बुधवार, ७ जून, २०१७

ऑपरेशन ??? मुळीच नाही !!!

ऑपरेशन ??? मुळीच नाही !!!

रवींद्र ओव्हाळ म्हणून माझे एक जातक मित्र आहेत. ज्योतिष-शास्त्राची आवड असून स्वतः ज्योतिषशास्त्र शिकत आहेत.  त्यांचा २४ मे रोजी रात्री ९ वाजून ५५ मिनिटांनी फोन आला. त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या आरोहीचे  हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. निमित्त होते हाताला झालेली उष्णतेची फोड. त्या फोडीचे रूपांतर "Infection"मध्ये झाले आणि छोट्या आरोहीला हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागले. दोन -तीन दिवसानंतरही डॉक्टर नक्की काहीच सांगत नव्हते. आरोहीचा ताप उतरला होता. डॉक्टरांनी आरोहीच्या हाताचे ऑपरेशन करावे लागेल अशी शंका व्यक्त केली. जेमतेम दोन वर्षांची आरोही. तिचे हाताचे ऑपरेशन. आई-वडील खूप घाबरले. एक उष्णतेची फोड काय होते ..त्याचे इन्फेक्शन काय होते ...आणि आता ऑपरेशनशिवाय पर्याय नाही असे डॉक्टरांचे म्हणणे. डॉक्टरांनी आरोहीचा MRI रिपोर्ट्स काढून घ्या असे सांगितले. मग मात्र तिच्या आई -वडिलांची चिंता रवींद्रला पहावली नाही. त्यांनी लागलीच फोन करून मला सर्व परिस्थितीचा आढावा दिला. त्यांनी आरोहीचे जन्म-टिपणही मला दिले. रवींद्रला स्वतःचा ज्योतिष-शास्त्राचा अभ्यास असल्याने त्यांनी आरोहीच्या आई -वडिलांकडून के.पी. नंबरही घेतला. ( ज्योतिष शास्त्रात जर एखाद्या व्यक्तीला ठरावीक प्रश्नाचे उत्तर हवे असल्यास के. पी. नंबर ज्योतिषाला देऊन त्यावरून उत्तर काढता येते. ही एक पद्धत आहे )
मी तिची जन्मकुंडली तपासली. परंतु मी प्रश्न कुंडलीवर जास्त भर दिला. ह्याचे कारण एखादी व्यक्ती ठरविक वेळेला प्रश्न विचारते ती वेळ अचूक उत्तर देते असा माझा अनुभव आहे. त्यामुळे मी ९ वाजून ५५ मिनिटांची कुंडली मांडली.

धनु लग्नाची कुंडली. चंद्र पंचमात मेष राशीत. चंद्र पंचमात म्हणजेच प्रश्न किती मनापासून विचारला गेला आहे. पंचम स्थान हे मुलांशी निगडीत स्थान आहे. चंद्र भरणी म्हणजेच शुक्राच्या नक्षत्रात आणि शुक्र चतुर्थात उच्चीचा. कृष्णमूर्ती पद्धतीत रुलिंग प्लॅनेट्सना (शासक ग्रह ) महत्त्व फार. शासक ग्रह मांडले.

L -  गुरु - १०,१,४      चंद्र - ५,८
S -  शुक्र - ४,६,११     बुध - ५,७,१०
R -  मंगळ - ६,५,१२  मंगळ - ६,५,१२
D -  मंगळ ६,५,१२    मंगळ - ६,५,१२

कुठेही ऑपरेशनचे योग दिसत नव्हते. मात्र चंद्राचा अष्टम स्थानाशी संबंध येत असल्याने औषधोपचार चालू ठेवावे लागतील असे दिसते. आरोहीची मूळ कुंडली सुद्धा अभ्यासली. त्यातही अष्टम आणि षष्ठ स्थानाचा संबंध येत होता. याचाच अर्थ काही काळ तरी हा त्रास छोट्या आरोहीला सहन करावा लागेल परंतु औषधोपचाराने बरे वाटेल. आता पालकांचा पुढचा प्रश्न असतो - मग हॉस्पिटलमधून कधी घरी जाता येईल ? शासक ग्रहांवर नजर टाकली. गुरुवारी किंवा शुक्रवारी तिला घरी जाण्यास परवानगी मिळेल हे स्पष्ट दिसतेय. त्याप्रमाणे मी रवींद्रला फोन करून सांगितले की,

१) ऑपरेशनची गरज भासणार नाही.
२) औषधोपचार सुरु ठेवावे लागतील.
३) हॉस्पिटलमधून गुरुवारी किंवा शुक्रवारी घरी येऊ शकेल.

रवींद्रने उद्या MRI चे रिपोर्ट्स आल्यावर कळवतो असे म्हणून फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी मी सुद्धा कामाच्या ओघात विसरून गेले. रात्री रवींद्रचा मेसेज आला. रवींद्रने केलेला मेसेज म्हणजे ज्योतिष शास्त्रावर द्विगुणीत झालेला त्याचा विश्वास आहे. तो मेसेज इथे वाचकांसाठी देतेय - 

मॅडम,एक चांगली बातमी सांगायची होती..आरोहीचं ऑपरेशन करावं लागणार नाही..फक्त काही मेडिसीन आणि इंजेक्शनचा कोर्स करावा लागणार आहे निदान काही दिवस तरी..आणि तिचा MRI रिपोर्ट नॉर्मल आल्यामुळे तिला आज दुपारी हॉस्पिटलमधून घरी सोडलं...मी पण ९ वाजता घरी कामावरून आलो तेव्हा कळलं..फोन करणार होतो...पण घरी थोडं कामं होतं..म्हणून आता मेसेज करत आहे...पुन्हा एकदा कृष्णमूर्ती पद्धतीला सलाम...आणि तुम्ही गुरुवारी किंवा शुक्रवारी सोडतील ते सुद्धा भाकीत बरोबर आलं..


धन्यवाद..अगदी मनापासून...असंच मार्गदर्शन करत रहा..खूप खूप आभार 🙏🙏🙏

ज्योतिष -शास्त्राचा उपयोग फक्त लोकांना घाबरवण्याचा नसून त्यांना "टेंशन फ्री" करण्यासाठी आहे हा संदेश लोकांपर्यंत पोहोचावा हा ह्या लेखाचा उद्देश.

कसा वाटला हा लेख ? प्रतिक्रिया नक्की कळवा. 
सूचना - ह्या आणि अशा बऱ्याच केसेसचा मी माझ्या "ब्रम्हांडातील रत्ने" ह्या पुस्तकांत समावेश केलेला आहे. तुम्हांला हे पुस्तक हवे असल्यास इथे संपर्क साधावा - www.bookganga.com. इथे तुम्हांला पुस्तकांतील काही पाने वाचावयास मिळतील. ऑर्डर दिल्यास पुस्तक घरपोच मिळेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

READERS ALL OVER THE WORLD