मंगळवार, ७ मे, २०१९

वास्तूतील पाण्याची टाकी




वास्तूतील पाण्याची टाकी


हा प्रश्न मला कित्येक जातक विचारतात की," वास्तूत पाण्याची टाकी कुठे असावी ?" त्याहून पुढे, ज्यांनी फक्त पुस्तके वाचून आणि इंटरनेटवरून वास्तूबद्दल ज्ञान संपादन केले आहे त्यांच्या मते ईशान्य ही पाण्याची टाकी बसवण्याची बेस्ट जागा. कारण ईशान्य ही तर जलतत्वाची दिशा आहे. त्या सर्वांसाठी आजचा लेख. 

दिवसेंदिवस पाण्याच्या टंचाईमुळे पाण्याची टाकी प्रत्येकाच्या घरी बसवावीच लागतेय. ज्यांचा प्लॉट आहे म्हणजेच बंगला आहे आणि जे फ्लॅटमध्ये राहत आहेत त्यांच्यासाठीही आजचा लेख उपयोगी ठरावा. त्याआधी वास्तूचे काही नियम समजून घेऊ -

वास्तुशास्त्र म्हणजे फार अवडंबर नसून,वास्तुशास्त्र म्हणजे वास्तूतील पाच तत्वांचा समतोल राखणे. ही पाच तत्वे - अग्नि,पृथ्वी,वायू,जल आणि आकाश. ह्या पाच तत्वांना वास्तूमध्ये ठरावीक असे स्थान आहे.

  • अग्नि - आग्नेय दिशा (South East)
  • जल - ईशान्य दिशा (North East)
  • पृथ्वी - नैऋत्य दिशा (South West )
  • वायू - वायव्य दिशा (North West)
  • आकाश - ब्रम्हस्थान (Center of the Vastu)
ईशान्य ही ईश तत्वाची दिशा म्हणजेच ईश्वराची दिशा.  ही दिशा सर्वात पवित्र आहे. वास्तुपुरुष मंडळानुसार इथे वास्तू पुरुषाचे डोक्याचा भाग येतो. ह्या दिशेत पवित्र आणि स्वच्छ गोष्टी असाव्यात आणि म्हणूनच ह्या दिशेत  देवघराची रचना असावी असे सांगितले गेले आहे. मुंबईत जागेअभावी इथे देवघर शक्य नसल्यास काही हरकत नाही परंतु ह्या दिशेत हलक्या वस्तू असल्यास बरे. तुमची बैठकीची खोली ह्या दिशेत येत असल्यास सोफा असावा. बेडरूम येत असल्यास आरसा असल्यास चांगले. (आरसा झाकलेलाच असावा ) स्वयंपाकघर आल्यास पाणी भरून ठेवण्यासाठी ही दिशा चांगली. ह्या दिशेत शक्यतो टॉयलेट्स असू नयेत. 

ह्या दिशेत पाणी असावे असे शास्त्रात लिहिले गेले आहे. त्यामुळे बऱ्याच जणांचा असा गैरसमज होतो की पाण्याची दिशा आहे तर पाण्याची टाकी चालू शकेल. ह्या दिशेत स्वयंपाकघर असल्यास हमखास ह्या दिशेत पाण्याची टाकी आढळून येते. परंतु शास्त्र खोलात अभ्यासल्यास असे लिहिले आहे की ईशान्य दिशेत पाणी असावे परंतु ते जमिनीखाली असावे. ह्या दिशेत पाण्याची टाकी जर जमिनीखाली असेल तर उत्तम. ज्यांचा प्लॉट आहे म्हणजेच बंगला आहे अर्थातच त्यांना हे सहज शक्य आहे. कारण ही टाकी बंगल्याच्या बाहेर ईशान्य दिशेत जमिनीखाली बसवता येऊ शकते. अशी बरीचशी उदाहरणे आहेत ज्यांच्या बंगल्याच्या बाहेर ईशान्य दिशेत मी पाण्याची टाकी जमिनीखाली असलेली पाहिली आहे. 

प्रश्न असतो फ्लॅटधारकांचा. फ्लॅटमध्ये जमिनीखाली टाकी बसवणे अशक्य. त्यामुळे गैरसमज हा आहे की हि टाकी स्वयंपाकघरातील माळ्यावर बसवली तरी चालेल म्हणून ईशान्य दिशेत माळा बनवून त्यावर ही टाकी बसवली जाते.  शक्यतो ह्या दिशेत उंचावर टाकी बसवणे निषिद्ध मानले गेले आहे. त्यामुळे मग टाकी बसवायची तर कुठे ? घरात पाण्याची टाकी ही माळ्यावर बसवायची असल्यास दक्षिण पश्चिम दिशा म्हणजेच नैऋत्य दिशा शास्त्रकारांनी अधिकृत सांगितलेली आहे. ज्यांना ह्या नैऋत्य दिशेत टाकी बसवणे शक्य आहे त्यांना ह्या दिशेचा असा उत्तम उपयोग करून घेता येऊ शकतो. 

मुंबईत प्रत्येक फ्लॅटमध्ये हे शक्य होइलच असे नाही. आधीच जागेची कमतरता त्यात स्वयंपाकघराला फार न्याय मिळालेलाच नसतो. गेल्या एका लेखात मी सांगितले होते की हल्ली जागेच्या अभावामुळे स्वयंपाकघर हे अगदी घराच्या पॅसेजमध्ये असते आणि जिथे मूळ किचन असावे तिथे लोकं बेडरूम बनवून घेतात. त्यामुळे अशावेळी  जिथे जागा मिळेल तिथे टाकी बसवावी लागते. अशा वेळी ह्याचे वाईट परिणाम मिळू नयेत ह्याकरिता वास्तुशास्त्राप्रमाणे  काही परिहार असू शकतो तो जाणकारांकडून नक्की समजून घ्या आणि तसे उपाय वास्तूत करून घ्या. कारण पंचतत्वांचा (अग्नि,पृथ्वी,वायू,जल,आकाश)balance बिघडल्यास वास्तूतील वातावरण बदलण्यास वेळ लागत नाही. 

वास्तूतील पाण्याची टाकी शास्त्राप्रमाणे कुठे असावी आणि कुठे नसावी ? जमिनीखाली आणि जमिनीवर ह्याबद्दलचा जनमानसांत जो गैरसमज आहे तो ह्या लेखाद्वारे निश्चितच राहणार नाही अशी मी अशा करते. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

READERS ALL OVER THE WORLD