रविवार, १८ जून, २०१७

वास्तूचे रिचार्जिंग

वास्तूचे रिचार्जिंग 

'वास्तूचे रिचार्जिंग' ऐकून वेगळं वाटलं असेल ना ? आज जरा वास्तूबद्दल समजून घेऊ. मला आपल्या भारतीय संस्कृतीचा खूप अभिमान वाटतो कारण आपल्या संस्कृतीत प्रत्येक नवीन गोष्टींची पूजा केली जाते. नवीन जमीन घेतली की "भूमी पूजन" केले जाते. त्याच जमिनीवर जेंव्हा आम्ही स्वतःची वास्तू बांधतो तेंव्हा त्या वास्तूचीही पूजा केली जाते. अगदी घरात नवीन कॉम्पुटर आणला तरी त्याची पूजा केल्याशिवाय आम्ही तो सुरूही करत नाही. नवीन गाडी मुहुर्तावरच घेतो. काही श्रद्धाळू मंडळी तर गाडी ताब्यात घेतल्यानंतर आधी आपल्या इष्ट देवतेच्या दर्शनासाठी जातात मग रोजच्या व्यवहारासाठी गाडी वापरली जाते.

परंतु जेंव्हा ह्याच कॉम्प्युटरमध्ये कालांतराने काही बिघाड होतो मग त्याची दुरुस्ती करून घ्यावी लागते किंवा कॉम्प्युटरला मेंटेन करावे लागते असं म्हणूया. गाडीलाही कालांतराने मेन्टेन्सची गरज असते. चांगल्या स्वरूपातील गाडी ऍव्हरेजही चांगले देते. मोबाईल तर हल्ली काळाची गरज आहे. मोबाईलच्या बॅटरीचे रिचार्जिंग तर सतत करावे लागते. आता "Power Banks" ही नवीन मशीन आली आहे त्यामुळे प्रवासातही मोबाईलला रिचार्जिंग करता येउ शकते. ह्या तर सगळ्या मशिन्स झाल्या. परंतु प्राणी,झाडे आपण मनुष्य ह्या सर्वांनाच कालांतराने गरज भासते ती म्हणजे नव्या ऊर्जेची. आणि ह्यासाठी आपण झाडांना उत्कृष्ट दर्जाचे खत पुरवतो,कीड लागू नये म्हणून कीटक-नाशकाची फवारणी करतो. मनुष्य जेंव्हा रोजच्या धकाधकीच्या धावपळीमुळे थकतो आणि त्याला नव्या ऊर्जेची गरज भासते तेंव्हा तो नेहेमीच्या कामातून सुट्टी घेऊन बाहेरगावी जातो. refresh होतो,recharge होतो आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरवात करतो.  थोडक्यात काय तर रिचार्जिंग हे मनुष्य,प्राणी,झाडे,मशिन्स ह्या सर्वांसाठीच खूप महत्त्वाचे आहे कारण रिचार्जिंगनंतर प्रत्येक गोष्टीची काम करण्याची क्षमता वाढते. पटतंय ना मंडळी ?

पण आपल्या रोजच्या धावपळीत आपण एका गोष्टीचे रिचार्जिंग करतंच नाही. आणि ती गोष्ट म्हणजे आपले घर,आपली वास्तू. कामावरून निघाल्यावर प्रत्येकाला ओढ लागते ती घरी पोहोचण्याची. इथे घर मोठे किंवा छोटे हा वाद नाही कारण घर कसेही असले तरी कधी एकदा आपण आपल्या घरी पोहोचतो असे प्रत्येकालाच वाटते. ह्याच घरात मोठे समारंभ झालेले असतात,लग्न,डोहाळेजेवण,बारशी इ. आणि ह्याच घराने मृत्यूही पाहिलेले असतात. आपले वाद,शोक,आनंद,प्रेम ह्या सर्वात आपण आपल्या घराला म्हणजेच वास्तूला नकळतपणे आपल्या सुख-दुःखात सामील करून घेत असतो आणि ह्या वास्तूवर ह्या सर्वांचा परिणाम होत असतो. वास्तूची ऊर्जा कमी होत जाते आणि त्याचा नकारत्मक परिणाम त्या वास्तूत राहणाऱ्या व्यक्तींवर होण्यास प्रारंभ होतो. मग वास्तूला गरज भासते ती 'रिचार्ज' करण्याची.

कारण तुम्ही म्हणाल आम्ही वास्तूची रंगरंगोटी तर आम्ही ठरावीक कालांतराने करतो. ही रंगरंगोटी, साफसफाई म्हणजे वास्तू मेंटेन केली असं म्हणू शकतो परंतु वास्तू रिचार्ज केली असं म्हणू शकत नाही. आता वास्तूचे रिचार्जिंग करायचे म्हणजे नक्की काय करायचे ? वास्तूचे रिचार्जिंग म्हणजे वास्तूमध्ये वर्षांनुवर्षे जमा झालेली नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी आणि सकारत्मक ऊर्जा प्रवाहित होण्यासाठी प्रयत्न करावेत. वास्तूच्या रिचार्जिंगसाठी अनेक उपाय आहेत. त्यातले प्रामुख्याने केले जाणारे उपाय म्हणजे -वास्तुशांत, उदकशांत, लघुरुद्र इ. वास्तुशांत आणि उदकशांत ह्या मध्ये जे मंत्रांचे उच्चारण केले जाते त्यामुळे वास्तूत तयार झालेल्या नकारात्मक ऊर्जेला थारा राहत नाही आणि वास्तू प्रफुल्लीत होऊन आपल्याला नवीन ऊर्जा देण्यास सक्षम बनते. आता वास्तुशांत आणि उदकशांत हे प्रत्येकाच्या खिशाला परवडण्यासारखे नाही. त्यासाठी इतरही उपाय आहेत. ज्यांना हे उपाय करता येऊ शकणार नाहीत त्यांनी रोज संध्याकाळी स्वतः रामरक्षेचा पाठ म्हणावा. ते शक्य नसेल तर हल्ली मोबाईल सर्वांकडेच असतो. मोबाईलवर रामरक्षा डाऊनलोड करून घ्या आणि रोज तिन्हीसांजेला वास्तूत सर्वांना ऐकू येईल इतपत परंतु हळू आवाजात ती ऐका. ते ही शक्य नसेल तर "हनुमान चालीसा" ऐकू शकता.( हनुमान चालीसा - ह्यांवर बोलण्यासारखे इतके आहे की त्यावर एखादा लेख होऊ शकेल. ) वास्तूतील जमीन खडे मिठाच्या पाण्याने दररोज पुसून घेतली तरी बऱ्याच प्रमाणात नकारत्मक ऊर्जा वास्तूमधून निघून जाण्यास मदत होते. (खडे मीठाबद्दल आता संशोधन झालेले असून बाहेरच्या प्रगत देशातुन खडे मिठाचा वापर नकारत्मक ऊर्जा निघून जाण्यासाठी वापर केला जातोय. ह्या संदर्भातील माहिती तुम्ही इंटरनेटवर तपासून पाहू शकता. )

वर नमूद केलेल्या गोष्टींचा अंमल केल्याने नकारात्मक ऊर्जा वास्तूमधून बाहेर जाण्यास नक्की मदत होईल परंतु वास्तूत सकारत्मक ऊर्जा पुन्हा प्रवाहित करण्यासाठी तुम्हांला जास्त प्रयत्नशील रहावे लागेल. त्यासाठी काय कराल ? त्यासाठी वास्तूत "Negative" बोलणे टाळा. पूर्वीच्या काळची मंडळी नेहेमी म्हणायची "वास्तू नेहेमी तथास्तु म्हणत असते".  तथास्तु म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होवो. म्हणूनच वास्तूत नेहेमी सकारत्मक बोलणे असावे. वास्तूतील हवा सतत प्रवाहित राहील अशी व्यवस्था करावी. आपल्या घरात तुळस असावी. तुळशीचे महत्त्व आयुर्वेदशास्त्रात नमूद केलेलेच आहेत. वास्तूच्या भिंतींचा रंग हा फार उग्र नसावा. थकून घरी आल्यानंतर वास्तूतील रंगसंगतीमुळे मनाला शांती आणि उभारी मिळेल असे रंग असावेत. घरात असलेल्या चित्रांना (पेन्टिंग्स) महत्त्व आहे. वास्तूत कुठले चित्र असावे आणि कुठले असू नये ह्या साठी वास्तू-शास्त्रात काही नियम सांगितले आहेत. परंतु माझे म्हणणे आहे की इतके काटेकोर नियम पाळण्यापेक्षा साधा नियम म्हणजे जे चित्र भिंतीवर लावणार असाल त्याने मन क्रोधीत न होता तुमचा उत्साह वाढेल असे असावे. आठवड्यातून एकदा तिन्ही सांजेला वास्तूत धूप करावा. वर्षातून एकदा तरी आपल्या वास्तूत एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करावे.  त्या तृप्त झालेल्या व्यक्तीकडून मिळणाऱ्या आशिर्वादाने ( Good Vibes ) वास्तूतील ऊर्जा सकारत्मक होते. 
एवढे साधे जरी उपाय तुम्ही केलेत तरी तुमची वास्तू रिचार्ज होईल. अशी रिचार्ज झालेली वास्तू स्वतः प्रसन्न असते आणि सतत प्रसन्नता परावर्तित करते. मग काय मंडळी तुमची वास्तू कधी रिचार्ज करताय ?

कसा वाटला हा लेख ? प्रतिक्रिया जरूर कळवा.

सूचना - ह्या आणि अशा बऱ्याच केसेस चा मी माझ्या "ब्रम्हांडातील रत्ने" ह्या पुस्तकांत समावेश केलेला आहे. तुम्हांला हे पुस्तक हवे असल्यास इथे संपर्क साधावा - www.bookganga.com. इथे तुम्हांला पुस्तकांतील काही पाने वाचावयास मिळतील. ऑर्डर दिल्यास पुस्तक घरपोच मिळेल.

अनुप्रिया देसाई
ज्योतिष आणि वास्तू विशारद
anupriyadesai@gmail.com    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

READERS ALL OVER THE WORLD