बुधवार, २४ जानेवारी, २०१८

वास्तूतील नकारात्मक ऊर्जा कशी कमी कराल ?


वास्तू संदर्भात अनेक लेख आणि पुस्तके उपलब्ध आहेत तरी सुद्धा वास्तूबद्दलचे प्रश्न आणि शंका मनात सतत वाटत असतात. वास्तूतील ऊर्जा कशी वाढवावी आणि तिला रिचार्ज कसे करावे ह्यांवर लिहिलेल्या लेखाला वाचकांचा छान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर वाचकांकडून 'वास्तूतील नकारात्मक ऊर्जा कशी कमी करावी ह्यांवर काही लिहा' अशी विनंती होत होती. आजचा लेख ह्याच विषयावर आहे. काही वेळेस आपण कळत नकळत ज्या गोष्टी वास्तूत ठेवतो त्याचा कालांतराने वास्तूवर सकारात्मक परिणाम होण्याऐवजी नकारात्मक परिणाम होत जातो. अशा कुठल्या वस्तू किंवा गोष्टी घरात असू नयेत आणि वास्तूतील गोष्टी कशा प्रकारच्या असाव्यात ह्यांवर काही टिप्स देण्याचा हा प्रयत्न -

१) मुख्य दरवाजा - घरात ऊर्जेचा प्रवेश होतो तो मुख्य दरवाजाने. ह्यामुळे मुख्यदरवाज्यासमोर अडथळे असू नयेत. अडथळे ह्याचा अर्थ खूप सामान असू नये. चपलांचा रॅक दरवाज्यात समोरच असू नये. काही व्यक्तिंना फुलांची आवड असल्याने मोठमोठया फुलदाण्या मुख्य दरवाज्यातच ठेवल्या जातात. ज्यांमुळे मुख्यदरवाजतून घरात प्रवेश करणे काही वेळेस अडचणीचे ठरते.

मुख्य दरवाजा मोठा असल्यास तेवढी अडचण येत नाही परंतु शहरात छोट्या घरांमुळे प्रवेशद्वार हे फार मोठे नसते. काही वेळेस घरात प्रवेश केल्यानंतर narrow passage असतो. अशा पॅसेज मध्ये फुलदाण्या ठेवूच नयेत. पॅसेजच्या भिंतीवर छान paintings करू शकता ज्यामुळे प्रवेश करताच मन प्रसन्न होईल. दरवाजावर फार गोष्टी असू नयेत. काही वास्तूत मुख्य दरवाज्यावर भरपूर प्रमाणात खोटी प्लॅस्टिकची फुले,विचित्र चित्रे असलेली मी पाहिली आहेत. असे असू नये. वास्तू शास्त्राप्रमाणे प्रवेशद्वार हे दोन्ही बाजूने उघडणारे असावे. परंतु दोन्ही बाजूने उघडणारे दार हे स्वतःचा बंगला असेल तरच शक्य आहे,शहरात तर बिल्डर्स जसं घर बांधून देतो त्यावरच सगळं विसंबून आहे. आणि मुख्य म्हणजे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो परंतु मुख्य प्रवेशद्वाराची साफसफाई विसरून जातो. कित्येक महिन्यांची धूळ साचलेली असते. सणासुदीला लावलेल्या फुलांचे तोरण कित्येक महिने तिथेच असल्याने 'Decompose' होण्यास सुरवात झालेली असते. हे सर्व साफ झाले पाहिजे. सकारत्मक ऊर्जा हवी असल्यास मुख्यद्वाराजवळील अडथळे असू नयेत आणि प्रसन्न प्रवेश असावा.

२) खिडक्या आणि पडदे - मुख्यद्वारातून जसा ऊर्जेचा प्रवेश होतो त्याच प्रमाणे हवा खेळती ठेवणे हे काम आहे खिडक्यांचे. वास्तूत योग्य प्रमाणात आणि योग्य उंचीच्या असलेल्या खिडक्या नकारात्मक उर्जेला थारा देत नाहीत. खिडक्या ह्या योग्य दिशेत मोठ्या असाव्यात. खिडक्यांचे गज (Grill ) योग्य प्रमाणात असावे. ज्यामुळे सूर्यप्रकाश आणि हवा वास्तूत खेळती राहील. ज्या घरात सूर्यप्रकाश व्यवस्थित प्रमाणात येत नाही त्या वास्तूत 'Dull' वाटते. अशा वास्तूत काही वेळ जरी व्यतीत केला तरी डोके जड होणे,मळमळणे असे वाटू शकते. जर खिडक्या योग्य प्रमाणात नसतील किंवा सूर्य प्रकाश घरात फार वेळ राहत नसेल अशा वास्तूत 'Light Arrangement' व्यवस्थित असावी. गरज असल्यास 'Air Cooler' ठेवून हवा खेळती राहील ह्यांवर लक्ष्य द्यावे.

बऱ्याच वास्तूत मी पडद्यांचा विचित्र रंग पाहिला आहे. पडद्यांसाठी काळा रंग हा वास्तूत वापरूच नये. जर वास्तूत सूर्यप्रकाश योग्य प्रमाणात नसेल तर काळा किंवा गडद (Dark) रंग टाळलेलाच बरा ! हलक्या रंगाचे पडदे, भिंतीच्या रंगला साजेसा रंग निवडावा. ज्यामुळे नकारात्मक उर्जेला थारा उरणार नाही.

३) खेळती हवा - वास्तूत हवा खेळती असावी. व्हेंटिलेशन व्यवस्थित असले पाहिजे. जर खिडक्या कमी असल्या तरी जितक्या खिडक्या आहेत त्या बंद असू नयेत. काही वेळेस जातकांची तक्रार ही असते की खिडक्या उघड्या ठेवल्या की बाहेरची धूळ घरात येते वगैरे वगैरे. असा वेळेस पूर्णवेळ खिडक्या बंद न ठेवता काही वेळापुरत्या खिडक्या उघडाव्यात. मुख्य दरवाजा उघडावा. ज्यामुळे हवा खेळती राहण्यास मदत होईल. सततच्या बंद खिडक्या आणि दरवाजा ह्यामुळे वास्तूतील हवा दमकट होते. अशा वास्तूत एक प्रकारची दुर्गंधी येण्यास सुरवात होते. त्यामुळे हवा खेळती असण्याकडे लक्ष्य द्या. वास्तू नेहेमीच सुगंधाने दरवळली पाहिजे. कृत्रिम Freshener पेक्षा आपल्याकडे भारतीय आणि पारंपरिक बरेच उपाय आहेत. शेणाच्या गोवऱ्यांच्या वापराने वास्तूतील दुर्गंधी तर जाईलच परंतु नकारात्मक ऊर्जा आणि कीटक/डास ह्यांचा होणारा प्रादूर्भाव थांबेल. शेणाच्या गोवऱ्या वापरणे शक्य नसेल तर पाण्यात जाई-जुईच्या अत्तराचे चार -पाच थेंब घालून संपूर्ण घरात हे अत्तर शिंपडावे. दुर्गंधी नाहीशी होईल. आणि वास्तूत एक नैसर्गिक सुवास दरवळत राहील. वास्तूत धूप घालणे,अग्निहोत्र करणे ह्यामुळे बऱ्याच जातकांना फायदा झालेला आहे. तुम्ही सुद्धा अनुभव घेऊ शकता.

४) पुनर्रचना/ Rearrangement  - काहीवेळेस वास्तूत ठेवलेल्या वस्तू जसे सोफा,खुर्च्या,टी.व्ही.,टेबल ह्या वर्षानुवर्षे एकाच जागी असल्याने घरात वावरणाऱ्या व्यक्तिंना सुद्धा मग कंटाळा येऊ लागतो. अशा वेळेस वास्तूत फेररचना करू शकतो, ज्यामुळे वास्तू अजून प्रसन्न वाटेल.५) वस्तूंची साठवण - भारतीय लोकांना असलेली एक सवय म्हणजे - जिथे फिरायला जातील तिथून भरपूर वास्तू आणणे आणि घरात साठवून ठेवणे. त्या वस्तूंची कालांतराने काळजी घेतली न गेल्यामुळे त्या वस्तू तशाच पडून राहतात. तुम्हीच तपासून पहा. तुमच्या शोकेस मध्ये अशा किती वस्तू आहेत ज्यांना तुम्ही वर्षानुवर्षे शोकेसमधून बाहेरच काढलेलं नसेल. ज्याचा तुम्हांलाच विसर पडलेला असतो. अशा वापरात नसलेल्या वस्तूंचा निचरा लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. बंद पडलेली घड्याळे,धूळ खात असलेली पुस्तके,शो-पिसेस, फुलदाण्या,वापरात नसलेली शेगडी,स्टोव्ह अशा वस्तुंनी वास्तूतील ऊर्जा 'Drain' होते. त्यामुळे अशा वस्तूंचा निकाल लवकरात लवकर लावणे. तुमच्या वास्तूतील ऊर्जेसाठी ह्या बंद आणि धूळ खात असलेल्या वस्तू हानिकारक ठरतात.

६) मिठाचा प्रयोग - वास्तू होणारा जाड मिठाचा प्रयोग आता नवीन नाही. भारताबाहेरील प्रगत देशात जाड मिठाचा प्रयोग नकारत्मक ऊर्जा घालवण्यासाठी मोठं मोठे Therapistही सुचवू लागले आहेत. जाड मिठाचा प्रयोग भारतात बऱ्याच काळापासून सुरु आहे. नाकारत्मक ऊर्जा ह्या शब्दापेक्षा आपल्याकडे "नजर लागणे" हा शब्द प्रयोग जास्त वापरला गेला. नजर लागली असं म्हणत तुमच्या आईने -आजीने तुमची नजर जाड मिठाने बऱ्याचदा काढली आहे. असं केल्याने लगेच गुण येतो असा शिक्कामोर्तबही झालेला असतो. आपल्या आजीला नकारत्मक ऊर्जा वगैरे शब्दप्रयोग माहीत नव्हते.
जाड मिठाच्या वापराने फरक पडतो ह्यांवर तिचा ठाम विश्वास होता आणि आहे. हेच आपल्याला आजच्या काळात त्यामागचे शास्त्र समजून पाळायचे आहे. जाड मीठ पाण्यात घालून त्या पाण्याने फारशी पुसून घेणे,जाड मीठ आणि निलगिरीच्या तेलाचे काही थेंब पाण्यात घालून ते पाणी शिंपडल्याने वास्तूतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होण्यास मदत होते. ह्या बरोबरीने जाड मीठ चिनी मातीच्या वाडग्यात किंवा चक्क मातीच्या मोठ्या पणतीत ठेवून घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवल्यानेही चांगले परिणाम मिळतात. हे मीठ कधी बदलावे ?  - जर वास्तू फारच  Dull वाटत असेल तर ४८ तासांत मीठ बदलावे. वाडग्यातील मीठ टॉयलेट मध्ये flush करावे आणि नवीन मीठ वाडग्यात ठेवावे. नाहीतर दर १० -१२ दिवसांनी मीठ बदल्यास चालू शकेल. हा प्रयोग नक्की करून पहा.

७) रोपटी आणि फुलझाडे - वास्तूत खऱ्या रोपट्यांचा आणि छोट्या फुलझाडांचा वापर केल्यास वास्तू प्रसन्न वाटते. फक्त ह्याचा वापर करतांना डास आणि माशा ह्यांचा उपद्रव होणार नाही ना ह्याची काळजी घ्यावी.८) वास्तूतील चित्रे आणि फोटो  -
काही जातकांच्या घरी मी विचित्र अशी चित्रे आणि फोटो भिंतीवर पाहिली आहेत. रडणाऱ्या मुलाचे चित्र, दुःखी स्त्री,लढाईचा प्रसंग असलेले चित्र,डरकाळी फोडणारा सिंह किंवा वाघ - अशा चित्रांनी काय साध्य होते माहित नाही. आर्ट म्हणून ठीक आहे परंतु अशा चित्रांचा वास्तूतील वापर हानिकारकच ठरतो.


ह्या सर्व चित्रात दुःखाचा आणि रागाचा आवेग दिसून येतो. अशी चित्रे वास्तूत ठेवल्याने आपले लक्ष सतत अशा चित्रांकडे जाते. अशाच प्रकारचा स्वभाव आपला बदलत जातो. सिंहाचे चित्र असावे परंतु त्यातून 'Leadership Quality' झळकावी. स्त्रीचे चित्र जरूर असावे परंतु त्यातून तिच्या आनंदाच्या लहरींचे कंपन असावे, मुलाचे चित्र असावे असे ज्यातून त्याचा नटखटपणा,खेळकरपणा आणि निरागसता झळकावी. आणि म्हणूनच कृष्ण आणि यशोदेचे चित्र लावण्याची प्रथा असावी. नक्की विचार करा. तुम्हांला कुठल्या प्रकारची ऊर्जा हवी ते ठरवून चित्र निवडावे. 

९) भिंतीचा रंग - हल्ली भिंतींवर रंगसंगतीचा वापर चांगल्या प्रकारे केला जाऊ शकतो. गडद रंगाचा वापर करताना कुठल्या भिंतीवर हा प्रयोग करीत आहोत ह्याची काळजी घ्यावी. गडद रंग वापरतांना हलक्या रंगाचाही प्रयोग करावा. अशा खोलीत प्रकाश भरपूर असावा अथवा गडद रंगामुळे खोली लहान असल्याचा भास होतो.  

१०) घड्याळ - मुंबईत तर प्रत्येक खोलीत घड्याळ असणे अनिवार्य आहे. घड्याळावरच आपुले जीवन! वास्तूत घड्याळ शक्यतो पूर्व-पश्चिम किंवा उत्तरेच्या भिंतीवर असावे. वास्तू -व्हिजिटला गेल्यावर मला वेगवेगळ्या आणि विचित्र प्रकारची घड्याळे असू शकतात हे लक्षात आले. घड्याळ नेहमी 'काळ' दाखवतो. त्यामुळे घड्याळाची निवडही महत्त्वाची ठरते. ह्या बरोबर मी काही फोटो देत आहे. ह्या फोटोत दाखवलेली घड्याळे तुम्ही तुमच्या वास्तूत ठेवणे म्हणजे नकारत्मक उर्जेला आमंत्रण आहे. 


वर दिलेल्या सूचना आणि टिप्सचा वापर करून तुम्हांला तुमच्या वास्तूतील नकारत्मक ऊर्जा नाहीशी करण्यात नक्कीच मदत होईल अशी आशा आहे. 

प्रतिक्रिया नक्की कळवा. 
अनुप्रिया देसाई 
९८१९०२१११९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

READERS ALL OVER THE WORLD