रविवार, १८ जून, २०१७

राहू - शिक्षण आणि करीअरचा बट्ट्याबोळ ? कि आशेचा किरण ?

राहू महादशा - शिक्षण आणि करीअरचा बट्ट्याबोळ ? कि आशेचा किरण ? 


परवा सौ. मोरेंचा फोन होता. मुलाच्या शिक्षणाबद्दल त्यांना कुंडली विवेचन हवे होते. भेटण्याचा दिवस आणि वेळ ठरवली. ठरवून दिलेल्या दिवशी सौ. मोरे मुलाला - गौरवला माझ्याकडे घेऊन आल्या. अत्यंत बेफिकिरीची छटा त्या मुलाच्या चेहेऱ्यावर होती. आईने आता कोणाकडे मला आणले आहे ? आता ह्या काय मला सांगणार ? असे भाव त्याच्या चेहेऱ्यावर होते. बाकीच्या पालकांप्रमाणे गौरवच्या आईनेही त्याच्याबद्दल तक्रारी करायला सुरवात केली - हा अजिबात अभ्यास करीत नाही. शाळेला दांड्या मारून मित्रांबरोबर भटकत असतो. सध्या गुटका खायला शिकलाय. गुटका आणि तंबाखु भरलेला असतो तोंडात. त्यांना तिथेच थांबवून मी त्यांना त्याच्या वडिलांबद्दल चौकशी केली. त्यांना विचारले की बाबांचाही धाक नाही का ? पालकांपैकी एकाच तरी धाक मुलांना असतो. ह्याचे वडील हा लहान असतांनाच वारले ह्या त्यांच्या बोलण्यावर मी निरुत्तर झाले. माझा संपूर्ण फोकस मी मुलाच्या कुंडलीवर घेतला.

कुंडली विवेचन - पारंपरिक पद्धतीने -:

१) मिथुन लग्नाची कुंडली. लग्न स्थानात गुरु आणि बुध अस्तंगत अवस्थेत. (अस्तंगत म्हणजे त्या ग्रहांची तुम्हांला परिणाम देण्याची क्षमता गमावून बसतात.) ह्या कुंडलीत बुद्धीचा कारक ग्रह बुध आणि ज्ञानाचा कारक ग्रह गुरु दोन्हीही अस्तंगत होते. त्यामुळे बुद्धी आणि शिक्षण ह्याचा अभाव जाणवतो. फक्त हेच ग्रह कारणीभूत आहेत असे नाही. ग्रह जेंव्हा अस्तंगत होतात तेंव्हा ते काही दिवसांसाठी अस्तंगत होतात. त्यामुळे त्या दिवसांत जन्म झालेल्या सगळ्यांच मुलांच्या पत्रिकेत हे ग्रह अस्तंगत असणार परंतु ह्याचा अर्थ असा नाही की त्या सर्वच मुलांना शैक्षणिक प्रगतीत अडथळे येतील. त्याला बाकीही कारणे असू शकतात. त्याचाही अभ्यास झाला पाहिजे.

२) तर गौरवच्या कुंडलीत हे ग्रह अस्तंगत होते ते ही बुधाच्या मिथुन राशीत. बुध हा ग्रह तुमचा "Common Sense"कसा आहे हे दर्शवितो. ह्या राशीतच दोन्ही ग्रह अस्तंगत. चतुर्थ स्थानातून प्राथमिक शिक्षण,संस्कार पहिले जातात. मिथुन लग्न असल्याने चतुर्थ स्थानात बुधाचीच कन्या राशी आली. म्हणजे तिथेही उजेड असणार हे उघड आहे. माझा मोर्चा मी नवम स्थानाकडे वळवला. प्राथमिक शिक्षणात असलेले अडथळे पहाता उच्च शिक्षण किंवा काही दुसऱ्या प्रकारचे प्रशिक्षण घेऊ शकेल का हे तपासणे जरुरी होते. 

३) नवमस्थानाचा अधिपती शनि आणि तो सुद्धा व्यय स्थानांत. त्याच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण काळातील दशा अभ्यासल्या. प्राथमिक शिक्षणासाठी दशा जरातरी Supportive होत्या परंतु माध्यमिक शिक्षण सुरु झाल्यानंतर मंगळाची दशा सुरु झाली. मंगळ व्यक्तीला अजून आक्रमक बनवतो. मंगळ ह्या पत्रिकेत आहे वक्री. आधीच अभ्यासाची फार आवड नसलेल्या गौरवाची मंगळाची दशा सुरु झाली होती. आता तो कोणाचेही ऐकण्यासाच्या मनःस्थितीत नव्हता. दहावीच्या वर्गात त्याची हजेरी जेमतेम होती. परंतु शाळेतील प्रत्येक शिक्षक आणि प्राध्यापकांना घरातील परिस्थिती माहिती असल्याने त्यांनी नेहेमीच गौरवला समजून घेतले. परंतु ह्याचा गौरवने गैरफायदा घेतला.त्याने दहावीच्या परीक्षेच्या आधी द्यावी लागणारी कुठलीही "Assignment" पूर्ण करून  दिली नाही. मग मात्र शाळेचा नाईलाज झाला. नियमांनुसार गौरवला परीक्षेला बसू दिले नाही. त्याचा गौरववर तरी काहीच परिणाम झाला नाही. त्या माऊलीला मात्र आपल्यानंतर ह्याचे काय होणार ही चिंता वाटू लागली.

ह्या सर्व कथा -कथनाबरोबर माझे गौरवच्या कुंडलीचे विवेचन सुरूच होते. 

कृष्णमूर्ती पद्धतीने केलेले विवेचन खालील प्रमाणे - :    

१) प्राथमिक शिक्षणासाठी चतुर्थाचा सबलॉर्ड राहू. राहू "पंचम" स्थानाचा कार्येश. राहू आहे राहूच्याच नक्षत्रात. म्हणजे पंचम स्थान चांगलेच ऍक्टिव्ह होते. म्हणजे सातत्याचा अभाव. 
२) प्राथमिक शिक्षणाच्या वेळेस चंद्राची महादशा सुरु झालेली. चंद्र स्वतः व्ययात. चंद्राची कर्क राशी कस्पप्रमाणे तृतीय  स्थानात. चंद्र तृतीय आणि व्यय स्थानाचा कार्येश. म्हणजे इथेही साहेबांनी अभ्यास केलेला दिसत नाही कारण एकाग्रता होण्यासाठी जी स्थाने जरुरी आहेत ती इथे ऍक्टिव्हच नाहीत. 
३) चंद्रानंतर आली मंगळ महादशा. मंगळ षष्ठ आणि व्यय स्थानाचा कार्येश. मंगळ बुधाच्या नक्षत्रात. बुध कस्पने व्यय स्थानात. त्यामुळे बुध व्यय स्थान,प्रथम स्थान,द्वितीय आणि पंचम स्थानांचा कार्येश. इथे तर अभ्यास करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ह्या महादशेतच गौरव व्यसनांच्या अधीन झालेला आहे. 
४) त्याच्या येणाऱ्या पुढच्या दशांवर मी लक्ष केंद्रित केले. जेंव्हा गौरव २१-२२ वर्षांचा होईल तेंव्हा राहू महादशा सुरु होणार आहे. राहू हा छाया ग्रह आहे. तो ज्या ग्रहाबरोबर असतो त्या ग्रहाचे चांगले गुणधर्म नष्ट करून टाकतो. राहू जर गुरु ग्रहाबरोबर असेल तर मुलांच्या शिक्षणात अतोनात अडथळे येतात. राहू जर बुधाबरोबर असेल तर खोटे बोलणे, नकली सह्या करणे, नकली कागदपत्रे बनविणे,इतरांच्या नकला करणे इ. गोष्टींमध्ये जातक एक्स्पर्ट होतो. दशेने साथ दिली नाही तर ह्या सर्व गोष्टींमध्ये कायद्याच्या कात्रीत सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गौरवच्या कुंडलीत सुरु होणारी राहूची महादशा म्हणजे ही व्यक्ती नोकरी करणार नाही हे नक्की होते. मग तो करणार काय ? 
ती माऊली तर फार अपेक्षेने माझ्याकडे बघत होती,की काहीतरी चांगली गोष्ट मुलाच्या आयुष्यात घडणार असेल. समोर असलेल्या जातकांना शक्यतो मी स्पष्टपणे जे जाणवते ते सांगते. कारण त्यामुळे त्या व्यक्तीची मानसिक तयारी होते आणि दुसऱ्या काही शक्यतांवर लक्ष केंद्रित करता येते. वरील सर्व गोष्टी गौरवच्या आईला स्पष्ट सांगण्याची गरज होती. म्हणून मी गौरवला थोड्या वेळेसाठी बाजूच्या खोलीत बसण्यास सांगितले. सौ. मोरेंना गौरवच्या शिक्षणाबद्दल सगळी कल्पना दिली. पुढे तो फार शिकणार नाही परंतु आपण त्याला तसे न सांगता किमान बारावी पर्यंतचे तरी शिक्षण पूर्ण करून घेता आले तर त्यासाठी प्रयत्न करावेत. गौरवच्या शुक्राच्या कार्येशत्ववरून त्याला कुठल्याही प्रकारच्या "Musical Instrument " ची आवड आहे का ? हे विचारल्यानंतर गौरवला गिटार वाजवण्याची आवड असल्याने तो सध्या गिटारच्या क्लासला जातो, ही माहिती मिळाली. त्याने त्याची ही आवड कायम ठेवावी हे सांगितले. गौरवच्या पुढील दशा पहाता तो नोकरी तर करणार नाही. कारण सातत्य दिसत नाही. परंतु द्वितीय स्थान बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह दिसत असल्याने अर्थार्जन तर होणार आहे. परंतु अर्थार्जन कसे ? तर त्याचे उत्तर महादशेतच लपलेले आहे असे मला वाटते. राहू हा "Corruption" चा कारक आहे. राहू हा राहूच्याच नक्षत्रात असून बुधाच्या सबमध्ये आहे. बुध हा कागदपत्रांचा कारक आहे आणि राहू "Corruption" चा. त्यामुळे पुढे गौरव कागदपत्रांची देवाणघेवाण आणि त्यातून कमावलेले कमिशन (Commission  Based Income - बुध ) हीच गौरवाची कमाई. त्यामुळे पुढील आयुष्यात तो आर्थिकदृष्ट्या नक्कीच स्वावलंबी असेल. त्यामुळे पालकांची जी मुळात काळजी असते कीआमच्या पश्चात्त आमचे मुलं आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल ना ? ती काळजी सौ. मोरेंची सध्यातरी कमी झाली होती. 

हे सर्व सांगितल्यानंतर सौ. मोरेंना अश्रू आवरले नाही. त्या म्हणाल्या," मला तुम्हांला प्रामाणिकपणे काही सांगायचे आहे. मी आतापर्यंत बऱ्याच ज्योतिषांकडे गेले आहे. गौरवच्याच कुंडलीकरिता. त्याचीच सतत काळजी असते मला. त्याच्याबद्दल मला आतापर्यंत सर्व ज्योतिषांनी खूप वाईट वाईट सांगितले होते. हा मुलगा वाया जाणार आहे. काहीही कमवणार नाही. ह्याचं आयुष्यात काही होऊ शकत नाही. त्यामुळे माझी स्वतःची सतत चिचिड होत असते. सध्या मी त्याला माझ्याबरोबर ऑफिसलाही घेऊन जाते. कारण तो घरी राहिला की मित्रांबरोबर जातो आणि दिवसभर बाहेर भटकत  रहातो. माझ्याबरोबर आला की व्यसनांपासूनही दूर रहातो आणि तिथे थोडा अभ्यासही होतो. आठवड्यातून दोन दिवस गिटारच्या क्लासला जातो. आता तुम्ही त्याच्या पुढच्या आयुष्याबद्दल थोडी कल्पना दिली आहे त्यामुळे मला खूप रीलॅक्सड वाटत आहे.आता मी अभ्यासासाठी त्याच्या सतत मागे लागणार नाही. मी आता स्वतः टेन्शन फ्री राहीन. मी तुम्हांला वेळोवेळी त्याच्या प्रगतीबद्दल सांगेनच." 

पारंपरिक पद्धतीने कुंडली पाहिल्यास सर्व वाईटच गोष्टी प्रथम दर्शनी दिसून येत आहेत परंतु कृष्णमूर्ती पद्धतीने पाहिल्यास आशेचा एक किरण दिसतोय. तोच धागा पकडून त्यांना त्याबाबत गौरवच्या पुढील आयुष्याबाबत सांगितले. गौरवच्या कुंडलीत "जेल योग" आहे का ते ही तपासून घेतले होते. तसे काही योग दिसले नसल्याने त्याची उगीच चर्चा करून त्यांना टेन्शन देण्यात अर्थ नव्हता. हे सर्व झाल्यानंतर गौरवला पुढील शिक्षण घेण्याबद्दल समजावून सांगितले. त्याने नुसतीच मान डोलावली. ज्योतिष -शास्त्रामुळे एका माऊलीला तणावमुक्त करण्यात यशस्वी ठरले. 


अनुप्रिया देसाई 
anupriyadesai@gmail.com


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

READERS ALL OVER THE WORLD