सोमवार, १९ ऑक्टोबर, २०१५

वास्तू शांतीचे महत्त्व

वास्तू शांतीचे महत्त्व

वास्तुपुरुष नमस्तेस्तु भुशय्याभिरत प्रभो l 
मदगृहं धनधान्यादीनसमृरुद्धं कुरु सर्वदा ll





साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा. दसरयाच्या दिवशी सरस्वतीपूजन होतेच परंतु त्याच बरोबरीने शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या,लढाईसाठी वापरल्या जाणाऱ्या हत्यारांची पूजा करण्याची पद्धत आहे. आपल्या परंपरेत प्रत्येक वस्तू ही सजीव म्हणजेच त्यात जीव आहे ही भावना आहे. म्हणूनच नवीन वस्तू घरात आली की आपण औक्षण करतो आणि ती वस्तू आपल्याला लाभावी अशी प्रार्थना करतो. आपल्या संस्कृतीत प्रत्येक वस्तूची पूजा होतेच. मला आठवतेय लहानपणी जेंव्हा माझ्या शिक्षणाची सुरवात झाली तेंव्हा पाटीची पूजा करून त्यावर "श्री" असे आईने माझ्याकडून लिहून घेतले. अगदी आजच्या पिढीचे सांगायचे झाले तर संगणक जरी घरी आला तरी त्याची पूजा केल्याशिवाय तो सुरूही करत नाही. घरात नवीन फ्रीज येऊ दे,नवीन टी. वी. येऊ दे त्याची पूजा करूनच सुरवात होते. मग जेव्हा आपण नवीन वास्तूत प्रवेश करणार तेंव्हा त्या वास्तूची, तिथल्या वास्तू-पुरुषाची पूजा होणे, शांत होणे जरुरी आहे. 

कोणतेही बांधकाम सुरु करण्याआधी भूमिपूजन केले जाते. त्यांनतर इमारत उभी रहाते. त्या वास्तूत राहण्याआधी वास्तुशांत करण्याची पद्धत आहे. आपण ज्या वास्तूत राहतो त्या वास्तूशी आपले नकळतपणे एक भावनिक नाते जुळते. सुखदुखःच्या सर्व गोष्टींची साक्ष होत असते ती वास्तू. नोकरीवरून घरी परताना कधी एकदा घरी पोहोचतो असे वाटते. बाहेरगावी गेलो अगदी काश्मीरला गेलो आणि तिथे कितीही छान वाटले तरी आपले घर ते आपलेच घर. मग अशा वास्तूसाठी एक दिवस एक समारंभ(वास्तू शांत) तो ही आपल्या हिताचा करण्यास काय हरकत आहे. 

वास्तू हा शब्द "वस" ह्या शब्दापासून आला आहे.  “वस" हा संस्कृत भाषेतील धातू आहे याचा मराठीत अर्थ होतो वसणे, वास, निवास, वास्तव्य, वस्ती हे त्याचे समान अर्थी शब्द. पुराणात प्रजापती आणि उषा या दांपत्याला चार पुत्र होते. त्यातील सर्वात धाकटया पुत्राचे नाव होते वास्तोष्पती तथा गृहपती. पृथ्वी ही त्याची गृहस्वामिनी होय. स्वाभाविकच पृथ्वीवर निर्माण केलेल्या प्रत्येक वास्तूचा हा ‘ गृहपती ’ अथवा ‘ वास्तुपती ’ असतो, त्यालाच वास्तुपुरुष संबोधतात.

ज्याप्रमाणे मानवी शरीर हे ब्रम्हांडाची प्रतिकृती आहे. वास्तू पंचतत्वाच प्रतिक आहे.  अग्नि, पृथ्वी, वायू, जल आणि आकाश.



वास्तूला आठ दिशा आहेत  - पूर्व,पश्चिम,उत्तर,दक्षिण,ईशान्य,आग्नेय,वायव्य,नैऋत्य. ईशान्य दिशेत जलतत्व, आग्नेय दिशेत अग्नितत्व,वायव्य तत्वात वायूतत्व,नैऋत्य दिशेत पृथ्वी तत्व. ही सर्व तत्वे आपल्या शरीरातही आहेत.

वास्तूसंबंधी एक कथा सांगितली जाते ती अशी.. भगवान शंकराचं अंधकासुराशी ज्या वेळी युद्ध झालं त्या वेळी शंकराच्या घर्मबिंदूतून एक महाभूत निर्माण झालं. अंधकासुराचं रक्त प्राशन करूनही त्याची भूक शमली नाही आणि क्षुधातृप्तीसाठी त्याने घोर तप केले. त्या वेळी भगवान शंकरांनी त्याला असा वर दिला की, ‘वास्तुपुरुषाची पूजा करताना जो बलिभाग दिला जाईल, तो तुला अन्न म्हणून मिळेल आणि जे लोक वास्तुपुरुषाला बली न देता वास्तू उभारतील, ती वास्तूच तुझे भक्ष्य बनेल.’


वास्तुशांतीची सुरवात करताना प्रथम संकल्प, पुण्याहवाचनादी कृत्ये केल्यानंतर आचार्यपूजन करून पुढील कृत्ये त्याद्वारे केली जातात. देवतेच्या स्थापनेसाठी चौकोनी वेदी बनवून उत्तर वेदीच्या कोप-यावर लोखंडी खिळा ठोकतात. त्यावर भाताचा बळी ठेवतात. आग्नेयेस अग्नीची स्थापना करून घेतात. या सर्व रचनेला ‘वास्तुमंडल’ म्हणतात. ग्रहाचे आवाहन करून पूजन करतात. वेदीवर शिखी, पर्जन्य, जयंत इत्यादी ४५ देवतांचं आवाहन करतात. वास्तुपुरुषाच्या निरनिराळ्या अवयवांवर देवतांची स्थापना करायची असते. मध्यभागी वास्तुपुरुषाची प्रतिमा ठेवून इतर देवतेसह त्यांचं पूजन केलं जातं. प्रथम होमाच्या वेळी ग्रहाच्या समिधा, चरू, आज्य यांचे हवन करून वास्तुमंडल देवतेसाठी तीळ, पायस, आज्य यांच्या आहुत्या देण्यात येतात. त्याचप्रमाणे वास्तोस्पतीसुक्ताने वास्तुस्पतीसाठी बिल्वपत्राच्या आहुत्या देतात. प्रायश्चित्त होमानंतर सर्व देवतांना यथाविधी उडदासह चरूचा बली देतात. मग यजमान दाम्पत्यावर त्याच्या कुटुंबीयांसह ऋत्विज अभिषेक करतात. तिहेरी सूत घेऊन पवमान आणि रक्षान्घ ही सुक्ते म्हणतात. त्या घराभोवती ते गुंडाळताना यजमान आणि त्याची पत्नी दूध आणि पाणी यांची संततधार करतात.

वास्तुनिक्षेप आग्नेयेस करावा. तांब्याच्या लहान गड्डात यात सप्तधान्य, दही, भात, फुले, नदीतील शेवाळ ठेवून, वास्तूची प्रतिमा पालथी ठेवून (ईशान्येकडे मस्तक आणि नैऋत्येकडे पाय) तिचा नि:क्षेप करून प्रार्थना करावी. (वास्तुप्रतिमा ब्राह्मणास दान देऊ नये.)

हा विधी अत्यंत व्यवस्थित झाला पाहिजे. वास्तुशांती  एकदाच होते.  काहीवेळेस माझ्या पाहण्यात हे आले आहे की काही कुटुंबांना नवीन वास्तूत गेल्यावर लागलीच वास्तुशांत करणे जमत नाही. परंतु माझा सल्ला असा असेल की गणेशपूजन तरी करून घ्यावे मगच गृहप्रवेश करावा. त्यानंतर वर्षभराच्या आंत वास्तुशांत केलेली बरी. वास्तुशांत केल्यानंतर काही वर्षांनी उदकशांत,सप्तशतीचे पाठ घरी करून घ्यावेत.

ll वास्तू तथास्तु ll

 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

READERS ALL OVER THE WORLD