गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१९

राजकारणातील यश आणि कुंडली

राजकारणात यश मिळेल का ? 

सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. माझ्याकडे येणाऱ्या जातकांपैकी बरेच जण मला राजकारणात यश आहे का ? मी राजकारणात जाऊ का ? माझे बरेचसे मित्र राजकारणात आहेत. मलाही जावेसे वाटतेय. मला निवडणुकीत तिकीट मिळेल का पासून ते मी निवडणूक जिंकेन का ? हे प्रश्न विचारले जात आहेत. काही जण ह्यात यशस्वी ठरतात तर काही जणांना हार मानावी लागते. मुळात कुंडलीत जर राजकारणात यश हा योग असेल तर तुम्हांला दिल्ली गाठायला वेळ लागणार नाही. काही वेळेस दिग्गज नेते निवडणुकीत हरतात तर राजकारणात नवखी असलेली व्यक्ति बाजी मारून जाते.
तुमच्या कुंडलीत जर राजकारणात यश मिळणारे योग असतील तर तुम्ही राजकारणात यश संपादन कराल. राजकारणात यशस्वी होण्यासाठी मुख्यत्वे रवि,शनि,मंगळ,राहू आणि बुध ह्या ग्रहांची साथ हवी. ह्या ग्रहांबरोबरच लग्न स्थान,दशम स्थान,षष्ठ स्थान,पराक्रम स्थान,अष्टम आणि लाभ स्थान ह्याची जोड असावी. स्थान आणि ग्रह ह्याच बरोबरीने सिंह,मेष,वृश्चिक राशी ह्यांचा प्रभाव मोठमोठ्या राजकारण्यांच्या कुंडलीतून दिसून येतो.

रवि - रवि म्हणजेच सूर्य. आपल्या ग्रहमालेतील महत्त्वाचा तारा म्हणजे सूर्य. सर्व ग्रह सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे सूर्य भोवती फिरतात ज्यामुळे ग्रहमाला स्वतःचे कार्य कुशलतेने करू शकते. थोडक्यात हा सूर्य "Leadership" चे कार्य करीत आहे. रवि म्हणजे नेतृत्व. नेता हा पक्षाचे नेतृत्व करीत असतो. हे नेतृत्व करणे तेवढे सोपे नाही. सर्वांचे ऐकून,सर्वांना सांभाळून घेऊन, सर्वांकडून कार्य करवून घेणे,महत्त्वाचे निर्णय घेणे,दूरदृष्टी ठेवणे आणि पक्ष चालवणे हे येड्यागबाळ्याचे काम नाही. नेतृत्व गुण नसतील तर असे कित्येक राजकारणी आले आणि तसेच गेले. सर्वांना धरून ठेवण्याचे कसब हे हवेच. हे फक्त रविच करू शकतो. तुमच्या कुंडलीत रविचे स्थान,राशी बलवत्तर असावे. हाच रवी जेंव्हा राजकारण्यांच्या कुंडलीत तपासला तेंव्हा तो कधी लग्नात (तनु स्थानात ),दशमेश किंवा दशमवर दृष्टी असणारा,कधी स्वतः लाभ स्थानात किंवा लाभावर दृष्टी असणारा आढळला. आज मी विविध पक्षातील माननीय राजकारण्यांच्या कुंडलीतून हे मुद्दे तुमच्या समोर मांडणार आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे,शरद पवारजी,पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी आणि अरविंद केजरीवाल ह्यांच्या कुंडल्या मी इथे नमूद करीत आहे.
माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या कुंडलीत रविची पंचम स्थानातून लाभ स्थानावर दृष्टी आहे. Leadership Qualities निश्चितच आहेत. रवि हा शनिच्या मकर राशीत आहे. दीर्घकाळ चालणारा पक्ष. शरद पवारांच्या कुंडलीत रवि दशमेश असून लग्न स्थानात मंगळाच्या वृश्चिक राशीत आहे. नरेंद्र मोदींच्या कुंडलीत रवि दशमेश असून लाभ स्थानात आहे तर सोनियांच्या कुंडलीत रवि मंगळाच्या वृश्चिक राशीत असून त्याची लाभ स्थानावर दृष्टी आहे. अरविंद केजरीवालांच्या कुंडलीत रवि स्वतःच्याच सिंह राशीत असून त्याची दशमावर दृष्टी आहे.

शनि - रवि खालोखाल दुसरा बलवान ग्रह असावा शनि. शनि म्हणजे सातत्य. शनि म्हणजे चिकाटी. शनि हा कष्टाळु आहे. दीर्घकाळ चालत आलेल्या गोष्टींचे प्रतिनिधित्त्व शनि करतो. पक्ष स्थापन करणे सोपे आहे तो पक्ष दीर्घकाळ राजकारणात टिकवून ठेवणं सोपे नाही. असा शनि तुमच्या कुंडलीत असेल तर सातत्याने एक पक्ष चालवणे, चिकाटीने-नेटाने एखादे कार्य करणे सोपे होते. तुमच्यातच जर धरसोड वृत्ती असेल तर तुमच्या कार्यकर्त्यांच्या मनातही संभ्रम निर्माण होईल. त्यामुळे शनि बलवान हवाच.
बाळासाहेबांच्या कुंडलीत शनि पराक्रम स्थानात असून दशमेश बुधावर शनिची दृष्टी आहे. नरेंद्र मोदींच्या कुंडलीत शनि दशमात आहे. शरद पवारांच्या कुंडलीत षष्ठातल्या शनिची लग्नेश मंगळावर दृष्टी आहे. सोनिया गांधींच्या कुंडलीत शनि लग्न स्थानातच तर केजरीवालांच्या कुंडलीत शनि षष्ठ स्थानावर दृष्टी आहे.

मंगळ - मंगळ म्हणजे Strength. मंगळ म्हणजे तडफदारपणा. लाजणे,भिडस्तपणा,लाडिकवाळ बोलणे हे मंगळाला आवडत नाही. मंगळाचे बोलणे म्हणजे एक घाव दोन तुकडे. मंगळ म्हणजे निडरपणा. तुम्ही चुकीचे वागलात हे तुम्हांला फक्त मंगळ व्यक्तिच सांगू शकते. त्यावेळी तुमचा हुद्दा -वय ह्या सर्वांचा मंगळप्रधान व्यक्ति विचार करीत नाहीत. पक्षाचा नेताही असाच असावा. निडर. पक्षाच्या नेत्यांना धमकीवजा बरेच फोन/संदेश येत असतात. ही धमकी कधी विरोधी पक्षाकडून असू शकते किंवा अंडरवर्ल्डकडून. परंतू आपले कार्य आपण निडरपणे करत राहणार तो म्हणजे मंगळ. अशा मंगळाची साथ कुंडलीला जरूर हवी.
बाळासाहेब ठाकरेंच्या कुंडलीत मंगळ मेषेचा (स्वराशीचा) आणि तो ही अष्टमात. अष्टमातून लाभ आणि पराक्रम स्थानावर दृष्टी. कुंडलीत मंगळाची अशी स्थिती नसती तर ते नवलच होते. मंगळ जेंव्हा अष्टमात असतो किंवा त्याची दृष्टी अष्टमावर तेंव्हा ती व्यक्ति निडर असतेच परंतु risk घेण्यासही मागेपुढे पाहत नाही. बाळासाहेब अत्यंत निडर असे व्यक्तिमत्त्व. आपल्या भाषणात मोठंमोठ्या नेत्यांबद्दल बोलतांना ते कधीही कचरले नाहीत. किंबहुना बाकी नेत्यांवर बाळासाहेबांचे दडपण असायचे. बाळासाहेबांचा दराराच तसा होता. बाळासाहेबांचा शब्द म्हणजे शब्द असायचा. पंतप्रधान मोदींच्या कुंडलीत हा मंगळ वुश्चिकेचा  (स्वराशीचा) चंद्राबरोबर असून लग्न स्थानात आहे. मंगळाची दृष्टी सप्तमावर आणि अष्टमावर आहेच. त्यांचा दराराही आहेच. पवारांच्या कुंडलीत मंगळ लग्नेश असून व्ययात आहे. व्ययातून षष्ठ स्थानावर,चंद्र,गुरु आणि शनिवर दृष्टी. षष्ठ स्थान हे सातत्याने कार्य करण्याचे स्थान. त्यांची कार्यपद्धती सर्वांना ज्ञात आहेच. सोनियाजींच्या कुंडलीत मंगळ हा षष्ठ स्थानात धनु राशीचा आहे. षष्ठ स्थान स्थानातून व्ययात असलेल्या चंद्रावर आणि लग्नातील शनिवर दृष्टी. राजीव गांधींच्या मृत्यूनंतर राजकारणात प्रवेश केला. त्या राजकारणात चुकीचं वागल्या की बरोबर हा ज्योतिषशास्त्राचा मुद्दा आता नाही. विदेशात आपले स्थान निर्माण करणे सोपे नव्हते. हिंदी भाषेचा गंध नव्हता. हिंदी भाषा चिकाटीने शिकून घेतली. पेहरावात बदल केला. त्यांचाही दरारा पक्षात आहेच. केजरीवालांच्या कुंडलीत कर्केचा मंगळ पराक्रम स्थानात आहे. मंगळाची दृष्टी दशम स्थानावर आहेच. दशम स्थान हे राजकारण्यांसाठी महत्त्वाचे. पक्षाचे नेतृत्व जरी करीत असले तरी त्यांचा दरारा आहे असं म्हणता येणार नाही.

राहू - जनसामान्यांसाठी राहू म्हणजे वाईट फळे देणारा. खरंतर तसं नाही. राजकारणी व्यक्ति,फिल्म -सीरिअल इंडस्ट्रीतील व्यक्ति इ. व्यक्तिंच्या कुंडलीत राहू सुस्थित असल्यास प्रगती लवकर होते. राहू म्हणजे प्रभाव. आपल्या बोलण्याने लोकांवर प्रभाव टाकणे हे काम राहूचे. ज्यांच्या कुंडलीत राहू बलवान अशा व्यक्तिंचा जनसागरावर लगेचच प्रभाव पडतो. त्यांचे Followers सुद्धा जास्त असतात.
बाळासाहेब ठाकरेंच्या कुंडलीत दशमात मिथुन राशीचा. दशम स्थान हे राजकारणी व्यक्तिंसाठी महत्त्वाचे आहेच परंतु इथे मिथुन राशीतील राहू आहे. मिथुन राशी ही बोलण्याशी संलग्न आहे. मिश्कीलपणे बोलणे,हजरजबाबी असणे हे मिथुनेचे गुण. हिंदुहृदयसम्राट असलेले बाळासाहेबांना संपूर्ण महाराष्ट्रने भरभरून प्रेम दिलं. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी होणारी गर्दी,दसरा मेळावा म्हणजे राहूच्या प्रभावाची उत्तम उदाहरणे. मोदींच्या कुंडलीत हाच राहूची पंचमातून लाभ स्थानावर दृष्टी. गंमत म्हणजे शरद पवारांच्या,सोनियाजींच्या आणि केजरीवालांच्या कुंडलीत राहू स्वतः लाभ स्थानातच. म्हणजेच जनसागर आहेच पण त्याला दशमातल्या मिथुनेतल्या राहूची तोड नाही.

बुध - वरील सर्व ग्रहांबरोबरच बुध हा ग्रह सुद्धा राजकारणात प्रवेश करणार असाल तर सुस्थितीत, बलवान असावा. बुध म्हणजे बुद्धी. बुध म्हणजे तुमची सद्सदविवेकबुद्धी(Common Sense). कुठल्याही परिस्थिती सद्सदविवेकबुद्धीने चोखपणे निर्णय घ्यावे लागतात. हे कुंडलीत सुस्थित असलेल्या बुधामुळे शक्य आहे. बुध हा वाणीचा सुद्धा कारक ग्रह. तुम्ही प्रभावीपणे बोलू शकाल का ? हे कुंडलीतील बुधाच्या स्थितीवर अवलंबून आहे. तुमचे बोलणे लोकांपर्यंत पोहोचवणे हे बुधाचे कार्य. बोलतांना जीभ घसरणे हे कुंडलीतील बुधाची स्थिती काही चांगली नाही हे दर्शवते. असा बुध जेंव्हा रविच्या सान्निध्यात येतो तेंव्हा त्या व्यक्तिचे बोलणे अत्यंत प्रभावी असते. बहुतांश राजकारण्यांच्या कुंडलीत असा योग नसल्याने त्यांची भाषणे तेवढी प्रभावी ठरत नाहीत. बुध आणि रवि ह्यांची जेंव्हा अंशात्मक युती होते तेंव्हा त्याला "बुधादित्य योग" म्हटले जाते. हा योग असणाऱ्या व्यक्तिचे बोलणे प्रभावी असतेच. त्यांना संभाषणकाला चातुर्य नैसर्गिकरित्या असते. त्यांच्या बोलण्याची छाप जनसामान्य लोकांच्या मनावर लगेच पडते.
बाळासाहेबांच्या कुंडलीत असा "बुधादित्य योग" आहे. पंचम स्थानात हा योग असून लाभ स्थानावर दृष्टी आहे. मिश्कीलपणे बोलणे. बोलण्यातून लोकांवर छाप पाडणे,लोकांपर्यंत विषय प्रभावीपणे जाणे हे बाळासाहेबांच्या भाषणाचे वैशिष्ट्य. मोदींच्या कुंडलीत "बुधादित्य योग" लाभ स्थानातच आहे. पवारांच्या कुंडलीत हा योग नसला तरी रवि आणि बुध हे लग्न स्थानातच आहेत. (अंशात्मक युती नाही.)सोनियाजींच्या कुंडलीतसुद्धा हा योग नाही परंतु रवि आणि बुधाची पंचम स्थानातून लाभ स्थानावर दृष्टी आहे. त्यामुळे बोलणे फार प्रभावी नाही. लोकांवर छाप पडणारे तर नक्कीच नाही. मिश्कीलपणा Totally Absent. केजरीवालांच्या कुंडलीत बुधादित्य योग आहे. त्यांच्या राजकारणात येण्याआधीची भाषणे पाहिली तर लोकांवर त्यांचा पडणारा प्रभाव लक्षात येईल. लोकांची मनं त्यांनी तेंव्हा जिंकली खरी परंतु काही कारणामुळे लोकांच्या मनातील स्वतःचे स्थान त्यांना टिकवता आले नाही. ह्यावर अजून विश्लेषण करता येईल परंतु आपला आजचा हा विषय नाही.

तर वाचकांनो हे सर्व योग तुमच्या कुंडलीत असतील आणि योग्य महादशांचा लाभ मिळाला तर राजकारणात नुसताच प्रवेश नव्हे तर ह्या क्षेत्रात नक्कीच यशस्वी व्हाल आणि नावलौकिक मिळेल.

कसा वाटला आजचा लेख. जरूर कळवा.

अनुप्रिया देसाई (ज्योतिष वास्तू विशारद )
९८१९०२१११९
वेबसाईट - www.kpastrovastu.com
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

READERS ALL OVER THE WORLD