाणवतो आहे. गेल्या थर्टीफस्टला काय केले होते ? मग आता ह्या वेळी काय करायचे ? ह्यांवर सगळ्यांचे  प्लॅन्स सुरु झालेले आहेत. थर्टीफस्टला नवीन संकल्पांचीही जाहीरात केली जाते. ह्यावर्षी कोणी नवीन घर घेणार ह्याचा संकल्प,तर कोणी नोकरी बदलणार हा संकल्प करतो. सर्वात जास्त संकल्प केला जातो तो वजन कमी करण्याचा. प्रत्येकाचा संकल्प वेगळा.

मला विचाराल तर माझं वैयक्तिक मत वेगळं आहे. मराठी शाळेत झालेल्या शिक्षणामुळे,कायम भारतीय संस्कार मनात खोलवर रुतलेले आहेत. नवीन वर्ष हे गुढीपाडव्यालाच. हिरव्या शालूने आणि झेंडूच्या फुलांनी बहरलेला निसर्ग. नवीन वर्ष सुरु झाल्याची ग्वाही निसर्गच प्रत्यक्षात देत असतो. ख्रिसमस ट्रीपेक्षा कडुनिंब आणि तुळस ही रोपटी नेहेमीच जवळची वाटत आली आहेत. ह्या दिवशी गुढी उभारून नवीन वर्षाची सुरवात होते. कडुनिंब,धणे  आणि गूळ हे मिश्रण चघळणे ह्या दिवशी अनिवार्य. घरी पुरणपोळीचा छान बेत. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणं, मंदिरात जाऊन दर्शन घेणं हे आलंच. कुठेही आळस जाणवत नाही. सगळीकडे उत्साह आणि प्रफुल्लता. नवीन वर्षाची सुरवात असावी तर अशी.

परंतु सध्या इंग्राजळेल्या पिढीला गुढीपाडव्यापेक्षा १ जानेवारी हेच आपले नवीन वर्ष वाटू लागले आहे. म्हणून अगदी सप्टेंबर महिन्यातच थर्टीफस्टचे बुकिंग केले जाते.आमच्याकडे थर्टीफस्ट साजरा करा अशा आशयाचे होर्डिंग्स दिसू लागतात. ह्यामुळे गेल्या काही काळात हॉटेल्स किंवा तत्सम संस्थांना आर्थिक फायदा होऊ लागला आहे. ही झाली एक बाजू. ह्याची दुसरी बाजू म्हणजे - थर्टीफस्टनंतरच्या दुसऱ्या दिवशी ही पिढी रात्रभर झालेल्या जागरणाने लवकर उठू शकत नाही. काही वर्गात ड्रिंक्स किंवा तत्सम गोष्टींचाही समावेश असतो. नवीन वर्ष म्हणवून घेता परंतु त्याच दिवशी दुपारी ३.०० वाजता तुमची पहाट होते. आळसावलेल्या मनाला आणि शरीराला काहीही उत्साह नसतो. ह्या दुसऱ्या बाजूमुळे खरंतर वाईट वाटते.

असो. तर आजचा विषय आहे थोडासा गमतीदार. थर्टीफस्ट साजरा करणाऱ्या व्यक्तिच्या पद्धतीवरून आपण त्या व्यक्तिला ओळखू शकता. पण ही गोष्ट गंमत म्हणून घ्या !!

सतत थर्टीफस्टचे प्लॅनिंग बदलून शेवटी आहे त्याच प्लॅनप्रमाणे वागणाऱ्या तुमच्या मित्राची राशी आहे - कन्या. कन्या राशीला एखादा प्लॅन निश्चित होत आला की त्यात शंका जास्त वाटू लागतात मग प्लॅनमध्ये बदल करण्यास हे भाग पडतात. मग दुसरा प्लॅन झाला की त्यातही खोट दिसू लागते. शेवटी आहे त्याच प्लॅनप्रमाणे प्रोग्रॅम होतो.

आधी आढेवेढे घेऊन आणि भाव खाणाऱ्या परंतु नंतर तुमच्याबरोबर येणाऱ्या तुमच्या मैत्रिणीची राशी आहे - मकर. मुळात मकर राशीला आधी उत्साह नसतो परंतु पार्टी जसजशी रंगते तसतसे हे खऱ्या रूपात येतात.

एकाच वेळेस दोन ते तीन ठिकाणी थर्टीफस्ट साजरे करणारे महाभागही मी पहिले आहेत. जर तुमचा मित्र तुमच्या ग्रुप बरोबरच दुसऱ्याही ग्रुपबरोबर प्लॅन बनवत असेल किंवा जाणार असेल तर तो आहे - तूळ. तूळ राशीला पार्टीपेक्षाही कुठल्या हॉटेलमध्ये किंवा कुठल्या ठिकाणी थर्टीफस्ट साजरा होणार ह्याला महत्त्व जास्त असते. हॉटेल सुद्धा "ब्रँडेड" असावे लागते. अशा तशा ठिकाणी हे लोक शक्यतो जातच नाहीत.

तुमच्या मैत्रिणीला किंवा मित्राला थर्टीफस्ट साजरा करण्यापेक्षा त्या दिवशी आपण कसे दिसणार ह्याचे महत्त्व जास्त वाटत असेल आणि त्यासाठी बऱ्याच पार्लर आणि सॅलोनचे उंबरठे झिजवून झाले असतील तर त्याची किंवा तिची राशी आहे - वृषभ.

थर्टीफस्टला खाण्याचे प्लॅनिंग करत असतांना तिखट आणि चमचमीत नॉन व्हेज /चायनीज/थाई पदार्थ कुठे चांगले मिळतात ह्याची माहिती तुम्हांला देणारा मित्र आणि मैत्रिण म्हणजे साक्षात वृश्चिक राशीचा अवतार !!!

ज्या मैत्रिणीने माझा तर थर्टीफस्टचा प्लॅन फिक्स आहे,आम्ही गोव्याला जाणार आहोत असे ठामपणे सांगून तुम्हांला आठवडाभर भंडावून सोडले आहे आणि आयत्यावेळी ती जर तुमच्याबरोबर नवीन वर्ष साजरे करायला  आली तर समजा तिची राशी आहे - मिथुन.

थर्टीफस्ट साजरे करण्यात धनु राशीचा हात कोणीच पकडू शकत नाही. प्लॅन्स अगदी तयार असतात ह्यांच्याकडे. थर्टीफस्टसाठी नुसते डेस्टिनेशन सांगून हे गप्प बसत नाहीत. तिथे कसं जायचं ? तिथे खाण्यापिण्याची काय सोय असेल ? इतर काही करमणुकीचे कार्यक्रम करता येतील का ? अशी इत्यंभूत माहिती धनु शिवाय कोणी देऊ शकत नाही. ग्रुपमध्ये कोणी आढेवेढे घेत असले तर त्याला वठणीवर फक्त धनुच आणू शकते.

थर्टीफस्ट म्हणजे ३१ तारीख संध्याकाळ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत साजरा करण्याचा काळ. सिंह राशी ह्याला अपवाद आहे. ३१ तारखेलाच सुट्टी घेऊन छान थंड हवेच्या ठिकाणी जायचे. संपूर्ण दिवस मस्त मजेत घालवायचा. संध्याकाळी नवीन उत्साहाने मौज करायला तयार असणारी राशी म्हणजे - सिंह.

आळसावलेले डोळे आणि थर्टीफस्टचा फारसा उत्साह नसणारी राशी म्हणजे कुंभ. ह्या राशीला थर्टीफस्ट साजरा झालाच पाहिजे,हा ही हल्ली एक भारतीय सण (?) आहे ह्याच्याशी सोयरसुतक नसतं. कोणीतरी प्लॅन बनवलेला असतो आपण फक्त जायचं एवढंच ह्यांना माहीत.

प्लॅन्स बनवतांना सर्वात जास्त चिडचिड होत असलेली मैत्रिण म्हणजे मेष. तिला कुठलेच ठिकाण आवडत नाही. आधी नकारघंटा आणि चिडचिड - मेषेचा साक्षात प्रत्यय.

सेलेब्रेशनपेक्षाही संकल्पाला जास्त महत्त्व देणार. थर्टीफस्टपेक्षा १ तारखेपासून मी अमुक अमुक करणार असे ठरवलेले आहे, मी अमुक ठिकाणी जाणार, मी कामे कमी करून लाईफ एन्जॉय करणार अशी सांगणारी राशी म्हणजे मीन. ह्या राशीला वर्तमानकाळात वावरताच येत नाही. एकतर भूतकाळात फार रमतात किंवा भविष्याची स्वप्ने रंगवण्यात मग्न असतात. म्हणजे गेल्या वर्षी थर्टीफस्ट कसा झक्कास साजरा केला होता ...त्या आधीच्या वर्षी कशी मजा आली होती ह्यावर चर्चा करण्यात अगदी रंगून जातील.

काय पटतंय का मंडळी ?? हा राशींचा गंमतीचा भाग झाला. ह्या वर्षी तुम्ही तुमच्या मैत्रिणीची किंवा मित्राची राशी नक्की ओळखू शकाल.

अनुप्रिया देसाईREADERS ALL OVER THE WORLD